AddThis code

Thursday, February 16, 2023

#valentines Week निमित्त झील इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी भोंगवली गावात संवाद

#valentines  Week निमित्त 🌹 "समाजात गांधी विचारांच्या माध्यमातून #प्रेम कसे वाढवावे" ❤️ या विषयावर विचार मांडण्याची संधी मिळाली. झील इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी भोंगवली गावात NSS कॅम्प साठी आले होते. सन्मित्र अविनाश पवार आणि  विशाल ताठे यांच्यामुळे मला या इंजिनिअरिंग च्या आणि शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
मीही बी फार्मसी ला असताना #NSS मध्ये होतो ते दिवस आठवले.
इथे मुलांनी स्वतः बनवलेले जेवण बढिया होते..हे विद्यार्थी शाळेची जुनी इमारत paint करून देत होते.
व्याख्यानाला जाताना मुद्दामून 20 कॅडबरी अविनाश ला घेण्यास सांगितले होते. त्यातील 5 कॅडबरी व्याख्यान सुरु असताना माझ्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या साठी तर 15 कॅडबरी मला प्रश्न विचारणाऱ्या साठी. त्यामुळे सेशन मध्ये मजा आली, भरपूर प्रश्न आले. 
आपल्या इथे  अनेक ठिकाणी "प्रश्न विचारू नका, गप्प बसा" वगैरे संस्कृती आहे. त्यामुळे अनेक जण अंधपणे काही गोष्टी अनुकरण करत राहतात. तर्क आणि चिकित्सा न केल्यामुळे बौद्धिक विकास आणि नवीन संशोधन ही होत नाही. त्यामुळे माझा याला प्रोत्साहन देण्याचा थोडा प्रयत्न असतो.  यात कुठलाही प्रश्न टाळत नाही उलट याच्यामुळे आपल्याला आपला अभ्यास किती झाला आहे आणि अजून किती करायचा आहे हे शोधण्याचीही संधी मिळते. अधिकाधिक तयारी करता येते. 
सध्या समाजात प्रेम आणि #संवाद वाढवण्याची खूप गरज आहे. लोक एकमेकांच्या पासून अधिकाधिक दुरावत चालले आहेत. आपण जेव्हा एखाद्या जातीचा , धर्माचा #द्वेष करतो तेव्हा हळु हळू तो द्वेष आपल्या मनात ही उतरतो आणि त्यानंतर तोच द्वेष गावात , घरात ही पसरतो. त्याला उत्तर दुसऱ्याने प्रती द्वेष करणे हे नाही तर प्रेम पसरवणे हेच आहे. ❤️
पण जवळपास सतत भीषण काही तरी घडत असताना आणि इतिहासापासून हिंसा, युद्ध याची उदाहरणे असताना प्रेम फक्त बोलून चालत नाही?  त्यासाठी त्यावर चालणाऱ्याची अनुकरण करता येईल अशी जवळपास ची उदाहरणेही लागतात . #गांधी हे त्यातील सगळ्यात जवळचे आणि प्रेमाचे सर्वात मोठे उदाहरण.  त्यामुळे त्यांच्या जीवनातील वेगवेगळ्या घटना सोबत आईन्स्टाईन, स्टीव जॉब्स, जॉन लिनन आणि वेगवेगळ्या लोकांनी गांधी विचारातून प्रेरणा घेऊन जगात आणि स्वतः त काय बदल घडवले त्याबद्दल गप्पा मारत मांडणी केली. त्यांच्याबद्दलचे गैरसमज आणि सत्य याबद्दल सांगितले. 
हे झाल्यावर शेवटी सर्वाकडून #पंचसूत्री ची शपथ घेतली. मला आत्ता तरी समाजात 5 प्रमुख समस्या दिसतात त्यामुळे जिथे जाईल तिथे त्यावर शपथ देत असतो. म्हणजे सगळेच पाळतील असा माझा बिलकुल दावा नाही पण 1% लोकांनी जरी पंचसूत्री अमलात आणली तर माझ्यासाठी पुरेसे आहे. आणि परिणाम होतच नाही असा नाही. मला लहानपणी कोणी तरी अशीच दारू, सिगरेट, गुटखा वगैरे न ग्रहण करण्याची शपथ दिली होती जी आजपर्यंत मोडू शकलो नाही. पण मी संकल्प थोडे वेगळे देत असतो ते खालील प्रमाणे..
पहिली समस्या भेदभावाची . जात, धर्म, पंथ, वर्ग, रंग, लिंग वगैरे अनेक गोष्टीवरून लोक काहींना कमी लेखतात तर काहींना जास्त आदर देतात. सर्वांशी समानतेने वागत नाहीत. ( 1.मी कधीही कुणाला त्याची जात धर्म पंथ वर्ग लिंग रंग या गोष्टीवरून कमी लेखणार नाही, सर्वांशी समानतेने वागेन)
 
दुसरी समस्या आहे फसवणुकीची.आज स्वार्थीपणा, धरसोड प्रवृत्ती खूप वाढली आहे ज्यामुळे लोक फसवणूक करतात त्यातही बाहेर आपण सावध असतो पण नात्यात जिथे विश्वास ठेवतो तिथेच काही लोक थोड्या स्वार्थासाठी घात करतात . घटस्फोट वाढले, भावंडात कलह वाढले , आई वडिलांना किंवा मुलांना उघड्यावर सोडून देण्याचे प्रमाण वाढले ते याच स्वार्थी वृत्तीमुळे त्यामुळे याबद्दल एक शपथ ( 2. मी कधीही कुणाला नात्यात फसवणार नाही. महिलांचा आणि ज्येष्ठांचा आदर करेन)
तिसरी समस्या व्यसनाची- अनेक संसार दारू आणि अमली पदार्थाच्या व्यसनाने बरबाद झाले. जेवढे अपघात होतात, गुन्हे घडतात ( खून, महिलांवरील अत्याचार आणि अन्य गुन्हे) त्यातील बहुतेक ठिकाणी व्यसन मोठे कारण असते ज्यामुळे नाहक व्यसनी व्यक्ती सोबत इतरांनाही त्रास होतो, त्यांचा बळी जातो.( 3. मी कधी कुठले व्यसन करणार नाही.  करत असेल तर ते हळूहळू सोडेल)
चौथी समस्या असत्य प्रसाराची- लोक ऐकलेली खोटी गोष्ट दुसऱ्याला सांगतात त्यामुळे गैरसमज तर वाढतातच पण दंगली सुध्दा होतात. पालघर मध्ये साधू मारले गेले ते याच चुकीच्या व्हॉट्सॲप मेसेज मुळे की "ते साधू मुल पळवायला आले आहेत" ज्यामुळे लोकांनी चिडून त्यांची हत्या केली.(4. मी कधीही कुठलीही बातमी, कुठलाही मेसेज सत्य पडताळणी केल्याशिवाय दुसऱ्याला सांगणार नाही, forward करणार नाही)
पाचवी मोठी समस्या आहे हिंसक दंगलीची. धर्मांध लोक स्वतः सुरक्षित राहतात पण सामान्य लोकांना धर्माच्या नावावर भडकवून एकमेकांच्या विरूद्ध दंगली घडवतात. त्यामुळे गाव, राज्य आणि देश उध्वस्त होऊ शकतो त्यामुळे हिंसक दंगलीत सहभाग न घेण्याचा शेवटचा संकल्प (5. मी कधीही कुठल्या हिंसक दंगलीत सहभागी होणार नाही.)

प्रश्न भरपूर आले जसे की एका मुलीने सांगितले.  की गोडसेला दहशतवादी का म्हणता? तो तर गांधीजींचा भक्त होता ना ? पूर्वी अनेक वर्षे गांधीजींच्या सोबत राहिला पण त्याला त्यांचे विचार आणि आचरण नाही आवडले म्हणून हत्या केली त्याने? तिला ही खोटी गोष्ट कोणी सांगितली? माहित नाही पण अश्या बऱ्याच बनावट कथा युवा पिढी पर्यंत पोहोचवल्या जात आहेत..उत्तर देताना मी सांगितले की गोडसेने कधीही गांधीजींसोबत संवाद साधला नाही . तो एक आठवडा जरी गांधीजी सोबत राहिला असता तरी आतून बाहेरून बदलला असता पण त्याने कधीही संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही. मनातील गैरसमजामुळे गांधीजींचा खून करण्याची इच्छा बाळगणारे अनेक जण होते पण जेव्हा हे लोक गांधींना भेटले तेव्हा आतून बाहेरून बदलले.

एकाने मिलिटरी बद्दल प्रश्न विचारला मिलिटरी म्हणजे हिंसेची आवश्यकता आहे म्हणजे गांधीजी अहिंसा उपयोगाची नाही ना? त्याला तात्विक अहिंसा आणि गांधीजींची अहिंसा यातील फरक सांगितला. गांधींनी कधीही देशाला मिलिटरी नको म्हणून उपोषण केले नाही उलट कश्मीर मध्ये पाकिस्तान ने घुसखोरी केली तर सैन्य पाठवून त्याला चोख उत्तर द्या असे सांगणारे गांधी होते. पण जगात अनेक देश आहेत ज्यांच्या boundry वर मिलिटरी नाही तिथे गांधी विचार यशस्वी झाले आहेत. आपण आणि आपल्या शेजारच्या देशाने ठरवले तर आपला बराच मिलिटरी चा खर्च वाचू शकतो. पण दोन्ही बाजूंच्या राजकीय व्यक्तींना हा संघर्ष हवा असतो. 

मला यानिमित्त  मागच्या वर्षी शाळेतील एका चिमुकल्या मुलाने विचारलेला प्रश्न आठवला. गांधींकडून जगभर एवढ्या लोकांनी प्रेरणा घेतली पण गांधींना कोणी बरं प्रेरणा दिली? ❤️❤️

यात मी हिंसा आणि अहिंसा यातील फरक समजावून सांगताना विद्यार्थ्यांना काही प्रयोगही सुचवत असतो. तुमच्यातील ज्यांना आपल्या वडीलांच्या दारू पिण्याचा त्रास होतोय तुम्ही ठरवले तरी त्यांच्या विरूद्ध  हिंसा करू शकता का? नाही ना? पण गांधी मार्गाने उपवास किंवा अन्य गोष्टी करून बघा. डॉ. विवेक सावंत सरांनी काही ठिकाणी या प्रयोगातून बदल घडवले आहेत. अनेक पालक आपल्या पाल्याच्या प्रेमामुळे व्यसन सोडू शकतात पण त्यांना ती जाणीव देण्यासाठी पाल्याकडून तेवढीच मेहनत लागेल. 

यात सध्याच्या वाढत चाललेल्या हिंसेबद्दल ही काही ठिकाणी प्रश्न आले. नुकतेच आपण ऐकले असेल की "प्रियकराने प्रेयसीचा  किंवा प्रेयसी ने प्रियकराचा , पत्नीने पतीचा किंवा पतीने पत्नीचा खून केला. प्रेत फ्रीज मध्ये बेड मध्ये किंवा अन्य ठिकाणी ठेवले.  काही ठिकाणी पित्याने मुलीचा खून करून  प्रेताची राख केली, तुकडे करून जंगलात फेकून दिले" अश्या गोष्टी का वाढत आहेत?. तर आपल्या मनातील हिंसा, द्वेष , क्रूरता आणि स्वार्थ वाढल्यामुळे.

  जोडीदार निवड करताना मुख्य गोष्टी काय पहायला हव्यात? तर त्या व्यक्तीची प्रामाणिकता, विचार , आचरण , अनुरूपता, शिक्षण वगैरे पण आपण काय पाहतो?
 मुली असल्या तर पैसा पाहतात आणि मुले असली तर सौंदर्य पाहतात. 
पण माझे मत आहे की खूप पैसा, संपत्ती पाहण्यापेक्षा आर्थिक स्थैर्य पहावे आणि मुलांनी सौंदर्या ऐवजी अनुरूपता पहावी. या 2 गोष्टी केल्या तर मनाजोगा चांगला जोडीदार पण मिळेल आणि नात्यात नंतर  समस्याही कमीत कमी येतील. ❣️❣️

(महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग या तिघांचे  स्वातंत्र्य लढ्याचे मार्ग वेगवेगळे असले तरी तिघांचे आणि त्यांच्या सोबतच्या सर्वांचे 'सर्वांचा भारत' हेच ध्येय होते. तेच RSS, हिंदू महासभा, मुस्लिम लीग यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला नसला तरी देश स्वतंत्र होताना मात्र त्यांना तो मूठभर वर्चस्ववादी लोकांच्या हाती हवा होता. याबद्दल काही RSS शी जुळलेल्या विद्यार्थ्यांनी भरपूर प्रश्न विचारले. ज्या सर्वांची उत्तरे देताना तो संवाद रंगला होता.)
शेवटी फीड बॅक ही घेतले त्याचे व्हिडिओ पण लवकरच पाठवतो..
 
असो प्रेमाचा प्रसार करत राहूया ❤️❤️

द्वेष करणे सोप्पे असते पण #प्रेम करणे #Healthy असते ❤️❤️🌹

संकेत मुनोत 
8668975178
17 Feb 2023

Thursday, February 2, 2023

गांधी समजून घेताना- दैनिक प्रजापात्र या वृत्तपत्रात आलेला संकेत मुनोत यांचा गांधीजी बद्दल चे प्रमुख गैरसमज दूर करणारा लेख

गांधींनी स्वतःला सुधारक वगैरे कधी म्हटले नाही पण तसे न म्हणताही धर्माचा मौलिक अर्थ सांगत त्यातील लोकांना सहिष्णू, चरित्रवान बनण्यास प्रवृत्त केले.

लेखाच्या सुरवातीलाच हे स्पष्ट करतो कि मी गांधीवादी नसून त्यांच्या विचारांचा छोटासा अभ्यासक आहे.

लहानपणी गांधीजींबद्दल थोडा आदर वाटायचा , पण 8वी ते 10वी दरम्यान मी गांधीजींचा थोडा तिरस्कार करत असे. देशाचे तुकडे करणारा, अहिंसेचा अतिरेक करणारा,५५ कोटी देणारा, आंबेडकरांना, भगतसिंग , बोस यांना त्रास देणारा म्हातारा अशी काहीशी प्रतिमा अर्धवट वाचनातून आणि वेगवेगळी मते ऐकून मनात निर्माण झाली होती, त्यांच्या खुन्याची पुस्तके आणि नाटके पाहिली होती त्यामुळे त्या खुन्याचा थोडा चाहता झालो होतो.पण सत्य वेगळेच आहे हे मला दोन्ही बाजू वाचल्यावर लक्षात आले, जसजसा गांधी वाचू लागलो तस-तसे सत्य उमजत गेले , स्वतःत सकारत्मक बदल घडवण्याची आणि Knowing Gandhi Global Friends चळवळ सुरू करण्याची प्रेरणा त्यातून मिळाली.
म्हणजे गांधी वाचण्यापूर्वी मी जसा होतो तसा नंतर राहिलो नाही बराच सकारात्मक बदल झाला. मी पूर्वी अंधार, कुत्रा, गुंड, भुताची कल्पना, स्टेज आणि अनेक गोष्टींना घाबरत असे गांधी वाचायला लागल्यावर ही भीती गेली आणि मी निर्भय झालो. शिवाय सत्यशोधक वृत्ती, विज्ञानवादी दृष्टीकोन, प्रेम या गोष्टी वाढून अंधश्रद्धा, द्वेष अश्या अनेक गोष्टी कमी झाल्या. पण अजून बराच बदल घडायचा आहे. अजूनही माझ्यात अनंत उणिवा आहेत आता त्यातील काही उणीवा तरी मी स्पष्टपणे सांगू शकतो..

तर महात्मा गांधी बद्दल एक-एक मुद्दा पाहूया

1 . जागतिक प्रभाव-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, अँप्पल चे मुख्य स्टिव्ह जॉब्स, विनोदाचा बादशहा चार्ली चॅप्लिन, दक्षिण आफ्रिकेचे राष्टाध्यक्ष नेल्सन मंडेला आणि जगातल्या कितीतरी लोकांनी त्यांच्या आयुष्यात गांधीविचारांची प्रेरणा असल्याचे कबूल केले आणि जागतिक परिवर्तन घडवून दाखवले.अल्बर्ट आईन्स्टाईन या थोर वैज्ञानिकांने म्हटलेच आहे की ‘’ येणाऱ्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत कि असा कोणी हाडा मांसाचा माणूस या पृथ्वीतलावर वावरत होता’’ आणि होय आईन्स्टाईनच्या इतर सिद्धांताप्रमाणे हाही सिद्धांत खरा ठरतो की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती आज आहे. तुम्ही आसपास पहा गांधी बद्दल एवढ्या अफवा पसरवल्या आहेत की खरच असा कोणी चांगला माणूस होता त्यावर आजची पिढी विश्वास ठेवत नाही.

2.गांधीजी -जात आणि धर्म-
गांधीजींनी कोणत्याही जातिचे वा धर्माचे अतिरेकी समर्थन केले नाही ते स्वतः ज्या जातीत जन्माला आले त्या जातीचेही त्यांनी स्वतः ला प्रतिनिधी वगैरे म्हणवून घेतले नाही. त्यामुळे कुठलीही जात त्यांच्या मागे नाही उलट  बहुतेक जातीतील कट्टरवादी लोक त्यांचा द्वेष करतात.
एका जातीतील कट्टर लोकांना  पुणे करारामुळे गांधीजी ब्राम्हणधार्जिणे आणि दलितद्वेष्टे (मनुवादी) वाटतात

एका जातीतील काही कट्टर लोकांना गांधी ब्राम्हणद्वेष्टे, दलित धार्जिणे वाटतात कारण जिथे एका जातीचे वर्चस्व होते अशी सर्व ठिकाणे राजकारण, समाजकारण व इतर अनेक  गांधीजींनी अस्पृश्यता निवारण चळवळीद्वारे  त्या जातीचे वर्चस्व संपवून सर्वांना त्यात पुढे आणले.

पाकिस्तानमधील काही कट्टर मुस्लिमांनाही आम्हाला छोटा पाकिस्तान दिला,काश्मीर दिला नाही वगैरे कारणावरून  गांधी मुस्लिमद्वेष्टे व हिंदुधार्जिणे वाटतात.

त्यामुळे गांधीजींच्या मागे त्यांचा उदो-उदो वा देव करणारी कोणताही जातसमूह नाही. जेवढी टिंगल गांधीजींची उडवली जाते त्याच्या एक टक्का जरी इतर कोणत्या महापुरुषांची झाली असती तर दंगली झाल्या असत्या, पण कुठल्याही जातीचा , धर्माचा, पंथाचा आधार न घेता ते जगभर पोहचले या उलट इतर जातींच्या महापुरुषांना त्यांच्याच जातीच्या लोकांनी स्वतःपुरते संकुचित करून ठेवले.

काही महापुरुषाचे गुणगान करताना किंवा चरित्र लिहितांना गांधीजींना कमी लेखावेच लागते त्याशिवाय यांचा महापुरुष मोठा होत नाही.याउलट गांधींचे वर्णन करताना कोणाला कमी लेखायची गरज नाही. गांधीजीनी स्वतःच्या चरित्रात इतर कुणाही पेक्षा स्वतःलाच कमी लेखले आहे

3. स्वातंत्र्य फक्त गांधींमुळे मिळालं का?
अस कोणीही म्हणत नाही की स्वातंत्र्य फक्त गांधींमुळे मिळाले. पण हे राष्ट्र घडवण्यात , सर्व जाती-पाती , धर्म च्या लोकांना एकत्र आणण्यात, कोट्यवधी सामान्य माणसांना इंग्रजांविरुद्ध निर्भयपणे लढण्यास प्रेरणा देणारे ते होते त्यामुळे ते स्वातंत्र्य लढ्याचे नायक ठरतात.आणि हे त्याकाळचे सर्वच नेते मान्य करतात. नेताजी बोस त्यामुळेच त्यांना राष्ट्रपिता म्हणतात आणि आझाद हिंद सेनेत ही प्रत्येक कार्यक्रमानंतर 'महात्मा गांधी की जय' म्हटले जाते.
जसे 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' म्हटलं की सगळे मावळे त्यात येतात त्यात वेगवेगळ्या मावळ्यांची वेगळी नावे घेऊन जय म्हणण्याची गरज पडत नाही तसेच 'महात्मा गांधी की जय' म्हटलं की त्याकाळचे सगळेच स्वातंत्र्यसैनिक येतात.

4. ब्रिटिशांचे जगातील साम्राज्य कमी करण्यात गांधीजीचा वाटा-
 पूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश साम्राज्याचे पंतप्रधान चर्चिल म्हणाले होते कि 'या गांधीला जर जनरल स्मट्स ने आफ्रिकेतील तुरुंगातच संपवले असते तर ब्रिटिशांचे जगावर राज्य अजून काही दशके टिकले असते शिवाय भारताला स्वातंत्र्य दिले तर 10 वर्षात भारताचे तुकडे तुकडे होऊन हा देश बेचिराख होईल असेही त्याचे म्हणणे होते पण स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली तरी आपण आजही एकत्र आहोत आणि लोकशाही टिकून आहे ती या गांधींविचारांमुळेच.

5.शाहीदे आजम भगतसिंग यांची फाशी आणि म. गांधी-

भगतसिंग आणि क्रांतिकारकांचे प्राण वाचावे यासाठी गांधी गव्हर्नर जनरल आयर्विन यास भेटलेफाशीची शिक्षा अमलात न आणण्याची विनंती केली. शिक्षेच्या एक दिवस आधी त्यांनी आपले सर्व भाषिक कौशल्य पणाला लावून पत्र लिहून अगदी येशू ख्रिस्ताचा दाखला देऊनही शिक्षा माफ करण्याची विनंती केली, पण त्यास न जुमानता फाशी अंमलात आणली गेली. ब्रिटिश गांधीजींचे सहज ऐकणारे असते तर गांधी म्हटले असते चले जाव आणि ब्रिटिश निघून गेले असते. तसे मग ब्रिटिशांनी कस्तुरबांच्या आरोग्याची मुद्दामून गैरसोय करून त्यांची हत्या ही केली नसती.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भगतसिंग आणि त्याचे सहकारी हौतात्म्यासाठी खूपच अधीर झाले होते . त्यांना माफी नकोच होती ,म्हणून तर त्यांनी खटल्या दरम्यान बचावाचा प्रयत्न केला नाही. वीर भगतसिंग यांनी स्वतःच्या पालकांना ही खडसावुन शिक्षा माफ करण्यासाठी कुठलेही प्रयत्न करू नका असे सांगितले.आमच्या हुतात्मा जाण्याने हजारो तरुणांना स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा मिळेल असे ते म्हणत.

6.गांधीजी खूप अध्यात्मिक वा धार्मिक होते असा काही कट्टर नास्तिक मंडळींचा आरोप असतो

 सत्य -गांधीजी हे धार्मिक व आध्यात्मिक असले तरी धर्मांध व दुसऱ्या धर्माचा द्वेष करणारे नव्हते
गांधीजींचे अध्यात्म हे धार्मिक अथवा साक्षात्कारी नव्हते. त्याला सामाजिक परिमाणे होती. समाजाची सेवा, निसर्गाचे रक्षण, जलसंवर्धन, सार्वजनिक आरोग्याची काळजी हे त्यांना अभिप्रेत होते. व्यक्तिगत त्याग व व्यक्तिगत विकास यातून समाजाच्या हिताचा व्यापक विचार त्यांनी मांडला होता. एकाही डोळ्यातून एकही अश्रू निघू नये, गरिबी, अन्याय, विषमता यांचे उच्चाटन व्हावे, हीच त्यांची जीवनदृष्टी होती, हेच त्यांचे अध्यात्म होते आणि हाच त्यांचा परमार्थ होता. स्वातंत्र्याचा उल्लेख करणाऱ्यांनी स्वातंत्र्याकडे कसे पाहावे, याची दृष्टी गांधीजींच्या आचरणातून मिळते. गांधीजींनी कधीही लोकांना मी कृष्ण किंवा कुणाचा अवतार बनून तुमचा उद्धार करायला आलो आहे वगैरे म्हटले नाही. गांधींना एवढे लोक मानणारे होते की त्यांनी जर ठरवले असते तर ते एखाद्या नवीन धर्माचे संस्थापक ठरू शकले असते पण त्यांनी तसे काही केले नाही. 

7.गांधीहत्येनंतर ब्राम्हणांची हत्या झाली का?-

भ्याडपणे नथुराम गोडसे ने जेव्हा  प्रार्थनेला जाणाऱ्या गांधीजींची हत्या केली त्यानंतर तो स्वतःची ओळख सांगत नव्हता. स्वतःला मुसलमान दाखवून, गांधीजींची हत्या एका मुस्लिमाने केली असे सांगून भारतभर हिंदू-मुस्लिम दंगल पेटवून पटेल, नेहरू, मौलाना आझाद आणि सर्व प्रमुख नेत्यांच्या कत्तली घडवण्याचा आणि सरकार पाडण्याचा त्याचा आणि त्याच्या संघटनेचा डाव होता.  त्या ठिकाणी जेव्हा व्हॉईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन आले तेव्हा लोक त्यांच्याकडे आले आणि "हत्या करणारा मुस्लिम आहे का ?"असे विचारू लागले त्यांनी "तसे असणे शक्यच नाही" असे सांगितले , नंतर काकासाहेब गाडगीळ यांनी नथुरामला ओळखले आणि मोठा अनर्थ टळला.
राष्ट्रपित्याच्या हत्येमुळे पूर्ण देश शोकात बुडालेला असतांना हिंदू महासभा, आर.एस.एस च्या काही ब्राम्हण्यवादी लोकांनी साखर आणि मिठाई वाटणे सुरु केले. 
"आमचा बाप गेला आणि यांना कसला विकृत आनंद झाला" म्हणून लोक भडकले आणि त्यांच्यावर धावून गेले यात काही ब्राम्हण्यवादी लोकांची घरे जळाली.
पण पुणे, नगर आणि अनेक ठिकाणी गांधीवाद्यांनीच मध्ये पडून घरे वाडे जळण्यापासून वाचवली आणि जमावाला शांत केले.गांधीवाद्यांनी कधीही ब्राम्हणांचा किंवा कुठल्या जातीचा विरोध वा द्वेष केला नाही. आचार्य विनोबा भावे, कालेलकर, धर्माधिकारी हे गांधीजींचे महाराष्ट्रातील प्रमुख शिष्य कोण होते ? जर  ब्राम्हण जाती बद्दल द्वेष असता? तर यांना गांधीवाद्यांनी गांधीनंतर आपले मानले असते का? 

8.गांधी हत्या-
गांधीहत्येबद्दल 55 कोटी, फाळणी आदी काही खोटी कारणे सांगितली जातात पण हे सत्य नाही.फाळणीला शेवटपर्यत विरोध करणारे एकमेव गांधीजींच होते तर त्यांचे उपोषण हे 55 कोटींसाठी नसून दंगली थांबाव्यात यासाठी होते.सरकारने 55 कोटी देण्याचे कबूल केले तरी ते उपोषण थांबले नव्हते. दंगल थांबली तेव्हा त्यांनी उपोषण मागे घेतले.
55 कोटी बद्दल सरदार पटेल स्वतः म्हणतात की गांधीजी चा सल्ला बरोबर होता. 
"हम पास की सोचते है, पर बापू दूर की सोचते है" असे स पटेल यावेळी म्हणाले

9.गांधी हत्येचे कारण - 
गांधीहत्येचे मुख्य कारण होते त्यांचे सर्वसमावेशक धोरण. जे कार्य हजारो वर्षांपूर्वी भ महावीर व म. बुद्धांनी केले तेच काम गांधीजींनी आत्ता केले ते म्हणजे धर्म, राजकारण , शिक्षण, अर्थकारण , समाजकारण आदी सगळीकडे एका वर्गाची मक्तेदारी, वर्चस्व मोडून काढून ते सामान्य माणसासाठी खुले केले. गांधीजींच्या उदयापूर्वी राजकारण धर्मकारण आदी ठिकाणी मुख्यतः उच्चवर्णीय लोकांची मक्तेदारी होती ज्यामुळे त्यांची हत्या झाली. गांधीजींवर पहिला हल्ला पुण्यात जून1934 मध्ये ते अस्पृश्यता निवारण चळवळीचे कार्य करत असतांना झाला जेव्हा 55 कोटी, फाळणी इ गोष्टी ही अस्तित्वात नव्हत्या. सनातनी लोकांनी तो हल्ला घडवला होता.त्यानंतर अनेक हल्ले झाले

10.परिवर्तन – गांधी स्वतःत नेहमी सकारात्मक परिवर्तन करत राहिले उदा – चातुर्वर्ण्याबद्दलची त्यांची मते बदलत गेली.फक्त आंतरजातीय विवाहातच उपस्थित राहणार असा प्रण त्यांनी घेतला आणि शेवटपर्यत त्याचे पालन केले.
याचा परिणाम आजही दिसतो.उदाहरण सांगतो माझे जेष्ठ मित्र ACP प्रेमसागर सांगतात की त्या दोघांचे आंतरजातीय लग्न जवळजवळ अशक्य होते. त्यांचा जवळचा मित्र ही त्यांना सल्ला देऊन सोडून गेला की "या आंतरजातीय विवाहात तुझा खून वगैरे होऊ नये म्हणून म्हणून तू लांब रहा यापासून".हे चालू असताना मुलीच्या आजी कडे (आईचीआई) हे प्रकरण गेले त्या म्हणाल्या "अरे लडका हरिजन है, मतलब अपने से भी उपर है ऐसा गांधीजीने कहा है और गांधीजी तो सिर्फ ऐसेच शादी मे जाते थे" त्या आज्जीला कोणी विरुद्ध बोलू शकल नाही कारण गांधींचे एवढं स्थान सगळीकडे होत. 30 वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले तेव्हा माझ्या लग्नात म.गांधी उपस्थित असल्यासारखे मला यामुळे वाटल्याचा ACP प्रेमसागरजी मला म्हणाले तेव्हा मलाही भरून आले की "किती लोकांना अंतर्बाह्य बदलून टाकले या गांधीने"...

11.पर्यावरणपृथ्वीकडे सर्वांची गरज भागवण्याएवढे आहे पण सर्वांची हाव भागवू शकेल एवढे  शकेल एवढे नाही.असे ते म्हणत. आज जगभर जेव्हा पर्यावरणा साठी मोर्चे निघतात तेव्हा त्यावर गांधीजींचे हेच वाक्य असते.

12.स्त्रियांचे सक्षमीकरण-

 जीवनाच्या ज्या ज्या क्षेत्रात पुरुष कार्य करतात त्या त्या क्षेत्रात स्त्रिया कार्य करू शकतात; स्त्रियांना कार्य करता आले पाहिजे आणि स्त्रियांनी कार्य केले पाहिजे हा गांधीजींचा आग्रह होता. त्यामुळेच त्यांनी स्त्रियांसाठी खास असे काही कार्यक्रम राबवले नसले तरी त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांची योजनाच अशी असायची की त्यात स्त्रियांचा सहभाग आवश्यक असे. एकदा बिहारमध्ये त्यांना एका कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते ,आपल्या पूर्ण देशामध्ये स्त्रियांना चूल, मुल पदर आणि बुरखा एवढ्या पुरतेच मर्यादित ठेवले जाई बिहार मध्ये तर स्त्रियांवर अजून काही बंधने होती असे असताना गांधीजींनी अट घातली कि कार्यक्रमात स्त्रियांचा सहभाग असला तरच मी कार्यक्रमाला येणार आणि तेथे तो चमत्कार घडला सुद्धा.
आपली भारतीय राज्यघटना तयार करण्यात अनेक गांधीवादी स्त्रियांचे मोठे योगदान आहे.स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी अनेक विकसित देशांना भांडावे लागले. आपल्या भारतात ते स्वातंत्र्यासोबतच मिळाले त्याला कारण गांधींनी तयार केलेली मानसिकता.

शेवटी बाबा आमटेंच्या मुक्तछंदातील हे शब्द सांगून विराम घेतो
त्याने प्रथम एका मिठाच्या पुडीला हात घातला आणि मग एक साम्राज्य 
मिठाच्या सात समुद्र पलीकडे फेकून दिले.त्याने सुतातून सुरुवात केली
आणि अखेर स्वराज्याचा स्वर्ग गाठून दाखवला. याच साध्या सुताने त्याने एक पिढीच्या पिढी आणि एक देशच्या देश बांधून दाखवला.
पण एक देशच्या देश आणि एक पिढीच्या पिढी पकडण्यासाठी 
नुसतीच हिकमत पुरी पडत नाही
त्यासाठी ताकदही लागते
भारी वजनाचा एक क्रूस वाहण्याची ताकद!"
"ज्याला तो क्रूस वागवता येतो 
त्याच्या सोबत बारा अनुयायी असले 
तरी त्याचे प्रेषितत्व घाबरत नाही.
पण खांद्यावर क्रूस नसता कुणी बारा लाख बाजारबुणगे घेवून निघाला 
तरी त्याचा महंत होतो.
आणि महंत फक्त गादी चालवू शकतात.
मन्वंतरे घडवून आणू शकत नाहीत


चला तर मग बदलाची सुरुवात स्वतःपासून करूया

संकेत मुनोत
8668975178
Knowing.Gandhi@gmail.com
Knowing Gandhism Global Friends

आपणही ही चळवळ जॉईन करा 

Comment, Share ,Follow and Subscribe.