अनेक वर्षांपासून ओळखत होतो पण काल अधिक परिचय घेता आला .सर चळवळीत काम करणाऱ्या विविध लोकांच्या बद्दल फेसबुकवर नियमित लिहीत असतात.
आपल्या जवळपास विविध प्रेरणादायी लोक असतात पण आपण त्यांच्याबद्दल माहिती प्रसारित न केल्याने भिडे सारखे विकृत लोक सामान्य लोकांसाठी आदर्श बनतात. कारण त्यांच्या बद्दल 90 बैठका, 100 जोर, PHD in automatic science इ सारखे अतिरंजीत खोटे लेख नियमित फॉरवर्ड होत असतात तर चवळीतील लोक एकमेकांवर टीका करतात पण चांगले लिहीत नाहीत .
तर उपेंद्र सरांच्या बद्दल जाणून घेऊया
उपेंद्र सरांचे आई वडील राष्ट्र सेवा दलाच्या विचारांचे कार्यकर्ते होते. त्यामुळे लहानपणापासूनच ते त्याच्याशी जोडले गेले आणि शिबिरातून घडत गेले.सरांचे वडील यांनी बीए शिक्षण घेतले आणि शिक्षक झाले. त्यानंतर वकिलीचे शिक्षण घेऊन वकील झाले आणि काही वर्ष वकिली करून न्यायाधीशाची परीक्षा देऊन न्यायाधीश झाले. सरांच्या आई सुरुवातीला शिक्षिका होत्या पण पती न्यायाधीश झाल्यावर दर काही वर्षांनी बदली होत असल्याने त्यांनी शिक्षिकेची नोकरी सोडली.
1984 साली राष्ट्र सेवा दलाने छात्र भारती ही विद्यार्थी संघटना सुरू केली. त्यात उपेंद्र सर सक्रिय सहभागी झाले आणि महाराष्ट्राचा संघटक म्हणूनही त्यांनी काम केले.
बीएससीची परीक्षा दिल्यावर त्यांनी वडील आणि भावाच्या इच्छेनुसार सहज म्हणून मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह च्या नोकरीसाठी मुलाखत दिली. ज्यात त्यांचे सिलेक्शन झाले आणि तीन वर्ष त्यांनी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कार्य केले.
1989 मध्ये राष्ट्रसेवा दलाच्या क्षीरसागर कुटुंबातील पुष्पाशी त्यांनी ठरवून आंतरजातीय विवाह केला. त्यांची विवाहाची कथा सुद्धा प्रेरणादायी आहे. छात्र भारतीचे कार्यकर्ते पंढरपूरला गेले तेव्हा पुष्पाताईंचे वडील सेवा दलाचे कार्यकर्ते असल्याने त्यांच्या घरी उतरले होते. त्यानंतर टीम पुढच्या गावी गेल्यावर पुष्पा ताईंनी "हा मुलगा कोण होता?" त्याची चौकशी केली आणि त्यांच्या घरातून यदुनाथ थत्तेजींना याबाबत विचारणा झाली. त्यानंतर संजय पवार हे पन्नालाल सुराणा यांच्याशी बोलले आणि सुराणा यांनी उपेंद्र सरांच्या विवाहाबद्दल पत्र क्षीरसागर कुटुंबासाठी लिहिले. हे लग्न घडविण्यात पुष्पाताईंचा भाऊ व उपेंद्र सरांचा मित्र सुनील क्षीरसागर यांचा मोठा वाटा होता.
त्यानंतर पुण्यात साने गुरुजी स्मारक येथे त्यांचे नोंदणी पद्धतीने लग्न झाले. लग्नानंतर कुटुंबाच्या अर्थार्जनाची संपूर्ण जबाबदारी पुष्पाताईंनी घेतली, ज्या त्या आजही सार्थपणे निभवत आहेत.
1993 मध्ये लातूर उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या प्रलयंकारी भूकंपानंतर मदत कार्यात सहभागी होण्यासाठी छात्र भारतीच्या सहकाऱ्यांसह किल्लारी येथे गेले. त्याच दरम्यान मानवलोक संस्थेच्या डॉ. द्वारकादासजी लोहिया यांनी उमरगा तालुक्यातील सालेगाव येथे कायमस्वरूपी भूकंप पुनर्वसनासाठी उपकेंद्र सुरू केले. त्यांनी उपेंद्र सरांना "यासाठी निदान 5 वर्षे देणार का?" असे विचारले? ज्याला होकार दिल्यावर लोहियांनी त्यांना उपकेंद्राच्या प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. या कामात पुष्पाताईंनी सुद्धा मोठा सहभाग घेतला.
शेतकरी केंद्रस्थानी मानून त्यांच्यासाठी उसनवार खत बियाणे, विहिरींच्या गाळ काढणे, नवीन सामुदायिक विहिरी खोदणे, पाणलोट क्षेत्र विकास त्याचसोबत महिलांचे संघटन, आरोग्य असे अनेक उपक्रम त्यात होते. पाच वर्षानंतर लोहियांनी संस्थेच्या विकेंद्रीकरणाची संकल्पना मांडली. ज्याला प्रतिसाद देत उपेंद्र सरांनी छात्र भारतीच्या साथींसह 1999 साली विकास भारती पुणे ही संस्था काळनिबाळा येथे सुरू केली. याच दरम्यान पुष्पाताई कलदेव निबाळा येथे शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या. उपेंद्र सर आणि पुष्पाताई दोघेही येथे बचत गट, आरोग्य, शेतीपूरक व्यवसाय प्रशिक्षण त्यात रेशीम उद्योग, आळंबी उत्पादन अशा विविध विषयांवर काम केले.
पुढे 2008 मध्ये मुलीच्या शिक्षणासाठी सोलापूर येथे शिफ्ट झाले. पुष्पाताई सोलापूर वरून काळनिंबाळ येथे शाळेसाठी ये जा करत होत्या.
यानंतर सोलापूर येथून एक वर्ष साप्ताहिक प्रजापत्राचे कार्यकारी संपादक म्हणून कार्य केले आणि त्यानंतर राष्ट्रसेवा दलाच्या कामात पुन्हा सक्रिय झाले.
मुलीची १० वी झाल्यावर तिने पुढील शिक्षण पुणे येथे घ्यायची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार तिच्यासह उपेंद्र सर पुण्यास शिफ्ट झाले.
दरम्यान राष्ट्रसेवा दलाचे महामंत्री म्हणून त्यांनी दोन वर्षे काम केले.
2021 पासून उपेंद्र सर एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशन मध्ये सहसचिव म्हणून कार्य करत आहेत.
"जीवनसाथी पुष्पाची आश्वासक व समर्थ साथ असल्यामुळेच मी सातत्याने काम करू शकतो" असे उपेंद्र सर सांगतात. विशेष म्हणजे सरांची मुलगी सानिया ही पण आता इंजिनियर म्हणून स्वतःच्या पायावर उभी आहे. तिचे नावही सानिया पुष्पा उपेंद्र असे असून तिने आडनाव लावलेले नाही. मागच्याच वर्षी पासपोर्ट घेताना पोलिसांनी तिला "असे कसे नाव? आणि आडनाव कुठे आह?" हे विचारले तेव्हा तिने पोलिसांना चांगल्या प्रकारे समजावून सांगितले की आडनाव लावणे हे कसे पुरुषसत्ताक व्यवस्थेचे लक्षण आहे ज्याला पोलिस सुद्धा सहमत झाले.
एखादी व्यक्ती गेली की आपण त्या व्यक्तीबद्दल भरभरून लिहितो आणि हळहळ व्यक्त करतो. पण जिवंतपणीच त्या व्यक्तींचे काम जाणून घेऊन त्यातून प्रेरणा घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे या गोष्टी व्हायला हव्यात म्हणून हा लेख प्रपंच.
(विशेष म्हणजे आर्थिक नियोजन करण्याच्या निमित्ताने आमची भेट झाली. ज्यात आर्थिक नियोजना बद्दल अनेक गोष्टी सरांनी माझ्या कडून समजून घेतल्या पण आर्थिक नियोजन सल्लागार सोबत मी एक सामाजिक कार्यकर्ताही असल्याने मला हे लिहणे ही महत्वाचे वाटले..)
संकेत मुनोत
16 डिसेंबर 2023Comment, Share ,Follow and Subscribe.
No comments:
Post a Comment