AddThis code

Thursday, March 28, 2019

आपल्या वाणी, आचरण व स्मित हास्याने सगळीकडे आंनद पसरवणारे आंनद गुरू

*आपल्या वाणी, आचरण व स्मित हास्याने सगळीकडे आंनद पसरवणारे आंनद गुरू*
*आचार्य आनंद ऋषीजी महाराज* यांचा आज स्मृती दिन
आनंद ऋषीजी , आंनद बाबा असेही त्यांना म्हटले जाते
  साधारणतः साधू म्हटले की आजच्या काळात आपल्या डोळ्यासमोर कुणीतरी तथाकथित *चमत्कारी पुरुष* किंवा *आपल्या धर्माचा आक्रस्ताळेपणाने प्रचार करणारी 'कट्टर' व्यक्ती* उभी राहते. आनंद ऋषींचे वेगळेपण येथेच आहे. त्यांनी चमत्कार आणि भोंदूपणाऐवजी आपल्या  *प्रवचनांतून आणि आचरणातून समाजसुधारणा, माणसांना जवळ आणण्याचा, सांप्रदायिकता कट्टर वाद कमी करण्याचा तळमळीने प्रयत्न* केला. ते जरी जैन धर्माचे आचार्य असले तरी त्यांनी आपली दृष्टी केवळ जैन धर्मापुरतीच संकुचित न ठेवता संपूर्ण समाजाला व्यापेल अशी विशाल ठेवली. आपल्या शिकवणुकीतूनही त्यांनी *प्रेम, सहिष्णुता, शांतता, अहिंसा, अनेकांतवाद* यांसारख्या मूल्यांचा प्रसार केला. त्यांच्या प्रेरणेतून उभे राहिलेले शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रातले प्रचंड कार्यही सर्व मानव जातीसाठी होते आणि आहे. त्यात जाती-धर्मावरून भेदभाव नव्हता. त्यामुळेच की काय, त्यांना मानणारे केवळ जैन धर्मीयच नव्हेत तर सर्वच जाती-धर्मांतील लाखो लोक आजही आहेत. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या दर्शनार्थ आनंदधामवर जमणारे हजारो सर्वसामान्य लोक याची साक्ष देतात. उदार दृष्टिकोन अंगीकारणारे आनंद ऋषी हे खऱ्या अर्थाने राष्ट्रसंत होते. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी त्यांचा *राष्ट्रसंत* म्हणून केलेला गौरव हा योग्यच होता.(संदर्भ-सन्मित्र गणेश भंडारी)
त्यांच्या प्रवचनात जैन शास्रसोबतच संत तुकारामांचे अभंग, कबीर दोहे, गांधीजींचे प्रसंग, कुराण आणि वेगवेगळ्या धर्मग्रंथातील व वर्तमानातील संदर्भ ही असत.
आजच त्यांनी लिहलेला एक प्रसंग वाचनात आला.
गांधीजीं आफ्रिकेतील तुरुंगात असतांना त्यांच्यासाठी  एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा क्रृर सेवक ठेवण्यात आला.(गांधीजी कुणी गुन्हेगार नसून एक राजकीय कैदी आणि तेथील पददलितांचे नेते होते त्यामुळे प्रोटोकॉल नुसार ते ठेवणे आवश्यक असावे). हा क्रूर सेवक गांधीजींशी अतिशय उद्धटपणे वागत असे पण गांधीजींनी त्याबद्दल कधीच तक्रार केली नाही. एकदा त्याला विषारी विंचू चावला आणि तो वेदनेने तडफडू लागला गांधीजींनी त्याच्या त्या भागाला चाकूने काप देऊन तोंडाने ते विष घेऊन थूकुन दिले आणि तिथे औषधी वनस्पतीचा लेप देऊन एक पट्टी बांधली काही क्षणात च त्याला आराम मिळाला त्या क्षणापासूनच तो त्यांचा नम्र सेवक आणि मित्र झाला. आंनदऋषीजी म्हणतात हे खरे पांडित्य आहे ज्यात विरोधी विषाला ही अमृतात परिवर्तन करण्याची शक्ती आहे
संत कबिरांनीही म्हटले आहे
*पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय,*
*ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय।*
(संदर्भ-आंनद प्रवचन -अष्टम भाग, पृष्ठ क्रं. १०९)
आज जेव्हा आपल्यासोबत काही वाईट घडते कोणी वाईट वागते तर आपण लगेच त्यांच्याप्रति वाईट होण्याऐवजी त्यांच्याप्रति वैरभाव ठेवण्याऐवजी हे चांगले गुण आचरणात आणून नम्रतेने व क्षमाशीलतेने ते वातावरण व नातेसंबंध चांगले करू शकतो.
एक प्रसंग आठवतो आचार्य असल्यामुळे त्यांना एक उंची पाट बसायला असे तर त्या पाटावर कधी लहान मुलेही बसत आजू बाजूचा श्रावक वर्ग त्यांना उठवे पण आंनदऋषीजीं बसू द्या म्हणत.
आयुष्याच्या शेवटपर्यँत ते काही ना काही नवीन ज्ञान घेत होते, ७० च्या आसपास वय असताना एक मौलवी त्यांना फारसी आणि उर्दू शिकवायला आले होते तेव्हा आनंदऋषीजींनी त्यांना स्वतःच्या पाटावर बसवून स्वतः जमिनीवर बसले काही जणांनी स्वतः त्या मौलवींनी पण यावर आक्षेप घेतला पण ते म्हणाले कि मी आता विद्यार्थी आहे' मग दोघेही जमिनीवर बसून एकमेकांकडून शिकू लागले.
साधू ची लक्षणे संत तुकारांमनी सांगितली आहेत ती त्यांच्यामध्ये दिसत होती
जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपले ।। १।।
तोची साधू ओळखावा ।। देव तेथे चि जाणावा ।।धृ.।।
#मृदू_सबाह_नवनीत । तैसे सज्जनाचे चित्त ।। २।।
ज्यासि अंपगिता नाही । त्यासि घरी जो हृदयी ।। ३।।
दया करणे जे पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ।। ४।।
तुका म्हणे सांगू किती । तो चि भगवंताची मूर्ती ।। ५।।
कबीर म्हणतात
साधु ऐसा चाहिए, जैसा सूप सुभाय,
सार-सार को गहि रहै, थोथा देई उड़ाय।
आंनदऋषीजीं म्हणत असत कि
"मै बडा हो गया तो क्या दुसरो का अपमान करू? दुसरो को तुच्छ समझु? मुझे अधिकार मिला है अधिकार किसीको अपमानित करणे के लिये या किसी को छोटा बताने के लिये नही है| किसी को भी अपमानित करणे का हक हमे नही है कोई भले ही तुम्हे भलाबुरा कहे इससे फर्क क्या पडता है?"
आदर्श ऋषींजीची पुस्तके आणि कार्य खूप मोठे आहे, नगर मध्ये गोरगरिबांना कमी खर्चात चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात या दृष्टीने आचार्य आंनद ऋषी हॉस्पिटल उभारले गेले त्यात त्यांच्या प्रेरणे चा सिंहाचा वाटा आहे.सध्याच्या कट्टर आणि प्रचारकी वातावरणात संयत आणि मुद्देसूद मांडणी करणारे रविषकुमार हे त्यांचेही आवडते पत्रकार आहेत हे विशेष
आज जेव्हा वेगवेगळ्या धर्मातील काही साधूंकडून सामजिक धार्मिक तेढ निर्माण करणारी द्वेषपूर्ण भडक भाषणे ऐकायला मिळतात, तेव्हा आंनद गुरूंची आठवण प्रकर्षाने होते.
प्रत्येक धर्मात 2 प्रकारची मूल्ये असतात एक ओळख मूल्ये आणि दुसरी म्हणजे नैतिक मूल्ये
ओळख मूल्ये जसे कि टोपी, टिळा.. इ
नैतिक मूल्ये जसे कि सत्य, अहिंसा, समता, बंधुभाव ..ई.
वेगवेगळ्या धर्मातील या नैतिक मूल्यांचा मला जीवनात प्रचंड फायदा झाला.मी 4-5 वर्षाचा असतांना एका शिबिरात पुनीत ऋषीजी म्हणून एका साधूंनी एक शपथ दिली कि आयुष्यात दारू, सिगरेट, गुटखा, मावा असे काही ग्रहण करायचे नाही ते मी अजून ही पाळत आहे, ऑफिस आणी अनेक ठिकाणच्या पार्टी मध्ये असे प्रसंग आले पण मी त्यापासून लांबच राहिलो.
असो प्रत्येक धर्मात असे अनेक चांगले संत असतात पण काही भडक लोकांमुळे आपल्यासमोर त्या-त्या धर्माचे वेगळेच चित्र उभे राहते.त्यामुळे असे चांगले साधू संत शोधायला हवेत.संत कबीर, मदर टेरेसा, संत तुकाराम अशी अनेक उदाहरणे देता येतील
आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांनी सांगितलेली सहिष्णुता, सत्य, प्रेम, अहिंसा, बंधुभाव, कुणाचा द्वेष न करणे, नम्रता, मानवता, क्षमा, त्याग ही मूल्ये कसोशीने अंगी बाणवण्याचा प्रयत्न करूया! आपले कुटुंब, समाज, देश आणि हे जग अधिक निर्मळ बनवूया
संकेत मुनोत

No comments:

Post a Comment