AddThis code

Friday, November 30, 2018

गांधी आजच्या तरुणाईच्या परपेक्षातून- जनमानसाची शिदोरी मासिकात प्रकाशित लेख

परवा मुंबईमध्ये रेल्वे पादचारी पुलावर चेंगराचेंगरी झाली आणि पुन्हा गांधीचे शब्द आठवले "खेड्याकडे चला".दररोज वर्तमानपत्र वाचत असतांना गांधी आठवतच असतात. परंतु अशा घटना घडल्यावर मात्र गांधींच्या विचारांची, तत्त्वांची गरज तीव्रपणे जाणवते.


जगभरात गांधीजींचे चाहते आणि अनुयायी असले तरी भारतात गांधीजींची चेष्टाच जास्त उडवली जाते.
अल्बर्ट आईन्स्टाईन या थोर वैज्ञानिकांने म्हटलेच आहे की ‘’ येणाऱ्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत कि असा कोणी हाडा मांसाचा माणूस या पृथ्वीतलावर वावरत होता’’ आणि होय आईन्स्टाईनच्या इतर सिद्धांताप्रमाणे हाही सिद्धांत खरा ठरतो की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती आज आहे.

होय आजही गांधीचे विचार महत्वाचे, अनुकरणीय, आचरणीय , आम्हा भारतीयांना आणि जगाला वाचविणारे आहेत याचा प्रत्यय पावलोपावली येतो. काही दिवसांपूर्वी मराठी सिनेसृष्टीचे बादशहा, नटसम्राट अभिनेता डॉ श्रीराम लागू यांच्याशी गप्पा मारतांना "आज गांधीजी relevant(समकालीन) आहेत का?" हा प्रश्न विचारला होता. ते म्हणाले की गांधीविचार फक्त काल किंवा आज नाही तर सार्वकालिक  relevant आहेत. एका विज्ञानवादी माणसाकडून हे ऐकणे माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता.

थोडा विचार केला तरी गांधीचे विचार आजही आचरणीय आहेत हे लक्षात येते. त्यातील काही सहज दिसून येणाऱ्या बाबी पाहू या

अहिंसा –

'कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका'-महात्मा गांधी 

आज आश्चर्य वाटते की या महात्म्याने तेव्हा मोबाईल, इंटरनेट, टीव्ही सारखी कुठलीच माध्यमे नसतांना संपूर्ण देश स्वराज्याच्या एका धाग्याने जोडला होता. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वाटेवर विकास करीत असतांना  जगास त्याचे काही नुकसानही भोगावे लागत आहे. अनेक देश अण्वस्त्र घेऊन एकमेकांविरुद्ध उभे आहेत. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण स्वतः बलवान असायला पाहिजे, खूप सैनिकी शक्ती पाहिजे अशा मांडल्या जाणाऱ्या राष्ट्रावादात तथ्य किती याचा शोध घ्यावा लागेल. ज्यांना जगातील सर्वात बलाढ्य महासत्ता किंवा विकसित देश म्हणावं असे देशही दहशतवादी वृत्तींपासून स्वतःला वाचवू शकले नाहीत. तुम्ही एक बॉम्ब टाका आम्ही 2 टाकतो आणि काही क्षणात दोघेही संपून जाऊ असे वातावरण आहे, आणि याच वेळेस Eye for eye will make whole world blind अशा समंजस गांधीविचारांची सर्वाधिक गरज काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये वर्ल्ड ट्रेंड सेंटरवर दहशतवादी हल्ला झाला आणि पूर्ण जग सैरभैर झाले होते. तेव्हा पुढे असे प्रकार होऊ नयेत यासाठी जे शिष्ट मंडळ बनवले गेले त्यात या जगाला आइन्स्टाईनच्या सिद्धांताप्रमाणे गांधीविचारच तारू शकतात असा निर्वाळा अनेक विचारवंतांनी तेथे दिला.

कोलंबियात ‘फार्क‘ नावाची अति-डावी संघटना आहे.(आपल्याकडील नक्षलवाद्यांसारखी . पण आपल्याकडील नक्षलवाद्यांपेक्षा कितीतरी पट अधिक विध्वंसक क्षमता असणारी) तीची स्थापना 1964 ची. तेव्हापासून फार्क ने नंगानाच केला आहे. अपरिमित मनुष्यहानी व संसाधनांची हानी केली आहे. कोलंबियाचे सैनिक इतके वर्षे झाली पण त्यांचा बिमोड करण्यात सपशेल अपयशी ठरली.
सन्टोस यांनी यावर ‘गांधीयन मार्गाने’ उत्तर शोधण्याचा निर्णय घेतला. म्हणजे काय तर त्यांनी फार्क ला हिंसेचा मार्ग सोडून लोकशाही निवडणूक प्रक्रियेत पक्ष म्हणून सहभागी होण्यासाठी राजी केले. मागच्या वर्षी त्याच संदर्भात कोलंबियात सार्वमत घेण्यात आले. त्यावेळी सन्टोस यांनी गांधीजींपासून आपण प्रेरणा घेऊ असे लोकांना आवाहन करत

“We in Colombia have to adopt this culture of non-violence,” असे विधान केले.

अर्थात गांधीयन वाटेवर चालणारे सन्टोस हे काही पहिले नाहीत. कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकेतील मार्टिन ल्युथर किंग, कैक वर्षे तुरुंगात डांबले गेले तरी गोऱ्यांविषयी द्वेषभावना ज्यांच्या मनात राहिली नाही ते दक्षिण आफ्रिकेचे नेल्सन मंडेला, पिस्तुलगच्च देशात आवाज उचळणारी मलाला यांनी, ‘गांधीयन वाटेेवर’ मार्गक्रमण करून आपआपल्या देशात परिवर्तन घडवून आणले. या सर्वांना शांततेचा नोबेल पूरस्कार प्राप्त झाला. हा एक प्रकारे गांधीजींचाच सन्मान आहे.

शुराची अहिंसा-
मी समोरच्यवर हात ही उचलणार नाही , पळून ही जाणार नाही आणि समोरच्या बद्दल वैरभाव ही मनात आणणार नाही. किती मोठी गोष्ट आहे ही.
गांधीजींची अहिंसा ही शुराची अहिंसा होती
एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा हे गांधीजी इंग्रजांबाबत बोलले नव्हते तर हरीजनांबाबत बोलले होते.दंगल झाल्यावर जेव्हा सवर्णांनी हरीजनांवर अन्याय केला तेव्हा गांधींनी हे उद्गार काढले होते त्यांचे पूर्ण वाक्य असे होते 'एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे केला आणि त्याच्यावर जरी मारले तरी आपण हरीजनांवर जो अत्याचार केला आहे त्या पापाचे परिमार्जन होणार नाही.कश्मीरमध्ये दंगली चालू होत्या पाकिस्तान घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा नेहरूंनी गांधीजींना विचारले होते की आत्ता अहिंसेचे कसे करायचे त्यावर गांधींनी उत्तर दिले होते की मी जर तुमच्या जागी असतो तर सैन्याचा वापर केला असता आणि पाकिस्तानच्या घुसखोरीला चोख प्रत्युत्तर दिले असते.पत्रीसारकारचे मुख्य क्रातीसिंह नाना पाटील जेव्हा महात्मा गांधींना भेटले त्यांना आपल्या ‘पत्रीसरकार’बद्दल सांगितले. त्यावर गांधीजी म्हणाले होते, की ‘नाना पाटील, तुमची चळवळ माझ्या तत्त्वात बसते न बसते यापेक्षा तुम्ही १९४२ ची स्वातंत्र्य चळवळ जिवंत ठेवली, सातार्याने या चळवळीचे नाव राखले हे महत्त्वाचे होय ! नाना, तुम्ही बहादूर आहात. भ्याडाच्या अहिंसेपेक्षा शुराची हिंसा परवडेल असे मानणारा मी आहे.  

यांत्रिकीकरण आणि गांधी –

गांधीजींनी यांत्रिकीकरणाला विरोध केला असा काहीसा गैरसमज पसरवला जातो तर ते असे काहीही नाही. उलट गांधीजीनी  चरखा असो किंवा इतर काहीही त्याच्या आधुनिकीकरणाला त्यांनी प्रोत्साहनच दिले होते. त्यांचा विरोध होता तो यांत्रिकीकरणाच्या अतिरेकामुळे होणाऱ्या बेकारीला, जे हजारो लोकांचे काम एका यंत्राकडे देऊन त्यांना बेरोजगार करू शकते, अतिवापराला जे लोकांची कष्ट करण्याची क्षमता संपवून त्यांना आळशी व आजारी बनवते. गांधीजींनी त्या काळात तेव्हाची अत्याधुनिक समजली जाणारी बहुतेक साधने वापरली होती. त्यांच्या फोनचे बिलच तेव्हाच्या व्हाईसरॉयच्या फोन बिलापेक्षा कितीतरी पटीने जास्त असायचे.

आज कामगारांनी मागण्यांसाठी संप केला की उद्योजक यंत्रमानव उपयोगात आणायचे म्हणतात. काही ठिकाणी अपघात होऊन यंत्रमानवांनीच कामगारांचे जीव घेतले आहेत. हा यांत्रिकीकरणाचा अतिरेक नाही का?

आईनस्टाईन हेच वेगळ्या शब्दात सांगतो 
"I fear the day when the technology overlaps with our humanity. The world will only have a generation of idiots."
जेव्हा तंत्रज्ञान  माणूसकीवर जड होते तेव्हा या जगात फक्त मूर्खांची पिढी राहील.

खेड्यांकडे चला गांधी –

गांधीजींनी जो खेड्याकडे जाण्याचा आणि स्वयंपूर्ण खेडी बनवण्याचा संदेश दिला होता तो आज सर्वाधिक महत्वाचा आहे. खेड्यातील गरज खेड्यातच भागली पाहिजे अशाप्रकारे गावाचे व्यवस्थापन व्हावे. मुंबईसारखी अनेक शहरे आज पर्यावरण व सर्वच दृष्टीने धोक्याची आहेत. पण गावात रोजगार नसल्यामुळे तेथील तरुण शहरांकडे विस्थापित होत आहेत. आपल्याला दररोज लागणारी हत्यारे आणि उपकरणे आपल्याच गावात बनावीत असे स्वयंपूर्ण खेड्याचे चित्र हवे. गांधीजींची स्वदेशीची संकल्पना आपण अंमलात आणली तर चीनी माल भारतात येणारच नाही. आज चीनी मालावर बहिष्कार टाकतांना गांधीजींचा स्वदेशीचा मंत्र सोयीस्करपणे विसरला जातो.वारणासारखी अनेक स्वयंपूर्ण खेडी याची उदाहरणे आहेत ज्यांनी तेथील लोकांना तेथेच रोजगार मिळवून देऊन गांधीजींच्या स्वयंपूर्ण खेड्याची संकल्पना अमलात आणली आहे. 

गांधीजी -जात आणि धर्म
गांधीजींनी कोणत्याही जातिचे वा धर्माचे अतिरेकी समर्थन केले नाही म्हणून सर्व जातीतील कट्टरवादी लोक त्यांचा द्वेष करतात  

एका जातीतील कट्टर लोकांना  पुणे करारामुळे गांधीजी ब्राम्हणधार्जिणे आणि दलितद्वेष्टे (मनुवादी) वाटतात

कट्टर उच्चवर्णीयांना गांधी ब्राम्हणद्वेष्टे दलित धार्जिणे वाटतात कारण जिथे एका जातीचे वर्चस्व होते अशी सर्व ठिकाणे राजकारण, समाजकारण व इतर अनेक  गांधीजींनी अस्पृश्यता निवारण चळवळीद्वारे  सर्व जातीसाठी खुली केली जिथे त्यापूर्वी फक्त उच्चवर्णीयांचे वर्चस्व होते.

पाकिस्तानमधील काही कट्टर मुस्लिमांनाही आम्हाला छोटा पाकिस्तान दिला,काश्मीर दिला नाही वगैरे कारणावरून  गांधी मुस्लिमद्वेष्टे व हिंदुधार्जिणे वाटतात

त्यामुळे गांधीजींच्या मागे त्यांचा उदो उदो वा देव करणारी कोणताही जातसमूह नाही. जेवढी टिंगल गांधीजींची उडवली जाते त्याच्या एक टक्का जरी इतर कोणत्या महापुरुषांची झाली असती तर दंगली झाल्या असत्या, पण हेच गांधीजींचे वैशिष्ट्य आहे कुठल्याही जातीचा , धर्माचा, पंथाचा आधार न घेता ते जगभर पोहचले या उलट इतर जातींच्या महापुरुषांना त्यांच्याच जातीच्या लोकांनी स्वतःपुरते संकुचित करून ठेवले.
कुठल्याही महापुरुषाचे गुणगान करताना किंवा चरित्र लिहितांना गांधीजींना कमी लेखावेच लागते त्याशिवाय यांचा महापुरुष मोठा होत नाही.याउलट गांधीजीनी स्वतःच्या चरित्रात इतर कुणाही महापुरुषाला कमी लेखण्यापेक्षा स्वतःलाच कमी लेखले आहे 

समाजस्वास्थ्य –

ती जागतिक पातळी असो व देश पातळी व ग्रामीण भाग जात, धर्म, प्रांत, वर्ग अश्या अनेक भेदांत समाज विभागला जात असून प्रत्येक ठिकाणी लोकांचा एकमेकांप्रती द्वेष, इर्षा आणि हेवेदावे वाढत आहेत. व्यक्तिगत पातळीवरील धार्मिक स्वातंत्र्याचा आदर गांधीजींना अपेक्षित होता. एक हिंदू म्हणून त्यांना वर्णव्यवस्था ही श्रमविभागणी करणारी समाजव्यवस्था म्हणून पूर्वायुष्यात त्यांना मान्य होती. परंतु ही व्यवस्था श्रमांचीच विभागणी न करता श्रमिकांची सुद्धा विभागणी करते हे आंबेडकरांचे म्हणणे त्यांना पटल्यावर त्यांनी उत्तरायुष्यात ही चातुर्वर्ण्य व्यवस्था अमान्य करीत तिचे उच्चाटन करण्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले. धर्म, जाती, लिंग, प्रदेश, वर्ण यापलीकडे जाऊन प्रेम, बंधुभाव आणि समतेची तत्त्वे आचरणात आणावीत हा गांधीजींचा संदेश अमलात आणला तर अनेक गोष्टी सोप्या होऊ शकतात. समाजातील तंटे बखेडे, कोर्टातील कज्जे वाद कमी होऊ शकतात. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वाया जाणारे मनुष्यबळ, वेळ आणि पैसा वाचू शकतो. हेच मनुष्यबळ, वेळ, पैसा मानवाच्या सुखासाठी विधायक कामे करण्यात वापरता येतील.

पर्यावरण –

Be The Change , you wish to see in the World"

"जो बदल तुम्हाला जगात पहायचा आहे तो बदल आधी स्वतः मध्ये घडवा" हे गांधीजींच्या सर्व शिकवणीतले सार आहे. यांत्रिकीकरणामुळे आपल्या जीवनात सोयी आणि सुखे आलीही असतील आणि आलीही आहेत. परंतु आपण निसर्गापासून दूर जाणारे हे कृत्रिम जीवन जगत आहोत ज्यात आपण निसर्ग ओरबाडून घेत आहोत. त्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडून मानवासमोर स्वतःच्या अस्तित्वाच्याच समस्या उभ्या राहिल्या आहेत. 

There is enough on Earth for everybody's need, but not enough for everybody's greed.- M.K.Gandhi

पृथ्वीकडे सर्वांची गरज भागवण्याएवढे आहे पण सर्वांची हाव भागवू शकेल एवढे नाही.

गांधीजींच्या कुटीवर एकदा एक तरुण कार्यकर्ता येऊन बसला. त्याने कुटीबाहेर ठेवलेल्या माठातून पेलाभर पाणी घेतले आणि अर्धा पेला पाणी पिऊन उरलेले पाणी तेथील एका रोपावर ओतले. जेव्हा त्याची भेटीची वेळ आली तेव्हा गांधींनी त्याला त्याचे वय विचारले. त्याचे वय खूपच कमी होते म्हणून त्याला कदाचित गांधीजी हरकत घेतील असे त्याला वाटले म्हणून तो म्हटला की माझे वय कमी आहे तरी मी कार्यकर्ता म्हणून चांगले काम करू शकेन. गांधी म्हटले, नाही, फक्त वय सांगा. त्यांनी २०-२२ असे काही तरी सांगितले. गांधी म्हणाले तुम्ही २० वर्षे पाणी पीत आहात तरी तुम्हाला एका वेळी गरज किती पाणी लागते याचा अंदाज आला नाही.

*आरोग्य*

नागरी जीवन विकसित होण्याअगोदरच माणूस अन्नावर प्रक्रिया करायला शिकला होता. इतर प्राणी निसर्गात त्यांचे अन्न ज्या स्वरुपात उपलब्ध असेल त्याच स्वरुपात ग्रहण करतात. मात्र माणूस हाच एकमात्र असा प्राणी आहे की जो अन्नावर अनेक प्रक्रिया करून खातो. त्यामुळे त्याची जीभ भ्रष्ट होते. कोणत्याही प्राण्यास भूक नसतांना, अजीर्ण झाले असता, स्वस्थ नसतांना अशा अवस्थांत अन्न ग्रहण करण्याची इच्छा होत नाही. परंतु जीभ भ्रष्ट झाल्यामुळेच माणूस मात्र अशा अवस्थांतही अन्न ग्रहण करतो. जास्तीत जास्त चविष्ट बनविण्यासाठी अन्नावर जास्तीत जास्त प्रक्रिया केल्या जातात. ते टाळण्यासाठी त्यांनी नियम केला की भोजन बनवितांना तेल, मीठ, मिरची आदि पाच पेक्षा अधिक पदार्थ वापरायचे नाहीत. नैसर्गिक आहाराने व योग्य विहाराने गमावलेले आरोग्य प्राप्त करता यावे यासाठी त्यांनी पुण्याजवळील उरुळी कांचन येथे निसर्गोपचार केंद्र सुरु केले.

गेल्या काही दशकात जागतिक खाद्य संस्कृती खूपच बदलली असल्याचे दिसते. त्यामुळे एकीकडे अन्न वाया जाते तर दुसरीकडे मोठी लोकसंख्या भूकबळी आणि कुपोषणाची बळी ठरते. गांधीजींनी आहारप्रणालीबाबत मांडलेली मते जरी प्राथमिक स्वरुपाची असली तरी त्यावरच पुढे बरेच संशोधन होऊन योग्य प्रणालीने स्वास्थ्य टिकवता तर येतेच परंतु कन्सर सारख्या अनेक व्याधी सुद्धा बऱ्या होऊ शकतात असे सिद्ध झाले आहे.

स्त्रियांचे सक्षमीकरण

जीवनाच्या ज्या ज्या क्षेत्रात पुरुष कार्य करतात त्या त्या क्षेत्रात स्त्रिया कार्य करू शकतात; स्त्रियांना कार्य करता आले पाहिजे आणि स्त्रियांनी कार्य केले पाहिजे हा गांधीजींचा आग्रह होता. त्यामुळेच त्यांनी स्त्रियांसाठी खास असे काही कार्यक्रम राबवले नसले तरी त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांची योजनाच अशी असायची की त्यात स्त्रियांचा सहभाग आवश्यक असे. एकदा बिहारमध्ये त्यांना एका कार्यक्रमासाठी निमंत्रित केले असता त्यांनी अट घातली की कार्यक्रमात स्त्रिया आणि पुरुषांची संख्या बरोबरीने असली पाहिजे. स्त्रियांच्या सहभागाशिवाय, त्यांच्या विकासाशिवाय समाजाचा विकास अपूर्ण आहे असे गांधीजींचे मत होते.

शिक्षण- 
आजकाल सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या वाढतच चालली आहे.वाचनासोबतच कौशल्यपूर्ण शिक्षणाच्या अभावामुळे हे घडते आहे.गांधीजींच्या नयी तालीम या शिक्षण पद्धतीत शिकलेले विद्यार्थी शिक्षण आणि कौशल्य दोन्ही दृष्टीने परिपूर्ण असत.

सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, स्वदेशी, सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव आणि अशी अनेक मूल्ये सनातन असून ती परस्परसंबंधी आहेत व प्राचीन काळापासून ऋषीमुनींनी प्रतिपादित केली आहेत. याच मूल्यांनी समाजाची धारणा आणि व्यक्ती विकास होऊ शकतो. आणि गांधीजी हे असे अर्वाचीन काळातील महात्मा आहेत ज्यांनी व्यक्तिच्या व सामाजिक जीवनात या मूल्यांची प्रतिष्ठापना करण्याचा प्रयत्न केला.  या मूल्यांची प्रतिष्ठापना झाली तर माणूस बदलेल. माणूस बदलला तर समाज बदलू शकतो. माणूस बदलण्यावर गांधीजींचा विश्वास होता.

गांधींजीबद्दलच्या अफवा- 
५५ कोटी, फाळणी, भगतसिंगची फाशी अश्या अनेक गोष्टींना गांधींना जबाबदार धरले जाते पण ते सत्य नाही.शब्दमर्यादेमुळे ते येथे मांडत नाही तरुणांनी स्वतः याचा अभ्यास करून मग यावर मत बनवायला हवे

शेवटी बाबा आमटेंच्या मुक्तछंदातील हे शब्द सांगून विराम घेतो
त्याने प्रथम एका मिठाच्या पुडीला हात घातला आणि मग एक साम्राज्य 
मिठाच्या सात समुद्र पलीकडे फेकून दिले.त्याने सुतातून सुरुवात केली
आणि अखेर स्वराज्याचा स्वर्ग गाठून दाखवला. याच साध्या सुताने त्याने एक पिढीच्या पिढी आणि एक देशच्या देश बांधून दाखवला.
पण एक देशच्या देश आणि एक पिढीच्या पिढी पकडण्यासाठी 
नुसतीच हिकमत पुरी पडत नाही
त्यासाठी ताकदही लागते
भारी वजनाचा एक क्रूस वाहण्याची ताकद!"
"ज्याला तो क्रूस वागवता येतो 
त्याच्या सोबत बारा अनुयायी असले 
तरी त्याचे प्रेषितत्व घाबरत नाही.
पण खांद्यावर क्रूस नसता कुणी बारा लाख बाजारबुणगे घेवून निघाला 
तरी त्याचा महंत होतो.
आणि महंत फक्त गादी चालवू शकतात.
मन्वंतरे घडवून आणू शकत नाहीत

तर गांधी विचार आज , उद्या आणि सदा सर्वकाळ Relevant आहेत.

संकेत मुनोत
८०८७४४६३४६
Knowing Gandhism Global Friends
changalevichar1@gmail.com

No comments:

Post a Comment