AddThis code

Friday, November 30, 2018

जगाला अहिंसेचा संदेश देणारा अवलिया- जैन जागृती मध्ये प्रकाशित लेख

दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल

सध्या गांधी जन्मशताब्दीचे १५० वे वर्ष सुरु आहे फक्त भारतातच नव्हे तर जगभर त्याबद्दल अनेक उपक्रम सुरु आहेत.

भ. महावीर आणि बुद्ध जाऊन हजारो वर्षे झाली नंतर हळूहळू एक काळ असा आला कि लोकांचा अहिंसा या शब्दावरून विश्वास उडत चालला होता, काहींना तर अहिंसा हा बावळटपणा वाटे, जैन आणि बौद्धांच्या अहिंसेच्या अतिरेकाने भारत मागे राहिला असा खोटा प्रचार देखील काही विचारवंतांनी पसरवायला सुरु केला. पण याच वेळी गांधी नावाच्या या अवलिया व्यक्तीने फक्त भारतातच नव्हे तर जगभर अहिंसेचे महत्व पटवून दिले. आपल्यातील बहुतेक जैन लोकांनी अहिंसा आपल्यापुरतीच किंवा शाकाहारापुरतीच मर्यादित करून ठेवली पण या अवलियाने ती जगभर पोहचवली.

*गांधीजी, जात आणि धर्म:*
गांधीजींनी कोणत्याही जातिचे वा धर्माचे अतिरेकी समर्थन केले नाही म्हणून सर्व जातीतील कट्टरवादी लोक त्यांचा द्वेष करतात 

एका जातीतील कट्टर लोकांना  पुणे करारामुळे गांधीजी ब्राम्हणधार्जिणे आणि दलितद्वेष्टे (मनुवादी) वाटतात. कट्टर उच्चवर्णीयांना गांधी ब्राम्हणद्वेष्टे दलित धार्जिणे वाटतात कारण जिथे एका जातीचे वर्चस्व होते अशी सर्व ठिकाणे राजकारण, समाजकारण व इतर अनेक  गांधीजींनी अस्पृश्यता निवारण चळवळीद्वारे सर्व जातीसाठी खुली केली जिथे त्यापूर्वी फक्त उच्चवर्णीयांचे वर्चस्व होते. पाकिस्तानमधील काही कट्टर मुस्लिमांनाही आम्हाला छोटा पाकिस्तान दिला,कश्मीर दिला नाही वगैरे कारणावरून  गांधी मुस्लिमद्वेष्टे व हिंदुधार्जिणे वाटतात.

त्यामुळे गांधीजींच्या मागे त्यांचा उदो उदो करणारा वा त्यांचा देव बनवणारा कोणताही जातसमूह नाही. जेवढी टिंगल गांधीजींची उडवली जाते त्याच्या एक टक्का जरी इतर कोणत्या महापुरुषांची झाली असती तर दंगली झाल्या असत्या, पण हेच गांधीजींचे वैशिष्ट्य आहे कुठल्याही जातीचा , धर्माचा, पंथाचा आधार न घेता ते जगभर पोहचले.

*जागतिक प्रभाव:*
जगभर २ आॅक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला जातो 130 पेक्षा जास्त देशांनी गांधीजीवर अभ्यास करण्यासाठी विद्यापीठ सुरु केली आहेत जगात सर्वात जास्त रस्त्यांना त्यांची नावे आहेत, शिवाय जगात सर्वात जास्त वाचले जाणारे चरित्र असणारे आणि सर्व भाषांमध्ये ज्यांचे साहित्य उपलब्ध आहे अशी एकमेव व्यक्ती म्हणजे महात्मा गांधीच.

शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांचे गांधीजींविषयीचे उद्गार आपणा सर्वांना माहीतच आहेत. केवळ तेच नव्हे, तर नेल्सन मंडेला, बराक ओबामा यांच्यासारख्या जागतिक नेत्यांनी या महात्म्याची महती व त्यांचे त्यांच्या आयुष्यातील स्थान निसंदिग्ध भाषेत सांगितले आहे.
शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन म्हणतो, गांधी नावाचा हाडा मांसाचा महान माणूस या पृथ्वीवर होऊन गेला यावर पुढील पिढ्या विश्वास पण ठेवणार नाहीत.
एकदा ब्रिटिश नौसेना प्रमुखाची मुलगी जागतिक कीर्तीचे लेखक रोमा रोलाँ यांना भेटायला गेल्यावर तिने युध्दमय पार्श्वभूमीवर जगाचे काय होईल असे विचारले, तेव्हा ते म्हणाले की येशू ख्रिस्त तर आता नाहीत, पण या काळात भारतातल्या गांधी नावाच्या माणसाचे विचार या जगाला तारून जातील, , नेल्सन मंडेलांनी २२ वर्ष लढा देऊन स्वातंत्र्य मिळवले आणि  राष्ट्राध्यक्ष  झाल्यावर म्हणाले, मला पहिलं पाऊल गांधीजीच्या भूमीत ठेवायचे आहे आणि ते भारतात आले. ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात म्हटले आहे की जर गांधीविचार नसते तर मी आज इथे नसतो?
मार्टिन ल्युथर किंग, बीटल्सचा उद्गाता जाॅन लेनन, रोमेन रोलंड, रीचर्ड अॅटनबरो, अँपलचा जनक स्टीव्ह जाॅब्ज, जागतिक बौद्ध धर्मगुरु दलाई लामा , हेन्री फोर्ड, मलाला, सत्यार्थी,डॉ अभय बंग, सुधामूर्ती-नारायणमूर्ती, बाबा आमटे इ. अनेक माणसे गांधींपासून प्रेरणा घेऊन मोठी झाली आणि त्यांनी जगाचा इतिहास बदलला.नोबेल समितीने ११२ वर्षात पहिल्यांदा एका गोष्टीची माफी मागितली ती म्हणजे महात्मा गांधींना नोबेल न देण्याची चूक केल्याची माफी!

*जैन धर्माशी संपर्क:*
गांधीजी स्वतः जैन नसले तरी जैन समाजातील अनेक व्यक्तींचा त्यांच्यावर प्रभाव होता, ते लहान असताना त्यांच्या घरी वडिलांशी चर्चा करण्यासाठी जैन साधू येत असत,गांधीजीना विदेशात पाठवण्यापूर्वी त्यांच्या आईने जैन साधू बेचरजी स्वामी यांच्याकडून मद्य, मांस आणि परस्त्री यांच्यापासून दूर राहण्याची शपथ घेतली जी त्यांनी शेवटपर्यंत पाळली,जैन श्रावक श्रीमद राजचंद्रजी यांचाही त्यांच्यावर खूप प्रभाव होता.सत्य, अहिंसा, अपरिग्रह, अस्तेय , अस्वाद आणि ब्रह्मचर्य ही तत्वे त्यांनी वयाच्या ३७ व्या वर्षपासून आचरणात आणली होती

*अनेकांतवाद:*
पूर्वग्रहदूषित मत
आपल्यातील अनेक जण एखाद्या व्यक्तीबद्दल, महापुरुषाबद्दल, संस्थेबद्दल, संघटनेबद्दल, विचाराबद्दल किंवा कशाहीबद्दल पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेऊन जगत असतात.

म्हणजे माझ्या एखाद्या जवळच्याने सांगितलंय किंवा याने सांगितलंय ,परंपरेत आलंय या, या पुस्तकात आलय, घरातील कुणी सांगितलंय म्हणजे हे असेच असेल ती जवळपास वावरणारी व्यक्ती किंवा तो महापुरुष वा ते जे काही असेल ते असे असे चुकीचेच आहेत किंवा असे असे बरोबरच आहेत अस मानून आपण मोकळे होतो.

पण बहुतेक वेळा सत्य ते नसते सत्य त्यापलीकडे असते
अनेकांतवाद-अंत म्हणजे शेवट . एकान्त म्हणजे एकच शेवट . अनेकांतवाद म्हणजे अनेक शेवट . म्हणजेच कुठल्याही गोष्टीबाबत एकाच  बाजूचे मत न बनविणे.यासाठी हत्ती आणि सात आंधळ्यांची कथा उदाहरण म्हणुन फिट्ट बसते. सात आंधळे हत्तीजवळ जातात. त्यांनी हत्ती आधी  कधीच पाहिलेला नाही .  हत्तीच्या  शेपटीला हात लावून एका आंधळा म्हणतो हत्ती दोरिसारखा आहे . हत्तीच्या  पायाला हात लावणारा ओरडतो - हत्ती खांबासारखा आहे . हस्तिदंताला स्पर्श करणारा आंधळा पुटपुटतो -  हत्ती भाल्यासारखा टोकदार आहे. कानाला स्पर्श करणारा आंधळा पुटपुटतो -  हत्ती सुपासारखा आहे. सगळ्या आंधळ्यांचे मत वेगवेगळे बनते .
प्रत्यक्षात हत्ती हा दोरी , खांब , भाला, सुप इत्यादी सर्वासारखा असतो आणि कुणासारखाच तंतोतंत नसतो . सत्याकडे पाहण्याचे अनेक मार्ग असतात. एकाचवेळी ते सर्व योग्य आणि अयोग्यही असतात . एकाचवेळी निश्चित आणि  अनिश्चितहि असतात.सत्याचे मानवी आकलन विभिन्न असते. सत्याचे मानवी आकलन अपुर्ण असते.   त्यामुळे स्वत:च्या मताबद्दल कट्टरता किंवा दुसर्याच्या मताचा द्वेष चुक  आहे. अनेकांतवाद कट्टर पणाचा  मुडदा अहिंसक मार्गांनी  पाडतो !अहिंसेचा जन्म असा मनात आहे .  प्रथम तो माझ्या मनात होणार आहे त्यानंतर तुझ्या मनात होणार आहे . तो ज्ञानातून होणार आहे.  हे स्पष्ट दिसणारे  वौज्ञानिक सत्य स्वीकारायला शौर्य लागते . स्वत:च्या डोळ्यावरची झापडे काढणे हे येरागबाळ्याचे काम नाही.
आपले आधीचे मत चुकीचे होते हे स्वीकारायलाही खूप धैर्य लागते ज्यांनी हे स्वीकारले ते परिवर्तन घडवत पुढे जातात.
हे गांधीजीबद्दल तर झालेच पण हयात असलेल्या व्यक्तीबद्दल ही आपण असे पूर्वग्रहदूषित मत बनवून चालतो त्याच्याशी कधी प्रत्यक्ष संवाद साधत नाही आणि गैरसमज वाढत जातात.

या मार्गाने आपण नातेसंबंध, समाज , देश आणि जग अधिक जवळ आणि चांगले करू शकतो

*सत्य:*
सत्य आचरणात आणून सर्व करता येते हे त्यांनी स्वतःच्या जीवनातून सिद्ध केले ते राजकारण असो वा समाजकारण व आयुष्य प्रत्येक  ठिकाणी त्यांनी सत्याचाच मार्ग पत्करला.

*अस्तेय:*
फक्त चोरीचीच नव्हे तर गरज नसलेली कोणतीही वस्तू जवळ ठेवू नये हे ते तत्व त्यांनी आचरणात आणले.

*अपरिग्रह:*
गांधीजी जेव्हा जग सोडून गेले तेव्हा या जागतिक नेत्याच्या नावावर काहीच नव्हते. जेवढी गरज आहे तेवढाच संचय ते करत त्यांचा आहारही अगदी मर्यादित असे.

खरे तर गांधीजींनी सांगितलेली अस्तेय, अपरिग्रह ही तत्वे आपल्या जैन तत्त्वज्ञानातील पाच महाव्रतांपैकीच आहेत. पण आपण सत्य, अहिंसा या तत्वांना जेवढे महत्व दिले, त्यामानाने अस्तेय आणि अपरिग्रह आपल्याकडून काहीसे दुर्लक्षितच राहिले. आपण एवढा कट्टरतेने शाकाहार पाळतो, अगदी कांदा-लसूनही आपल्याला वर्ज्य! आपण जर एवढ्याच कट्टरतेने अस्तेय व अपरिग्रह या तत्वांचे पालन केले, तर आपले जीवन काही वेगळेच दिसेल. आपण लोक किती पैसे पैसे करतो. आपल्या संपत्तीत भर घालण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो; पण आपण पैशामागे न धावता जर आपल्या गरजेपुरतीच संपत्ती मिळवण्याचे व जवळ ठेवण्याचे तत्व पाळले, तर आपले जीवन किती शांततामय होईल याचा विचार करून बघा! एकदा का आपण संपत्तीच्या मागे धावू लागलो, की मग त्या नादात अस्तेय या तत्वाला कधी तिलांजली दिली जाते, हे कळतही नाही. वाटेल त्या मार्गाने आपण पैसे मिळवू पाहतो. व्यवसाय-धंद्यातील नीतिमत्ता येथे लोप पावते. आपण जर अपरिग्रह हे तत्व कसोशीने पाळू, तर अस्तेय हे तत्वही आपोआपच पाळले जाईल.

अस्वाद-
गांधीजींच्या सर्व तत्वांत मला सर्वात जास्त आवडलेले तत्व म्हणजे अस्वाद. अस्वाद म्हणजे कोणत्याही गोष्टीचा-अन्न, कपडे व इतर गोष्टी- केवळ इंद्रियसुखांसाठी रसास्वाद न घेणे, तर त्या केवळ शरीराचे भरणपोषण व संरक्षण करण्याच्या दृष्टीने वापरणे. आपल्या जैन धर्मानेही उपभोगावर मर्यादा घालण्याचा संदेश दिला आहे. पण प्रत्यक्षात चित्र काय दिसते? आपल्या समाजातील साध्या एखाद्या विवाह समारंभाचेच उदाहरण घ्या. अन्न आणि इतर साधनांच्या उपभोगाचा किती अतिरेक तेथे होतो हे आपण पाहतोच. आपल्या दैनंदिन जीवनातही आपण जिभेचे चोचले पुरवण्यासाठी, कपड्यालत्याची हौस भागवण्यासाठी जीवाचा किती आटापिटा करतो आपण! थोडासुद्धा संयम आपल्याला पाळता येत नाही.

चुका आणि क्षमा- आपल्याकडून होणाऱ्या चुका मान्य करा असे गांधीजी नेहमी सांगायचे. चुका नुसत्या मान्यच करू नका तर आपली चूक मोहरी(राई)एव्हढी असली तरी तिला डोंगराएव्हढी फुगवून समाजासमोर मांडा असे ते म्हणत. पण चुका मान्य करण्यात आपला अहंकार आडवा येतो. एखादा आपल्या चुका मान्य करीत असेल तर आपण त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी एकतर त्याला वेड्यात काढतो, गुन्हेगार ठरवतो किंवा मग त्याच्या सदीच्छेचा आपल्या स्वार्थासाठी कसा उपयोग करून घेता येईल या विवंचनेत असतो!क्षमा मागणे, क्षमा करणे ही वीराची लक्षणे आहेत भ्याडाची नव्हे.

सकारात्मक दृष्टिकोन-
काहीजण प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मक आणि पूर्वग्रहदूषित दृष्टीने बघतात गांधीजींच्या ही आयुष्यात असे अनेक प्रसंग आले, जेव्हा गांधीजी एखादा सामाजिक सुधारणेचा निर्णय घेत, घोषणा करत, हरीजन सप्ताहात लेख लिहित , एखादी मोहीम सुरु करत तर काही लोक त्याचा उलटा अर्थ काढत कि गांधींजींनी संबधित व्यक्तीला किंवा समूहाला हिणवण्यासाठीच ते केले आहे पण गांधीजी अश्या नकारात्मक व्यक्तींमुळे थांबले नाहीत.प्रत्येकाकडून जे चांगले घेता येईल ते घेत जगाला भरभरुन देत ते पुढे जात राहिले.

अहिंसा-
काही जैन मित्रच जेव्हा अहिंसेची चेष्टा करतात तेव्हा आश्चर्य वाटते. मित्रांनो अहिंसा भ्याडपणाचे नव्हे तर शूरपणाचे लक्षण आहे. समोरचा माझ्यावर हल्ला करत असताना मी समोरच्यवर प्रतिहल्ला ही करणार नाही, पळूनही जाणार नाही, समोरच्या बद्दल वैरभावही मनात आणणार नाही  आणि अन्यायही सहन करणार नाही . किती मोठी गोष्ट आहे ही!
एक गोष्ट लक्षात घ्या की अहिंसा म्हणजे केवळ दुसऱ्याची हिंसा करणे नव्हे, तर तिला यापेक्षाही अनेक विविधार्थी पदर आहेत. मी स्वतः शाकाहारी आहे. तसेच इतर प्राण्यांना कोणत्याही कारणाने मारण्याआधी किंवा इजा पोचवण्याआधी अनेकदा विचार करतो. पण ही अहिंसेची ढोबळ व्याख्या झाली. सुक्ष्मार्थाने अहिंसेचे पालन करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांना केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक पीडा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. माझ्या बोलण्यातून किंवा कृतींतून इतरांना काही त्रास होत असेल तर त्याची जाणीव होणे आणि मनाला वेदनाही होणे हे आपण योग्य मार्गावर असल्याचे लक्षण आहे असे मी मानतो. आपण शक्यतो दुसऱ्यांविषयी काही निर्णय घेताना किंवा दुसर्याशी बोलताना-वागताना त्यांच्या जागेवर स्वतःला ठेऊन पाहिले पाहिजे. त्यामुळे आपल्या हातून दुसऱ्यांना दुखावण्याची शक्यता कमी होते.

गांधीजींची अहिंसा ही शुराची अहिंसा होती
सशस्त्र आंदोलनात (सशस्त्र व गुप्त क्रांतीकारी मार्ग) थोड्या लोकांकडून संपूर्ण त्यागाची अपेक्षा होती आणि त्याचा परिणाम आणि पाठिंबाही मर्यादित होता. याउलट अहिंसक आंदोलनात सर्वांकडून थोड्या त्यागाची अपेक्षा होती त्याचा परिणाम म्हणून तळागाळातील प्रत्येकामध्ये, शेतकऱ्यांपासून सफाई कर्मचाऱ्यापर्यंत, उद्योगपतींपासून कामगारापर्यंत आणि स्त्रियांपासून बालकांपर्यंत सर्व लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि देशाच्या स्वातंत्र्याबद्दल प्रेरणा निर्माण झाली, जी तोपर्यंत नव्हती.
कोसबाडच्या टेकडीवरून’ या अनुताई वाघ यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकावर पु. ल. देशपांडे यांनी खूप सुंदर प्रतिक्रिया लिहिली आहे. गांधीजींची महानता यावरूनच समजण्यास मदत होते. “अन्यायाविरुद्ध आपण पेटू शकतो, असे तळागाळातल्या लोकांना त्यांनी वाटायला लावले, हे आवश्यकच होते.” हिंसक आंदोलनाविषयी ते म्हणतात, “भक्कन पेटणाऱ्या भडक्यासारखे. भडका उडतो तसाच विझतोही चटकन.”

समाज बदलायचा असल्यास त्यासाठी विधायक प्रवृत्तीची, शांतपणाने, न कंटाळता शोषितांच्या लहानसहान अडचणी सोडवत त्यांच्यात जाऊन राहणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज लागते. गांधीजींनी अशी फार मोठी फौज निर्माण केली होती. गांधीजींची अहिंसा टोकाची होती असे एक असत्य पसरवले जाते. गांधीजींची अहिंसा टोकाची कधीच नव्हती . पाकिस्तानने काश्मीरमध्ये घुसखोरी केल्यावर तेथे भारतीय सैन्य पाठवण्यास सांगणारे गांधीच होते.

एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा हे गांधीजी काही इंग्रजांबाबत बोलले नव्हते तर हरीजनांबाबत बोलले होते.दंगल झाल्यावर जेव्हा सवर्णांनी हरीजनांवर अन्याय केला तेव्हा गांधींनी हे उद्गार काढले होते त्यांचे पूर्ण वाक्य असे होते 'एका गालावर मारले आणि  दुसरा गाल पुढे केला आणि त्याच्यावर जरी मारले तरी आपण हरीजनांवर जो अत्याचार केला आहे त्याचे परिमार्जन होणार नाही.

पत्रीसरकारचे मुख्य क्रातीसिंह नाना पाटील जेव्हा महात्मा गांधींना भेटले त्यांना आपल्या ‘पत्रीसरकार’बद्दल सांगितले. त्यावर गांधीजी म्हणाले होते, की ‘नाना पाटील, तुमची चळवळ माझ्या तत्त्वात बसते न बसते यापेक्षा तुम्ही १९४२ ची स्वातंत्र्य चळवळ जिवंत ठेवली, सातार्याने या चळवळीचे नाव राखले हे महत्त्वाचे होय! नाना, तुम्ही बहादूर आहात. भ्याडाच्या अहिंसेपेक्षा शुराची हिंसा परवडेल असे मानणारा मी आहे.'

तत्त्ववेत्ते म्हणत असत, ‘दुष्ट प्रवृत्तीला तसंच प्रत्युत्तर देऊ नका, तुम्हाला एक मैल चालायला सांगितलं तर दोन मैल चाला’. गांधींनी असं कधीच म्हटलं नसतं. उलट विचारलं असतं, ‘का चालू? अगदी पहिला मैलभर चालण्यासाठीही पुरेसं कारण असलं पाहिजे.’ जगात न्यायाची स्थापना करण्यासाठी लढण्याचं अहिंसा हे हत्यार आहे अस ते म्हणत

गांधी हत्या-
गांधीहत्येबद्दल 55 कोटी, फाळणी आदी काही खोटी कारणे सांगितली जातात पण हे सत्य नाही.फाळणीला शेवटपर्यत विरोध करणारे एकमेव गांधीजींच होते तर त्यांचे उपोषण हे 55 कोटींसाठी नसून दंगली थांबाव्यात यासाठी होते.
गांधीहत्येचे मुख्य कारण होते त्यांचे सर्वसमावेशक धोरण. जे कार्य हजारो वर्षांपूर्वी भ महावीर व म. बुद्धांनी केले तेच काम गांधीजींनी आत्ता केले ते म्हणजे धर्म, राजकारण , शिक्षण, अर्थकारण , समाजकारण आदी सगळीकडे एका वर्गाची मक्तेदारी मोडून काढून ते सर्वांसाठी खुले करणे. गांधीजींच्या उदयापूर्वी राजकारण धर्मकारण आदी ठिकाणी मुख्यतः उच्चवर्णीय लोकांची मक्तेदारी असे गांधीजींनी ती सर्व जाती व वर्गासाठी खुली केली ज्यामुळे त्यांची हत्या झाली. गांधीजींवर पहिला हल्ला पुण्यात जून1934 मध्ये ते अस्पृश्यता निवारण चळवळीचे कार्य करत असतांना झाला जेव्हा 55 कोटी, फाळणी इ गोष्टी ही अस्तित्वात नव्हत्या.

*सप्त पातके:*
गांधीजींनी सात पातके सांगितली आहेत 
१.चारित्र्यविना  शिक्षण 
२.नितीमत्ताविरहित व्यवहार 
३. मानवतेविना विज्ञान 
४. त्यागारहित भक्ती 
५. विवेकहीन सुखोपभोग 
६.कष्टाविना संपत्ती 
७. तत्वहीन राजकारण

*समारोप:*
शेवटी बाबा आमटेंच्या मुक्तछंदातील हे शब्द सांगून विराम घेतो

त्याने प्रथम एका मिठाच्या पुडीला हात घातला आणि मग एक साम्राज्य 
मिठाच्या सात समुद्र पलीकडे फेकून दिले.त्याने सुतातून सुरुवात केली
आणि अखेर स्वराज्याचा स्वर्ग गाठून दाखवला. याच साध्या सुताने त्याने एक पिढीच्या पिढी आणि एक देशच्या देश बांधून दाखवला.
पण एक देशच्या देश आणि एक पिढीच्या पिढी पकडण्यासाठी 
नुसतीच हिकमत पुरी पडत नाही
त्यासाठी ताकदही लागते
भारी वजनाचा एक क्रूस वाहण्याची ताकद!"
"ज्याला तो क्रूस वागवता येतो 
त्याच्या सोबत बारा अनुयायी असले 
तरी त्याचे प्रेषितत्व घाबरत नाही.
पण खांद्यावर क्रूस नसता कुणी बारा लाख बाजारबुणगे घेवून निघाला 
तरी त्याचा महंत होतो.
आणि महंत फक्त गादी चालवू शकतात.
मन्वंतरे घडवून आणू शकत नाहीत

शेवटी एवढेच म्हणेन कि जो बदल आपल्याला जगात घडवायचा आहे त्याची सुरवात स्वतः पासून करूया

लेख लिहताना काही चुकले असल्यास क्षमस्व

संकेत मुनोत
8087446346
Changalevichar1@gmail.com

No comments:

Post a Comment