AddThis code

Saturday, September 1, 2018

अंबाजोगाई येथील अविस्मरणीय अनुभव

सन्मित्र गणेश हे आम्हाला या दौऱ्यात श्रीकृष्णासारखे सारथी म्हणून लाभले, दौऱ्यातील 6-7 तासाचा कुठे भेटीचा, गप्पांचा किंवा कार्यक्रमाचा वेळ सोडला तर जवळपास 20 तास त्यांनी गाडी चालवली तीही एकदम सेफ शिवाय येतांना त्यांचा सुमधुर आवाजात किशोरकुमार, बाल सुब्रह्मण्यम पासून ते सुरेश भटपर्यंतची गाणी ऐकणे ही सुद्धा आमच्यासाठी एक मेजवानीच होती.
तर त्यांनी केलेले अप्रतिम वृत्तांकन खालीलप्रमाणे
गणेशजी असेच लिहीत रहा.
अंबाजोगाई दौरा वृत्तांत:
सोमवार, दिनांक ४ सप्टेंबर २०१७ रोजी, अंबाजोगाई, जिल्हा बीड येथे श्री. योगेश्वरी शिक्षण संस्था शताब्दी महोत्सव श्री.रामानंद तीर्थ महाविद्यालय संचलित व विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत 'महात्मा गांधी अध्ययन केंद्र' आंबेजोगाई आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या *हिंसेला नकार...मानवतेचा स्वीकार* या जिल्हास्तरीय युवा संकल्प परिषदेस उपस्थित राहण्याचा योग knowing Gandhism Global Friends च्या टीमला चालूनच आला. कारण या परिसंवादातील अनेक मान्यवर व्याख्यात्यांपैकी एक आपल्या ग्रुप चे प्रमुख संघटक मा. संकेत मुनोत हे होते.
महाविद्यालयीन युवक युवतींनी समाजातील वाढता हिंसाचार लक्षात घेऊन त्याच्या प्रतिकारास सक्षम व्हावे, आपल्यातील विवेक जागा होऊन सामाजिक समता प्रस्थापित होण्यासाठी युवकांनीही आपलं योगदान देण्यास उद्युक्त व्हावं हा या मागचा हेतू.
संकेत मुनोत यांचे बरोबर KGGF च्या वतीनं माझ्यासह जामखेड येथून शिक्षणासाठी पुण्यात आलेला कु. अजय नेमाणे, जुन्नर हुन सामील झालेले डॉ.अमोल पुंडे आणि मूळची अंबाजोगाईची पण आता पुण्याची असलेली कु. सुुप्रिया राख अशी आमची पाच जणांची टिम या परिषदेस पुण्यातून पहाटे ३:०० वा निघून बरोबर सकाळी १०:०० च्या सुमारास परिषदेस उपस्थित राहिली.
श्री. योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. सुरेश खुरसाळे सरांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या परिषदेचे उदघाटन अं.नि.स.च्या मुक्ताताई दाभोळकर यांचे हस्ते करण्यात आले.
मुक्ताताई आणि अं.नि.स. चे राज्यपातळीवरील युवा कार्यवाह श्री. कृष्णातस्वाती (पूर्वीचं नाव श्री. कृष्णात कोरे) यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रामुख्याने हिंसाचाराच्या माध्यमातून आज समाजापुढे निर्माण झालेल्या प्रश्नांची ओळख करून दिली. यावर उपाय म्हणून शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी उभारलेल्या चळवळींची माहिती दिली. अंधश्रद्धा, व्यसनं आणि हिंसा माणसाला अविवेकी बनवतात. युवकांनी छोट्या छोट्या हिंसेला नकार द्यायला शिकलं पाहिजे. व्यायाम आपणास व्यसनांपासून दूर ठेवतो म्हणून युवकांनी व्यायामावर भर द्यायला हवा असे सांगताना दरवर्षी ३१ डिसेंम्बर ला " 'द' दारूचा नव्हे तर 'द' दुधाचा.." या उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन ही केलं. डॉक्टरांच्या हत्येनंतर सुरू झालेल्या या हत्यासत्राने विवेकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून केला जात आहे. त्या विरुद्ध सर्वांनी एकत्र येऊन हा लढा आता अधिक तीव्र करण्याची गरज व्यक्त केली .
हिंसेला नकार देताना, त्याचा निषेध करताना महात्मा गांधींनी जगाला दाखवुन दिलेल्या 'सत्य' आणि 'अहिंसा' या मूल्यांचं महत्व अधोरेखित करणं, तसेच त्यावरील निष्ठा जराही ढासळू न देता हा लढा आपण यशस्वीपणे देऊ शकतो असा विश्वास युवापिढीमध्ये निर्माण करणंही जास्त गरजेचं आहे. परंतु यात मुख्य अडचण होते ती, गांधीजी आणि त्यांच्या तत्वांबद्दल हेतुपुरस्पर पसरवल्या गेलेल्या अफवांची, अपप्रचाराची, तसेच त्यांच्या अहिंसा या तत्वाच्या उडविल्या गेलेल्या खिल्लीची....
तरुण गांधी अभ्यासक मा. संकेत मुनोत यांनी प्रश्न-उत्तरं स्वरूपात युवकांशी संवाद साधत 'गांधी - समज गैरसमज' या आपल्या विषयाने विद्यार्थ्यांचे प्रबोधन करताना गांधीजींच्या विषयी पसरवल्या गेलेल्या अफवांचे निराकरण करण्यावर विशेष भर देत विद्यार्थ्यांना विचार करण्यास भाग पाडले. बापूजींवरील आरोप आणि त्याचे मी केलेल्या निराकरणावर आपण स्वतः अभ्यास करून मत बनवावे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. 'अहिंसा' हाच जगण्याचा खरा मार्ग असून त्यानुसार वर्तन करण्यासच खरी 'जिगर' लागते. 'हिंसा' करणे हे भ्याडाचे लक्षण आहे, असे ठणकावून सांगितले. 'मजबुरीचे नव्हे... तर मजबुती नाव म्हणजे महात्मा गांधी' हे युवकांना पटवून दिले. शेवटी सद्य परिस्थितीत 'गांधी विचारच' जगाला तारू शकतात असेही ते म्हणाले.
राष्ट्रसेवादलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सुभाष वारे सरांनी हिंसेची व्याख्या करताना, हिंसेचा अर्थ केवळ शारीरिक इजा अथवा हत्या इतकाच मर्यादित नसून, कोणाला फसविणे, कोणावर मानसिक आघात करणे हा ही हिंसेचाच प्रकार असल्याचे सांगितले. कुटुंबांतर्गत हिंसाचार रोखण्यावर भर दिला जायला हवा असे प्रतिपादन केले. युवक युवतींनी जोडीदार कसा निवडावा, विवाहानंतर एकमेकांशी मित्रत्वाच्या नात्याने, जिव्हाळा निर्माण होईल या प्रकारे प्रपंच करणे का गरजेचे आहे, या बाबतही अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं. आत्महत्या केलेल्या शेतकर्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण १००% आहे. त्यांनी आपल्या जोडीदाराबरोबर सुरवातीपासूनच जर मित्रत्वाचे संबंध जोपासले असते, तर यापैकी बहुतांश आत्महत्या, जोडीदाराशी योग्य विचारविनिमय केल्याने, टळल्या असत्या असे निरीक्षण ही नोंदविले. या पिढीला आदर्श कुटुंबव्यवस्थेची गरज पटवून देण्याचा श्री. वारे सरांचा प्रयत्न खूपच प्रभावी होता.
महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्या संचालिका प्रा. डॉ. शैलजा बरुरे मॅडम यांनी 'लिंगभेदास नकार - मानवतेचा स्वीकार' या विषयावर आपली मतं मांडताना स्त्री आणि पुरुष यांनी यापुढे एका समान पातळीवर येऊन काम करणे गरजेचे आहे असे सांगितले. भारतीय समाजात लिंगभेदाचे स्तोम माजण्यात कुटुंबव्यवस्था, समाज आणि काही प्रमाणात आपल्या रूढीपरंपरा हे घटक जवाबदार आहेत. माहेर असो वा सासर, कोणत्याही कुटुंबातील स्त्रीचं स्थान हे हंगामी सदस्या प्रमाणे मानले जाते. अश्या विचारातूनच स्त्री ही शारीरिक अथवा मानसिक हिंसेची शिकार होते. या विचारसरणीत समाजातील सर्व स्तरातुन परिवर्तन होणे हे अत्यंत अनिवार्य आहे. अश्या हिंसेला आपण सर्वांनी विरोध केला पाहिजे. शेवटी स्त्री किंवा पुरुषच काय पण तृतीयपंथी म्हणून जन्माला आलेल्या व्यक्तीकडे सुद्धा समाजाने प्रथम माणूस म्हणून पहायला हवं असंही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाची सांगता, संकल्प पत्राचं वाटप आणि स्थानिक अंनिस कार्यकर्त्यांद्वारे, विवेकाचा आवाज बुलंद करणाऱ्या रिंगण नाट्यच्या सादरीकरणाने केला गेला.
अंबाजोगाई येथील प्रसिद्ध 'कृष्णाई डायनिंग हॉल' येथे दुपारच्या जेवणाच्या निमित्ताने या मान्यवरांसोबत मनमोकळा संवाद साधता आला.
आंबाजोगाई हे मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. येथील अनेक शैक्षणिक संस्था आणि त्यांच्या सामाजिक उपक्रमांविषयी माहिती घेतल्यास या शहराला मराठवाड्यातील 'विद्येचे माहेरघर' म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या शहरात वेगवेगळ्या संस्थांद्वारे वर्षभरात १५० हुन जास्त व्याख्यानं आयोजित केली जातात आणि त्यास तेवढाच जोरदार प्रतिसाद हि मिळतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून MSc, zoology झालेला अंनिस चा युवा जिल्हा कार्यवाह आणि रोजगार हमी योजनेवरील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत असणारा कु. सोपान भूंबे या सोबत या शहराचा फेरफटका मारताना या शहराबद्दलच्या माहितीत आणि कुतूहलात आणखी भर पडत होती. श्री. योगेश्वरीदेवीचे दर्शन घेताना या भव्य हेमाडपंथी मंदिराची वास्तुरचना मनाला भारावून टाकते. मंदिराच्या अगदी जवळच जमिनीखाली कोरलेले 'हत्तीखाना' हे वेरूळकालीन प्राचीन ऐतिहासिक लेणं आवर्जून भेट देण्यासारखं आहे. नुकत्याच झालेल्या उत्खननात उजागर झालेल्या 'बाराखांबे' या प्राचीन महादेव मंदिरास मात्र वेळेअभावी भेट देता आली नाही याची खंत वाटते.
वरिष्ठ हिंदी लेखक - रचनाकार आणि 'हिंदी रत्न सन्मान' या पुरस्काराचे आठरावे मानकरी मा.श्री. रंगनाथ रामदयाल तिवारी यांची भेट मात्र त्यांच्या निवासस्थानी जाऊनही होऊ शकली नाही. संकेत मुनोत संकलीत 'महात्मा गांधी- एक धैर्यशील योद्धा' हे पुस्तक भेट म्हणून त्यांच्या कुटुंबीयकडे सुपूर्द केले.आश्चर्य म्हणजे दुसऱ्याच दिवशी लगेच त्यांचा फोन आला एवढया मोठया व्यक्तीने ते पुस्तक लगेच वाचलेही आणि त्यांनी मन भरून पुस्तकाचे कौतुक करत दादही दिली.
ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांना मुख्यप्रवाहात आणताना, त्यांचे सामाजिक आणि राजकीय प्रश्न समजुन घेत सुखी समाज निर्माण करण्यासाठी अहोरात्र झटणारे, ८५ वर्षे वयाचे ज्येष्ठ गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते श्री. द्वारकदास लोहिया उर्फ बाबूजी यांची भेट म्हणजे या दौऱ्यातील परमोच्च आनंद देणारे क्षण होते. सद्यपरिस्थिती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या राज्यघटनेवरील विश्वास दृढ करणे आणि त्याच्या प्रसार-प्रचारावर अधिकाधिक भर देणे हे जास्त आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. बाबूजींनी १९७० साली स्थापन केलेल्या 'मानवलोक' या संस्थेस भेट दिल्यास आपणास बाबूजींच्या अफाट कार्याची कल्पना येते.
या संपूर्ण दौऱ्यात प्रा. मनोहर जायभाये सरांचे विशेष आभार मानवे लागतील. स्वतःच्या संपूर्ण कार्यव्यस्ततेतही, आमच्या सर्व कार्यक्रमांचे आणि भेटीगाठींचे नियोजन सरांचे होते. जायभाये सरांमुळे सायंकाळी श्री. राजेंद्र घोडके सरांच्या निवासस्थानी आयोजित 'अंनिस कुटुंब मेळाव्यास' आणि त्यानिमित्त च्या चहापानास उपस्थित राहून अनेक समविचारी बांधवांची त्यांच्या कुटुंबियांसह ओळख करून घेता आली.सोबत अमर हबीब सरांचेही आभार ते बाहेरगावी असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही पण पहिल्याच दिवशी त्यांनी फोनवर तेथे कुठे कुठे जावे याबद्दल मार्गदर्शन केलं होतं.
एकंदरीतच अंबाजोगाई दौरा हा वेगवेगळ्या अर्थाने अविस्मरणीय असा झाला. संकल्प परिषदेच्या सर्व आयोजकांचं अगदी नेमकं आयोजन, सर्व मान्यवर व्याख्यात्यांनी वेगवेगळ्या दृष्टीकोनातून 'हिंसेला नकार - मानवतेचा स्वीकार' या मुख्यसूत्रास अनुसरून केलेली मांडणी, थोरामोठयांबरोबरच सामाजिक भान असलेल्या समवयस्क मंडळींच्या भेटीगाठी, अगदी पहिल्यांदा भेटूनही एकमेकांविषयी वाटणारा जिव्हाळा, आपलेपणाचा अनुभव.. या साऱ्या गोष्टी गाठीशी बांधून आंबाजोगाई सोडताना अंगात एक नवीन ऊर्जा संचारल्याचा अनुभव वारंवार येत होता. आणि म्हणूनच कदाचित, संकेतने पुण्याला परतल्याच्या दिवशीच सायंकाळी फेसबुक वर पोस्ट केलं असावं की...' या पुढे प्रत्येक महिन्याला, एका जिल्ह्याच्या ठिकाणी, आपल्या टीमसह तेथील स्थानिकांची भेट घ्यायची योजना आखत आहे.
बाकी परतीच्या प्रवासात आम्ही सर्वांनी खूप मस्ती केली, एकमेकांची यथेच्छ टिंगलटवाळी, तर कोणाची उगाचच खेचाखेची केली. एकमेकांना हसवलं, अगदी रडवलं सुद्धा... पण निःसंशय सर्वांचं एकमेकांशी नातं मात्र घट्ट झालंय.. यातील गमतीजमती इथं सांगण्यात मजा नाही...
अनुभवायचं असेल तर नक्की सामील व्हा....
पुढच्या दौऱ्यात...!!!