AddThis code

Saturday, March 21, 2026

आजच्या युवा पिढीची लग्नाची समस्या - संकेत मुनोत, संवाद मासिक, मार्च 2026

सध्याच्या युवापिढीसमोर अनेक आव्हाने आहेत त्यातील मुख्य ३ म्हणायची तर नोकरी , व्यवसाय आणि लग्न . यात पहिल्या २ म्हणजे नोकरी किंवा व्यवसाय हे प्रश्न हळूहळू का होईना सुटूनही जातात पण लग्न जमणे आणि त्यानंतर ते टिकणे हे आजच्या जमान्यात खूप मोठे चॅलेंज झाले आहे . अर्थात अवास्तव अपेक्षा आणि तुलना हे त्यामागचे मोठे कारण आहे असे मला वाटते.
इतिहासाचा अभ्यासक म्हणून विचार केला तर महात्मा फुले, महात्मा गांधी किंवा इतर जे काही महामानव झाले त्यांच्यापुढे हे लग्न जमवण्याचे चॅलेंज नव्हते. विशेष म्हणजे जोडीदारामुळे अधिक चांगले काम करू शकलो हे वरचे दोघेही महामानव मान्य करतात आणि सवित्रीबाई आणि कस्तुरबाही त्यांच्यामुळे स्वतःला अधिक चांगले घडवू शकल्याचे सांगतात. 

'आर्थिक नियोजन आणि आर्थिक वृद्धी कशी करावी ?' याबद्दलची कार्यशाळा घेताना मी नेहमी सांगत असतो कि आपण खर्च करत असताना इच्छा आणि गरज यामध्ये गरजेला महत्व द्यावे तेच तत्व मला लग्नाच्या बाबतही सामान वाटते कि "जोडीदार म्हणून मला गरजेचे काय आहे?" ते पहायला हवे . इच्छा तर एखाद्याची करीना कपूरशी लग्न करायची असेल पण मग तो स्वतःही सैफ अली खान आहे का? आवास्तव अपेक्षा ठेवू नयेत हे यानिमित्त समजते.

मुलगा किंवा मुलगी पाहताना बहुतेक लोक काय पाहतात? याबद्दल काही दिवसांपूर्वी मिम बनवले होते त्यात या गोष्टी मांडल्या होत्या..
मुलगा असेल तर बहुतेक जण त्याची जात, धर्म, वार्षिक उत्पन्न, संपत्ती, स्वतःचे घर, जमीन, नोकरीं, व्यवसाय, शिक्षण वगैरे पाहतात तर  
तेच मुलगी असेल तर बहुतेक जण तिची जात, धर्म, रंग, उंची, सौंदर्य वगैरे पाहतात 
यात अश्या अपेक्षातून जोडीदार मिळाला तरी तो संसार पुढे किती चांगला चालेल ? किंवा लोकांना दाखवण्यासाठी नुसतं चाललंय म्हणून चाललंय असेही बऱ्याच ठिकाणी होते पण यात जर खरच काही महत्वाच्या गोष्टी पाहिल्या तर बराच फरक पडू शकेल आणि मस्त प्रेमळ नाते तयार होऊ शकते असे मला वाटते.

मुलगा पाहताना - 
* *दुप्पट चौपट उत्पन्न * - पूर्वी मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्यामुळे उत्पन्नही नव्हते. त्यामुळे उत्पन्नच नसल्याने किंवा अगदी कमी असल्याने दुप्पट, तिप्पट उत्पन्न सहज शक्य होते पण आज जेव्हा शिक्षणाचा समान अधिकार मिळाला आहे तर नोकरीं मिळताना पण सामान उत्पन्न मिळणार ना? नोकरी देताना मुलगा आहे म्हणून जास्त उत्पन्न आणि मुलगी आहे म्हणून कमी उत्पन्न देतात का ? त्यामुळे जमाना बदललाय तसे मुलांच्यासोबत मुलींनीही बदलायला हवे . दुप्पट उत्पन्नाच्या ऐवजी कुटुंबाची जबाबदारी व्यवस्थित घेऊ शकेल, घर चालवू शकेल एवढे उत्पन्न मुलाचे आहे ना? हे पहायला हवे असे मला वाटते. संपत्ती पाहताना सुद्धा अमाप संपत्ती ऐवजी आर्थिक स्थैर्य आहे ना एवढे पहायला हवे.

मुलगी पाहताना -
मुलगी पाहताना तिचा रंग , उंची , सौदर्य या गोष्टी अधिक पहिल्या जातात . रंग कुठला असावा , किंवा उंची किती असावी? हे आपल्या हातात नाही त्यामुळे ते न पाहता दोघेही एकमेकांना थोडे फार अनुरूप आहेत का हे पहायला हवे असे मला वाटते. 

यात स्थळ पाहताना जाती धर्माच्या चौकटीमुळे सुद्धा बर्याच अडचणी येतात . नुकतेच एका मुलीबद्दल ऐकले. तिला काही वर्षांपूर्वी सुशिक्षित, शाकाहारी आणि निर्व्यसनी मुलगा हवा पण तिच्या जातीत असा मुलगा मिळणे अवघड जात होते पण जातीबाहेर पाहायचीही तिच्या किंवा तिच्या घरातील लोकांची तयारी नव्हती. पूर्वी जिथे घटस्फोट झाला ते स्वतःच्या जातीधार्मातलेच होते पण तरीही चौकटीबाहेर जायचा विचार नव्हता आता तो विचार झाला पण वय वाढले .जात असो किंवा धर्म असो आपण माणसांनीच निर्माण केलेले आहेत त्यामुळे आयुष्याचा पुढचा प्रवास करताना त्याबाहेरही विचार करायला हवा असे मला वाटते. मुख्य गोष्ट ही पहायला हवी कि एकमेकांच्या वाईब्स जुळतात का ? मग धर्म, जात कुठलीही असो छान नाते चालू शकते .
अर्थात जातीधर्माबाहेरच जोडीदार असावा असेही काही नाही आपण जन्मलेल्या जाती धर्मात किंवा बाहेर कुठेही लग्न करावे पण समजून उमजून करावे असे मला वाटते.

मुलगा म्हणून लग्नाच्या बाजारात जोडीदार शोधताना येणारे अनुभव -
मुलींनाही चांगले वाईट अनुभव येत असतील पण एक मुलगा म्हणून मी जेव्हा या बाजारात जातो तर खूप विचित्र आणि निराशाजनक अनुभव यात आले.यात काही मुलींना मी नाही म्हटलो असेल काही मला नाही म्हटल्या असतील पण अनेक ठिकाणी काही अपेक्षा पाहून चक्रावून गेलो. सध्या व्यवसायातील एक दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार घेण्यासाठी परदेशात बोलवले गेले तेव्हा असे वाटले कि आपण आयुष्यात काहीतरी यश साध्य केले आहे पण तेच लग्नाच्या बाजारात गेलो तर जेव्हा एखादी मुलगी किंवा तीचे पालक वरून खाली कुतसित दृष्टीने पाहतात तेव्हा असे वाटते कि आपण तर कुठेच नाही अगदी कृष्णाचा सुदामा झाल्याचा विचार येतो. २ वर्षापूर्वी एका मुलीच्या वडिलांचा फोन आला कि तुमचे उत्पन्न किती , तेव्हा माझे ₹ 7.5 लाख एवढे वार्षिक उत्पन्न होते तर ते विचारत होते अजून काही- अजून काही उत्पन्न आहे का मी म्हटले नाही एवढ्यात मी खुश आहे आणि हळूहळू वाढेल हेही. मग flat 2 BHK च आहे का मग 3 BHK कधी घेणार ?मी म्हटल पूर्वी पप्पानी घेतलेला 2 BHK च होता आणि त्यात रिडेव्हलोपमेंट मध्ये 1 रूम जास्त घेण्यासाठीच मला बिल्डरला जवळपास ४० लाख द्यावे लागलेत त्यामुळे लगेच 3 BHK घेण्याचा विचार नाही तर तो म्हणाला "मै चिंतन करता हु" मी मनात त्याला " चिंतन नाही चिंता करा" अस म्हटल.
 पण फक्त दिखाव्याला म्हणजे शो ऑफ ला महत्व आहे आणि प्रामाणिक चरित्र , विचारांची प्रगल्भता , निर्व्यसनीपणा आणि संवेदनशीलता वगैरे गोष्टीला या लग्नाच्या बाजारात काहीच महत्व नाही का? असे कधी-कधी वाटते.
पूर्वी नोकरीं होती तेव्हा हे उत्पन्न होते ते दर वर्षाला वाढतही होते पण जेव्हा पूर्ण वेळ व्यवसायात आलो तेव्हा उत्पन्न याहून कितीतरी पटींनी वाढले उलट मी स्वतः काही लोकांना माझ्या फर्म मध्ये नोकरीं दिली आहे पण आता काही जण म्हणतात आम्हाला बिजिनेस नको नोकरींवाला पाहिजे. आता माणसाने करायचे तरी काय? नोकरीतले उत्पन्न चांगले असूनही कमी वाटतं होते तर व्यवसाय सुरु केला आणि ते चांगले वाढले तर आता पुन्हा ते सोडून नोकरीं कशी करणार? 
मध्यंतरी एका मुलीला भेटलो तर ती म्हणाली कि मी क्लबिंग करते, कधी-कधी ड्रिंक करते तुला काही प्रॉब्लेम नाही ना? मी म्हटलं नाही मला काही आक्षेप नाही मी घेत नसलो तरी माझे अनेक मित्र घेतात फक्त Occasionally च घे घरी असताना घेऊ नको आणि स्मोकिंग करत असल्यास ती सोड कारण त्याने कॅन्सर होऊ शकतो. एका मुलीचे म्हणणे होते कि बिअर्ड ठेवली पाहिजे तर तीही ठेवायला सुरु केली. ते म्हणतील तसे कपडे आणि इतर गोष्टी स्वतः मध्ये अपडेट करणे सुरु आहे. मुलगा असल्यामुळे जास्त अपेक्षा ठेवून चालत नाही, जशी मार्केट डिमांड आहे तसे स्वतःला बनवावे असे वाटते पण काही-काही गोष्टी नाही पटत.थोडा फार सामाजिक सेवेत सहभाग घेतल्याने दारु वगैरेच्या व्यसनाने अनेक कुटुंब उध्वस्थ झालेली पाहिली आहेत त्यामुळे त्याचे सेवन कधीच करणार नाही तिने केले तर माझी हरकत नाही फक्त कधीतरी आणि प्रमाणात करावे . यात एक-दोन मुली म्हणाल्या की त्यांना रागीट असा जोडीदार हवा आहे, ज्याचा घरात दरारा असेल, जो वर्चस्ववादी थोडा हुकूमशाही वृत्तीचा असेल. एका मुलीने सांगितले की तिच्या भावाचा घरी भलताच दरारा आहे, आई, वहिनी सगळे त्याला घाबरतात, मला कोणी मला घाबरावे किंवा मी त्यांना घाबरावे असे वाटतं नाही. काहींची इच्छा असते कि आईवडील सोबत नसावे, मी जर एकुलता एक आहे आणि त्याच दृष्टीने एवढे अधिक पैसे देऊन घर मोठे करुन घेतले आहे तर वेगळे का व्हावे? 

यात मुलांच्या वाईट परिस्थितीचे उदाहरण मी शेजारच्या अपार्टमेंट मध्ये एका फॅमिलीत प्रत्यक्ष पाहिले. एक जैन मारवाडी आजोबाचे शेजारच्या सोसायटीत 2 फ्लॅट असून एका फ्लॅट मध्ये राम तर दुसऱ्यात श्याम राहतो( नावे बदलली आहेत ). यात रामला 2 मुलगे आणि श्याम ला 2 मुली असं कुटुंब आहे. यात आजोबा 4 नातूना उद्देशून सांगतात कि कि तुम्ही चौघानी भरपूर शिकावे आणि स्वतःच्या पायावर उभे रहावे अशी माझी इच्छा आहे पण यात समजा मुलींना शिकण्याचा कंटाळा आला आणि त्या नाही शिकल्या तर लग्न जमवायला एवढा फरक पडणार नाही पण तुम्ही जर मुलगा म्हणून नाही शिकला किंवा नाही चांगले पैसे कमवले तर लग्नाच्या बाजारात तुम्हाला काहीही किंमत नसेल. 

अजून एक अडचण येते ती विचार मांडण्याची . एकेकाळी मीही एखाद्या धर्मांध नेत्याला मानणारा , प्रोपोगंडा गोष्टींना खरा मानणारा , एखाद्या धर्माचा द्वेष करणारा किंवा काही धर्म, पक्ष, व्यक्ती बद्दल आकस असणारा असा होतो पण जसजसा अभ्यास वाढला तश्या दोन्ही बाजू समजल्या आणि मनातले गैरसमज दूर झाले जे सत्य समजले ते मांडू लागलो आणि त्याबद्दल काही जण व्याख्यान वगैरे द्यायलाही बोलवू लागले , वृत्तपत्रात लेख प्रकाशित होऊ लागले , टी.व्ही. चर्चा मध्येही अभ्यासक म्हणून निमंत्रण मिळाले त्यामुळे तेथेही सत्य मांडू लागलो , हेतू हाच कि सगळीकडे प्रेम आणि अहिंसा पसरावी पण मी ज्या जातिधर्माचा भाग आहे तिथे मात्र आजही बहुसंख्य मी ज्या पूर्वीच्या फेज मध्ये होतो त्यातच आहेत आणि त्यांना हे चुकीचे वाटते . शिवाय मी जेव्हा त्यांच्या प्रचारकी द्वेषपूर्ण विचारांशी सहमत होत नाही आणि एखाद्या नेत्याचे समर्थन करायला नकार देतो किंवा त्यांना तार्किक प्रश्न विंचरतो तेव्हा मात्र ते चिडतात. नवीन काही वाचण्याची तयारी नसते आणि स्वतःच्या मनात असलेला प्रोपोगंडा सोडण्याचीही तयारी नसते. मी बहुतेक वेळेला या लग्नाच्या बाजारात तो विषय काढत नाही इतर आवडी निवडी, संसार , करीअर यावरच बोलतो पण कधीतरी समोरचा स्वतःहून विषय काढतो आणि मग मीही प्रामाणिकपणे माझे मत मांडतो आणि समोरचा व्यक्ती प्रोपोगंडाला बळी पडलेला असला तर अडचण होते . अर्थात भिन्न विचारधारेचे लोक सुद्धा एकत्र छान संसार करू शकतात असे माझे मत आहे. पण सध्या वातावरण एवढं दूषित झालंय की आपल्यापेक्षा विरोधी विचारांचा आहे म्हणजे मूर्ख आहे वगैरे समजले जाते. मला वाटतं आपण सत्यशोधक असले पाहिजे आज जरी मला तुमची विचारधारा किंवा तुम्हाला माझी विचारधारा पटत नसली तरी एकमेकांना समजून घेत पुढे जाऊ पुढे दुसऱ्याची सत्य आहे असे समजले तर त्याचे होऊन जाऊ नाही तर तिला ही सत्य वाटली तर ती आपली होईल किंवा तसेच राहू पण प्रेम एकमेकांना भरभरून देऊ.

असो मीही डिवोर्सच्या म्हणजे नाते तुटण्याच्या प्रक्रियेमधून गेलो आहे त्यात ते नाते तुटू नये म्हणून मी खूप प्रयत्न केले पण समोरची व्यक्ती तयारच नव्हती . दोघांच्याही काही चुका असतील किंवा उणीवा असतील पण त्यावर मत करून स्वतः मध्ये सकारात्मक बदल करून पुढे जावे अशी इच्छा होती. पण ते शक्य झाले नाही कुठलेही नाते एकाच बाजूने टिकत नसते. अर्थात आज त्या गोष्टीबद्दल बरेही वाटते कि तुटले ते बरे झाले नाहीतर आजही ज्या व्यक्तीला आपल्याबद्दल किंचितही आदर नाही तिच्यासमोर स्वतःला सिद्ध करत पुढचे जीवन घालवावे लागले असते. तर एका बाजूने चुकीच्या नात्यात राहण्यापेक्षा वेगळे झालेले बरे या मतावर मी पोहोचलो आहे.
 पण हे होत असताना हे ठरवले होते कि आपल्याला ज्या गोष्टीमुळे एवढा त्रास होतोय त्याच्या मुळाशी जायचे आणि त्यावर शक्य असेल ते काम करायचे आणि त्यातून नाते टिकवूया या चळवळीची सुरुवात झाली . यात समुपदेशक , सामाजिक कार्यकर्ते आणि काही लोकांची टीम बनवली आणि समुपदेशन सुरु झाले ज्यात आम्ही या समस्येतून जाणार्या लोकांचे कॉल घेतो आणि त्यांची नाती सुंदर करण्याचा , ताण तणाव कमी करण्याचाही प्रयत्न करतो .

अर्थात वर मी मुलगा असल्यामुळे ती बाजू अधिक आली.
मुलीची बाजू सांगायची तर 
मुलांनी आणि त्यांच्या पालकांनीही काळानुरूप स्वतः मध्ये अनेक बदल करायला हवेत. आलेल्या सुनेने सतत पदर घ्यावा, साडीच घालावी, आम्ही म्हणतोय तेच करावे वगैरे अपेक्षा सोडून द्याव्यात. तीचे स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि स्वतंत्र विचार आहेत हे समजून घ्यायला हवे. एखादी महिला वर्किंग असेल तर तिने घरातलीही सर्व कामे करावीत ही अपेक्षा मला चुकीची वाटते. फक्त कुटुंब हे आपली पहिली प्राथमिकता आहे हे मुलगा मुलगी दोघांनीही लक्षात ठेवायला हवे 

 काही वर्षापूर्वी जोडीदार निवडीबाबत लेख लिहला होता तो खालीलप्रमाणे  

जोडीदार निवडीचा कार्यक्रम साधा करण्याची गरज-
काही समाजामध्ये दाखवण्याचा कार्यक्रम खूप मोठा असतो . त्यात मुलीच्या घरातील काही लोक मुलाच्या घरी येतात तर त्यांचा खूप पाहुणचार करावा लागतो, त्यांना आग्रह करण्यासाठी नातेवाईकांना बोलवावे लागते.सुरवातीला ५-१० प्रकारचे ड्राय फ्रुट्स आग्रह करून देणे त्यानंतर नाश्ता / जेवण, ज्यात अनेक पदार्थ , मिठाई ते झाले कि अजून काही असा खूप पाहुणचार करावा लागतो. मुलगा आतमध्ये बसलेला असतो त्याला हे झाल्यानंतर बोलावले जाते आणि मुलाच्या घरच्यांची त्याबद्दलच खूप धावपळ उडते.अर्थात हे करणे सक्तीचे नसते पण नाही केले तर मागे बोलले जाते त्यामुळे बहुतेक जण हे करतातच. 

लग्न कुठल्या प्रकारचे-
लग्न हा क्षण एका नवीन आयुष्याची सुरवात असल्याने तो आंनद आपल्या आप्तजणांना आणि मित्रांना बोलवून द्विगुणित करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते त्यामुळे रजिस्टर लग्न बहुतेक जण करत नाहीत, पण जे आप्तजनांना बोलावून करायचे लग्न आहे तेही अगदी सध्या पद्धतीने करता येणे शक्य आहे, त्यातून एक सामजिक संदेशही जातो.माझ्या अनेक मित्रांनी याप्रकारचे लग्न केले आहे.जैन लग्न, गांधीविवाह किंवा सत्यशोधक लग्न ही त्या प्रकारची आदर्श लग्न आहेत.हाच खर्च पालकांनी आपल्या पाल्यांना चांगले संस्कार, शिक्षण देण्यास त्यांना त्यांच्या पायावर उभे करून देण्यास खर्च करायला हवा.शिवाय अश्या साध्या लग्नात नातेवाईकांचा मानपान , रुसवे फुगवे या गोष्टीही टाळल्या जातात ज्यामुळे लग्नाच्या वेळी याला हे केले, त्याला हे केले नाही यामुळे होणारे रुसवे फुगवे व त्यातून होणारा मानसिक त्रास ही टाळला जातो जो 70% लग्नात असतोच असतो. बहुतेक लग्नांमध्ये कोणी न कोणी नातेवाईक रुसून फुगून जातो , गोंधळ घालतो आणि ऐन आनंदाच्या क्षणी आनंदात विरजण पडते .उदाहरण द्मायाचे तर माझा मित्र सचिन आशा सुभाष याने जवळपास हजार लोकांना बोलवून सत्यशोधक पद्धतीचे लग्न केले ज्यात या सर्वांचे जेवण,मंडप, व इतर सर्व मिळून खर्च जवळपास लाख रु.च्या आत आला शिवाय लग्नात भेटवस्तू ऐवजी त्याने पुस्तके स्वीकारली ज्यातून त्या दोघांच्या ही गावात त्यांनी एक चांगले वाचनालय सुरु केले, अशी अनेक उदाहरणे आहेत.

लग्नाबद्दल मानसिक तयारी-
फक्त वय झालय म्हणून टाकूया उरकुन अस म्हणण्यापेक्षा खरच आपण ती जबाबदारी पेलू शकतील अशी त्यांची क्षमता झाली आहे का? ते पहावे.
कुठलेही लग्न म्हटले कि तडजोड ही करावीच लागते पण 'मी कसलीही तडजोड करणार नाही आहे तसाच किंवा तशीच राहणार' म्हटले तर लग्न झाल्यानंतर सर्व गोष्टी अवघड होऊन बसतात.कारण दोन भिन्न वातावरणात वाढलेल्या व्यक्ती म्हटल्या कि त्यांचे स्वतंत्र अस्तित्व असणारच अश्या वेळी दोघांनाही एकमेकंसाठी काही सकारात्मक तडजोडी कराव्या लागतील त्याची तयारी असायला हवी. हुंड्याला स्पष्ट नकार द्यायला हवा.शिवाय नाते टिकवायचे म्हटले तर अहंकार कमी करायला हवा, मी आहे तसाच किंवा तशीच राहणार कधीच झुकणार नाही असे चालत नाही
नाते सांभाळायचे म्हटले तर ते टिकवण्यासाठी त्यात थोडी झुकण्याची सोबतच त्याग, समर्पण, प्रेम या गोष्टींचीही गरज असते.

जोडीदार निवडतांना-
आपल्या इथे पत्रिका जुळवण्याकडे अधिक लक्ष दिले जाते त्याऐवजी विचार कुंडली जुळते का त्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे.
बाह्य सौंदर्य जसे कि रंग , उंची, बांधा यापेक्षा आंतरिक गुण जसे कि स्वभाव, वैचारिक बैठक यांच्याकडे अधिक लक्ष द्यावे.
एकमेकांचे छंद,आवडी-निवडी, सवयी जाणून घ्यायला हव्यात.आणि समोरच्या च्या या गोष्टींचा आपल्याला त्रास तर होणार नाही ना हे पाहायला हवे.
अवास्तव अपेक्षा टाळायला हव्यात.
स्वप्ने, भविष्याबद्दलचे विचार यात ही थोडे साम्य असायला हवे.
त्यामुळे ओळख झाल्यापासून ते लग्न यामध्ये किमान 2 महिने ते वर्ष एवढे अंतर तरी असावे जो वेळ एकमेकांना समजून घेण्यासाठी देता येईल शिवाय जर नाहीच जुळले विचार तर तेव्हा तेथेच थांबताही येते, घटस्फोटापेक्षा ते कधीही चांगले.
100% सगळ्या दृष्टीने परिपूर्ण असे कोणीच नसते त्यामुळे अपूर्णतेत ही आपल्याला आवश्यक असलेले गुण आहेत का ते पाहता यायला हवे.
आर्थिक जबाबदारी इ. गोष्टी जोडीदार पाहताना स्पष्ट पाहायला हव्यात उगाच वय होत चाललंय म्हणून इच्छा नसतांना एखाद्या आपल्या अपेक्षेपेक्षा कमी आर्थिक परिस्थिती असलेल्या व्यक्तीशी लग्न करणे आणि लग्नानंतर अधिक आर्थिक क्षमतेच कुणी दिसलं कि आहे त्या नात्याला तोडणे असे प्रकार ही घडतात तेच सौंदर्य, शिक्षण इ. गोष्टी पूर्वीच पाहायला हव्यात उगाच सुरवातीला नाते जोडायचे आणि नाही पटले किंवा दुसरे कुणी अजून सुंदर दिसले कि आहे ते तोडणे चुकीचे आहे. 

व्यसन - आपल्या समाजात ही व्यसनांचे प्रमाण हळूहळू वाढत चालले आहे त्यामुळे त्याबद्दल चौकशी करायला हवी आणि व्यसनी जोडीदाराला स्पष्ट नकार देता यायला हवा.

वैचारिक पातळी आणि सामजिक भान- आपला जोडीदार सामजिक , कला, राजकीय किंवा साहित्यिक क्षेत्रात असेल तर त्याच्या गोष्टींचा आपल्याला त्रास तर होत नाही ना, आपण त्या गोष्टीत साथ नाही देऊ शकलो तर किमान प्रोत्साहन तर देऊ शकू ना हे पहायला हवे
शिवाय त्याच्या किंवा तिच्या लेखनाचे, साहित्याचे, कलेचे अर्थ किंवा उद्देश आपल्याला समजत आहेत ना? जर ते समजत नसतील तर त्या गोष्टीतून वेगळे काही अर्थ निघून गैरसमज होण्याची शक्यता असते 
उदा माझी एक मैत्रीण पुरोगामी, वैज्ञानिक आणि आधुनिक विचारांची तर तिच्या नवर्याचे आई-वडील प्रचंड धार्मिक, ज्योतिषशास्त्र वगैरे मानणारे त्यामुळे ही जे काही लेख त्या अंधश्रद्धावर किंवा कशावरही लिहिते तर ते आमच्यवरच आहेत असे त्यांना वाटते आणि त्यातून गैरसमज वाढत जातात रतर ती बऱ्याच वर्षापासून लिहित होती हे त्यांना समजायला हवे होते पण वैचारिक आणि बौद्धिक अंतर असल्यावर अर्थाचा अनर्थ होतो तो असा.

जोडीदाराची संगत -
कुठल्याही व्यक्तीची ओळख त्याच्या संगतीवरून होते.त्याच्यासोबत असणारा मित्र परिवार कुठल्या दर्जाचा आहे त्यावरून ही त्याचा किंवा तिचा स्वभाव लक्षात येतो.कारण जश्या व्यक्ती असतात तसे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात.

लग्न झाल्यावर-
एकमेकांशी खुला संवाद- मेसेज किंवा फोनवरून बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष फेस टू फेस बोलणे कधीही चांगले, कारण प्रत्यक्ष बोलण्यात आवाजाला चढ उतार असतो चेहऱ्यावर हावभाव असतात ज्या गोष्टी मेसेज किंवा फोन वर शक्य होत नाहीत आणि गैरसमज वाढण्याची शक्यता असते

एकमेकांची छेड काढणे- लग्नानंतरचे नाते healthy ठेवायचे असेल तर थोडी विनोदबुद्धी असायला हवी आणि एकमेकांची छेड काढणे , चिडवणे यातून प्रेम वाढते.

मतभेद झाल्यास दोघांत सोडवणे- दोन भिन्न व्यक्ती म्हटल्यावर मतभेद हे होणारच पण ते झाले तरी मनभेद होता कामा नये ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी , झालेले भांडण तिसऱ्या कुणाला सांगितले जाते तेव्हा दुरावा वाढण्यात च अधिक मदत होते
  सामान्यतः मनुष्य एखाद्याशी झालेल्या वादाबद्दल सांगतांना स्वतःच्या चुका नकळतपणे लपवत असतो किंवा कमी करून सांगत असतो यामुळे ज्याच्यासोबत आपण ही गोष्ट शेयर करतोय ती व्यक्ती तेवढेच ऐकून त्या-त्या दृष्टीने आपले मत बनवते आणि समजा ती गोष्ट त्या व्यक्तीने अजून काहींना सांगितली तर ५ जणांचे ५ सल्ले यातून वाद विकोपाला जातो.

समजूतदार पणा- ही सर्वात महत्वाची बाब आहे , छोट्या-छोट्या गोष्टी पकडून न ठेवता एकमेकांना समजून घेऊन पुढे जायला हवे.समोरचा व्यक्ती माणूस आहे आणि तो चुकू शकतो आणि आपणही चुकू शकतो ही गोष्ट मान्य करायला हवी.

कौतुक आणि टीका- 
कौतुक चार चौघात करायला हवे तर चुका या एकट्यात त्याही थोड्या वेगळ्या शब्दात सांगायला हव्यात पण बऱ्याच ठिकाणी नेमके याच्या उलटे घडते.

पालकांचा संसारात अति हस्तक्षेप-
आपला मुलगा वा मुलगी किती वाजता उठतो, काय खातो, कुणाला किती पैसे देतो त्यापासून अनेक ठिकाणी पालकांचे लक्ष असते. आणि अशी प्रत्येक गोष्ट पाल्याकडून फक्त जाणूनच घेतली जात नाही तर त्याच्यावर नाहक सल्लेही दिले जातात कि हे असे-असे असायला हवे शिवाय त्या सगळ्याच बाबतीत संसारात लुडबुडही केली जाते. 
नाते टिकवूया चळवळीत आत्ताच जॉईन झालेल्या व कौटुंबिक समुपदेशक आणि सल्लागार म्हणून दीर्घ अनुभव असलेल्या छाया सावरकर यांनी सांगितले कि त्यांनी जेवढ्या केसेस हाताळल्या त्यात घटस्फोटासाठी सार्वधिक आढळलेले कारण हे मुलीच्या आईचा त्यांच्या संसारात अतिहस्तक्षेप हे आहे.आपल्या मुलीला जर मारहाण होत असेल, हुंड्याची मागणी होत असेल, तिच्या जीवाला धोका असेल अश्या वेळी हस्तक्षेप करून जाब विचारायला च हवा पण इतर प्रत्येक गोष्टीत माहेरहुन लक्ष घालणे चुकीचे आहे.
शिवाय मुलाच्या पालकांनीही सुनेकडून अवास्तव अपेक्षा, तिच्याकडून माहेरहुन काही आणण्याची मागणी, मारहाण इ. गोष्टी टाळायला हव्यात.यात सध्या मम्माज बॉय सारखी मुलेही कारण ठरली आहेत. लग्न झाल्यावरही ती आईचा पदर सोडत नाहीत आणि माझी आई असे-असे म्हणते तसेच तुला करावे लागेल यामुळेही काही नाती तुटल्याचे पाहण्यात आले . 

Mould for each other-
जगात made for each other अस कोणीच नसत पण तुम्हाला थोडं mould for each other व्हावेच लागेल

सकारात्मक बदल करण्याची तयारी- मी बिलकुल बदलणार नाही जे बदलायचं ते समोरच्यानेच हा दृष्टिकोन ही घातकच

.तुलना- सतत दुसर्याशी तुलना करु नये
काही मुली आपले भाऊ, मामा, काका इ. कडे बघून आपल्या नवर्याची त्यांच्याशी तुलना करतात तर काही मुले आपली बहीण, आई, आत्या इ बघून बायकोशी तुलना करतात व जोडीदाराने असे त्यांच्यासारखे व्हायला हवे अशी अपेक्षा ठेवतात ज्या चुकीच्या आहेत.सध्या सोशल मिडियामुळे तर या तुलनांचे प्रमाण खूपच वाढले आहे. 

स्वतःचे मत बनवण्याची क्षमता- मुलगा असो वा मुलगी जर तो किंवा ती प्रत्येक गोष्ट दुसऱ्याच्या मतावरून ठरवत असेल तर वैचारीक परिपक्वतेअभावी गैरसमज च होण्याची अधिक शक्यता असते.

14.काही गोष्टी सिक्रेट्स ठेवण्याची गरज - नवरा बायकोतील काही गोष्टी या सीक्रेटस म्हणजे गुप्तच असायला हव्यात पण जर एखादा जोडीदार दुसऱ्या कुणाला या गुप्त गोष्टी सांगत असतील तर ज्या व्यक्तीला ते सांगितले जाते त्यातून वाद वाढण्याची किंवा उलटा अर्थ निघण्याची अधिक शक्यता असते.

15.धरसोड प्रवृत्ती नको- 
धरसोड व्यक्तींना थोड्या दिवस एखादी व्यक्ती आवडते पण बाहेरहून कुणी फूस दिली कि अरे किंवा अग तुला यापेक्षा जास्त चांगला जोडीदार भेटला असता असे म्हटले आणि पालकांचा ही जर याला दुजोरा मिळाला तर अश्या व्यक्ती असणाऱ्या जोडीदारात सतत चुका शोधू लागतात, तू मला बोलायला पॉईंट देतोस/देतेस असे म्हणून समोरच्यात चुका शोधल्या जातात किंवा नसणाऱ्या चुका भासवल्या जातात ज्यामुळे दुसरा जोडीदार त्रस्त होतो, मग एक जण जोडायचा प्रयत्न करतो तर दुसरा तोडण्याचा प्रयत्न करतो , एक जण खोटे नाटे आरोप करत राहतो व दुसरा प्रत्येक गोष्ट सिद्ध करून दाखवू लागतो.
जोडणाऱ्याला जोडायचे असल्यामुळे तो किंवा ती कसेही करून नाते कसे चांगले होईल यासाठी प्रयत्न करतात समोरच्याच्या चुका दाखवण्याऐवजी स्वतःत सकारात्मक बदल करायची , सुधारण्याची ते तयारी दाखवतात आणि हवालदिल होतात तर तोडणाऱ्याला याची काही फिकीरच नसते त्यामुळे ते मिळेल तिथे खरे-खोटे आरोप करत आणि बदनामी करत जोडणाऱ्याचे मानसिक खच्चीकरण करत राहतात, तिसऱ्या व्यक्तींला सर्व बाजू माहित नसतात त्यामुळे तोडणाऱ्याच्या आरोपांकडे च अधिक लक्ष जाते पण यात जोडण्याचा प्रयत्न करणारा माणूस खचून जातो त्यामुळे धरसोड प्रवृत्ती टाळायला हवी.

16.एकमेकांना स्पेस देणे-
दोघांच्याही काही आवडी-निवडी असतीलच व त्या गोष्टी करण्यास एकमेकांना थोडी स्पेसही द्यायला हवी, उदा एखादी मुलगी चांगली चित्रकार आहे पण लग्न झाले कि तिला त्याबद्दल काहीच करू न देणे हे तिच्या कलागुणांना थांबवण्यासारखे आहे, तिच्या कलागुणांना वाव दिला तर ती आनंदी राहीलच शिवाय त्याचा फायदा ही होईल.शिवाय अश्या स्पेस चा गैरफायदा ही घेता कामा नये म्हणजे आपली पहिली प्राथमिकता कुटूंब ही असायला हवी.

एकमेकांशी विचारांचे टोकाचे मतभेद असतांना ही ते कायम ठेवून नात्यात मनभेद न ठेवता एकदम सुखी संसार केल्याची अनेक उदाहरणे मला माहित आहेत, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ नरेंद्र दाभोळकर स्वतः अंधश्रद्धा मानत नसले तरी पत्नीच्या इच्छे खातर नऊ वर्ष रोज पत्नीच्या श्रद्धास्थळ असलेल्या मंदिरात ते त्यांना सोडत.महात्मा गांधीनी आश्रमात चहा कॉफी वर्ज्य ठेवली होती ते स्वतः चहा कॉफी घेत नसत त्याला दारू सारखे पेय मानत पण जेव्हा एकदा कस्तुरबांना कॉफी पिण्याची खूप इच्छा झाली तर गांधीजींनी स्वतः त्यांना ती आणून दिली आणि अग्रहाने प्यायला ही लावली.
काही दिवसांपूर्वी अभिनेते श्रीराम लागू यांच्याशी जवळपास २ तास मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी मिळाली. ते पूर्णतः नास्तिक आणि बुद्धिवादी चळवळीला समर्पित आहेत,त्यांच्याशी गप्पा झाल्यावर त्यांच्या पत्नी दिपाताई यांच्याशी बोललो कि तुम्ही पण याच विचारांच्या का वगैरे त्या हो म्हटल्या पण माझी थोडी श्रद्धा आहे मी गणपती बसवते तेव्हा तो त्याला विरोध करत नाही 'मला फक्त प्रसाद देत जा' अस श्रीराम जी म्हणत असल्याचे त्यांनी सांगितले.
आपली प्रेयसी हितार्थी पारख(गुजरात,) हिला कँसर असल्याचे कळूनही प्रवीण पाटील(सांगली) याने तिच्याशी लग्न केले आणि 5 वर्ष तिच्यासोबत पहाडासारखा उभा राहून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, अशीच कहाणी प्रथमेश आणि सोनालीची, दोघे चांगले मित्र होते सोनालीच्या शिक्षणासाठी प्रथमेश ने आपल्या आईचे दागिने विकले होते पण दरम्यान काही वर्षांत प्रथमेशला कॅन्सर झाल्याचं तिला कळलं. त्याची अवस्था अतिशय बिकट झाली होती. अवघ्या 20 व्या वर्षी कॅन्सर. प्रथमेश पूर्णपणे खचून गेला होता. तणावाखाली असलेल्या मित्राला प्रेमाची सावली द्यावी, या भावनेतून सोनालीने प्रथमेशशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाली म्हणते, “ 25 जून 2018 रोजी आम्ही विवाहबद्ध झालो. या दिवसापासून प्रथमेशला या सगळ्या अडचणीतून बाहेर काढण्याचा मी दृढ निश्चय केला होता. माझ्या आईवडिलांनी नेहमी मला दुसऱ्यांना मदत करण्याचे संस्कार दिल्याने मी हा निर्णय घेऊ शकले."
आजही, प्रथमेशवर उपचार सुरू असून एका कार्यालयात तो अकाऊंट विभागात नोकरी करतो आहे. तर, सोनाली नगरपरिषदेत आरोग्यसेविका म्हणून काम करत आहे आणि त्याची तब्येत पहिल्यापेक्षा खूप सुधारल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

एकीकडे स्वार्थापायी काही नाती तुटताना ही उदाहरणे नाती कशी टिकवावी आणि फुलवावी याबद्दल प्रेरणादायी आहेत तर चला नाती अधिक सुंदर बनवूया
त्यावरूनच अश्या काही केसेस हाताळताना सहज सुचलेली कविता

मानलं तर लग्न आहे खूप सुंदर #बात 
जीवन जगायला मिळतो एक हक्काचा #हात 

ज्यांच्यासोबत शेयर करू शकू प्रत्येक #बात 
सुख दुःखात मिळते एकमेकांची #साथ 

 समजून घेऊ एकमेकांना #थोडे 
एकत्र मिळवून सोडू आयुष्याचे प्रत्येक #कोडे 

मान्य नसते कुणी made for each other 
पण व्हा कि थोडे Mould for each other 

बघ मग कसा संसार होईल #छान 
एक बनेल जानू तर दुसरा बनेल #जान 

वेगवेगळ्या ठिकाणी वाढल्यावर भिन्न स्वभाव #असणारच 
वेगवेगळ्या प्रकृती सारखे कुणी #नसणारच 

वेगळेपणातील अनुभवून #सुख  
चल करूया हास्यमय #मुख..   

संकेत मुनोत 
8668975178
changalevichar1@gmail.com

No comments:

Post a Comment