AddThis code

Saturday, April 20, 2024

महावीरांकडून सत्य आणि प्रेमासाठी भूमिका घेणे शिकायला हवे- दैनिक प्रजापत्र, संकेत मुनोत

सध्या देशात आणि जगात धर्म , जात  वर्ग यातील  द्वेष वाढत असताना समाजात प्रेम आणि बंधू भाव वाढवण्यासाठी महावीरांचे विचार अभ्यासणे आणि त्यावर चालण्याची आज  तीव्र गरज आहे. 
जैन धर्म हा अतिशय प्राचीन धर्म असून  तो वैदिक , हिंदू , बौद्ध किंवा कुठल्याही धर्माची शाखा नाही. भ. महावीर हे जैन धर्माचे संस्थापक नसून ते त्यातील चोविसावे तीर्थंकर आहेत. दुसऱ्याला जिंकणे सोप्पे असते पण स्वतःला जिंकणे अवघड.ही स्वतः वर विजय मिळवण्याची शिकवण जैन धर्म देतो. 
'भ. महावीर' या विषयावर  काही जैन युवक युवतींशी  गप्पा मारत होतो . त्यांच्याकडून याबद्दल जाणून घेताना  कुणी म्हणे "ते विषारी सर्प (चंडकौशिक) चावल्यावर विचलित झाले नाही उलट पायातुन दूध आले"  तर कोणी म्हणे "त्यांच्या कानात खिळे ठोकले तरी ते शांत राहिले", "राजमहाल सोडला त्यांनी, त्रिशला मातांना त्यांच्या जन्माच्या वेळी 14 स्वप्ने पडली" आणि असेच प्रसांग सांगू लागले पण महावीरांचा मूळ संदेश काय? , त्यांच्या विचारांचा आज  जगाला आणि आपल्या स्वतःला नेमकी उपयोग  काय?  यावर कोणीच बोलेना? अनेकांतवाद, सर्वोदय हे शब्दच बहुतेकांना नीट माहितही नव्हते.
महावीरांना फक्त अश्या  कथापुरते मर्यादित ठेवून आपण महावीरांचे विचार फक्त एका  धर्मा पुरते किंवा धार्मिक स्थळा पुरते संकुचित करून ठेवतोय का? एक तत्वज्ञ म्हणून महावीरांचे विचार आपण अधिक पुढे आणायला हवे आणि व्यापक करायला हवेत.
महावीरांचे तत्वज्ञान किं हे काही फक्त जैन धर्मीयांसाठी नव्हते तर ते अखिल प्राणीमात्रासाठी होते.
महावीर कुठल्याही देवी-देवतेचा अवतार नव्हते,  ना त्यांनी स्वतःला तसे कधी घोषित केले किंवा चमत्कार , श्राप , वरदान इ. गोष्टी पण महावीरांनी कधी केल्या नाहीत. वर्धमान म्हणून जन्म झाला पण स्व कर्तृत्वाने आणि कर्माने ते महावीर बनले . आपण त्यांचे विचार फक्त डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा ते डोक्यात घेऊन त्यावर आचरण करणे जास्त आवश्यक आहे. महावीर किंवा कुठल्याही जैन तीर्थकरांच्या हातात कुठले शस्त्र नाही, कुठली मौल्यवान आभूषणे नाहीत त्यांच्याजवळ गेल्यावर शांततेचा व प्रसन्नतेचा अनुभव येतो.

सत्यासाठी भुमीका घेणे -
महावीरांचा जन्म झाला तेव्हा काळ असा होता की सगळीकडे कर्मकांडाचे स्तोम माजले होते, मुक्या जीवांना यज्ञात बळी चढवले जात होते, स्त्री फक्त भोगवस्तू होती, पददलित आणि दुर्बलांना छळले जात होते. निवडक लोक ( वैदिक ब्राम्हण )  विद्वत्तेची मक्तेदारी सांगत सामान्य जनांचे शोषण करत होते.सामान्य जणांना ज्ञान घेण्याचा वा देण्याचा अधिकार नव्हता. महावीरांनी अशा काळात त्या सर्व पीडितांना, दुर्बलांना बळ दिले शिवाय शोषण करणार्यांचा अहंगंड दूर केला.
भूमिका घेणे हा जैन धर्माचा प्रमुख गुण आज कुठे तरी हरवल्यासारखा वाटतो. महावीर त्याच व्यवस्थेचे राजा होऊन या सगळीकडे दुर्लक्षित करत मजेत आयुष्य जगू शकले असते पण महावीरांनी सत्य, प्रेम आणि संत यासाठी भूमिका घेतली. 
जर तुम्ही सत्यासाठी अशी भूमिका घेत असाल तर तुम्ही जैन धर्माचे खरे अनुकरण करता आणि त्यासाठी तुमची जैन धर्मातच जन्म घेण्याची गरज नाही. 
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजनांना शिक्षणाची दारे खुली करून या विचारांचे खरे अनुकरण केले . त्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला , प्रस्थापितांशी लढावे लागले पण हार मानली नाही.  महात्मा गांधीं हे जरी जैन धर्मात जन्माला आलेले नसले तरी त्यांनी राजकारण, समाजकारण , धर्मकारण यातील एका ठराविक समाजाचे वर्चस्व संपवून त्यात सामान्य माणसाला नेतृत्व देऊन तेथे समता आणून या विचारांचे अनुकरण केले. गांधीजींच्या या समतेच्या भूमिके मुळे विषमता मानणाऱ्या गोडसेने  गांधींचा खून केला.नंदुरबारच्या इवल्याश्या  शिरीषकुमार मेहता (जैन) याने  'महात्मा गांधी कि जय' म्हणत ब्रिटिशांच्या गोळ्या खाल्ल्या पण भूमिका घेणे सोडले नाही . 
पण आज  ठाम भूमिका घेण्याऐवजी आज अनेकांचा नेत्यांची अंधभक्ती करण्याकडे कल वाढला आहे. जैन धर्म म्हणजे फक्त आहारापुरती अहिंसेची भूमिका घेणे नव्हे तर आचरणात ही अहिंसा आणि सत्याची भूमिका आली पाहिजे. 
कुठलाही धर्म म्हटले चिकित्सा करायची नाही किंवा प्रश्न विचारायचे नाही , जो कोणी प्रश्न विचारेल तो धर्मद्रोही असा आघात असतो, आज तर काही हुकूमशाही देशात सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांनाही देशद्रोही ठरवले जाते.पण भ. महावीर मात्र याउलट सांगतात.ते ईश्वरवादी किंवा वेदप्रामाण्यवादी सिद्धांत मांडण्याऐवजी बुद्धीप्रामाण्यवादी सिद्धांत मांडतात.
'पण्णा समीख्खए धम्मं' अर्थात धर्माची प्रज्ञेने समीक्षा करा असे भ. महावीर म्हणतात.त्यांनी माणसा-माणसातील वर्णावरून, लिंगावरून होणारी विषमता नाकारली. त्यांच्या सोबत श्रमण-श्रमणी आणि श्रावक श्रविकांमध्ये राजापासून रंकापर्यत, म्हाताऱ्यापासून लहानापर्यत, पुरुष- स्त्रिया हे सर्व एकत्र होते त्यांच्यात कुठलाही भेदभाव केला जात नव्हता.

मैत्रिभाव- 
मित्ती मे सव्व-भूएसु, वेरं मज्झ न केणइ

म्हणजेच सर्व प्राण्यांशी मम मैत्री , राहो न वैर कोणाशी।।
म्हणजे तो फक्त प्राणीच नव्हे तर मनुष्यही तो कोणीही असो कोणत्याही जातीचा, वा कोणत्याही धर्माचा, वयाचा, लिंगाचा , वर्गाचा असो त्याच्याप्रति मैत्रिभाव ठेवायची आज गरज आहे.वेगवेगळ्या जाती व धर्मावरुन आपल्या देशात तेढ निर्माण होत असतांना या विचारांचे अनुकरण करणे महत्वाचे आहे. एखाद्या धर्माच्या विरुद्ध खोटे साहित्य फॉरवर्ड करून आणि द्वेष करून आपण कसे बर महावीरांचे अनुयायी  होऊ शकतो ?

हिंसेने आणि द्वेषाने प्रश्न सुटत नसतात तर वाढत असतात हे आज जगानेही मान्य केले आहे कल्पना करा कि समजा काही देशांनी युद्ध करायचे ठरवले तर एकमेकांवर बॉम्ब टाकता टाकता जग काही मिनिटांत संपू शकते  त्यामुळे जगापुढे आज अहिंसा हाच एकमेव पर्याय आहे.
भ.महावीर आणि बुद्ध गेल्यावर हजारो वर्षांनी जेव्हा या अहिंसेची खिल्ली उडवली जाऊ लागली तेव्हा महात्मा गांधीनी अहिंसक चळवळीच्या माध्यमातून जगभर राज्य गाजवणाऱ्या ब्रिटिशांविरुद्ध पूर्ण देश एकत्र करून स्वातंत्र्य मिळवून दाखवले.नेल्सन मंडेला, मलाला, मार्टिन ल्युथर किंग यांच्यासारख्या जगभरातील अनेक लोकांनी तो मार्ग स्वीकारुन जगात बदल करून दाखवला त्यामुळेच तर जगतिक कीर्तीचा वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाइन ही म्हणाला कि महात्मा गांधींचे अहिंसक विचार च या जगाला उध्वस्त होण्यापासून वाचवू शकतील.

जगात अनेक धर्म ,पंथ स्थापन झाले काही टिकले काही लयाला गेले.बहुतांशी धर्माच्या संस्थापकांनी आम्ही देव आहोत किंवा प्रेषित आहोत म्हणून सांगितलं. त्यांची वचन, धर्मग्रंथ प्रमाण मानले गेले.
मात्र महावीर आणि  गौतम बुद्ध यांनी  ना स्वतःला देव घोषित केले ना प्रेषित म्हणवून घेतले.
समोर आलेली गोष्ट तर्काच्या, विवेकाच्या,बुद्धीच्या कसोटीवर घासून घ्या, मी सांगतो म्हणून नव्हे तर तुम्हाला समजली आणि पटली तरच स्विकारा अस म्हणणारे बुद्ध आणि महावीर म्हणूनच आपले वाटतात
माणसांना झापडबंद न होता प्रश्न विचारायला प्रवृत्त करणारे आपले वाटतात ते ह्यासाठी प्रश्न विचारणारी माणस विचार करतात, अशी विचार करणारी माणस जोवर जगात आहेत तोवर महावीर आणि बुद्ध आहेत. 

सध्या देशात काही लोक वेगवेगळ्या राष्ट्रांच्या घोषणा देत आहेत कोणी भारताला हिंदुराष्ट्र बनवू पाहतंय तर कोणी इतर कुठल्या धर्माचे राष्ट्र. सरदार पटेल , नेताजी सुभाषचंद्र बोस , भगतसिंग , डॉ राजेंद्रप्रसाद सारख्या अनेक महान नेत्यांनी हिंदुराष्ट्र वगैरे कल्पनेला मूर्खपणा, वेडेपणा म्हटले होते . आज ते हयात नाहीत  पण आपण अश्या धार्मिक राष्ट्राच्या गोष्टींना ठामपणे विरोध करत भारत या धर्मनिरपेक्ष राष्ट्रावर एकमेकांसोबत प्रेमाने रहायला हवे. आज कुणी मुस्लिम संपवण्याची भाषा करत असेल तर उद्या ते संपल्यावर ख्रिश्चन मग बौद्ध मग जैन आणि नंतर सामान्य हिंदू ही त्यात असेल हे विसरायला नको. कारण द्वेष करणाऱ्यांना फक्त एक गट हवा असतो ज्याचा द्वेष करत ते स्वतःचे वर्चस्व जपत असतात. इतिहासात याची उदाहरणे आहेत इथे जेव्हा मुस्लिम नव्हते तेव्हा लाखो श्रमनांच्या हत्या झाल्या होत्या त्यामुळे कुठल्याही द्वेष पसरवणाऱ्या मोहिमेला बळी न पडता एकमेकांसोबत राहूया प्रेम पसरवूया

तर चला अहिंसा, प्रेम आणि नम्रतेने जग जिंकूया, आपले नाते संबंध, समाज , देश , जग या अनुषंगाने अधिक बळकट करूया
संकेत मुनोत
8668975178
Changalevichar1@gmail.com

Share