AddThis code

Friday, March 8, 2019

सावित्री बाई फुले यांना 2018 मध्ये लिहलेले पत्र



#सावित्रीमाई तु मुलींनी शिकावं फक्त चूल आणि मूल एवढ्यामध्ये राहू नये म्हणून किती कष्ट घेतलेस ग.
लोकांनी तुझ्यावर शेण फेकले , शिव्या दिल्या, किती हाल अपेष्टा भोगल्या,  तरीही शेवटपर्यत हारली नाहीस.

पण तरीही कधी कधी प्रश्न पडतो मनाला

मुलगी शिकली प्रगती झाली यात तुमचे मोठे योगदान असले  पण ती खरच शिकली का ?? सज्ञान झाली का?की

 सुशिक्षित होणे,  पुरुषांच्या बरोबरीने कार्य करू लागणे, अर्थार्जन करणे एवढ्यापुरतेच मर्यादित राहिली?

माझे स्वतःचे एक वेगळे अस्तित्व आहे मला ही तुझ्या एवढेच सर्वच बाबतीत स्वातंत्र्य आहे हे म्हणायला ती कधी शिकणार ग माई?

अनेक जण तर सुशिक्षित होऊनही स्वतःच्या पोटात मुलगी आहे हे आधुनिक पद्धतीने तपासून त्या चिमुकलीचाच जीव घेऊ लागल्यात... हाच काय तो शिक्षणाचा अर्थ का माई? 

ज्या पुरुषसत्ताक प्रतिकांनी या महिलांना गुलामासारखे वागवले ती प्रतीके आज ही त्या अभिमानाने घेऊन मिरवतात माई.

बऱ्याच जण कमावत्या झाल्या पण निर्णय घेणाऱ्या कधी होणार ग माई.

आज ही 58% महिलांना त्यांचे नवरे मारतात आणि त्यातील फक्त 5-10% च त्याबद्दल बोलतात माई

अन्याय करणे जेवढा मोठा गुन्हा आहे त्यापेक्षा मोठा गुन्हा अन्याय सहन करणे आहे हे त्यांना कधी समजणार ग माई ?

तंत्रज्ञान, टीव्ही, समाजमाध्यमे आदीतुन यात सकारात्मक बदल होईल असे वाटले होते 

पण त्यातही अपवाद वगळता तिला एक सौंदर्य वस्तू म्हणूनच दाखवले जातय ग माई

आणि ज्योतिबांच्या सारखा विचारी आणि भूमिका घेणारा साथी किती जणी निवडतील ग माई? कारण शिक्षण घेतले, नोकरी-व्यवसायात उतरल्या पण अपेक्षा विचारांची नाही तर अजूनही मुलाचे उत्पन्न  संपत्ती स्वतः पेक्षा जास्त असावे हीच बहुतेक ठिकाणी आहे, त्याबद्दल वैचारिक प्रगल्भता कधी येईल माई..?

विवाहापूर्वी कुंडली जुळवणे, कुणासाठी उपवास करणे, आणि इतर अनेक अंधश्रद्धाचे ओझे त्या आजही मानगूटी वर घेऊन जगत आहेत माई|

होय मान्य यात महिलांच्या एवढीच चुक पुरुषांचीही आहे पण आमच्यातील बहुतेकांना तर हा वर्चस्व गाजवण्याचा अधिकार जन्मतःच मिळालाय ना, तो ते स्वतःहून का म्हणून सोडतील ग माई?ज्योतिबांसारखा त्याग ते थोडीच करू शकतील माई?


पण महिलांवर तर हजारो वर्षापासून हेच गुलामीचे सावज होते ग ,

तिने या बदलत्या काळात सज्ञान होऊन उलट ही बंधने फेकून द्यायला हवीत नाही का?

पण त्यांनीही याच बेड्यांच्या संरक्षणार्थ प्राणपणाने लढावे अशी प्रेरणा त्त्यांच्या मनात निर्माण करण्यात पुरुषसत्ताक शक्तींना आज ही  यश मिळताना दिसते माई..

असो आज तुझी जन्म जयंती तेव्हा मागेच सुरु केलेला संकल्प भविष्यात ही चालू ठेवेन माई

जसे की घरात असो वा बाहेर असो प्रत्येक ठिकाणी सर्व महिलांचा आदर करीन ,स्वयंपाक असो ,झाडू मारणे असो वा कोणतेही काम असो माझी बहीण किंवा आई प्रमाणे मीही करेन

माझ्या बहिणीला असो वा माझ्या होणाऱ्या जोडीदाराला माझ्याएवढेच अधिकार देण्याचा प्रयत्न करेन

हुंडा घेणार नाही वा देणार नाही

शक्य तिथे महिलांना त्यांच्या अधिकाराची हक्काची जाणीव करून देईन आणि हीच जाणीव माझ्या मित्रांमध्येही  निर्माण करण्याचा प्रयत्न करेन माई

लिहिताना काही चुकले असल्यास माफ कर माई

03 जानेवारी 2018

संकेत मुनोत

8668975178

No comments:

Post a Comment