AddThis code

Thursday, February 2, 2023

गांधी समजून घेताना- दैनिक प्रजापात्र या वृत्तपत्रात आलेला संकेत मुनोत यांचा गांधीजी बद्दल चे प्रमुख गैरसमज दूर करणारा लेख

गांधींनी स्वतःला सुधारक वगैरे कधी म्हटले नाही पण तसे न म्हणताही धर्माचा मौलिक अर्थ सांगत त्यातील लोकांना सहिष्णू, चरित्रवान बनण्यास प्रवृत्त केले.

लेखाच्या सुरवातीलाच हे स्पष्ट करतो कि मी गांधीवादी नसून त्यांच्या विचारांचा छोटासा अभ्यासक आहे.

लहानपणी गांधीजींबद्दल थोडा आदर वाटायचा , पण 8वी ते 10वी दरम्यान मी गांधीजींचा थोडा तिरस्कार करत असे. देशाचे तुकडे करणारा, अहिंसेचा अतिरेक करणारा,५५ कोटी देणारा, आंबेडकरांना, भगतसिंग , बोस यांना त्रास देणारा म्हातारा अशी काहीशी प्रतिमा अर्धवट वाचनातून आणि वेगवेगळी मते ऐकून मनात निर्माण झाली होती, त्यांच्या खुन्याची पुस्तके आणि नाटके पाहिली होती त्यामुळे त्या खुन्याचा थोडा चाहता झालो होतो.पण सत्य वेगळेच आहे हे मला दोन्ही बाजू वाचल्यावर लक्षात आले, जसजसा गांधी वाचू लागलो तस-तसे सत्य उमजत गेले , स्वतःत सकारत्मक बदल घडवण्याची आणि Knowing Gandhi Global Friends चळवळ सुरू करण्याची प्रेरणा त्यातून मिळाली.
म्हणजे गांधी वाचण्यापूर्वी मी जसा होतो तसा नंतर राहिलो नाही बराच सकारात्मक बदल झाला. मी पूर्वी अंधार, कुत्रा, गुंड, भुताची कल्पना, स्टेज आणि अनेक गोष्टींना घाबरत असे गांधी वाचायला लागल्यावर ही भीती गेली आणि मी निर्भय झालो. शिवाय सत्यशोधक वृत्ती, विज्ञानवादी दृष्टीकोन, प्रेम या गोष्टी वाढून अंधश्रद्धा, द्वेष अश्या अनेक गोष्टी कमी झाल्या. पण अजून बराच बदल घडायचा आहे. अजूनही माझ्यात अनंत उणिवा आहेत आता त्यातील काही उणीवा तरी मी स्पष्टपणे सांगू शकतो..

तर महात्मा गांधी बद्दल एक-एक मुद्दा पाहूया

1 . जागतिक प्रभाव-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, अँप्पल चे मुख्य स्टिव्ह जॉब्स, विनोदाचा बादशहा चार्ली चॅप्लिन, दक्षिण आफ्रिकेचे राष्टाध्यक्ष नेल्सन मंडेला आणि जगातल्या कितीतरी लोकांनी त्यांच्या आयुष्यात गांधीविचारांची प्रेरणा असल्याचे कबूल केले आणि जागतिक परिवर्तन घडवून दाखवले.अल्बर्ट आईन्स्टाईन या थोर वैज्ञानिकांने म्हटलेच आहे की ‘’ येणाऱ्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत कि असा कोणी हाडा मांसाचा माणूस या पृथ्वीतलावर वावरत होता’’ आणि होय आईन्स्टाईनच्या इतर सिद्धांताप्रमाणे हाही सिद्धांत खरा ठरतो की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती आज आहे. तुम्ही आसपास पहा गांधी बद्दल एवढ्या अफवा पसरवल्या आहेत की खरच असा कोणी चांगला माणूस होता त्यावर आजची पिढी विश्वास ठेवत नाही.

2.गांधीजी -जात आणि धर्म-
गांधीजींनी कोणत्याही जातिचे वा धर्माचे अतिरेकी समर्थन केले नाही ते स्वतः ज्या जातीत जन्माला आले त्या जातीचेही त्यांनी स्वतः ला प्रतिनिधी वगैरे म्हणवून घेतले नाही. त्यामुळे कुठलीही जात त्यांच्या मागे नाही उलट  बहुतेक जातीतील कट्टरवादी लोक त्यांचा द्वेष करतात.
एका जातीतील कट्टर लोकांना  पुणे करारामुळे गांधीजी ब्राम्हणधार्जिणे आणि दलितद्वेष्टे (मनुवादी) वाटतात

एका जातीतील काही कट्टर लोकांना गांधी ब्राम्हणद्वेष्टे, दलित धार्जिणे वाटतात कारण जिथे एका जातीचे वर्चस्व होते अशी सर्व ठिकाणे राजकारण, समाजकारण व इतर अनेक  गांधीजींनी अस्पृश्यता निवारण चळवळीद्वारे  त्या जातीचे वर्चस्व संपवून सर्वांना त्यात पुढे आणले.

पाकिस्तानमधील काही कट्टर मुस्लिमांनाही आम्हाला छोटा पाकिस्तान दिला,काश्मीर दिला नाही वगैरे कारणावरून  गांधी मुस्लिमद्वेष्टे व हिंदुधार्जिणे वाटतात.

त्यामुळे गांधीजींच्या मागे त्यांचा उदो-उदो वा देव करणारी कोणताही जातसमूह नाही. जेवढी टिंगल गांधीजींची उडवली जाते त्याच्या एक टक्का जरी इतर कोणत्या महापुरुषांची झाली असती तर दंगली झाल्या असत्या, पण कुठल्याही जातीचा , धर्माचा, पंथाचा आधार न घेता ते जगभर पोहचले या उलट इतर जातींच्या महापुरुषांना त्यांच्याच जातीच्या लोकांनी स्वतःपुरते संकुचित करून ठेवले.

काही महापुरुषाचे गुणगान करताना किंवा चरित्र लिहितांना गांधीजींना कमी लेखावेच लागते त्याशिवाय यांचा महापुरुष मोठा होत नाही.याउलट गांधींचे वर्णन करताना कोणाला कमी लेखायची गरज नाही. गांधीजीनी स्वतःच्या चरित्रात इतर कुणाही पेक्षा स्वतःलाच कमी लेखले आहे

3. स्वातंत्र्य फक्त गांधींमुळे मिळालं का?
अस कोणीही म्हणत नाही की स्वातंत्र्य फक्त गांधींमुळे मिळाले. पण हे राष्ट्र घडवण्यात , सर्व जाती-पाती , धर्म च्या लोकांना एकत्र आणण्यात, कोट्यवधी सामान्य माणसांना इंग्रजांविरुद्ध निर्भयपणे लढण्यास प्रेरणा देणारे ते होते त्यामुळे ते स्वातंत्र्य लढ्याचे नायक ठरतात.आणि हे त्याकाळचे सर्वच नेते मान्य करतात. नेताजी बोस त्यामुळेच त्यांना राष्ट्रपिता म्हणतात आणि आझाद हिंद सेनेत ही प्रत्येक कार्यक्रमानंतर 'महात्मा गांधी की जय' म्हटले जाते.
जसे 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' म्हटलं की सगळे मावळे त्यात येतात त्यात वेगवेगळ्या मावळ्यांची वेगळी नावे घेऊन जय म्हणण्याची गरज पडत नाही तसेच 'महात्मा गांधी की जय' म्हटलं की त्याकाळचे सगळेच स्वातंत्र्यसैनिक येतात.

4. ब्रिटिशांचे जगातील साम्राज्य कमी करण्यात गांधीजीचा वाटा-
 पूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश साम्राज्याचे पंतप्रधान चर्चिल म्हणाले होते कि 'या गांधीला जर जनरल स्मट्स ने आफ्रिकेतील तुरुंगातच संपवले असते तर ब्रिटिशांचे जगावर राज्य अजून काही दशके टिकले असते शिवाय भारताला स्वातंत्र्य दिले तर 10 वर्षात भारताचे तुकडे तुकडे होऊन हा देश बेचिराख होईल असेही त्याचे म्हणणे होते पण स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली तरी आपण आजही एकत्र आहोत आणि लोकशाही टिकून आहे ती या गांधींविचारांमुळेच.

5.शाहीदे आजम भगतसिंग यांची फाशी आणि म. गांधी-

भगतसिंग आणि क्रांतिकारकांचे प्राण वाचावे यासाठी गांधी गव्हर्नर जनरल आयर्विन यास भेटलेफाशीची शिक्षा अमलात न आणण्याची विनंती केली. शिक्षेच्या एक दिवस आधी त्यांनी आपले सर्व भाषिक कौशल्य पणाला लावून पत्र लिहून अगदी येशू ख्रिस्ताचा दाखला देऊनही शिक्षा माफ करण्याची विनंती केली, पण त्यास न जुमानता फाशी अंमलात आणली गेली. ब्रिटिश गांधीजींचे सहज ऐकणारे असते तर गांधी म्हटले असते चले जाव आणि ब्रिटिश निघून गेले असते. तसे मग ब्रिटिशांनी कस्तुरबांच्या आरोग्याची मुद्दामून गैरसोय करून त्यांची हत्या ही केली नसती.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भगतसिंग आणि त्याचे सहकारी हौतात्म्यासाठी खूपच अधीर झाले होते . त्यांना माफी नकोच होती ,म्हणून तर त्यांनी खटल्या दरम्यान बचावाचा प्रयत्न केला नाही. वीर भगतसिंग यांनी स्वतःच्या पालकांना ही खडसावुन शिक्षा माफ करण्यासाठी कुठलेही प्रयत्न करू नका असे सांगितले.आमच्या हुतात्मा जाण्याने हजारो तरुणांना स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा मिळेल असे ते म्हणत.

6.गांधीजी खूप अध्यात्मिक वा धार्मिक होते असा काही कट्टर नास्तिक मंडळींचा आरोप असतो

 सत्य -गांधीजी हे धार्मिक व आध्यात्मिक असले तरी धर्मांध व दुसऱ्या धर्माचा द्वेष करणारे नव्हते
गांधीजींचे अध्यात्म हे धार्मिक अथवा साक्षात्कारी नव्हते. त्याला सामाजिक परिमाणे होती. समाजाची सेवा, निसर्गाचे रक्षण, जलसंवर्धन, सार्वजनिक आरोग्याची काळजी हे त्यांना अभिप्रेत होते. व्यक्तिगत त्याग व व्यक्तिगत विकास यातून समाजाच्या हिताचा व्यापक विचार त्यांनी मांडला होता. एकाही डोळ्यातून एकही अश्रू निघू नये, गरिबी, अन्याय, विषमता यांचे उच्चाटन व्हावे, हीच त्यांची जीवनदृष्टी होती, हेच त्यांचे अध्यात्म होते आणि हाच त्यांचा परमार्थ होता. स्वातंत्र्याचा उल्लेख करणाऱ्यांनी स्वातंत्र्याकडे कसे पाहावे, याची दृष्टी गांधीजींच्या आचरणातून मिळते. गांधीजींनी कधीही लोकांना मी कृष्ण किंवा कुणाचा अवतार बनून तुमचा उद्धार करायला आलो आहे वगैरे म्हटले नाही. गांधींना एवढे लोक मानणारे होते की त्यांनी जर ठरवले असते तर ते एखाद्या नवीन धर्माचे संस्थापक ठरू शकले असते पण त्यांनी तसे काही केले नाही. 

7.गांधीहत्येनंतर ब्राम्हणांची हत्या झाली का?-

भ्याडपणे नथुराम गोडसे ने जेव्हा  प्रार्थनेला जाणाऱ्या गांधीजींची हत्या केली त्यानंतर तो स्वतःची ओळख सांगत नव्हता. स्वतःला मुसलमान दाखवून, गांधीजींची हत्या एका मुस्लिमाने केली असे सांगून भारतभर हिंदू-मुस्लिम दंगल पेटवून पटेल, नेहरू, मौलाना आझाद आणि सर्व प्रमुख नेत्यांच्या कत्तली घडवण्याचा आणि सरकार पाडण्याचा त्याचा आणि त्याच्या संघटनेचा डाव होता.  त्या ठिकाणी जेव्हा व्हॉईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन आले तेव्हा लोक त्यांच्याकडे आले आणि "हत्या करणारा मुस्लिम आहे का ?"असे विचारू लागले त्यांनी "तसे असणे शक्यच नाही" असे सांगितले , नंतर काकासाहेब गाडगीळ यांनी नथुरामला ओळखले आणि मोठा अनर्थ टळला.
राष्ट्रपित्याच्या हत्येमुळे पूर्ण देश शोकात बुडालेला असतांना हिंदू महासभा, आर.एस.एस च्या काही ब्राम्हण्यवादी लोकांनी साखर आणि मिठाई वाटणे सुरु केले. 
"आमचा बाप गेला आणि यांना कसला विकृत आनंद झाला" म्हणून लोक भडकले आणि त्यांच्यावर धावून गेले यात काही ब्राम्हण्यवादी लोकांची घरे जळाली.
पण पुणे, नगर आणि अनेक ठिकाणी गांधीवाद्यांनीच मध्ये पडून घरे वाडे जळण्यापासून वाचवली आणि जमावाला शांत केले.गांधीवाद्यांनी कधीही ब्राम्हणांचा किंवा कुठल्या जातीचा विरोध वा द्वेष केला नाही. आचार्य विनोबा भावे, कालेलकर, धर्माधिकारी हे गांधीजींचे महाराष्ट्रातील प्रमुख शिष्य कोण होते ? जर  ब्राम्हण जाती बद्दल द्वेष असता? तर यांना गांधीवाद्यांनी गांधीनंतर आपले मानले असते का? 

8.गांधी हत्या-
गांधीहत्येबद्दल 55 कोटी, फाळणी आदी काही खोटी कारणे सांगितली जातात पण हे सत्य नाही.फाळणीला शेवटपर्यत विरोध करणारे एकमेव गांधीजींच होते तर त्यांचे उपोषण हे 55 कोटींसाठी नसून दंगली थांबाव्यात यासाठी होते.सरकारने 55 कोटी देण्याचे कबूल केले तरी ते उपोषण थांबले नव्हते. दंगल थांबली तेव्हा त्यांनी उपोषण मागे घेतले.
55 कोटी बद्दल सरदार पटेल स्वतः म्हणतात की गांधीजी चा सल्ला बरोबर होता. 
"हम पास की सोचते है, पर बापू दूर की सोचते है" असे स पटेल यावेळी म्हणाले

9.गांधी हत्येचे कारण - 
गांधीहत्येचे मुख्य कारण होते त्यांचे सर्वसमावेशक धोरण. जे कार्य हजारो वर्षांपूर्वी भ महावीर व म. बुद्धांनी केले तेच काम गांधीजींनी आत्ता केले ते म्हणजे धर्म, राजकारण , शिक्षण, अर्थकारण , समाजकारण आदी सगळीकडे एका वर्गाची मक्तेदारी, वर्चस्व मोडून काढून ते सामान्य माणसासाठी खुले केले. गांधीजींच्या उदयापूर्वी राजकारण धर्मकारण आदी ठिकाणी मुख्यतः उच्चवर्णीय लोकांची मक्तेदारी होती ज्यामुळे त्यांची हत्या झाली. गांधीजींवर पहिला हल्ला पुण्यात जून1934 मध्ये ते अस्पृश्यता निवारण चळवळीचे कार्य करत असतांना झाला जेव्हा 55 कोटी, फाळणी इ गोष्टी ही अस्तित्वात नव्हत्या. सनातनी लोकांनी तो हल्ला घडवला होता.त्यानंतर अनेक हल्ले झाले

10.परिवर्तन – गांधी स्वतःत नेहमी सकारात्मक परिवर्तन करत राहिले उदा – चातुर्वर्ण्याबद्दलची त्यांची मते बदलत गेली.फक्त आंतरजातीय विवाहातच उपस्थित राहणार असा प्रण त्यांनी घेतला आणि शेवटपर्यत त्याचे पालन केले.
याचा परिणाम आजही दिसतो.उदाहरण सांगतो माझे जेष्ठ मित्र ACP प्रेमसागर सांगतात की त्या दोघांचे आंतरजातीय लग्न जवळजवळ अशक्य होते. त्यांचा जवळचा मित्र ही त्यांना सल्ला देऊन सोडून गेला की "या आंतरजातीय विवाहात तुझा खून वगैरे होऊ नये म्हणून म्हणून तू लांब रहा यापासून".हे चालू असताना मुलीच्या आजी कडे (आईचीआई) हे प्रकरण गेले त्या म्हणाल्या "अरे लडका हरिजन है, मतलब अपने से भी उपर है ऐसा गांधीजीने कहा है और गांधीजी तो सिर्फ ऐसेच शादी मे जाते थे" त्या आज्जीला कोणी विरुद्ध बोलू शकल नाही कारण गांधींचे एवढं स्थान सगळीकडे होत. 30 वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले तेव्हा माझ्या लग्नात म.गांधी उपस्थित असल्यासारखे मला यामुळे वाटल्याचा ACP प्रेमसागरजी मला म्हणाले तेव्हा मलाही भरून आले की "किती लोकांना अंतर्बाह्य बदलून टाकले या गांधीने"...

11.पर्यावरणपृथ्वीकडे सर्वांची गरज भागवण्याएवढे आहे पण सर्वांची हाव भागवू शकेल एवढे  शकेल एवढे नाही.असे ते म्हणत. आज जगभर जेव्हा पर्यावरणा साठी मोर्चे निघतात तेव्हा त्यावर गांधीजींचे हेच वाक्य असते.

12.स्त्रियांचे सक्षमीकरण-

 जीवनाच्या ज्या ज्या क्षेत्रात पुरुष कार्य करतात त्या त्या क्षेत्रात स्त्रिया कार्य करू शकतात; स्त्रियांना कार्य करता आले पाहिजे आणि स्त्रियांनी कार्य केले पाहिजे हा गांधीजींचा आग्रह होता. त्यामुळेच त्यांनी स्त्रियांसाठी खास असे काही कार्यक्रम राबवले नसले तरी त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांची योजनाच अशी असायची की त्यात स्त्रियांचा सहभाग आवश्यक असे. एकदा बिहारमध्ये त्यांना एका कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते ,आपल्या पूर्ण देशामध्ये स्त्रियांना चूल, मुल पदर आणि बुरखा एवढ्या पुरतेच मर्यादित ठेवले जाई बिहार मध्ये तर स्त्रियांवर अजून काही बंधने होती असे असताना गांधीजींनी अट घातली कि कार्यक्रमात स्त्रियांचा सहभाग असला तरच मी कार्यक्रमाला येणार आणि तेथे तो चमत्कार घडला सुद्धा.
आपली भारतीय राज्यघटना तयार करण्यात अनेक गांधीवादी स्त्रियांचे मोठे योगदान आहे.स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी अनेक विकसित देशांना भांडावे लागले. आपल्या भारतात ते स्वातंत्र्यासोबतच मिळाले त्याला कारण गांधींनी तयार केलेली मानसिकता.

शेवटी बाबा आमटेंच्या मुक्तछंदातील हे शब्द सांगून विराम घेतो
त्याने प्रथम एका मिठाच्या पुडीला हात घातला आणि मग एक साम्राज्य 
मिठाच्या सात समुद्र पलीकडे फेकून दिले.त्याने सुतातून सुरुवात केली
आणि अखेर स्वराज्याचा स्वर्ग गाठून दाखवला. याच साध्या सुताने त्याने एक पिढीच्या पिढी आणि एक देशच्या देश बांधून दाखवला.
पण एक देशच्या देश आणि एक पिढीच्या पिढी पकडण्यासाठी 
नुसतीच हिकमत पुरी पडत नाही
त्यासाठी ताकदही लागते
भारी वजनाचा एक क्रूस वाहण्याची ताकद!"
"ज्याला तो क्रूस वागवता येतो 
त्याच्या सोबत बारा अनुयायी असले 
तरी त्याचे प्रेषितत्व घाबरत नाही.
पण खांद्यावर क्रूस नसता कुणी बारा लाख बाजारबुणगे घेवून निघाला 
तरी त्याचा महंत होतो.
आणि महंत फक्त गादी चालवू शकतात.
मन्वंतरे घडवून आणू शकत नाहीत


चला तर मग बदलाची सुरुवात स्वतःपासून करूया

संकेत मुनोत
8668975178
Knowing.Gandhi@gmail.com
Knowing Gandhism Global Friends

आपणही ही चळवळ जॉईन करा 

Comment, Share ,Follow and Subscribe.

No comments:

Post a Comment