AddThis code

Tuesday, February 11, 2025

राहुल बजाज - निर्भय भूमिका घेणारा उद्योजक

12 फेब्रुवारी 2022
जेष्ठ उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे ८३ व्या वर्षी निधन झाले, भावपूर्ण श्रद्धांजली

सरकार कुठलेही असो त्याला न घाबरता  निर्भयपणे भूमिका घेणारा माणूस 

  'हमारा बजाज' हे जे स्लोगन ऐकतो ते त्यांचेच ...त्यांच्या कारकीर्दीत  बजाज ऑटोने  कंपनीची उलाढाल 7.2 कोटींवरून 12 हजार कोटींवर पोहोचली होती. बजाज ऑटो ही स्कूटर विकणारी देशातील सर्वात मोठी कंपनी बनली.

बजाज स्कूटर घेण्यासाठी खूप दिवस पूर्वी  बुकिंग करावे लागे...

गांधीविचारांचा वारसा - राहुल #बजाज यांचे आजोबा जमनालाल बजाज यांचा जन्म  एका गरीब मारवाडी कुटुंबात झाला.चौथीपर्यंतच शिक्षण घेतले. एका श्रीमंत कुटुंबाने त्यांना दत्तक घेतले. या नवीन कुटुंबाचा पैशावर खूप विश्वास होता. लोकांशी वागताना पण हे कुटुंब तसेच पैसे बघून वागे. जमनालाल यांना ते पटले नाही आणि ते घर सोडून निघून गेले त्यानंतर घरच्यांनी खूप समजावून त्यांना परत आणले . स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर त्यांनी खूप नाव कमावले. 
त्यांना अश्या व्यक्तीला आपला गुरू बनवायचे होते , ज्याच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक नसेल. 1915 मध्ये भारतात परतल्यावर गांधीजींनी साबरमतीत आश्रम बांधला जमनालाल तिथे पोहोचले आणि गांधीजींच्या कार्याचे निरीक्षण करू लागले कि खरच हा माणूस बोलतो तसा आहे का ? पण सोबत राहिल्यावर  सरदार  पटेल आणि अनेकांप्रमाणे तेही बदलले गांधींना  त्यांचा पाचवा मुलगा म्हणून स्वीकारायला सांगून पुढचे जीवन त्यांनी त्यासाठी वाहून घेतले. इंग्रज स्वातंत्र्यलढ्यात सहभाग न घेणाऱ्या आणि ब्रिटीशांची चापलुसी करणाऱ्या लोकांना व्यापारात खास सवलत देत असे. पण बजाज यांनी त्याला ठाम नकार देऊन  गांधीजींच्या स्वातंत्र्यलढ्यात  स्वतःला झोकून दिले ज्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना भरपूर त्रास ही दिला .  
एका मुलाखतीत राहुल बजाज यांनी गांधीविचार आजही कसे अनुकरणीय आहेत हे सांगताना स्वतःच्या  वडील कमलनयन बजाज यांच्यात झालेल्या सुधारणेचेच उदाहरण दिले .कमलनयन बजाज  जेव्हा गांधीजींच्या आश्रमात गेले तेव्हा त्यांनाही नियमाप्रमाणे आश्रमातील सगळे काम करण्यास सांगण्यात आले त्यात ''मै सारे काम करुंगा पर संडास(शौचालय ) साफ करने का गंदा काम नही करुंगा'' असे कमलनयन म्हणाले.  ही तक्रार थेट गांधीजीपर्यंत गेली . गांधींनी त्यांना सक्ती केली नाही  पण तिथून निघताना गांधी कमलनयन यांना  म्हणाले "गंदगी करना गंदी बात है या गंदगी साफ करना ?"  त्यानंतर कमलनयन यांनी स्वतः तर संडास साफ करण्याचे काम केलेच  पण अनेकांना ते करण्याची प्रेरणाही दिली. हेच त्यांच्या पत्नी बद्दल. सावित्री एका श्रीमंत घरातून सून म्हणून  बजाज यांच्या घरी आल्या तर ''खादीमुळे अंगावर ओरखडे येतात'' असे कारण सांगून ती  घालण्यास त्यांनी नकार दिला . गांधीजींकडे गोष्ट गेली तेव्हा ते म्हणाले कि ''खादी घालण्याची सक्ती करणे ही सुधा हिंसाच आहे त्यामुळे जेव्हा पटेल तेव्हा ती स्वीकारेल नाही घातली तरी हरकत नाही.''  पण सावित्रीजी यांनी नंतर खादी स्वीकारली ती कायमचीच.आईच्या अंत्यविधीच्या वेळीही तिच्या अंगावर खादी होती असे बजाज म्हणाले   
पैसा मिळवायचा म्हणजे लबाड्या च करायच्या अश्या गोष्टी जेव्हा आज बोलल्या जातात तेव्हा राहुल बजाज यांनी  प्रसिद्ध मासिक फोर्ब्सला दिलेल्या मुलाखतीतले शब्द आठवतात ,  'मी कोणी संत नाही. पण मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी पैसे मिळवण्यासाठी कोणतीही चुकीची पद्धत वापरली नाही.
त्यांच्या नावाचाही किस्सा भारी आहे .इंदिरा गांधीना त्यांच्या स्वतःच्या मुलाचे नाव राहुल ठेवायचे होते पण पंडित नेहरू यांनी  एका कार्यक्रमात बजाज यांना ते  दिल्यामुळे इदिराजींनी स्वतःच्या  मुलाचे नाव  राजीव ठेवावे लागले पण मग नातवाचे नाव त्यांनी  राहुल असे ठेवले . राहुल बजाज यांनीही स्वतःच्या मुलाचे नाव राजीव ठेवले आहे.
राहुल बजाज यांनीही आजोबांच्या निर्भयतेने भूमिका घेण्याचा  वारसा पुढे चालू ठेवला २०१९ च्या Economic Times Awards च्या कार्यक्रमात सगळे सरकारची चापलुसी करण्यात दंग असतांना त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना थेट जाब विचारला  ''देशात  सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लोक सरकारवर टीका करण्यासही घाबरत आहेत. लोकांना सरकारला प्रश्न विचारण्याची मुभा का नाही?गांधीजींचा खून करणाऱ्या दहशतवादी नथुराम गोडसेचे समर्थनच  कसे होऊ शकते ?  त्यावर अमित शहा यांनी ''आम्ही गोडसेचे समर्थन करणाऱ्या प्र्ज्ञासिंग वर कारवाई केल्याचे म्हटले'' सोबत ''तुम्ही बोलले म्हणजे भीती तर नाहीच ना बोलायला ?'' पण त्यांनतर राहुल बजाज यांना जसे ट्रोल केले त्यावरून त्यांच्या बोलण्याची सत्यता समजून येते पण तरीही ते घाबरले नाही आणि त्यांनी माफी ही मागितली नाही. 
गांधीजींचे वैशिष्ट्य हे होते कि क्षेत्र कुठलेही असो ते त्यांना निर्भय भूमिका घ्यायला लावत. तर असा भूमिका घेणारा एक निर्भय उद्योजक आपण गमावला 

भावपूर्ण श्रद्धांजली   

संकेत मुनोत

No comments:

Post a Comment