त्यांना भेटून 3 महिने झाले नंतर फोनवर काहीवेळा बोलणे झाले रोज लिहायचा विचार करत होतो , आपल्या मित्रमैत्रिणींनाही आपल्या जवळपास एवढी प्रेरणादायी व्यक्तीं आहे हे माहिती पडावे सोबतच ज्यांना माहित आहे त्यांच्याकडून त्यांच्याबद्दल अजून काही जाणून घेता यावे हा उद्देश होता पण रोज उद्यावर ढकलत होतो
शेवटी आज तोडके मोडके मांडूच म्हटल पहा समजतंय का
देणाऱ्याने देत जावे , घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे' अश्याच समाजाला भरभरून देणाऱ्या पद्मश्री #गणेश_देवी सरांशी काही दिवसांपूर्वी दक्षिणायन निमित्त धारवाड येथे 3 दिवस अनेक भेटी झाल्या. गप्पा, मार्गदर्शन आणि बरेच काही प्रेरणादायी अनुभव मिळाले. खूप नवीन गोष्टी शिकण्यास मिळाल्या.
एवढा मोठा माणूस पण त्याच्यात जरासाही अहंकार, attitude वा दुजेभाव नाही.
साहित्यिक, लेखक, कवी, आदिवासी विद्यापीठाचा शिल्पकार, जागतिक भाषातज्ञ आणि इतर बर्याच गोष्टी असणारे बहुआयामी व्यक्तिमत्व
त्यांच्या TV मुलाखतीनंतर आवटे सरांनी लिहिले होते
एक मराठी माणूस गुजरातेत तीन दशके राहतो. दोन भव्य संस्था उभ्या करतो. मनुष्यबळ, जमीन, इमारती, संरचना या सर्व अर्थाने मोठ्या संस्था.
आणि, वयाची साठी पूर्ण होताच, त्या संस्थेतील टाचणीही न घेता वानप्रस्थाश्रमासाठी धारवाडच्या दिशेने जातो, या माणसाला काय म्हणायचे?
आपल्याकडे अनेक सामाजिक असो व इतर कोणते ठिकाण त्याठिकाणी त्यांचीच नवी पिढी विराजमान होत असताना सर्व काही सोडणारा हा माणूस खरेच विश्वस्त वाटू लागतो. विश्वस्त... गांधींच्या विचारविश्वातला!
संदेश भंडारे सरांनीपण त्यांच्याबद्दल म.टा. मध्ये लिहिले होते कि
त्यांच्या ‘पीपल लिंग्विस्टिक सव्र्हे’चे अनेक खंड आता प्रकाशित होत आहेत.( People's Linguistic Survey of India in 2010, which has researched and documented 780 Living Indian Languages)या बहुमोल कामाव्यतिरिक्त त्यांचं आदिवासींच्या उत्थानासाठीचं कार्यही तितकंच अमूल्य व क्रांतदर्शी असंच आहे.
गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील कवाठ गावातुन आदिवासींकडून फक्त रताळी आणि बटाटय़ाच्या बदल्यात अमूल्य पांढरा डिंक घेणारे लबाड व्यापारी सर्रास आढळतात. इथं शोषित आदिवासींमध्ये आत्मभान जागवण्याचं देवींनी केलं आहे. गेल्या दहा वर्षांत त्यांनी आदिवासी अकादमीमध्ये दहावी-बारावी शिकलेल्या आदिवासी मुलांसाठी दहा महिन्यांचा कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग चालवला आहे. त्यातून या मुलांना विविध सरकारी योजनांचे लाभ आपल्या समाजाला कसे होतील, याचं भान त्यांनी दिलंय. त्याबरोबरच आरोग्य, शिक्षण, महिला बचत गट अशी कामंही उभी राहिली आहेत. त्यातून २४० पेक्षा जास्त तरुण कार्यकर्ते तयार झाले आहेत. हे सर्वजण आपापल्या गावात काम करतात. या सर्व गावांतून ग्रंथालय, बचत गट आणि विविध सरकारी योजनांचे लाभ पोहोचवले जात आहेत. दहा रुपयांत आरोग्य विमा, धान्य बँका, आरोग्य केंद्रे, लहान पाटबंधारे अशी जनसहभागातून उभी राहणारी कामं ते करवून घेत आहेत. त्याद्वारे बाराशे गावांतले लोक स्वयंपूर्ण होऊ लागले आहेत.
हे सर्व काम देवींच्या बरोबर पाहत असताना तिथल्या महिलांच्या अंगाखांद्यावर चांदीचे दागिने मोठय़ा प्रमाणावर दिसले होते. त्यांची पाश्र्वभूमी आणि माहिती देवींनी दिली. बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या हाती थेट पैसा येऊ लागल्याने आता त्यांना सावकाराकडे अतिशय कमी पैशाकरता दागिने गहाण ठेवण्याची वेळ येत नाही. देवींनी सांगितले, ‘हजारो वर्षांपासून या महिलांकडे परंपरेने हे दागिने आलेले आहेत. रोमच्या दरबारात दोन हजार वर्षांपूर्वीचा एक उल्लेख आहे की, ‘केवळ मसाले घेण्यासाठी इतक्या प्रमाणात चांदीचे दागिने तुम्ही का वाटता?’ अशी विचारणा रोमच्या व्यापाऱ्यांना करण्यात आली होती. रोमला हा व्यापार नर्मदासागरमार्गे चालायचा. तेव्हापासून आदिवासी महिलांकडे भरपूर दागिने होते. व्यापाऱ्यांना आदिवासी भागातून सुरक्षित येता यावं यासाठी चांदी वाटली जाई.
किलोत चांदी गहाण ठेवून त्यांच्या किरकोळ गरजा सावकारांकडून भागवल्या जात. असे आदिवासींचे शोषण सुरू होते. देवींच्या कामामुळे आदिवासींमध्ये केवळ आत्मभानच आले असे नाही, तर थेट हातात पैसाही आल्याने दागिने सावकाराकडे जायचं काही प्रमाणात थांबलंय. गेल्या पाच वर्षांत बचत गटांमुळे इथे सहा कोटी रुपयांची उलाढाल होऊ लागलीय.
आदिवासींच्या मुलांना शाळेत जायची संधी मिळत नाही. अशा १० ते १२ वयाच्या मुलांना निवडून त्यांना एक वर्ष मातृभाषेतून शिक्षण द्यायचं, नंतर त्यांना गुजरातीतून शिक्षण द्यायचं; ज्याद्वारे त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल! हा प्रयोग देवींनी राबवला. तोही त्यांच्या आदिवासी अकादमीद्वारे आश्रमशाळेच्या माध्यमातूनच राबविण्यात येत आहे.
आदिवासींबरोबरच छारानगर (गांधीनगर) इथल्या कंजारभाट जमातीसाठीही असंच काम देवींनी उभं केलंय. त्यातून ग्रंथालय, कौशल्यविकास आणि संगणक प्रशिक्षणही दिलं जातं. नाटक करू इच्छिणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देऊन ‘बुधन’ हा नाटय़प्रयोग बसवला गेला. तो राष्ट्रीय पातळीवर गाजला. बुधन हा आदिवासी बंगालमध्ये पोलिसी अत्याचाराला बळी पडला होता. त्याच्या जीवनावरील या प्रभावी नाटय़प्रयोगामुळे छारानगरमधले तरुण चक्क राष्ट्रीय नाटय़ विद्यालयापर्यंत पोहोचले. आपल्याकडच्या पारधी जमातीसारखाच छारा जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला गेलाय. देवींच्या प्रयत्नांमुळे या मुलांसाठी मीडिया स्कूल काढले गेले. तिथे शिकून आज एक मुलगा राष्ट्रीय इंग्रजी दैनिकात क्राइम रिपोर्टर आहे, तर तिघे एनएसडीतून पदवी घेऊन बाहेर पडलेत.
नर्मदेचं पाणी आदिवासी भागातून जातं. आदिवासींच्या दारातलं हे पाणी १०० कि.मी.वरील लोकांना पुरवलं जातं आणि आदिवासी मात्र कोरडाच राहतो. हे आदिवासी कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे मजूर म्हणून काम करतात. तेही अल्प मजुरीवर. ते ऊसतोडणीसाठी तसेच शहरात बांधकाम मजूर म्हणूनही जातात. तिथे ते आठ महिने राबतात. गणेश देवींना वाटतं की, त्यांच्या कामाचं साफल्य यातच आहे, की हे आदिवासी त्यांच्या घरासमोरून जाणाऱ्या पाण्यावर आपला हक्क सांगतील आणि आपल्या आयुष्यातली वेठबिगारीसदृश परवड स्वत:च संपवतील!
त्यांना त्यांच्या वानप्रस्थ पुस्तकासाठी Sahitya Akademi Award , त्यांच्या आदिवासी जमातीतील कार्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार ,SAARC Writers’ Foundation Award, तर इतिहास जतन तसेच गुजरात मधील दुर्मिळ भाषांच्या संवर्धनासाठी प्रतिष्ठेचा समजला जाणारा Prince Claus Award (2003) ही मिळाला आहे. त्यांच्या वानप्रस्थ पुस्तकाला दुर्गा भागवत पुरस्कार, महाराष्ट्र फौंडेशन पुरस्कार असे 6 पुरस्कार मिळाले आहेत महाश्वेतादेवी आणि लक्ष्मण गायकवाड यांच्यासोबत त्यांनी The Denotified and Nomadic Tribes Rights Action Group (DNT-RAG) ची स्थापना केली.
लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि freedom of expression वरील वाढते हल्ले आणि वाढत्या असहिष्णुतेच्या निषेधार्थ आपला साहित्य अकादमी पुरस्कार परत केला.
मुक्ती देते ती विद्या! देवी नेमके हेच करू पाहताहेत. महिला बचत गट असोत की गुन्हेगारी जमातीच्या तरुणांसाठीचं मीडिया स्कूल; गणेश देवी शोषितांना आत्मभान देण्याचं काम करताहेत, त्यांना स्वतंत्र करू पाहताहेत. हे केवळ सामाजिक वा सांस्कृतिक काम नाही, तर दीर्घकालीन राजकीय व्यवस्थाबदलाच्या दिशेने टाकलेले ते पाऊल आहे. म्हणूनच ते महत्त्वाचे आहे!
कार्यक्रमावेळी तसेच त्यांच्या घरीही त्यांचे आचरण मी पाहत होतो.त्यांचा प्रत्येक संदेश त्यांच्या कृतीतून दिसत होता वेळेचा काटेकोरपणा, समयसूचकता सोबतच कोणालाही दुय्यम न समजण्याची त्त्यांची वृत्ती सगळेच खूप काही शिकवुन जात होते .त्यांच्या अनेक प्रसिद्ध पुस्तकांपैकी वानप्रस्थ हे पुस्तक नक्की वाचा
संकेत मुनोत
8087446346
संदर्भ
1-"Ganesh Devy, the man who is out to map the world's linguistic diversity". The Economic Times. Retrieved 4 July 2016.
2-क्रांतपथिक डॉ. गणेश देवी (मराठी में , लोकसत्ता,संदेश भंडारे)
3-"Ganesh Devy returns his Sahitya Akademi award". The Times of India. TNN. 11 October 2015.
4-भाषाओं की क़ब्रगाह बन गया भारत (बीबीसी हिन्दी)
5-आवाज महाराष्ट्राचा गणेश देवी मुलाखत, साम टीव्ही
Facebook-https://m.facebook.com/story.php?story_fbid=1255021994548849&id=100001231821936