आज जगात 150 पेक्षा जास्त देशात महात्मा गांधींचे पुतळे आणि रस्ते असून अनेक देशात त्यांची विद्यापीठे सुद्धा आहेत. पण याच गांधींना घडवण्यात पुणे शहराचाही महत्वाचा सहभाग आहे
ना. गोपाळकृष्ण गोखले(मवाळ गट) आणि लोकमान्य टिळक (जहाल गट) दोघेही त्यांना पुण्यात भेटले. त्यांच्यातील विरोध संपवून दोघांना एकत्र करण्यासाठी गांधीजींनी प्रयत्न पुण्यातच केले .
त्यांचे राजकीय गुरु ना. गोखले यांनी याच पुण्यात गांधींना देश समजून घेण्यासाठी भारत फिरण्यास सांगितले. पण गांधीजी भारत पाहून परत येण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.पण गोखलेंची इच्छा होती कि त्यांनी स्थापन केलेल्या 'सर्वटस ऑफ इंडिया' संस्थेचे गांधीनी सदस्य व्हावे पण त्या संस्थेच्या इतर सदस्यांनी त्याला विरोध केल्याने ते शक्य झाले नाही .
गांधीजींचे पहिले आत्मचरित्र १९१८ मध्ये अवंतिका गोखले यांनी लिहले त्याची प्रस्तावना खुद्द लोकमान्य टिळकांनी पुण्यातच लिहली ज्यात त्यांनी गांधीजींच्या शील आणि चरित्राचे भरभरून कौतुक केले शिवाय देशातील भविष्याचा नेता म्हणून ही वर्णन केले. ही प्रस्तावना वाचली तर टिळकांचा गांधीजीबद्दल असणारा आत्मविश्वास , प्रेम आणि आदर स्पष्ट दिसून येतो, दोघांत मतभेद नक्कीच होते पण मनभेद नव्हते.
टिळकांच्या अंत्ययात्रेत खांदा द्यायला गांधी गेले तर "ब्राम्हण नसल्यामुळे तुम्ही खांदा देऊ शकत नाही" असे सांगून तेथील सानतन्यांनी त्यांना बाजूला ढकलले. गांधी अस्वस्थ झाले पण पुन्हा आक्रमकपणे पुढे गेले "समाजसेवकाला जात असत नाही" असे सुनावत गांधींनी स्वतः तर खांदा दिलाच पण पुढे जाऊन धर्माने मुस्लिम असलेल्या व्यक्तीला पण खांदा द्यायला लावला.
टिळक-गोखलेंच्या काळापर्यंत कॉंग्रेस म्हणजे ठराविक उच्चभ्रू लोक असे सामान्य माणसाला वाटे. त्यामुळे सामान्य माणसे आणि बहुजन त्यात आणि स्वातंत्र्यलढ्यात जास्त प्रमाणात सहभागी नव्हते. गांधीनी या खांदा देण्याच्या प्रसंगापासूनच स्वातंत्र्यलढा उच्चभ्रू लोकांपासून बहुजनांचा आणि हिंदू मुस्लिम एकतेचाही बनवला यामुळे कोट्यावधी लोक यात आले.
“आधी स्वातंत्र्य मग सुधारणा” आणि “आधी सुधारणा मग स्वातंत्र्य “ असे म्हणणारे २ गट भारतात होते. या दोन्ही गटांना एकत्र करण्याचे काम गांधीनी या पुण्यातच केले. स्वातंत्र्य आणि सुधारणा दोन्ही सोबत करता येतात हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.
पुणे करार - गांधी येरवडा तुरुंगात होते त्यादरम्यान ब्रिटिशांनी दलितांना विभक्त मतदार संघ द्यायचे ठरवले . त्यावेळेस देशात त्यामुळे अजून एक फुट पडू नये म्हणून गांधीनी आत्मक्लेश उपवास सुरु केला . आपण दलितांच्या सोबत हजारो वर्ष अन्याय केला आहे आणि त्याचे प्रायश्चित आपण घ्यायला हवे असे गांधीजी त्यावेळी सवर्णांना उद्देशून म्हणाले. या उपवासाचा परिणाम देशभर झाला. ज्या घरात प्रवेश नव्हता त्यापैकी अनेक घरात तो मिळाला . ज्या विहिरी मंदिरे जातीत विभागली होती त्यातील अनेक खुली झाली . डॉ. आंबेडकर यांनी मनाचा मोठेपणा दाखवला गांधीजीनीही ठरल्यापेक्षा जास्त जागा देऊ केल्या आणि दोन्ही महामानवांचे इथे मिलन झाले .
याच येरवडा तुरुंगात त्यांनी संत तुकारामांचे अभंग समजून घेतले आणि त्याचा इंग्रजीत अनुवाद केला.
गांधीहत्या– गांधीहत्येचे मुख्य हल्ले पुण्यातूनच झाले . अस्पृश्यतानिवारण आचरणात आणताना गांधीनी वाई येथे स्वतःच्या मुलाचा आंतर्जातीय विवाह लावला, त्याला प्रतिसाद देत त्यांच्या अनुयायांनी देशभर असे विवाह लावले. यानंतर पुण्यात काही ब्राम्हणांनी सभा घेतली आणि “या गांधीचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे” असे म्हटले .
पण गांधीजींची अस्पृश्यता निवारण मोहीम सुरूच राहिली यामुळे पुणे येथे त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला पण त्यात जात असताना २५ जून १९३४ रोजी पुण्यातील काही सनातन्यांनी त्यांच्या गाडीवर बॉम्ब टाकला. सुदैवाने गांधीजी मागच्या गाडीत असल्याने बचावले पण त्या गाडीतील लोक गंभीर जखमी झाले.
गांधींनी पुण्यातच अंतरराष्ट्रीय असा निसर्गोपचार आश्रम स्थापन केला ज्यात आजही देश विदेशातून लोक स्वतःचे आरोग्य चांगले करण्यासाठी येतात.
पुण्यात एका कार्यकर्त्यावर निसर्गोपचार करण्यासाठी गांधी आले होते तेव्हा सुद्धा नथुराम त्यांना भेटून संपवण्याचा कट रचला पण भेट न झाल्याने भेट म्हणून तुटक्या चप्पल बूट यांची पिशवी त्याने दिली. पिशवी उघडताच कार्यकर्ते संतापले पण गांधींनी त्या चपला भंगारात विकून त्यापासून काही उपयोगी आणण्यास सांगितले. १९३४-१९४४ या दरम्यान झालेल्या ७ हल्ल्यांच्या वेळी कुठेही फाळणी , ५५ कोटी हे मुद्दे नव्हते तर कारण एकच होते गांधीजीनी चालवलेले अस्पृश्यता निवारण धोरण ज्यामुळे राजकारण समाजकारण आणि धर्मकारण यात ठराविक एका उच्चभ्रू वर्गाचे असलेले वर्चस्व कमी होऊन सामान्य माणसाला यात नेतृत्व आणि मोठे स्थान मिळत होते.
महावीर, बुद्ध , तुकाराम, ज्ञानेश्वर, महात्मा फुले यांना ज्या विषमतावादी विचारधारेच्या लोकांनी त्रास दिला त्याच लोकांनी गांधींची हत्या केली. दुर्दैवाने हे खुनी लोकही पुण्यातलेच होते.
गांधीजी काही काळ आगाखान तुरुंगात होते . palace म्हणत असले तरी ते तुरुंगच होते . तिथल्या रोगट वातावरणामुळे गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा यांचा मृत्यू तिथे झाला. महात्मा गांधीही तिथे मृत्युच्या दारापर्यंत जाऊन परत आले .
देशाला कत्तलीपासून वाचवणारा पुणेकर काकासाहेब गाडगीळ -
1948 मध्ये गांधीहत्या करण्यासाठी गोडसे आणि सहकाऱ्यांनी पुण्यातूनच प्रस्थान केले, खून केल्यावर गोडसे पळून जात होता पण त्याला रघुराम यादव या बिर्लाभवन मधील माळ्याने पकडले. तिथे तो स्वतःची ओळख सांगण्यास तयार नव्हता. हा खुनी कुणी मुस्लिम असावा अशी अफवा पसरून देशातील काही भागात मुस्लिमांवर हल्ले सुरु झाले. यात या दंगली वाढवून हिंदू मुस्लिम दंगलीत नेहरू पटेल यांचे लोकशाही सरकार पाडणे आणि संस्थानीकांचे सरकार परत आणणे हा डाव त्यामागे होता. पण संध्याकाळी काकासाहेब गाडगीळ तेथे गेले आणि त्यांनी नथुरामला ओळखल्याने हा मुस्लिम नसून हा हिंदू ब्राम्हण आहे हे समोर आले. पण याचा त्रास त्याच्या चूक नसलेल्या काही जातीबांधवांनाही झाला.गांधीजींची हत्या झाल्यावर पूर्ण देश शोकात बुडालेला होता पण या विषमतावादी लोकांनी मिठाई वाटून तेव्हा विकृत आनंद साजरा केला होता ज्याला उत्तर म्हणून काही सामान्य लोकांनी त्यांच्या घरावर हल्ले केले पण अश्यावेळीही गांधीवाद्यांनीच मध्ये पडून त्यांची घरे वाचवली.
ज्या पुण्यात गांधींचा खुनी दहशतवादी गोडसे निघाला त्याच पुण्यात त्यांना अनेक चांगले अनुयायी सुद्धा भेटले. साने गुरुजी , सेनापती बापट आणि अनेक लोकांनी गांधीजींचा लढा पुढे नेला .
संकेत मुनोत
8668975178
knowing.gandhi@gmail.कॉम