AddThis code

Tuesday, February 11, 2025

राहुल बजाज - निर्भय भूमिका घेणारा उद्योजक

12 फेब्रुवारी 2022
जेष्ठ उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे ८३ व्या वर्षी निधन झाले, भावपूर्ण श्रद्धांजली

सरकार कुठलेही असो त्याला न घाबरता  निर्भयपणे भूमिका घेणारा माणूस 

  'हमारा बजाज' हे जे स्लोगन ऐकतो ते त्यांचेच ...त्यांच्या कारकीर्दीत  बजाज ऑटोने  कंपनीची उलाढाल 7.2 कोटींवरून 12 हजार कोटींवर पोहोचली होती. बजाज ऑटो ही स्कूटर विकणारी देशातील सर्वात मोठी कंपनी बनली.

बजाज स्कूटर घेण्यासाठी खूप दिवस पूर्वी  बुकिंग करावे लागे...

गांधीविचारांचा वारसा - राहुल #बजाज यांचे आजोबा जमनालाल बजाज यांचा जन्म  एका गरीब मारवाडी कुटुंबात झाला.चौथीपर्यंतच शिक्षण घेतले. एका श्रीमंत कुटुंबाने त्यांना दत्तक घेतले. या नवीन कुटुंबाचा पैशावर खूप विश्वास होता. लोकांशी वागताना पण हे कुटुंब तसेच पैसे बघून वागे. जमनालाल यांना ते पटले नाही आणि ते घर सोडून निघून गेले त्यानंतर घरच्यांनी खूप समजावून त्यांना परत आणले . स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर त्यांनी खूप नाव कमावले. 
त्यांना अश्या व्यक्तीला आपला गुरू बनवायचे होते , ज्याच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक नसेल. 1915 मध्ये भारतात परतल्यावर गांधीजींनी साबरमतीत आश्रम बांधला जमनालाल तिथे पोहोचले आणि गांधीजींच्या कार्याचे निरीक्षण करू लागले कि खरच हा माणूस बोलतो तसा आहे का ? पण सोबत राहिल्यावर  सरदार  पटेल आणि अनेकांप्रमाणे तेही बदलले गांधींना  त्यांचा पाचवा मुलगा म्हणून स्वीकारायला सांगून पुढचे जीवन त्यांनी त्यासाठी वाहून घेतले. इंग्रज स्वातंत्र्यलढ्यात सहभाग न घेणाऱ्या आणि ब्रिटीशांची चापलुसी करणाऱ्या लोकांना व्यापारात खास सवलत देत असे. पण बजाज यांनी त्याला ठाम नकार देऊन  गांधीजींच्या स्वातंत्र्यलढ्यात  स्वतःला झोकून दिले ज्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना भरपूर त्रास ही दिला .  
एका मुलाखतीत राहुल बजाज यांनी गांधीविचार आजही कसे अनुकरणीय आहेत हे सांगताना स्वतःच्या  वडील कमलनयन बजाज यांच्यात झालेल्या सुधारणेचेच उदाहरण दिले .कमलनयन बजाज  जेव्हा गांधीजींच्या आश्रमात गेले तेव्हा त्यांनाही नियमाप्रमाणे आश्रमातील सगळे काम करण्यास सांगण्यात आले त्यात ''मै सारे काम करुंगा पर संडास(शौचालय ) साफ करने का गंदा काम नही करुंगा'' असे कमलनयन म्हणाले.  ही तक्रार थेट गांधीजीपर्यंत गेली . गांधींनी त्यांना सक्ती केली नाही  पण तिथून निघताना गांधी कमलनयन यांना  म्हणाले "गंदगी करना गंदी बात है या गंदगी साफ करना ?"  त्यानंतर कमलनयन यांनी स्वतः तर संडास साफ करण्याचे काम केलेच  पण अनेकांना ते करण्याची प्रेरणाही दिली. हेच त्यांच्या पत्नी बद्दल. सावित्री एका श्रीमंत घरातून सून म्हणून  बजाज यांच्या घरी आल्या तर ''खादीमुळे अंगावर ओरखडे येतात'' असे कारण सांगून ती  घालण्यास त्यांनी नकार दिला . गांधीजींकडे गोष्ट गेली तेव्हा ते म्हणाले कि ''खादी घालण्याची सक्ती करणे ही सुधा हिंसाच आहे त्यामुळे जेव्हा पटेल तेव्हा ती स्वीकारेल नाही घातली तरी हरकत नाही.''  पण सावित्रीजी यांनी नंतर खादी स्वीकारली ती कायमचीच.आईच्या अंत्यविधीच्या वेळीही तिच्या अंगावर खादी होती असे बजाज म्हणाले   
पैसा मिळवायचा म्हणजे लबाड्या च करायच्या अश्या गोष्टी जेव्हा आज बोलल्या जातात तेव्हा राहुल बजाज यांनी  प्रसिद्ध मासिक फोर्ब्सला दिलेल्या मुलाखतीतले शब्द आठवतात ,  'मी कोणी संत नाही. पण मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी पैसे मिळवण्यासाठी कोणतीही चुकीची पद्धत वापरली नाही.
त्यांच्या नावाचाही किस्सा भारी आहे .इंदिरा गांधीना त्यांच्या स्वतःच्या मुलाचे नाव राहुल ठेवायचे होते पण पंडित नेहरू यांनी  एका कार्यक्रमात बजाज यांना ते  दिल्यामुळे इदिराजींनी स्वतःच्या  मुलाचे नाव  राजीव ठेवावे लागले पण मग नातवाचे नाव त्यांनी  राहुल असे ठेवले . राहुल बजाज यांनीही स्वतःच्या मुलाचे नाव राजीव ठेवले आहे.
राहुल बजाज यांनीही आजोबांच्या निर्भयतेने भूमिका घेण्याचा  वारसा पुढे चालू ठेवला २०१९ च्या Economic Times Awards च्या कार्यक्रमात सगळे सरकारची चापलुसी करण्यात दंग असतांना त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना थेट जाब विचारला  ''देशात  सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लोक सरकारवर टीका करण्यासही घाबरत आहेत. लोकांना सरकारला प्रश्न विचारण्याची मुभा का नाही?गांधीजींचा खून करणाऱ्या दहशतवादी नथुराम गोडसेचे समर्थनच  कसे होऊ शकते ?  त्यावर अमित शहा यांनी ''आम्ही गोडसेचे समर्थन करणाऱ्या प्र्ज्ञासिंग वर कारवाई केल्याचे म्हटले'' सोबत ''तुम्ही बोलले म्हणजे भीती तर नाहीच ना बोलायला ?'' पण त्यांनतर राहुल बजाज यांना जसे ट्रोल केले त्यावरून त्यांच्या बोलण्याची सत्यता समजून येते पण तरीही ते घाबरले नाही आणि त्यांनी माफी ही मागितली नाही. 
गांधीजींचे वैशिष्ट्य हे होते कि क्षेत्र कुठलेही असो ते त्यांना निर्भय भूमिका घ्यायला लावत. तर असा भूमिका घेणारा एक निर्भय उद्योजक आपण गमावला 

भावपूर्ण श्रद्धांजली   

संकेत मुनोत

Sunday, February 9, 2025

खोटे शिक्षण दाखवून पॉलिसी घेणे योग्य आहे का?

परवा एका मित्राच्या रेफेरेंस ने एका व्यवसायिकाने त्याचे आर्थिक नियोजन करण्यासाठी बोलवले होते. त्यांना बँकेत  कोणी तरी Term पॉलिसी दिली होती जी मेडिकल मध्ये रिजेक्ट झाली. शुगर जास्त भरली होती 6 महिन्यांनी परत करायला सांगितले होते. मला त्या म्हटल्या की तिथे नाही होत तुम्ही बघा तुमच्या ओळखीने सेटिंगने कुठे काही झाले तर. 
त्यांना म्हटलं तुमचे उत्पन्न आणि जबाबदाऱ्या पाहून मी तुम्हाला सूट होईल असे चांगल्यात चांगले planning सुचवेल जेणेकरून तुमचे पैसे वाढतीलही आणि वाचतीलही पण असे खोटे काही जमणार नाही. अर्थात जे कोणी तुम्हाला जमवून द्यायचे सांगतील ते आत्ता तात्पुरते काहीतरी देऊन नंतर क्लेम आल्यावर हात वर करतील. जर 1-2 कोटी चा क्लेम मिळाला नाही तर टर्म इन्शुरन्स काय कामाचा?
अशीच अजून एक केस त्यांचे शिक्षण 10 वी झालेले मी म्हटले तुम्हाला तुमच्या या उत्पन्नाला टर्म मिळू शकत नाही private कंपनीचा. LIC चा मिळत होता पण त्यांना महाग वाटला. पण काही महिन्यांनी त्यांना कोणी तरी टर्म दिला मला त्यांनी पॉलिसी कागदपत्रे दाखवली. मला आश्चर्य वाटले मी तपासले तर देणाऱ्यांनी त्यांचे शिक्षण graduate दाखवले होते. मी त्यांना सांगितले की क्लेम आला तर खोटे शिक्षण दाखवले म्हणून रिजेक्ट होईल असे करू नका मग त्यांनी त्या बँकेतील व्यक्तीला संपर्क केला पण त्याची दुसरीकडे बदली झाली होती जो नवीन बँकर त्याच्या जागी आला होता तो म्हटला मला काही माहित नाही तुम्ही इन्शुरन्स च्या ऑफिस मध्ये जा. तर बँकेतुन पॉलिसी घेण्याचा हा तोटा होतो ते आत्ताचं उपलब्ध नाही तर पुढे क्लेम आल्यावर काय करणार? स्वतः IRDA ने आणि आपल्या अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे की बँकेने इन्शुरन्स पॉलिसी बाबत misseling केले आहे म्हणजे चुकीच्या पॉलिसी विकल्या आहेत. हेच ऑनलाईन बाबतही होते की नंतर जबाबदारी घेण्यासाठी ते नसतात.
मी स्वतः कुठलीही पॉलिसी देताना माझ्या घरातील एखाद्या व्यक्तीला देतोय अश्या प्रकारे देतो आणि मिळत नसेल तर नाही म्हणतो पण चुकीचे काही देत नाही कारण चुकीच्या गोष्टी सांगून दिले तर नंतर त्या कुटुंबाला 1-2 कोटी रुपये मिळणार नाहीत आणि तो तळतळाट आपल्याला लागेल ही भीती असते. ऑनलाईन पॉलिसी देणाऱ्यांना किंवा काहीही चुकीचे करणाऱ्यांना ही भीती नसते का? त्यांना नसली तरी जो काढतोय त्यांना ती असायला हवी.

असो तुम्ही तरी अश्या गोष्टी करू नका. आपण पैसा कष्टाने कमवतो तो योग्य प्रकारे नियोजित करा. 

संकेत मुनोत 
आर्थिक तज्ञ आणि विमा सल्लागार 
8668975178
( photo प्रतिकात्मक आहे..)
#financialliteracy #financialplanning

Saturday, January 11, 2025

माझे नावडते पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग- मार्मिक मध्ये प्रकाशित लेख

माझे नावडते पंतप्रधान डॉ.#मनमोहनसिंग

ते न पटण्याचे कारण त्यांचे #पंतप्रधान म्हणून शांत राहून काम करणे

पंतप्रधान कसा असावा तर मस्त भरपूर #भाषणे करणारा ,जे केले नाही ते पण मी केले असे सांगणारा, स्वतःच्या चुकांचे खापर पूर्वीच्या सरकारवर टाकणारा, मस्त बॉलीवूड च्या लोकांसोबत, पशु पक्ष्यांसोबत रोज वेगवेगळ्या पोसे मध्ये फोटो शूट करणारा आणि असा सगळा टाइमपास करूनही पहा ;''मी कसा १८-१८ तास काम करतो'' अश्या थापा मारणारा ...

पण डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान असूनही यातले काहीच जमत नव्हते, मोठं-मोठ्या थापा मारत आक्रस्ताळी भाषणे न करता शांतपणे काम करत स्वतःच्या निर्णयातून ते इतिहास घडवत राहिले? खरं तर करायला काय हवं होत त्यांनी तर प्रत्येक दिवसाचा इव्हेंट करायला हवा होता,आज हे कसे भारी केले असं सांगत प्रत्येक दिवस #ऐतिहासिक कसा आहे हे सांगायला हवे होते पण डॉ मनमोहनसिंगांना हे जमत नव्हते .#दुर्बुद्धी च म्हणा त्यांची

त्यांनी #चुकीचे अनेक मोठे मोठे #निर्णय घेतले पण त्यातले ५ निर्णय खूप भयानक होते

1.त्यातील पहिला म्हणजे #Economic_Reforms_1995- देशाची अर्थव्यवथा बुडते का काय? असं लोकांना वाटतं असतांना डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थविषयक काही धोरणे आखून भारताची अर्थव्यवस्था मजबूत केली लायसन्स राज संपवले ,ते पंतप्रधान असताना एक काळ असा होता कि पूर्ण #जग मंदीच्या गर्तेत होते, रोज शेयर मार्केट ढासळत होते, खरतर यावेळी करायला काय हवे होते तर नोटबंदी किंवा इतर कुठला निर्णय किंवा थाळी वाजवा , टाळ्या वाजवा सारखा निर्णय ज्यामुळे पूर्ण जग नैराश्यात आहे पण आपण एकत्र कसे आहोत हे लोकांना सांगता आले असते पण केले काय तर, मनमोहन सिंग यांनी अशी काही धोरणे आखली कि भारताला याचा धोकाच पोहोचला नाही ,त्यांनी भारताची अर्थव्यवस्था जगात दुसऱ्या स्थानावर नेऊन ठेवली होती.

2. त्यांचा चुकीचा दुसरा निर्णय म्हणजे #माहिती_अधिकार_कायदा ज्याच्यामुळे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर थांबला, अरे #भ्रष्टाचार काय थांबवायची गोष्ट असते काय ?

उलट ''ना खाता हू , न खाने दूंगा'' असं म्हणत भरमसाठ भ्रष्टाचार करायचा असतो, ED, CBI, RBI आणि अश्या सगळ्या स्वायत्त संस्थांना आपले बाहुले बनवायचे असते.आणि तरीही विरोधी कोणी जिंकले तर त्यांच्यातील लोक शेकडो कोटी देऊन विकत घ्यायचे असते, वृत्तपत्रात पहिल्या पानावर आणि टीव्ही च्या सगळ्या वाहिन्यांवर स्वतःच्या हजारो कोटींच्या जाहिराती द्यायच्या असतात एवढे करायला पैसे कुठून आले त्याचा हिशोब विचारायचा नसतो, तो भ्रष्टाचार थोडीच असतो?.

3. तिसरा चुकीचा निर्णय म्हणजे ग्रामीण भागातील लाखो लोकांना रोजगार देणारी #मनरेगा योजना, तुम्हाला आठवत असेल तर आपले आपले पंतप्रधान मोदीजी यांनी या योजनेवर प्रचंड टीका केली आणि स्वतः १ कोटी रोजगार दर वर्षाला देऊ म्हटले पण आज आपण पाहतो कि नवीन रोजगार सोडा, आहे ते रोजगार गेले आहेत, शेवटी आजही याच मनरेगा योजनेअंतर्गत अनेकांना रोजगार मिळतो पण खरं करायला काय हवे होते लोकांना सरळ ''भजी तळा'' वगैरे सारखे सल्ले द्यायला हवे होते आणि जो काही राष्ट्रीय रोजगार सर्वे चा चार्ट आहे तोच बंद करायला हवा होता पण त्यांना ते जमले नाही.

4. चौथा महत्वाचा चुकीचा निर्णय म्हणजे #Civil_Nuclear_Deal - या निर्णयवेळी त्यांच्यासोबत जे सत्तेत होते त्यांनी या्ला विरोध करत पाठिंबा काढून घेऊअसे म्हटले, पण डॉ मनमोहन सिंग यांनी ते बिल पारित करून त्यांचा पाठींबा जाऊनही पुन्हा मजबूत सरकार स्थापन केले. इथे एक मुद्दा चमचा म्हणण्याचा पण येतो ते जर दुसऱ्या कुणाचा चमचा असते तर असा निर्णय घेणे शक्य झाले असते का ? नाही ना ? पण तरीही त्यांनी हा निर्णय घेतला पण आपण मात्र त्यांना असं असूनही बाहुला म्हणूया...

5. पाचवा चुकीचा निर्णय फूड security बिल चा याबद्दल तुम्ही स्वतः जाऊन वाचा , याचे फायदे आपण आजही भोगत आहोत

पण वरील सर्व करतांना त्यांचे चुकले काय तर त्यांनी सामान्य लोक, मध्यमवर्गीय लोक ,छोटे-मोठे व्यापारी, शेतकरी,कामगार सर्वांचा विचार केला पण विचार कोणाचा करायला हवा होता तर अदानी अंबानी यांचा, त्यांच्यामुळे तर आपला देश चालतोय ना बाकी आपण कुठे काय करतोय पण इथे चुकलेच त्यांचे..

अजून एक मुद्दा सहानुभूतीचा पण आहे, त्यांनी भाषणात रडून स्वतःचे बालपणातील किस्से सांगून किंवा आपल्या आज्जीसोबतचेे फोटो टाकून किंवा जगभरातून मिळालेले पुरस्कार दाखवून कधी सहानुभूती गोळा नाही केली.फाळणीच्यावेळी बालपणीच त्यांना सर्वस्व गमावून भारतात यावे लागेल, त्याच दरम्यान आईचा मृत्यू झाल्याने आज्जीने त्यांना सांभाळले, त्या वेळी घरातील प्रचंड गरिबीमुळे रॉकेलच्या दिव्याच्या प्रकाशात रात्री जागून अभ्यास केल्यामुळे त्यांचे डोळे खराब झाले, त्यांच्या जाड भिंगाचा चष्मा याची साक्ष देतो ,शिक्षणातील प्रत्येक वर्षात पहिला नंबर मिळवत त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठापर्यत मजल मारली पण यातील कुठल्याही गोष्टीचा त्यांनी सहानुभूती गोळा करण्यासाठी उपयोग केला नाही, खरतर स्वतःच्या कार्यकाळात स्वतःच्या प्रेरणादायी आयुष्यावर एक मस्त चित्रपट काढता आला असता आणि त्याला भारतातूनच नव्हे तर जगभरातून प्रतिसाद मिळाला असता, त्यांच्या तर सगळ्या पदव्या सुद्धा खऱ्या होत्या

मान्य करू कि नसेल मगर पकडली बालपणी त्यांनी मोदीजींसारखी किंवा एकाच वेळी आपला एक एक अवतार हिमालयात, एक भिक्षा मागायला, एक चहा विकायला आणि एक शिक्षण करायला असे नसतील गेले त्यांचे

पण त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून जगातील नावाजलेलया केम्ब्रिज विद्यापीठाने ''सिंग शिष्यवृत्ती'' त्यांचा सन्मान म्हणून सुरु केली आहे मग करायचा ना एखादा मस्त चित्रपट तयार पण दुर्बुद्धी मुले नाही जमले त्यांना हे ..

एक मुद्दा #मौनी बाबाचा ही - पंतप्रधानाला भाषणात #थापा मारता यायला हव्यात, हे आज आपण पाहतो पण मनमोहन सिंग यांच्यात हा चांगला गुणच नव्हता, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात तब्बल १९९८ एवढी भाषणे केली पण ती मनकी बात सारखी एककल्ली नव्हे तर लोकसभा आणि राज्यसभा सारख्या सदनांमध्ये केली आहेत, त्यांच्या मुलाखती पहिल्या तर मुलाखत घेणारे पत्रकार ही मूर्ख असावेतअसे दिसते, वेगवेगळ्या धोरणविषयी अवघड प्रश्न हे पत्रकार विचारत, पण अरे मुलाखतीत काय विचारावे हे समजायला नको का तुम्हाला ?तुम्ही आंबे कसे खाता?, तुम्ही खिशात पाकीट ठेवता कि नाही? तुम्ही कसे महान आहात वगैरे प्रश्न विचारायला हवेत ना? पण त्यावेळी पत्रकार पण चांगले नसावेत

आज पहा कसे मस्त मस्त पत्रकार आहेत लोकांचे मुख्य प्रश्न सोडून पूर्ण वेळ रिया कंगना ड्रुग्स इ वर बोलत असतात. अरे रोजगार जात आहेत , आरोग्यव्यस्था , शिक्षण , GDP यावर बोलायाच असत का कुठे?

डॉ.मनमोहनसिंग ्यांच्यावर काही लोक जेव्हा खालच्या पातळीवर जाऊन बोलत होते तेव्हा ते म्हणाले होते कि ''माझ्या कामाची दखल इतिहास घेईल''

आज आपली अर्थव्यवस्था रसातळाला गेल्यावर, बेरोजगारी प्रचंड वाढल्यावर त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतच आहोत. पण मला वाटतं त्यांनी तस बोलण्यापेक्षा सरळ जो कोणी त्यांचा विरोध सोडा, छोटासा प्रश्न सुद्धा विचारतोय त्याला #पाकिस्तानी , #देशद्रोही , #चमचा म्हणत ट्रोल करायला हवे होते, त्यांच्यावर खोट्या केसेस टाकून तुरुंगात टाकायला हवे होते पण असतात काही-काही लोक ज्यांना या महत्वाच्या गोष्टी समजत नाहीत ते असले प्रकार करायचे सोडून फक्त स्वतःचे काम करत राहतात

चूकभूल क्षमस्व

संकेत मुनोत
26 Sep 2020
#ManmohanSingh