*डॉ बाबासाहेब आंबेडकर- समज-गैरसमज*
आज दिवसभर फेसबुक, whatsapp सारख्या सामजिक माध्यमातुन मित्रांशी चर्चेत अनेक समज गैरसमज आढळून आले त्याबद्दल *माझ्या अल्पअभ्यासाने संदर्भासहित काही गोष्टी मांडण्याचा हा प्रयत्न*
शाळेत असतांना आंबेडकरांबद्दल थोडेसे आकर्षण वाटायचे ते त्यांच्या काही गोष्टी पाठ्यपुस्तकात होत्या त्यामुळे, मी आत्ता जातपात मानत नसलो तरी *cast- open असे असल्यामुळे आरक्षण व ईतर काही अनुभवांमुळे सुरवातीला मला आंबेडकर फक्त दलितांचेच पुढारी वाटत सोबतच त्यांनी आपले नुकसान केले असेही वाटे.*
बी फार्मसी झाल्यावर G-PAT Entrance परीक्षेत शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी open caste मधील विद्यार्थ्यांसाठी 145 तर तर SC , NT साठी 100 च मार्क्स पाहिजे होते तेव्हा मला 140 मार्क्स पडले आणि थोडक्यात नंबर हुकला तेव्हा वाईट वाटले होते आणि आरक्षणाबद्दल चीड आली होती (पण काही काळानंतर अभ्यास केल्यानंतर आरक्षण योग्य आहे याचीही जाणीव झाली.काही लोक या आरक्षणाचा गैरफायदा घेतात व आपण त्याचे श्रेय पूर्ण समजाला देऊन बसतो हे चुकीचे आहे.)
परत आंबेडकर जयंतीला रात्री पिऊन फिरणारी मुले, आणि त्यातील ती बिभत्स गाणी ज्यात प्रबोधनाचा अंशही नव्हता उलट काही गाणी तर ईतर महापुरुषांना नावे ठेवणारी होती, त्यातील अनेक भाषणेही इतर महापुरुषांना नावे ठेवणारी होती( जसे की नोटेवर भीम चांगला दिसला असता, किंवा गांधींना शिव्या देऊन त्यावर टाळ्या मिळवणे) इ. हे पाहून आंबेडकरांबद्दलचे गैरसमज अजून वाढत गेले.
पण जस वाचन, सामजिक चळवळीतील सहभाग वाढत गेला तसे सत्य समोर येत गेले कि हे जस दाखवल जातय तस सत्य नाही.
आंबेडकर महामानव होते ते कुणा एका जातीपुरते नव्हतेच. त्यांनी आणि नेहरूंनी जर भारतीय राज्यघटना बनवण्यात मोठे योगदान दिले नसते तर आजचा भारत कदाचित वेगळा असता लोकशाही टिकली नसती.लोकशाही टिकवण्याच सगळ्यात मोठे श्रेय गांधी ,नेहरु, आंबेडकर आणि पटेल सारख्या महापुरुषांना जाते.
*आंबेडकरांचे नुसते कोट्यावधी रुपयांचे मोठमोठे पुतळे बांधण्यापेक्षा आणि दारु पिऊन नाचण्यापेक्षा #आंबेडकरांचे_विचार_डोक्यात_घेण्याची_वत्त्यांच्या_विचारावर_कार्य_करण्याची_जास्त_गरज_आहे.*
*महापुरुषांचा देव केला की त्याच्या अनुकरणाची गरज संपते*
कारण देव बनवल्यावर आपल्याला म्हणता येते की ते तर बाबासाहेब होते म्हणून त्यांना ते शक्य होते आपल्याला कसे शक्य होईल ते?
मागे कुणीतरी लिहले होते की *कागदावरचा बाबासाहेब सर्वानी वाचला पण बाबासाहेबांचा कागद कुणी नाही वाचला.*
*विचारांची कास धरून विवेकाशीलतेने वागून... वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकारून, सुशिक्षित समाजाचे घटक व्हायला हवे*, *उत्सवासोबत च या दिवशी वही-पेन-पुस्तके ही वाटायला हवीत , रचनात्मक काम करायला हवे असे वाटते.
चळवळीतील काही मित्रांनी असे काही ऊपक्रम चालु केले आहेत त्यांचे अभिनंदन पण हा ऊपक्रम सर्व जण हाती घेतील तेव्हा कुठे डॉ.आंबेडकरांच्या स्वप्नाकडे आपण वाटचाल करु
सोबतच आंबेडकरांविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज(अफवा)आहेत तेही दुर व्हायला हवेत त्या अफवा किंवा गैरसमज खालीलप्रमाणे
*1.आंबेडकरांचे राज्यघटने मध्ये काही योगदान नाही ?*
*2.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रध्वज म्हणून भगवा झेंडा बनविण्याचा आग्रह होता*
*3.आंबेडकर सावरकरांचे कट्टर समर्थक होते,*
*गांधीहत्येनंतर आंबेडकरानी सावरकरांच्या वकिलांना गुपचूप भेटून सावरकरांना गांधीहत्येतून वाचवण्याचा प्रयत्न केला*
*4.आंबेडकर कडवे मुस्लिम धर्मविरोधी होते*
*5.आंबेडकर ब्राम्हण होते व नंतर बौध्द झाले*
*6.आंबेडकर आणि गांधी एकमेकांचे कट्टर शत्रू होते*
तर विस्ताराने खालीलप्रमाणे
1)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत काही योगदान दिले नाही, आपली घटना फकत दुसऱ्या देशातील घटनांची कॉपी पेस्ट आवृत्ती आहे ?
उत्तर-
हे साफ खोटे आहे , भारतीय राज्य घटना तयार होण्यासाठी २२ समित्या निर्माण केल्या होत्या, या सर्व समित्यांचे यात खूप मोठे योगदान आहे. ब्रिटिश जाताना आम्हीच भारताचे संविधान तयार करू असे म्हणत होते. महात्मा गांधींनी त्याला ठाम विरोध केला आणि आमचे संविधान आम्ही बनवणार हे ठणकावून सांगितले. जर हे झाले नसते तर ५०० पेक्षा जास्त राजांना त्यांचे राज्य चालवण्याचे अधिकार मिळाले असते आणि भारत कधीही एकसंध झाला नसता.आपण स्वतः आपले संविधान बनवल्यामुळे हे शक्य झाले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ राजेंद्रप्रसाद आणि यासारखे अनेक विद्वान या निर्मिती प्रक्रियेत होते म्हणून आपले संविधान उत्तम झाले
2)डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रध्वज म्हणून भगवा झेंडा बनविण्याचा आग्रह होता-
उत्तर - हे साफ खोटे आहे
१० जुलै १९४७ ची गोष्ट.बाबासाहेब दिल्लीला जायला निघालेले.ते विमानात बसतेवेळी हिंदूमहासभेच्या पुढाऱ्यांनी त्यांना भगवा ध्वज अर्पण केला व आपल्या राष्ट्रध्वजाचा रंग भगवा असावा यासाठी प्रयत्न करण्याची विंनंती केली .त्या वेळी हिंदू महासभेचे नेते रावबहादूर सी.के.बोले,अनंतराव गद्रे यांना डॉ.बाबासाहेब विनोदाने म्हणाले ,"मला महाराच्या पोराला पुढे करुन तुम्ही मागे राहणार काय??दिल्लीला चला तेथे यासाठी जोरदार निदर्शने झाली पाहिजेत"मी माझ्याकडून शक्य ते सारे करेंनच" आणि आपण पाहताच आहोत बाबासाहेबांनी भगव्या ध्वजाऐवजी अशोक चक्रांकित तिरंगी झेंड्याचा स्वीकार देशासाठी केला म्हणजे अर्थात त्यात ती निवड नेहरूंची होती पण बाबासाहेबांनी त्याला विरोध केला नाही. (संदर्भ-डॉ.बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ)
3) आंबेडकर सावरकरांचे कट्टर समर्थक होते,
गांधीहत्येनंतर आंबेडकरानी सावरकरांच्या वकिलांना गुपचूप भेटून सावरकरांना गांधीहत्येतून वाचवण्याचा प्रयत्न केला.
सत्य -
हे साफ खोटे आहे ऊलट सावरकरांनी आंबेडकरांचा ऊल्लेख बाटगा असा केला आहे.
ब्रिटिशांची माफी मागून येणाऱ्या सावरकरांनी जशी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांवर टीका केली तशीच त्यापेक्षाही जास्त टीका डॉ. आंबेडकरांवर केली आहे, त्यांचे लेखन वाचले तर असे अनेक संदर्भ मिळतील
सावरकरांच्या जात्युच्छेदक निबंध या पुस्तकातील उतारा संदर्भासाठी देत आहे
*"डॉ आंबेडकर हि व्यक्ती भिक्षु आंबेडकर झाली तरी त्याचे कोणाही हिंदूस कोणचेही विशेष सोयर सुतक बाळगण्याचे कारण नाही . ना हर्ष ना विमर्श, जेथे बुद्धाने हात टेकले तेथे आंबेडकर कोणत्या झाडाचा पाला I"(उक्त पृ .२२३)*
तर सावरकरांबद्दल बाबासाहेबांनी म्हटलेले आहे कि सावरकरांनी काय कोणीही अपप्रचार करण्याऐवजी मला बुद्धासंबंधी उघड विचारावे असे आवाहन बाबासाहेबांनी केले होते त्यांनी म्हटले होते कि
*"तेव्हा अश्या नादान व बेजबाबदार लोकांच्या आपण नादी लागू नये.काही लोक म्हणतात सावरकर विष ओकले पण मी म्हणतो सावरकर आपल्या पोटातील नरक ओकले(उक्त-2 जून 1956)*
गांधींजींशी वैचारिक मतभेद असले तरी हत्येचे दुःख आंबेडकरांना ही झाले होते आणि डॉ. आंबेडकर जे करायचे किंवा बोलायचे ते उघड उघड बोलत किंवा करत हे आपल्याला त्त्यांच्या लेखनातूनही दिसून येईल त्यामुळे सावरकरांच्या वकिलांना असे गुपचूप भेटण्याचा प्रश्नच येत नाही.
4)आंबेडकर कडवे मुस्लिम धर्मविरोधी होते
सत्य-आंबेडकरांनी अनेक धर्मांची चिकित्सा केली आहे त्यात ईस्लामबद्दलही लिहले आहे-
बाबासाहेबांचे इतर लेखन वापरून हिंदू कट्टरवाद्यांकडून सामान्य मुस्लिमांना झोडपण्याचे काम सुरुये.हाच प्रकार सामान्य हिंदूंच्या बाबतीत "रिडडल्स इन हिंदुइसम"व बाबासाहेबांचे इतर लिखाण वापरून त्यांना झोडपण्याचे काम गैरहिंदू कट्टरवाद्यांकडून होतेय. खरे तर त्यांची विचारसरणी हि बुद्धिप्रामाण्यवादावर आधारित विचारसरणी आहे जी कोणत्याच धर्मातील कट्टरवाद्यांना झेपणारी नाही.
5)"आंबेडकर ब्राम्हण होते व नंतर बौध्द झाले"
अनेक मित्रांकडुन मी ही गोष्ट ऐकली आहे
सत्य - हसावे कि रडावे हे ऐकून असा हा गैरसमज आहे पण खूप सामान्य जणांमध्ये हा गैरसमज आहे
जो कुणी हुशार तो आमच्याच जातीचा अस बोलणार्या गटांनी 'हे गैरसमज पसरवले आहेत , त्यांच्या आडनावात 'कर' म्हणुन ते ब्राम्हण असेही अनेक लोक समजतात पण ते खोटे आहे त्यांचा जन्म महार जातीत झाला होता.आणि त्यांना कोणत्या हालअपेष्टा सोसाव्या लागल्या हे आपणास माहीतच असेल.
6)आंबेडकर आणि गांधी एकमेकांचे कट्टर शत्रू होते
सत्य -
हेही साफ खोटे आहे , गांधीजी आणि आंबेडकर यांच्यात मतभेद निश्चितच होते पण मनभेद नव्हते.त्यांचे काही विचार एकमेकांशी भिन्न तर काही विचार एकमेकांना पूरक होते..
*ज्या काळात आंबेडकरांनी दलितांमधील न्युनगंड घालवून त्यांना माणूसपण बहाल केले, त्याच काळात म.गांधींनी स्पृश्य माणसातील अहंगंड कमी करून त्याच्यातील पशुत्व नष्ट केले.या दोन्ही गोष्टी एकाच वेळी झाल्याने सामाजिक अन्याय मोठ्या प्रमाणात कमी झाला.*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४. ११.१९३२ रोजीचे बोटीवरून पत्र लिहिले होते त्यात त्यांनी म्हटले आहे
*"माझा बहुतेक वेळ गांधीजींची अस्पृश्यता निवारक पत्रके वाचण्यात जातो. पत्रकांतील विचार वाचून गांधीजींच्या विचारांत केवढी तरी क्रांती घडून आल्याचे दिसून येते. गांधीजींना आता `आपला माणूस' म्हणावे. कारण ते आता आपली भाषा व आपले विचार बोलू लागले आहेत.अस्पृश्यांच्या हालअपेष्टांचे गांधीजींनी एका पत्रकात केलेले यथार्थ वर्णन वाचीत असता मला वाटते की `समता' अगर `बहिष्कृत भारत' या आपल्या पत्रातील काही लेखांचे इंग्लिश भाषांतरच जणू वाचत आहोत."* [संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा
*- शंकरराव खरात*- पृ १७७]
"कुणी एका गालावर मारले तर तर दुसरा गाल पुढे करा" असे गांधीजींनी ब्रिटिशांबद्दल नाही तर अस्पृश्यतानिवारण चळवळीत म्हटलेले वाक्य आहे हे किती जणांना माहित आहे?
*सवर्ण हिंदुंनी दलितांवर एवढे अत्याचार केले आहेत की त्यामुळे चिडून कोण्या दलिताने मला सवर्ण हिंदू समजून माझ्या एका गालावर मारले तर मी त्याचा प्रतिकार करणार नाही उलट दुसरा गाल पुढे करेल,आणि तरीही आम्ही केलेल्या पापाचे परीमार्जन होणार नाही असे महात्मा गांधी म्हणाले होते.*
गांधीजींचा खून ही गोडसेने सावरकरांच्या आदेशावरून अस्पृश्यतानिवारणाचा वाढता प्रभाव थांबवण्यासाठी केला होता.55 कोटी, फाळणी हे सर्व बनाव आहेत कारण गांधीजींवर पहिला हल्ला 25 जून 1934 रोजी पुण्यातील सनातन्यांनी गांधीजींनी केलेल्या मंदिरे सर्व जातींना उघडी करा या आवाहनाला विरोध करण्यासाठी केला होता तेव्हा 55 कोटी किंवा फाळणी कसलाच प्रश्न नव्हता.
गांधीजींच्या उपोषणामुळे जी मंदिरे, विहिरी शेकडो वर्षे अन्य जातीसाठी बंद होती ती गांधीजींच्या उपोषणामुळे काही वर्षात खुली झाली. लोक एकत्र येऊ लागले आणि अनेक चांगल्या गोष्टी झाल्या. गांधीजींनी साताऱ्यातील वाई येथे स्वतःच्या मुलाचा आंतरजातीय विवाह केला तेव्हाच पुण्यात सनातनी ब्राम्हण लोकांनी सभा घेऊन गांधींचा निषेध करत त्यांच्यावर सडकून टीका केली होती पण गांधी घाबरले नाहीत. त्यानंतर लगेच 1934 मध्ये सनातनी लोकांनी त्यांच्यावर बॉम्ब टाकून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला पण तो फसला.
सुरेश सावंत सरांनी याबाबत लिहले आहे
गांधीजींशी बाबासाहेबांचे मतभेद काय होते, ते किती तीव्र होते, हे आपण पाहिले. पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे स्वातंत्र्य काँग्रेसला मिळालेले नसून देशाला मिळाले आहे आणि म्हणून पहिल्या मंत्रिमंडळात देशातील विविध राजकीय प्रवाहांचे प्रतिनिधीत्व असायला हवे ही भूमिका घेण्यात गांधीजींचा पुढाकार होता. बाबासाहेबांचा या मंत्रिमंडळात समावेश करण्याची सूचना गांधीजींचीच होती, घटना समितीत बाबासाहेब निवडून आले तो मतदारसंघ पाकिस्तानात गेल्यावर दुसऱ्यांदा ते निवडून आले ते मुंबई इलाख्यातून. यासाठीचे सहकार्य काँग्रेसने दिले होते. मसुदा समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब निवडले गेले. यामागेही गांधीजी होते,
लखलखीत गुणवत्तेमुळेच बाबासाहेबांना हा बहुमान मिळाला, हे उघडच आहे. तथापि ते गांधीजीमुळेच शक्य झाले नाहीतर टाळणेही शक्य होते (आत्ता वेगवेगळ्या खात्यावर कोणतीही गुणवत्ता नसणारे कसे लोक भरले आहेत हे आजही आपण पाहु शकता ते FTII, RBI असो वा ईतिहास संशोधन खाते, रघुराम राजन सारखी हुशार व्यक्ती ही हटवली जाते हे आपण पाहतोच),राष्ट्रीय हिताचा विचार करताना मतभेद आड येऊ देता कामा नये, या गांधीजींच्या भूमिकेचा यथोचित आदरही करायला हवा.
ज्या मूल्यांवर आधारित संविधान तयार करण्यासाठी बाबासाहेब हवे असे गांधीजींना वाटत होते, ती मूल्ये या दोघांची समान होती. संविधानाच्या प्रास्ताविकात नमूद झालेली ती हीच दोहोंची सामायिक मूल्ये. जर त्या काळात तीव्र मतभेद असतानाही या सामायिक मूल्यांसाठी ते एकमेकांना सहकार्य करत होते, एकत्र काम करत होते, तर आज ही मूल्ये धोक्यात आलेली असताना त्यांच्या वारसदारांनी परस्परांत तसेच सहकार्य का करु नये?
बाबासाहेबांनी जर त्यावेळी गांधीजी किंवा नेहरु यांच्या सगळ्या भूमिका पटल्या तरच मी घटना लिहीन अशी अट ठेवली नाही किंवा गांधी-नेहरुंनी बाबासाहेबांकडून ठेवली नाही, तर आपण तरी ती आज का ठेवावी? ते जसे परस्परपूरक राहिले, तसेच आपणही राहू शकतो
मार्क्स, गांधी, आंबेडकर तसेच अन्य महामानव यांच्या वैचारिक समन्वयाचा आग्रह न धरता त्यांच्यातील परस्परपूरकत्व शोधणे व त्या पायावर व्यापक एकजुटीचा कार्यक्रम आखणे आणि आपल्या संविधानातील प्रगत मूल्यांना आव्हान देणाऱ्या शक्तींना पराभूत करणे हा संकल्प बाबासाहेबांच्या १२६ व्या जयंतीनिमित्ताने आपण करायला हवा.
असो डॉ आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन
वरील लिखाणात काही चुकले असल्यास क्षमस्व
जय भीम , जय भारत , जय जगत
संकेत मुनोत
8087446346
14-एप्रिल-2017
Comment, Share ,Follow and Subscribe.