AddThis code

Sunday, January 20, 2019

आर्थिक नियोजन नक्की कसे करावे?

*आर्थिक नियोजन नक्की कसे करावे?*/How to do Financial Planning ⏰💰🚗🏘🏥🏤🎬🎲
आर्थिक नियोजनाची सुरुवात केव्हा करावी?
2019 वर्ष सुरू झाले तेव्हा अनेकांना ठरवले असेल यावर्षी तरी आपण अशी अशी सेविंग करूया पण गेले काही दिवस नियोजन करून परत बे एके बे होऊ शकते
मित्रांनो आपण *शैक्षणिक साक्षर* होतो परंतु *आर्थिक साक्षर* होत नाही. *गणिताची आकडेमोड* येणे म्हणजे *आर्थिक साक्षरता* नक्कीच नाही. आर्थिक साक्षरतेचं पहिलं पाऊल म्हणजे *बचतीची सवय*.

बचती बरोबर पहिली कमाई सुयोग्य रित्या कशी वापरावी इथून आर्थिक नियोजनाची यशस्वीतां सुरु होते.

तर आपले  वय कितीही असुदे या क्षणा पासून या नियोजनाला सुरुवात करा. 
सर्व हिशोब लिहून ठेवा ,एका सध्या वहिवर वा कॉम्प्युटर वर एक्सेल मध्ये ही तुम्ही हे करू शकता हे खूप महत्वाचे आहे.

*सुयोग्य आर्थिक नियोजन* (Perfect Financial planning) कसे करावे?

१. आर्थिक नियोजनाचा पहिला टप्पा म्हणजे आपल्या *मासिक उत्पन्नाची योग्य विभागणी.*

आपल्या महिन्याच्या एकूण कमाई पैकी जास्तीजास्त ३०%च रक्कम ही घरखर्चासाठी वापरली गेली पाहिजे. यामध्ये किराणा सामान, गॅस सिलेंडर, विजेचे बिल, फोनचे बिल, दुधाचे बिल, रोजच्या भाजीचे खर्च इत्यादी बाबी येतील.

३०% रक्कम ही बँक कर्ज, देणी ईत्यादि साठी वापरावीत. मुळात उत्पन्नाच्या ३०% रक्कम एवढाच हप्ता येईल एवढेच ज्यास्तीत ज्यास्त कर्ज घ्यावे यापेक्षा ज्यास्त कधीच घेऊ नये. कर्ज हे अत्यंत गरज असल्यास घ्यावे. सणवार, यात्रा, जत्रा साजरे करण्यासाठी, खोटा मोठेपणा मिरवण्यासाठी कधीच कर्ज घेऊ नये. आपले नुकसान झाल्यास समाजातील कोणीही व्यक्ती भरून देऊ शकत नाही. 

३०% रक्कम ही भविष्य नियोजनासाठी बचत केली पाहिजे. आर्थिक नियोजनाचा अतिशय महत्वाचा भाग. थेंबे थेंबे तळे साचे आपण लहान वयापासून ऐकत आलो आहोत. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी फक्त बचत महत्वाची नसते तर केलेल्या बचतीचा उपयोग आर्थिक साधना मध्ये रूपांतरित करून त्या पासून पैश्यांनी पैसे कमावणे हे तंत्र आत्मसात करावयास हवे. आजारपण आणि मृत्यू हा कधीही सांगून न येणारा आणि टाळता न येणारा योग. या दोन्ही गोष्टींसाठी कायमस्वरूपी खात्रीशीर आर्थिक नियोजन करणारा व्यक्तीच आयुष्याचा मनसोक्त आनंद उपभोगू शकतो. 

उरलेले फक्त १०% रक्कम ही आपल्या मनोरंजनासाठी वापरली जायला हवी. आयुष्य कामास जुंपलेल्या बैलासारखे कधीच नसावे. हौस मौज आणि मनोरंजन हे अत्यंत आवश्यक आहे. परंतु यासाठी कितीही पैसे खर्च करणे महागात पडते. नियोजित रक्कमेतच मनोरंजनाची सवय आयुष्य समृद्ध करण्यास मदत करते. 

२. *टर्म इन्शुरन्स - आपल्यानंतर कुटुंबाचा मोठा आधार. *

टर्म इन्शुरन्स हे एकमेव आर्थिक साधन तुमच्या कुटुंबाला मोठे आर्थिक संरक्षण देते. टर्म इन्शुरन्स चा हप्ता कमी असतो आणि तो कुटुंबास आपल्या मृत्यू पश्चात मोठी रक्कम देतो. तुलनेने इतर कोणताही इन्शुरन्स प्लॅन टर्म इन्शुरन्स पेक्षा मोठी रक्कम मृत्यू पश्चात देत नाही.त्यामुळे टर्म इन्शुरन्स काढावाच तोही चांगल्या कंपनीचा.
साधारण आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या अंदाजे दहा पट कव्हर असावा. म्हणजे समजा ३० वर्ष वयाची व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न ३ लाख आहे तर जीवन विमा ३० लाखाचा असावा. त्यासाठी त्याला वार्षिक फक्त ६ हजार रुपयांचा कायम स्वरूपी प्रीमियम भरावा लागतो.
जीवन विमा घेताना कमी वयात असताना घेतला गेला पाहिजे जेणे करून वार्षिक प्रीमियम कमी भरावा लागतो. ज्या कंपनीचा विमा घेताय त्याचा क्‍लेम सेटलमेंट Ratio जास्त असेल असाच बघून घ्यावा. दारू किंवा सिगारेट घेत असाल/ नसाल तर खरी माहिती दिली पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे योजनेसाठी वारसदार (Nominee) ठरवलेला असला पाहिजे. विमा कितीही रकमेचा घेता येतो. ह्या संदर्भातील माहिती ऑनलाइन उपलब्ध आहे.

३. *मेडीक्लेम - अचानक उद्भवणाऱ्या मेडिकल आपत्तीचा साथी.*

मेडिकल आपत्ती म्हणजेच अपघात,साथीचे रोग डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, तसेच इतर गंभीर आजार सांगून येत नाहीत. या आजारांमध्ये हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होणे हे ठरलेलेच. कमीत कमी ५००० रुपये ते लाखो रुपयां पर्यंतचा खर्च अशावेळी होतोच. आपण कितीही तंदुरुस्त असलो तरी अपघात आणि आजार न होण्याची खात्री देता येत नाही. त्याचबरोबर कुटुंबामध्ये कोनावरही हि वेळ येऊ शकते. अशाप्रसंगी मोठ्या कष्टाने केलेल्या बचतीचे पैसे वापरने, कमी पडल्यास कर्जाऊ घेणे, सोनंनाणं मोडणे, जमीन विकणे, प्रसंगी राहते घर विकणे या पेक्षा मेडीक्लेम घेणे कधीही फायद्याचे असते.तो कसा निवडावा याबाबत पूर्वीचा लेख वाचावा.

४. *कमीतकमी पुढील ६ महिन्यांचा घर-ऑफिस खर्चाची तरतूद* अगोदरच असायला हवी, जेणेकरून नोकरी गेली, किंवा व्यवसायात मंदि आली तरी ही त्यावर ६ महिने पुढील सोय होईतो पर्यंत  आपले खर्च चालतील.

५. *सेकंड होम* ही गुंतवणूक नाही, सर्व्हे असे दर्शवतो को सेकंड होम हे एकूण व्याज आणि खर्च, आणि वाढती महागाई वगळून जास्तीजास्त ५% फायदा करून देऊ शकते.

६. *४५ वयानंतर कुठली ही देणी, कर्जे आपल्या अंगावर असू नयेत*. मुलांचे उच्चशिक्षण, लग्न ही या काळात होतात त्याची प्लॅनिंग आपल्या ३० वयापासूनच व्हायला हवेत.(लग्न साध्या पद्धतीने करावीत)

७. *कुठलेही गुंतवणुकीचे चे निर्णय हे भावनिक दृष्टिकोनातून घेऊ नये.* फसव्या ज्यास्त परतावा देणाऱ्या गुंतवणुकीच्या योजनांपासून दूर रहावे. एका रात्रीत कोणीही करोडपती होऊ शकत नाही. १०,००० रुपये कमावणारा व्यक्ती योग्य आर्थिक नियोजन करून त्याचे तंतोतंत पालन करून मात्र सहज करोडपती होऊ शकतो.
    गुंतवणूक करताना सर्वप्रथम योजनेची संपूर्ण माहिती घ्यावी. संभाव्य धोके किती आहेत हे पाहावे.  उगाच नातेवाईक, मित्र यांनी सांगितले म्हणून कोणत्याही ठिकाणी पैसे गुंतवू नका.

८. *क्रेडिट कार्ड वापरताना सावध रहा, त्याचे पैसे वेळच्या वेळी भरा नाही भरले तर व्याज अधिक द्यावे लागते, शिवाय ज्यांचे सॅलरी अकाउंट असते त्यांच्यासाठी काही बँका करंट अकाउंट ही देतात ज्यातुन अधिक रक्कम आपणास काढता येते पण त्याचा मेसेज येत नाही शिवाय त्या रकमेला व्याज ही पडते त्यामुळे तिथे ही लक्ष द्या

९. *एकाच वेळी एकाच ठिकाणी मोठी गुंतवणूक कधीही करू नका*. टप्याटप्याने वेगवेगळ्या ठिकाणी केलेली गुंतवणूक कधीही उत्तम. एस आय पी हा छान गुंतवणुकीचा पर्याय आहे, परंतु तेथे देखील संपूर्ण माहिती घेण्याची काळजी निश्चित घ्या.

१०.पैश्यावरून कुणाला कमी लेखू नका, पैसा आज आहे उद्या नसेल ही पण चांगली माणसे जोडून ठेवा

११. कधीही *एकाच उत्पन्नाच्या मार्गावर अवलंबून* राहू नये. उत्पन्नास सुरुवात केल्यानंतर बचतीचा वापर उत्पन्नाचे मार्ग वाढवण्यात करावा. आपण प्रत्यक्ष मेहनत न करता गुंतवणुकीचा लाभ खात्रीने कमी ज्यास्त प्रमाणात मिळेल असे उत्पन्नाचे मार्ग निवडावेत. हेच मार्ग रिटायर्ड आयुष्य जगताना मोठा आधार देतात तसेच आपल्या मुलांना शून्यातून सुरुवात करावी लागत नाही.

१२. *सर्व आर्थिक व्यवहार कायदेशीर चेक, ए टी एम ट्रान्सफर, डी डी, अकाउंट ट्रान्सफर याच मार्गाने करावेत.रोखीने व्यवहार करणे शक्यतो टाळावे.*

१३. *मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी आणि आपल्या रिटायरमेंट साठी खात्रीशीर रिटर्न असणाऱ्या तरतुदीवरच भर द्या.* 

१४. *जर बँकेत चोरी, किंवा आग लागल्यास आपल्या बँकेतील लॉकर वर फक्त १ लाख रुपये पर्यन्त रक्कम बँक रिटर्न म्हणून देऊ शकते, उरलेले नुकसान आपले असते.*

१५. तुम्ही *टॅक्स रिटर्न* फाईल करणे टाळू नाही शकत, पण योग्य गुंतवणूक करून टॅक्स कमी करू शकता, तुमचे इनकम जास्त असो वा कमी असो, टॅक्स फाईल केल्यास भविष्यात खूप फायदे होतात, सर्वात मोठा फायदा म्हणजे कर्ज, हेंच तुम्हाला व्यवसायात पुढे नेऊ शकते.

१६. *सर्व आर्थिक कागदपत्रे ही व्यवस्थित ठेवा, याची माहिती आपल्या कुटुंबाला देऊन ठेवा. जेणेकरून तुमच्या अनुपस्थितीत किंवा तुमच्या संकटात तुमचे कुटुंब ते योग्यप्रकारे वापरु शकतील.

१७. आपला *प्रोग्रेस ग्राफ* दर सहा महिन्यांनी चेक करा. कारण त्या ग्राफ प्रमाणे आपली गुंतवणूक, आणि व्यवसायांतील निर्णय बदलता येतात.

१८. आपला अकौंटंट फक्त वर्षाची टॅक्स फाईल करणारा असल्यापेक्षा योग्य कन्सल्टंट असेल याची खात्री करा नाहीतर लगेच बदला, कारण योग्य गुंतवणुकीचा मार्ग हा योग्य सल्लागारच सुचवितो.

१९. *बचतीचे तंत्र* जाणून घ्या. प्रत्येक गोष्टींमध्ये बचतीस महत्व द्या. याचा अर्थ कंजूषपणा करा असा नाही.मात्र एखाद्या गोष्टीची आपणास खरेच गरज आहे काय यास महत्व द्या. श्यक्यतो खर्च वाढवणाऱ्या गोष्टी गरज असेल तरच खरेदी कराव्यात.

२०. *कुटुंबातील सर्व सदस्यांना आर्थिक साक्षर करा.* सर्व सदस्य आर्थिक साक्षर झाल्यास आपला फायदा कित्येक पटींनी वाढवता येईल.

२१.  *सोने/चांदी यांतील गुंतवणूक* एकूण गुंतवणुकीच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही, असे पहावे.

२२. *आपले मृत्युपत्र* करून ठेवावे. यामुळे आपल्या पश्चात संपतीवरून होणारे वादविवाद टाळले जाऊ शकतात.

23. नवीन कौशल्ये
स्वतःला सतत डेव्हलप करत राहा नवीन ज्ञान आणि कौशल्य घेत रहा त्यासाठी पैसा खर्च करायला मागेपुढे पाहू नका

24.सामजिक बांधिलकी व बंधुता जपण्यासाठी ही थोडा खर्च करा, कारण देश टिकला तर तुम्ही टिकाल, तेथे जर अस्वस्थता, असहिष्णुता असली तर त्याचा परिणाम रोजगार व सर्वच बाबीवर होतो

25.समाधानी रहा
अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांच्याकडे खूप कमी आर्थिक क्षमता असतांना ते सुखी आहेत जसे कि धीरेन सोनेजी, अभय बंग आणि बरीच मंडळी यांची चरित्रे वाचा विडिओ पहा प्रेरणा मिळेल.

26.मानसिक आणि शारीरिक आरोग्य
मिळणाऱ्या पैश्यासोबतच स्वतःचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपा ते खूप महत्वाचे आहे रोज थोडा वेळ शारीरिक व्यायाम आणि ध्यान इ साठी द्या

27.कुणाला कमी लेखण्यासाठी वा शत्रूता दाखवण्यासाठी पैसा खर्च करू नका तोच पैसा स्वतःला अधिक प्रगत करण्यासाठी वापरा
कधी कधी आयुष्यात असे प्रसंग येतात की समोरचा व्यक्ती आपल्याकडे कुत्सित नजरेने बघू लागतो आपला अपमान करतो तेव्हा आपण दुखावले जाऊन स्वत्व सिद्ध करण्यासाठी इतर काही गोष्टी करू लागतो पण त्यापेक्षा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून स्वतःला अधिक समृद्ध करा.
लक्षात ठेवा तुमच्या स्वतःच्या इच्छेशिवाय तुम्हाला कोणीच दुखवू शकत नाही
याबाबत रतन टाटांचा आदर्श घेण्यासारखा आहे

लिहताना काही चुकले असल्यास क्षमस्व
अजून खुप काही लिहण्यासारखे आहे पण तूर्तास एवढे पुरे

सदर लेख कुठल्याही प्रकारचे मार्केटिंग करण्यासाठी नसून आपणास आर्थिक बाबतीत साक्षर करण्यासाठी आहे.महापुरुष व तत्सम गैरसमज आदीबद्दल महत्व सांगणारे व गौरसमज दूर करणारे माझे लेख आपण वाचलेच असतील पण आर्थिक घडी मजबूत असणे ही महत्वाचे म्हणून हा लेख.

साभार -
1.Money Mayuka सुरुवात सुख आणि समृद्धीची
2.आर्थिक नियोजन संदर्भातील लेख व पुस्तके
3.आरोग्य विमा कसा काढावा यासंदर्भातील माझा लेख.

*संकेत मुनोत*
८०८७४४६३४६, ८४४६२५९१५९
sanket.insurance@gmail. com

Friday, November 30, 2018

गांधी आजच्या तरुणाईच्या परपेक्षातून- जनमानसाची शिदोरी मासिकात प्रकाशित लेख

परवा मुंबईमध्ये रेल्वे पादचारी पुलावर चेंगराचेंगरी झाली आणि पुन्हा गांधीचे शब्द आठवले "खेड्याकडे चला".दररोज वर्तमानपत्र वाचत असतांना गांधी आठवतच असतात. परंतु अशा घटना घडल्यावर मात्र गांधींच्या विचारांची, तत्त्वांची गरज तीव्रपणे जाणवते.


जगभरात गांधीजींचे चाहते आणि अनुयायी असले तरी भारतात गांधीजींची चेष्टाच जास्त उडवली जाते.
अल्बर्ट आईन्स्टाईन या थोर वैज्ञानिकांने म्हटलेच आहे की ‘’ येणाऱ्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत कि असा कोणी हाडा मांसाचा माणूस या पृथ्वीतलावर वावरत होता’’ आणि होय आईन्स्टाईनच्या इतर सिद्धांताप्रमाणे हाही सिद्धांत खरा ठरतो की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती आज आहे.

होय आजही गांधीचे विचार महत्वाचे, अनुकरणीय, आचरणीय , आम्हा भारतीयांना आणि जगाला वाचविणारे आहेत याचा प्रत्यय पावलोपावली येतो. काही दिवसांपूर्वी मराठी सिनेसृष्टीचे बादशहा, नटसम्राट अभिनेता डॉ श्रीराम लागू यांच्याशी गप्पा मारतांना "आज गांधीजी relevant(समकालीन) आहेत का?" हा प्रश्न विचारला होता. ते म्हणाले की गांधीविचार फक्त काल किंवा आज नाही तर सार्वकालिक  relevant आहेत. एका विज्ञानवादी माणसाकडून हे ऐकणे माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता.

थोडा विचार केला तरी गांधीचे विचार आजही आचरणीय आहेत हे लक्षात येते. त्यातील काही सहज दिसून येणाऱ्या बाबी पाहू या

अहिंसा –

'कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका'-महात्मा गांधी 

आज आश्चर्य वाटते की या महात्म्याने तेव्हा मोबाईल, इंटरनेट, टीव्ही सारखी कुठलीच माध्यमे नसतांना संपूर्ण देश स्वराज्याच्या एका धाग्याने जोडला होता. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वाटेवर विकास करीत असतांना  जगास त्याचे काही नुकसानही भोगावे लागत आहे. अनेक देश अण्वस्त्र घेऊन एकमेकांविरुद्ध उभे आहेत. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण स्वतः बलवान असायला पाहिजे, खूप सैनिकी शक्ती पाहिजे अशा मांडल्या जाणाऱ्या राष्ट्रावादात तथ्य किती याचा शोध घ्यावा लागेल. ज्यांना जगातील सर्वात बलाढ्य महासत्ता किंवा विकसित देश म्हणावं असे देशही दहशतवादी वृत्तींपासून स्वतःला वाचवू शकले नाहीत. तुम्ही एक बॉम्ब टाका आम्ही 2 टाकतो आणि काही क्षणात दोघेही संपून जाऊ असे वातावरण आहे, आणि याच वेळेस Eye for eye will make whole world blind अशा समंजस गांधीविचारांची सर्वाधिक गरज काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये वर्ल्ड ट्रेंड सेंटरवर दहशतवादी हल्ला झाला आणि पूर्ण जग सैरभैर झाले होते. तेव्हा पुढे असे प्रकार होऊ नयेत यासाठी जे शिष्ट मंडळ बनवले गेले त्यात या जगाला आइन्स्टाईनच्या सिद्धांताप्रमाणे गांधीविचारच तारू शकतात असा निर्वाळा अनेक विचारवंतांनी तेथे दिला.

कोलंबियात ‘फार्क‘ नावाची अति-डावी संघटना आहे.(आपल्याकडील नक्षलवाद्यांसारखी . पण आपल्याकडील नक्षलवाद्यांपेक्षा कितीतरी पट अधिक विध्वंसक क्षमता असणारी) तीची स्थापना 1964 ची. तेव्हापासून फार्क ने नंगानाच केला आहे. अपरिमित मनुष्यहानी व संसाधनांची हानी केली आहे. कोलंबियाचे सैनिक इतके वर्षे झाली पण त्यांचा बिमोड करण्यात सपशेल अपयशी ठरली.
सन्टोस यांनी यावर ‘गांधीयन मार्गाने’ उत्तर शोधण्याचा निर्णय घेतला. म्हणजे काय तर त्यांनी फार्क ला हिंसेचा मार्ग सोडून लोकशाही निवडणूक प्रक्रियेत पक्ष म्हणून सहभागी होण्यासाठी राजी केले. मागच्या वर्षी त्याच संदर्भात कोलंबियात सार्वमत घेण्यात आले. त्यावेळी सन्टोस यांनी गांधीजींपासून आपण प्रेरणा घेऊ असे लोकांना आवाहन करत

“We in Colombia have to adopt this culture of non-violence,” असे विधान केले.

अर्थात गांधीयन वाटेवर चालणारे सन्टोस हे काही पहिले नाहीत. कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकेतील मार्टिन ल्युथर किंग, कैक वर्षे तुरुंगात डांबले गेले तरी गोऱ्यांविषयी द्वेषभावना ज्यांच्या मनात राहिली नाही ते दक्षिण आफ्रिकेचे नेल्सन मंडेला, पिस्तुलगच्च देशात आवाज उचळणारी मलाला यांनी, ‘गांधीयन वाटेेवर’ मार्गक्रमण करून आपआपल्या देशात परिवर्तन घडवून आणले. या सर्वांना शांततेचा नोबेल पूरस्कार प्राप्त झाला. हा एक प्रकारे गांधीजींचाच सन्मान आहे.

शुराची अहिंसा-
मी समोरच्यवर हात ही उचलणार नाही , पळून ही जाणार नाही आणि समोरच्या बद्दल वैरभाव ही मनात आणणार नाही. किती मोठी गोष्ट आहे ही.
गांधीजींची अहिंसा ही शुराची अहिंसा होती
एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा हे गांधीजी इंग्रजांबाबत बोलले नव्हते तर हरीजनांबाबत बोलले होते.दंगल झाल्यावर जेव्हा सवर्णांनी हरीजनांवर अन्याय केला तेव्हा गांधींनी हे उद्गार काढले होते त्यांचे पूर्ण वाक्य असे होते 'एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे केला आणि त्याच्यावर जरी मारले तरी आपण हरीजनांवर जो अत्याचार केला आहे त्या पापाचे परिमार्जन होणार नाही.कश्मीरमध्ये दंगली चालू होत्या पाकिस्तान घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा नेहरूंनी गांधीजींना विचारले होते की आत्ता अहिंसेचे कसे करायचे त्यावर गांधींनी उत्तर दिले होते की मी जर तुमच्या जागी असतो तर सैन्याचा वापर केला असता आणि पाकिस्तानच्या घुसखोरीला चोख प्रत्युत्तर दिले असते.पत्रीसारकारचे मुख्य क्रातीसिंह नाना पाटील जेव्हा महात्मा गांधींना भेटले त्यांना आपल्या ‘पत्रीसरकार’बद्दल सांगितले. त्यावर गांधीजी म्हणाले होते, की ‘नाना पाटील, तुमची चळवळ माझ्या तत्त्वात बसते न बसते यापेक्षा तुम्ही १९४२ ची स्वातंत्र्य चळवळ जिवंत ठेवली, सातार्याने या चळवळीचे नाव राखले हे महत्त्वाचे होय ! नाना, तुम्ही बहादूर आहात. भ्याडाच्या अहिंसेपेक्षा शुराची हिंसा परवडेल असे मानणारा मी आहे.  

यांत्रिकीकरण आणि गांधी –

गांधीजींनी यांत्रिकीकरणाला विरोध केला असा काहीसा गैरसमज पसरवला जातो तर ते असे काहीही नाही. उलट गांधीजीनी  चरखा असो किंवा इतर काहीही त्याच्या आधुनिकीकरणाला त्यांनी प्रोत्साहनच दिले होते. त्यांचा विरोध होता तो यांत्रिकीकरणाच्या अतिरेकामुळे होणाऱ्या बेकारीला, जे हजारो लोकांचे काम एका यंत्राकडे देऊन त्यांना बेरोजगार करू शकते, अतिवापराला जे लोकांची कष्ट करण्याची क्षमता संपवून त्यांना आळशी व आजारी बनवते. गांधीजींनी त्या काळात तेव्हाची अत्याधुनिक समजली जाणारी बहुतेक साधने वापरली होती. त्यांच्या फोनचे बिलच तेव्हाच्या व्हाईसरॉयच्या फोन बिलापेक्षा कितीतरी पटीने जास्त असायचे.

आज कामगारांनी मागण्यांसाठी संप केला की उद्योजक यंत्रमानव उपयोगात आणायचे म्हणतात. काही ठिकाणी अपघात होऊन यंत्रमानवांनीच कामगारांचे जीव घेतले आहेत. हा यांत्रिकीकरणाचा अतिरेक नाही का?

आईनस्टाईन हेच वेगळ्या शब्दात सांगतो 
"I fear the day when the technology overlaps with our humanity. The world will only have a generation of idiots."
जेव्हा तंत्रज्ञान  माणूसकीवर जड होते तेव्हा या जगात फक्त मूर्खांची पिढी राहील.

खेड्यांकडे चला गांधी –

गांधीजींनी जो खेड्याकडे जाण्याचा आणि स्वयंपूर्ण खेडी बनवण्याचा संदेश दिला होता तो आज सर्वाधिक महत्वाचा आहे. खेड्यातील गरज खेड्यातच भागली पाहिजे अशाप्रकारे गावाचे व्यवस्थापन व्हावे. मुंबईसारखी अनेक शहरे आज पर्यावरण व सर्वच दृष्टीने धोक्याची आहेत. पण गावात रोजगार नसल्यामुळे तेथील तरुण शहरांकडे विस्थापित होत आहेत. आपल्याला दररोज लागणारी हत्यारे आणि उपकरणे आपल्याच गावात बनावीत असे स्वयंपूर्ण खेड्याचे चित्र हवे. गांधीजींची स्वदेशीची संकल्पना आपण अंमलात आणली तर चीनी माल भारतात येणारच नाही. आज चीनी मालावर बहिष्कार टाकतांना गांधीजींचा स्वदेशीचा मंत्र सोयीस्करपणे विसरला जातो.वारणासारखी अनेक स्वयंपूर्ण खेडी याची उदाहरणे आहेत ज्यांनी तेथील लोकांना तेथेच रोजगार मिळवून देऊन गांधीजींच्या स्वयंपूर्ण खेड्याची संकल्पना अमलात आणली आहे. 

गांधीजी -जात आणि धर्म
गांधीजींनी कोणत्याही जातिचे वा धर्माचे अतिरेकी समर्थन केले नाही म्हणून सर्व जातीतील कट्टरवादी लोक त्यांचा द्वेष करतात  

एका जातीतील कट्टर लोकांना  पुणे करारामुळे गांधीजी ब्राम्हणधार्जिणे आणि दलितद्वेष्टे (मनुवादी) वाटतात

कट्टर उच्चवर्णीयांना गांधी ब्राम्हणद्वेष्टे दलित धार्जिणे वाटतात कारण जिथे एका जातीचे वर्चस्व होते अशी सर्व ठिकाणे राजकारण, समाजकारण व इतर अनेक  गांधीजींनी अस्पृश्यता निवारण चळवळीद्वारे  सर्व जातीसाठी खुली केली जिथे त्यापूर्वी फक्त उच्चवर्णीयांचे वर्चस्व होते.

पाकिस्तानमधील काही कट्टर मुस्लिमांनाही आम्हाला छोटा पाकिस्तान दिला,काश्मीर दिला नाही वगैरे कारणावरून  गांधी मुस्लिमद्वेष्टे व हिंदुधार्जिणे वाटतात

त्यामुळे गांधीजींच्या मागे त्यांचा उदो उदो वा देव करणारी कोणताही जातसमूह नाही. जेवढी टिंगल गांधीजींची उडवली जाते त्याच्या एक टक्का जरी इतर कोणत्या महापुरुषांची झाली असती तर दंगली झाल्या असत्या, पण हेच गांधीजींचे वैशिष्ट्य आहे कुठल्याही जातीचा , धर्माचा, पंथाचा आधार न घेता ते जगभर पोहचले या उलट इतर जातींच्या महापुरुषांना त्यांच्याच जातीच्या लोकांनी स्वतःपुरते संकुचित करून ठेवले.
कुठल्याही महापुरुषाचे गुणगान करताना किंवा चरित्र लिहितांना गांधीजींना कमी लेखावेच लागते त्याशिवाय यांचा महापुरुष मोठा होत नाही.याउलट गांधीजीनी स्वतःच्या चरित्रात इतर कुणाही महापुरुषाला कमी लेखण्यापेक्षा स्वतःलाच कमी लेखले आहे 

समाजस्वास्थ्य –

ती जागतिक पातळी असो व देश पातळी व ग्रामीण भाग जात, धर्म, प्रांत, वर्ग अश्या अनेक भेदांत समाज विभागला जात असून प्रत्येक ठिकाणी लोकांचा एकमेकांप्रती द्वेष, इर्षा आणि हेवेदावे वाढत आहेत. व्यक्तिगत पातळीवरील धार्मिक स्वातंत्र्याचा आदर गांधीजींना अपेक्षित होता. एक हिंदू म्हणून त्यांना वर्णव्यवस्था ही श्रमविभागणी करणारी समाजव्यवस्था म्हणून पूर्वायुष्यात त्यांना मान्य होती. परंतु ही व्यवस्था श्रमांचीच विभागणी न करता श्रमिकांची सुद्धा विभागणी करते हे आंबेडकरांचे म्हणणे त्यांना पटल्यावर त्यांनी उत्तरायुष्यात ही चातुर्वर्ण्य व्यवस्था अमान्य करीत तिचे उच्चाटन करण्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले. धर्म, जाती, लिंग, प्रदेश, वर्ण यापलीकडे जाऊन प्रेम, बंधुभाव आणि समतेची तत्त्वे आचरणात आणावीत हा गांधीजींचा संदेश अमलात आणला तर अनेक गोष्टी सोप्या होऊ शकतात. समाजातील तंटे बखेडे, कोर्टातील कज्जे वाद कमी होऊ शकतात. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वाया जाणारे मनुष्यबळ, वेळ आणि पैसा वाचू शकतो. हेच मनुष्यबळ, वेळ, पैसा मानवाच्या सुखासाठी विधायक कामे करण्यात वापरता येतील.

पर्यावरण –

Be The Change , you wish to see in the World"

"जो बदल तुम्हाला जगात पहायचा आहे तो बदल आधी स्वतः मध्ये घडवा" हे गांधीजींच्या सर्व शिकवणीतले सार आहे. यांत्रिकीकरणामुळे आपल्या जीवनात सोयी आणि सुखे आलीही असतील आणि आलीही आहेत. परंतु आपण निसर्गापासून दूर जाणारे हे कृत्रिम जीवन जगत आहोत ज्यात आपण निसर्ग ओरबाडून घेत आहोत. त्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडून मानवासमोर स्वतःच्या अस्तित्वाच्याच समस्या उभ्या राहिल्या आहेत. 

There is enough on Earth for everybody's need, but not enough for everybody's greed.- M.K.Gandhi

पृथ्वीकडे सर्वांची गरज भागवण्याएवढे आहे पण सर्वांची हाव भागवू शकेल एवढे नाही.

गांधीजींच्या कुटीवर एकदा एक तरुण कार्यकर्ता येऊन बसला. त्याने कुटीबाहेर ठेवलेल्या माठातून पेलाभर पाणी घेतले आणि अर्धा पेला पाणी पिऊन उरलेले पाणी तेथील एका रोपावर ओतले. जेव्हा त्याची भेटीची वेळ आली तेव्हा गांधींनी त्याला त्याचे वय विचारले. त्याचे वय खूपच कमी होते म्हणून त्याला कदाचित गांधीजी हरकत घेतील असे त्याला वाटले म्हणून तो म्हटला की माझे वय कमी आहे तरी मी कार्यकर्ता म्हणून चांगले काम करू शकेन. गांधी म्हटले, नाही, फक्त वय सांगा. त्यांनी २०-२२ असे काही तरी सांगितले. गांधी म्हणाले तुम्ही २० वर्षे पाणी पीत आहात तरी तुम्हाला एका वेळी गरज किती पाणी लागते याचा अंदाज आला नाही.

*आरोग्य*

नागरी जीवन विकसित होण्याअगोदरच माणूस अन्नावर प्रक्रिया करायला शिकला होता. इतर प्राणी निसर्गात त्यांचे अन्न ज्या स्वरुपात उपलब्ध असेल त्याच स्वरुपात ग्रहण करतात. मात्र माणूस हाच एकमात्र असा प्राणी आहे की जो अन्नावर अनेक प्रक्रिया करून खातो. त्यामुळे त्याची जीभ भ्रष्ट होते. कोणत्याही प्राण्यास भूक नसतांना, अजीर्ण झाले असता, स्वस्थ नसतांना अशा अवस्थांत अन्न ग्रहण करण्याची इच्छा होत नाही. परंतु जीभ भ्रष्ट झाल्यामुळेच माणूस मात्र अशा अवस्थांतही अन्न ग्रहण करतो. जास्तीत जास्त चविष्ट बनविण्यासाठी अन्नावर जास्तीत जास्त प्रक्रिया केल्या जातात. ते टाळण्यासाठी त्यांनी नियम केला की भोजन बनवितांना तेल, मीठ, मिरची आदि पाच पेक्षा अधिक पदार्थ वापरायचे नाहीत. नैसर्गिक आहाराने व योग्य विहाराने गमावलेले आरोग्य प्राप्त करता यावे यासाठी त्यांनी पुण्याजवळील उरुळी कांचन येथे निसर्गोपचार केंद्र सुरु केले.

गेल्या काही दशकात जागतिक खाद्य संस्कृती खूपच बदलली असल्याचे दिसते. त्यामुळे एकीकडे अन्न वाया जाते तर दुसरीकडे मोठी लोकसंख्या भूकबळी आणि कुपोषणाची बळी ठरते. गांधीजींनी आहारप्रणालीबाबत मांडलेली मते जरी प्राथमिक स्वरुपाची असली तरी त्यावरच पुढे बरेच संशोधन होऊन योग्य प्रणालीने स्वास्थ्य टिकवता तर येतेच परंतु कन्सर सारख्या अनेक व्याधी सुद्धा बऱ्या होऊ शकतात असे सिद्ध झाले आहे.

स्त्रियांचे सक्षमीकरण

जीवनाच्या ज्या ज्या क्षेत्रात पुरुष कार्य करतात त्या त्या क्षेत्रात स्त्रिया कार्य करू शकतात; स्त्रियांना कार्य करता आले पाहिजे आणि स्त्रियांनी कार्य केले पाहिजे हा गांधीजींचा आग्रह होता. त्यामुळेच त्यांनी स्त्रियांसाठी खास असे काही कार्यक्रम राबवले नसले तरी त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांची योजनाच अशी असायची की त्यात स्त्रियांचा सहभाग आवश्यक असे. एकदा बिहारमध्ये त्यांना एका कार्यक्रमासाठी निमंत्रित केले असता त्यांनी अट घातली की कार्यक्रमात स्त्रिया आणि पुरुषांची संख्या बरोबरीने असली पाहिजे. स्त्रियांच्या सहभागाशिवाय, त्यांच्या विकासाशिवाय समाजाचा विकास अपूर्ण आहे असे गांधीजींचे मत होते.

शिक्षण- 
आजकाल सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या वाढतच चालली आहे.वाचनासोबतच कौशल्यपूर्ण शिक्षणाच्या अभावामुळे हे घडते आहे.गांधीजींच्या नयी तालीम या शिक्षण पद्धतीत शिकलेले विद्यार्थी शिक्षण आणि कौशल्य दोन्ही दृष्टीने परिपूर्ण असत.

सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, स्वदेशी, सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव आणि अशी अनेक मूल्ये सनातन असून ती परस्परसंबंधी आहेत व प्राचीन काळापासून ऋषीमुनींनी प्रतिपादित केली आहेत. याच मूल्यांनी समाजाची धारणा आणि व्यक्ती विकास होऊ शकतो. आणि गांधीजी हे असे अर्वाचीन काळातील महात्मा आहेत ज्यांनी व्यक्तिच्या व सामाजिक जीवनात या मूल्यांची प्रतिष्ठापना करण्याचा प्रयत्न केला.  या मूल्यांची प्रतिष्ठापना झाली तर माणूस बदलेल. माणूस बदलला तर समाज बदलू शकतो. माणूस बदलण्यावर गांधीजींचा विश्वास होता.

गांधींजीबद्दलच्या अफवा- 
५५ कोटी, फाळणी, भगतसिंगची फाशी अश्या अनेक गोष्टींना गांधींना जबाबदार धरले जाते पण ते सत्य नाही.शब्दमर्यादेमुळे ते येथे मांडत नाही तरुणांनी स्वतः याचा अभ्यास करून मग यावर मत बनवायला हवे

शेवटी बाबा आमटेंच्या मुक्तछंदातील हे शब्द सांगून विराम घेतो
त्याने प्रथम एका मिठाच्या पुडीला हात घातला आणि मग एक साम्राज्य 
मिठाच्या सात समुद्र पलीकडे फेकून दिले.त्याने सुतातून सुरुवात केली
आणि अखेर स्वराज्याचा स्वर्ग गाठून दाखवला. याच साध्या सुताने त्याने एक पिढीच्या पिढी आणि एक देशच्या देश बांधून दाखवला.
पण एक देशच्या देश आणि एक पिढीच्या पिढी पकडण्यासाठी 
नुसतीच हिकमत पुरी पडत नाही
त्यासाठी ताकदही लागते
भारी वजनाचा एक क्रूस वाहण्याची ताकद!"
"ज्याला तो क्रूस वागवता येतो 
त्याच्या सोबत बारा अनुयायी असले 
तरी त्याचे प्रेषितत्व घाबरत नाही.
पण खांद्यावर क्रूस नसता कुणी बारा लाख बाजारबुणगे घेवून निघाला 
तरी त्याचा महंत होतो.
आणि महंत फक्त गादी चालवू शकतात.
मन्वंतरे घडवून आणू शकत नाहीत

तर गांधी विचार आज , उद्या आणि सदा सर्वकाळ Relevant आहेत.

संकेत मुनोत
८०८७४४६३४६
Knowing Gandhism Global Friends
changalevichar1@gmail.com

गांधींविचारांची आज तीव्र गरज- राष्ट्र सेवादल पत्रिका ऑक्टोबर 2018 मध्ये प्रकाशित लेख

काही लाख इंग्रज कोट्यवधी भारतीयांवर राज्य करू शकले त्याची अनेक कारणे आहेत त्यातील सर्वात मुख्य कारण म्हणजे जात-पात , धर्म-वर्ग यात विभागलेला समाज 

काही लोक लढायचे पण त्याला म्हणावा तितका पाठिंबा मिळत नसे शिवाय सामान्यांना व पददलित वर्गाला तर त्याने काही फरकच पडत नसे त्यांच्यवर इंग्रजांनी राज्य केले काय मोगलांनी केले वा पेशव्यांनी केले त्यांचे तर सगळीकडे हालच होत

पण जेव्हा महात्मा गांधी आले तेव्हा त्यांनी काय केले तर  जात ,धर्म, पंथ, वर्ग, लिंग आदी सर्व भेद विसरून देशासाठी लढण्यासाठी एकत्र केले त्यांच्यात सुराज्य मिळवण्याचा आत्मविश्वास निर्माण केला जो त्यापूर्वी कोणी निर्माण केला नव्हता.
आज पुन्हा जेव्हा जाती जातीचे मोर्चे पाहतो तेव्हा गांधीविचारांची तीव्रतेने गरज जाणवते

गांधीजी -जात आणि धर्म
गांधीजींनी कोणत्याही जातिचे वा धर्माचे अतिरेकी समर्थन केले नाही म्हणून सर्व जातीतील कट्टरवादी लोक त्यांचा द्वेष करतात .
एका जातीतील कट्टर लोकांना  पुणे करारामुळे गांधीजी ब्राम्हणधार्जिणे आणि दलितद्वेष्टे (मनुवादी) वाटतात.
कट्टर उच्चवर्णीयांना गांधी ब्राम्हणद्वेष्टे दलित धार्जिणे वाटतात कारण जिथे एका जातीचे वर्चस्व होते अशी सर्व ठिकाणे राजकारण, समाजकारण व इतर अनेक  गांधीजींनी अस्पृश्यता निवारण चळवळीद्वारे  सर्व जातीसाठी खुली केली जिथे त्यापूर्वी फक्त उच्चवर्णीयांचे वर्चस्व होते.
पाकिस्तानमधील काही कट्टर मुस्लिमांनाही आम्हाला छोटा पाकिस्तान दिला,काश्मीर दिला नाही वगैरे कारणावरून  गांधी मुस्लिमद्वेष्टे व हिंदुधार्जिणे वाटतात.
त्यामुळे गांधीजींच्या मागे त्यांचा उदो उदो वा देव करणारी कोणताही जातसमूह नाही. जेवढी टिंगल गांधीजींची उडवली जाते त्याच्या एक टक्का जरी इतर कोणत्या महापुरुषांची झाली असती तर दंगली झाल्या असत्या, पण हेच गांधीजींचे वैशिष्ट्य आहे कुठल्याही जातीचा , धर्माचा, पंथाचा आधार न घेता ते जगभर पोहचले या उलट इतर जातींच्या महापुरुषांना त्यांच्याच जातीच्या लोकांनी स्वतःपुरते संकुचित करून ठेवले.
कुठल्याही महापुरुषाचे गुणगान करताना किंवा चरित्र लिहितांना गांधीजींना कमी लेखावेच लागते त्याशिवाय यांचा महापुरुष मोठा होत नाही.याउलट गांधीजीनी स्वतःच्या चरित्रात इतर कुणाही महापुरुषाला कमी लेखण्यापेक्षा स्वतःलाच कमी लेखले आहे.

गांधीजी आणि जागतिक प्रभाव
त्यांचा भारतावरच नाही तर पूर्ण जगावर प्रभाव आहे हे आपणास माहीतच नसते 
जगभर २ आॅक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला जातो 130पेक्षा जास्त देशांनी गांधीजीवर अभ्यास करण्यासाठी विद्यापिठ सुरु केली आहेत

,शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन म्हणतो, गांधी नावाचा हाडा मांसाचा महान माणूस या पृथ्वीवर होऊन गेला यावर पुढील पिढ्या विश्वास पण ठेवणार नाहीत ( आईनस्टाईन हा मानवी इतिहासातील सर्वात बुध्दीमान माणसांपैकी एक आहे ),

ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात म्हटले की जर गांधीविचार नसते तर मी आज इथे नसतो? मार्टिन ल्युथर किंग, बीटल्सचा उद्गाता जाॅन लेनन, रोमेन रोलंड, रीचर्ड अॅटनबरो, अलीकडचे स्टीव्ह जाॅब्ज, दलाई लामा, आॅंग साॅन स्यु की , हेन्री फोर्ड, मलाला, सत्यार्थी, अभय बंग, सुधा-नारायनमूर्ती,प्रकाश आमटे इ. अनेक माणसे गांधींपासून प्रेरणा घेऊन मोठी झाली आणि त्यांनी जगाचा इतिहास बदलला आणि आजही बदलत आहेत.

गांधीजी व समकालीन महापुरुष

स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पाहताना एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी.
सर्व महापुरुषांना एकमेकांविषयी प्रचंड आदर होता त्यांचे मार्ग जरी वेगळे असले तरी ध्येय एकच होते.

आझाद हिंद सेना स्थापन केल्यावर नेताजींनी त्यात ज्या  तुकड्या बनवल्या त्यांची नावे गांधी टुकडी व नेहरू टुकडी होते. आकाशवाणीवरून गांधीजीना राष्ट्रपिता म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोसच होते तर सुभाषचंद्र बोस ना प्रथम नेताजी म्हणणारे गांधीच होते
शहीदे आजम भगतसिंहनी आपल्या 'नये नेताओंके अलग अलग विचार' या पुस्तकात नेताजी बोसना emotional Bengali, a devotee of the ancient culture of India तर नेहरुंना  internationalist and revolutionary असे म्हटले आहे.

-गांधीजी राष्ट्रपिता

‘ गांधींचे राष्ट्रपितापण हे कुणाच्या मानण्या न मानण्यावर अवलंबून नाही आणि कुणाच्या मेहेरबानीने ते महात्माजींना मिळालेले नव्हते. शतकानुशतके अन्याय आणि शोषणामुळे अवनत झालेल्या करोडो भारतीयांच्या उत्थानाचा आशय गांधींनी स्वातंत्र्य आंदोलनाशी जोडला. अस्पृश्य, दलित, शेतकरी, कष्टकरी, महिला अशा सर्वानीच आपले उत्थान भारतीय स्वातंत्र्यलढय़ात पाहिले. सर्वाच्या दु:खांवर गांधींनी आपल्या करुणेची केवळ फुंकरच घातली नाही, तर त्यांच्यातील स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम जागृत करून समतेवर आधारलेला राष्ट्रवाद गांधींनी उभा केला. गांधीजींनी कृश आणि दुबळ्या हाताने मूठभर मीठ उचलले आणि एका बलाढय़, गौरवशाली साम्राज्याचा पाया खचून गेला. कारण कोटी कोटी भारतीय जनतेच्या तन-मन-धनाची प्रेरणा त्या कृश आणि दुबळ्या हातांत एकवटली होती. गांधींनी राष्ट्रही जागविले आणि नवा राष्ट्रवादही जागविला. म्हणूनच सर्वच बाबतीत विभिन्नता असलेल्या देशात सर्वाना राजकीय, सामाजिक आणि आíथक समतेच्या संधी देणाऱ्या एका सेक्युलर संविधानाची, एका आधुनिक नव्या राष्ट्राची निर्मिती शक्य झाली. त्यामुळे गांधी राष्ट्रपिता ठरतात.

गांधीजी खूप अध्यात्मिक वा धार्मिक होते त्यामुळे ते मनुवादी होते असा काही मंडळींचा आरोप असतो

 सत्य -गांधीजी हे धार्मिक व आध्यात्मिक असले तरी धर्मांध व दुसऱ्या धर्माचा द्वेष करणारे नव्हते
गांधीजींचे अध्यात्म हे धार्मिक अथवा साक्षात्कारी नव्हते. त्याला सामाजिक परिमाणे होती. समाजाची सेवा, निसर्गाचे रक्षण, जलसंवर्धन, सार्वजनिक आरोग्याची काळजी हे त्यांना अभिप्रेत होते. व्यक्तिगत त्याग व व्यक्तिगत विकास यातून समाजाच्या हिताचा व्यापक विचार त्यांनी मांडला होता. एकाही डोळ्यातून एकही अश्रू निघू नये, गरिबी, अन्याय, विषमता यांचे उच्चाटन व्हावे, हीच त्यांची जीवनदृष्टी होती, हेच त्यांचे अध्यात्म होते आणि हाच त्यांचा परमार्थ होता. स्वातंत्र्याचा उल्लेख करणाऱ्यांनी स्वातंत्र्याकडे कसे पाहावे, याची दृष्टी गांधीजींच्या आचरणातून मिळते..

महात्मा गांधी आणि गोसेवा- महात्मा गांधी गोसेवक होते पण गोरक्षणाच्या नावाखाली माणसाला मारायला व माणसा-माणसात भेद पडायला त्यांनी कडाडून विरोध केला होता.
 25 जुलै 1947 सालच्या सर्वधर्म प्रार्थनेच्या वेळी गांधींजीनी गोहत्याबंदीसाठी करत असलेल्या उपोषणकर्त्या मित्राला आपल्या भाषणातून खडसावले होते "भारतात गोहत्या बंदीचा कायदा होऊ शकत नाही. गोसेवेचं व्रत मी अनेक वर्षांपासून स्वीकारलं आहे, पण माझा धर्म सर्व भारतीयांचा कसा असू शकेल? ही तर हिंदू नसलेल्या भारतीयांवर बळजबरी होईल.जोपर्यंत एखादा माणूस गोहत्या न करण्यास प्रवृत्त होत नाही, तोवर मी त्याला बळजबरी कशी करू? भारतात फक्त हिंदूच नाहीत तर मुस्लीम, पारसी, ख्रिश्चन आणि इतर धर्मांचे लोकही राहतात. आता भारत हा फक्त हिंदूंची भूमी आहे, हे हिंदूंचे गृहितक चुकीचे आहे. इथे जे राहतात, भारत त्या सर्वांचा आहे."

गांधीजी आणि अहिंसा- 

एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा हे गांधीजी काही इंग्रजांबाबत बोलले नव्हते तर हरीजनांबाबत बोलले होते.दंगल झाल्यावर जेव्हा सवर्णांनी हरीजनांवर अन्याय केला तेव्हा गांधींनी हे उद्गार काढले होते त्यांचे पूर्ण वाक्य असे होते 'एका गालावर मारले आणि  दुसरा गाल पुढे केला आणि त्याच्यावर जरी मारले तरी आपण हरीजनांवर जो अत्याचार केला आहे त्याचे परिमार्जन होणार नाही. काश्मीरमध्ये  दंगली चालू होत्या पाकिस्तान घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा नेहरूंनी गांधीजींना विचारले होते की आत्ता अहिंसेचे कसे करायचे त्यावर गांधींनी उत्तर दिले होते की मी जर तुमच्या जागी असतो तर सैन्याचा वापर केला असता आणि पाकिस्तानच्या घुसखोरीला चोख प्रत्युत्तर दिले असते.पत्रीसारकारचे मुख्य क्रातीसिंह नाना पाटील जेव्हा महात्मा गांधींना भेटले त्यांना आपल्या ‘पत्रीसरकार’बद्दल सांगितले. त्यावर गांधीजी म्हणाले होते, की ‘नाना पाटील, तुमची चळवळ माझ्या तत्त्वात बसते न बसते यापेक्षा तुम्ही १९४२ ची स्वातंत्र्य चळवळ जिवंत ठेवली, सातार्याने या चळवळीचे नाव राखले हे महत्त्वाचे होय ! नाना, तुम्ही बहादूर आहात. भ्याडाच्या अहिंसेपेक्षा शुराची हिंसा परवडेल असे मानणारा मी आहे.  

संघ आणि गांधी

संघातील मंडळी अश्या बाता मारतात कि गांधीजीनी संघाचे कौतुक केले होते म्हणून पण गोळवलकर गुरुजींच्या भेटीनंतर महात्मा गांधीजींनी गोळवलकर गुरुजी व रा. स्व. संघ याबद्दलचे त्यांचे मत नेहरूंकडे व्यक्त केले होते. नेहरूंनी सरदार पटेलांना लिहिलेल्या एका पत्रात ते उदधृत केले आहे. नेहरू लिहितात : "बापूंनी श्री. गोळवलकरांच्या पहिल्या भेटीनंतर सांगितल्याचे स्मरते की त्यांनी (गोळवलकरांनी) काहीशी छाप टाकली हे खरे; पण मी त्यांच्यावर विश्वास टाकायला तयार नाही. त्यांच्याशी झालेल्या दुसर्या व तिसर्या भेटीनंतर मात्र प्रतिकूल मत व्यक्त करून बापू म्हणाले, यांचा काही भरवसा देता येत नाही. ही मंडळी बोलताना समजूतदार, वाजवी भासतात. पण नंतर बोलल्याच्या नेमके उलट वागण्यात त्यांना कसलाही खंत, खेद वाटत नाही. माझंही मत तसंच झालं आहे."

(सिलेक्ट कॉरस्पॉन्डन्स ऑफ सरदार पटेल-१९४५-५० भाग २ सं. व्ही. शंकर, नवजीवन, अहमदाबाद)

कस आहे भगतसिंह-राजगुरु फ़ासावर चढत होते .
कोट्यावधी सर्वसामान्य भारतीय माणसे प्रांत , प्रदेश ,संस्थान ह्या सगळ्या सीमा पार करून गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय म्हणून एक होऊन इंग्रजांशी लढत होते.
सुभाषबाबु आझाद हिंद सेनेतुन सशस्त्र लढा देण्याचा प्रयत्न करत होते, बाबासाहेब दलित स्वातंत्र्यासाठी झगडत होते .......,खुदीराम बोस, चंद्रशेखर आझाद इथिपासुन तिथपर्यंत लोक येन केन प्रकारे देशासाठी सर्वस्व अर्पण करत होते तेव्हा हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा मुस्लिम लीग अस नाव लावणार्या आणि स्वतःला सामाजिक संघटना म्हणवणाऱ्या या संघटना , संघटना म्हणून ह्या लढाईत आपल काय योगदान देत होत्या ?

मग ज्या लढाईत आपण भाग घेतलाच नाही त्या लढाईत पुढे असणाऱ्या नेत्यांचे असणारे मतभेद ( जे वैचारिक असतील , मार्गाबद्दल असतील पण ध्येयाबद्दल कधीच नव्हते ) चव्हाट्यावर आणून चघळत बसण्याचा नैतिक हक्क ह्या संघटनांना कसा मिळतो ?
आपल्याच मनाला आपण प्रश्न विचारले तर उत्तर सापडतील पण कबूल करण्याची हिंमत असायला पाहिजे. 
देशाच्या सरहद्दीवर हजारो सैनिक भगव्या किंवा हिरव्यासाठी लढत नाहीत तर तिरंग्यासाठी लढत आहेत देशाचे ऐक्य तुटेल असे काही करु नका
शेवटी बाबा आमटेंच्या मुक्तछंदातील हे शब्द सांगून विराम घेतो

त्याने प्रथम एका मिठाच्या पुडीला हात घातला आणि मग एक साम्राज्य 
मिठाच्या सात समुद्र पलीकडे फेकून दिले.त्याने सुतातून सुरुवात केली
आणि अखेर स्वराज्याचा स्वर्ग गाठून दाखवला. याच साध्या सुताने त्याने एक पिढीच्या पिढी आणि एक देशच्या देश बांधून दाखवला.
पण एक देशच्या देश आणि एक पिढीच्या पिढी पकडण्यासाठी 
नुसतीच हिकमत पुरी पडत नाही
त्यासाठी ताकदही लागते
भारी वजनाचा एक क्रूस वाहण्याची ताकद!"
"ज्याला तो क्रूस वागवता येतो 
त्याच्या सोबत बारा अनुयायी असले 
तरी त्याचे प्रेषितत्व घाबरत नाही.
पण खांद्यावर क्रूस नसता कुणी बारा लाख बाजारबुणगे घेवून निघाला 
तरी त्याचा महंत होतो.
आणि महंत फक्त गादी चालवू शकतात.
मन्वंतरे घडवून आणू शकत नाहीत

संकेत मुनोत
८०८७४४६३४६
Knowing Gandhism Global Friends
changalevichar1@gmail.com