AddThis code

Sunday, April 24, 2022

सिगरेट चे व्यसन नेमकी काय कारण असावे?


#सिगरेट 
सकाळी मॉर्निंग वॉक नंतर नाश्ता करावा म्हणून जवळच्या स्नॅक्स सेंटर मध्ये गेलो..पोह्यांची ऑर्डर देणार तेवढ्यात जवळपास बघितले तर सगळीकडे नुसता सिगरेटचा धुर. जागा बदलूनही फायदा नव्हता  ४ पैकी ३ टेबलवर अशीच परिस्थिती म्हणून तिथून बाहेर पडलो. 
त्याला स्नॅक्स सेंटर म्हणावे की स्मोकींग सेंटर ते समजत नव्हते..त्या रेस्टॉरंट मध्ये मुख्य  काउंटरवर मोठे असे सगळ्या सिगरेटच्या बॉक्सेस असलेले  पॅकिंग जाहिरात करून लावलेले होते.जवळच 4-5 बिल्डिंग  सोडून एक मोठे कॉलेज आहे कदाचित त्याच्यामुळेही कदाचित हे केले असावे..
रेस्टॉरंट मालकाला विचारले की सकाळी समोरच्या गार्डन मधून फिरून येणाऱ्या लोकांना समजा इथे नाश्ता करायला यायचे असेल तर त्यांनी कुठे बसायचे? इथे काही No smoking Zone वगैरे आहे का? तर नाही म्हणाला ..पण जास्त लोक असतील तर आतमध्ये तात्पुरती खुर्च्या टाकून व्यवस्था करू शकू असे म्हणाला...

 सध्या  हुक्का आणि अनेक नव-नवीन ट्रेंड यात आले आहेत. तर त्याबद्दल आज सहज आठ्वलेल्या  काही गोष्टी ...

या व्यसनाची नेमकी सुरवात कुठून होते? ते माहित नाही पण मला वाटते काही ठिकाणी कुतुहलापोटी ती होत असावी. लहानपणी ५-६ वर्षाचा असताना एका धार्मिक शिबिरात सिगरेट , गुटखा , दारू वगैरे घ्यायचे नाही अशी शपथ घेण्यासाठी एका साधूंनी उभे राहायला सांगितले होते तेव्हा ती घेतली होती त्यामुळे कि गांधीविचारांमुळे कि आणखी कशामुळे माहित नाही पण मनात सिगरेट गुटखा ई. बद्दल आकर्षण नाही आणि पूर्वी तर इतरांचीही सोडवावी वाटे ...म्हणजे धर्माचा प्रभाव म्हणता येणार नाही कारण मी कितीतरी धार्मिक लोक सिगरेट पिताना पहिले आहेत.. ११ वीत असताना एका मित्राला "तु सिगरेट सोडणार असशील तर मी त्याबदल्यात तुला पैसे देत जाईल, तुझी काही कामे करत जाईल" असे म्हटलो होतो..असे आठवते.अर्थात मी म्हटलो म्हणून त्याने काही ते सोडले नाही..पण हीच तळमळ कायम राहिली आणि चळवळीत काही  लोकांची सिगरेट सोडवण्यात थोडेफार  यश मिळाले..

12वीत असताना एक वर्गमित्र सिगरेट ओढायचा तो म्हणायचा की 'तेरे नाम' चित्रपट पाहून त्याला सिगरेट प्यावी असे वाटू लागले..बी-फार्मसी करताना दुसऱ्या वर्षाला असताना एक रूममेट सिगरेट-दारू सगळेच करायचा ...त्याचे म्हणणे होते की "जिंदगी मे आये हो और ये नही किया तो क्या जिंदगी जिया? और जवानी में नही करोगे तो कब करोगे..?" त्यांच्या सोबत राहून १-२ शिव्या मी शिकलो होतो पण  सिगरेट वगैरे बद्दल तेव्हा ही आकर्षण वाटले नाही...बी फार्मसीतच शेवटच्या वर्षाला असताना आम्ही नाईट मारायचो (म्हणजे रात्रभर जागून पेपर चा अभ्यास करायचो) त्यावेळी  झोप लागू नये  म्हणून काही मित्र सिगरेट आणि हुक्का की त्यासारखे काही तरी ओढायचे त्यांचे म्हणणे असे होते की ते ओढल्याने झोप लागत नाही आणि Concentration लवकर होते पण मग मी आणि माझे काही मित्र तसे न करताही आमचा अभ्यास होतच होता ना? झोप आम्हालाही यायची पण ती येऊ नये म्हणून चहा वगैरे प्यायचो..
बी फार्मसी पूर्ण झाल्यावर  एका मोठ्या फार्मा कंपनीत २ महिने MR होतो तेव्हा तिथेही अनेक जण म्हणाले की  वरतून जास्त प्रेशर आले, कामाचा लोड असला की ओढावीच लागते सिगरेट, नंतर जवळपास 7-7.5 वर्ष IT कंपनीत (Semi IT )होतो तिथे तर सिगरेट चे स्पेशल Smoking Zone असायचे पण तेव्हाही कधी गरज पडली नाही.

लोक म्हणतात जेव्हा ब्रेक अप होते किंवा आयुष्यात एखादी खूप मोठी वाईट घटना घडते तेव्हा लोक व्यसनाकडे जास्त  वळतात... एकदा आयुष्यात अश्या मोठ्या धक्यातूनही जावे लागले म्हणजे त्यावेळेस मानसिक ताण एवढा होता की आत्महत्या करावी वाटे. त्यावेळेस काहींनी सरळ दारू आणि सिगरेट पिऊन मन मोकळे करण्याचा पर्याय सांगितला पण तेव्हाही त्याची गरज वाटली नाही...
 सध्या तर एका चळवळीतील मोठ्या व्यक्तीने चेष्टेने म्हणा किंवा प्रेमाने म्हणा असेही म्हटले कि तुला जर जास्त लोकात मिसळायचे असेल तर सिगरेट, दारू, मांसाहार वगैरे करावे लागेल ,आणि  प्रमाणात केले कि ते वाईट नसते,  व्यसनेच माणसांना एकत्र आणतात, त्यासाठी पुराणातील सोमरसा पासून ते आत्तापर्यतची अनेक उदाहरणे त्यांनी  दिली ..आपण यामुळे जास्त टॅक्स देऊन सरकार ला कसे सहकार्य करून देश उभारण्यात मोठा  उचलतो हेही सांगितले .. मी त्यांना उत्तर दिले नाही पण घेतलीही नाही अश्या वेळी मला गांधी आठवतात आपल्या कुणाही पेक्षा जास्त मिसळणारा हा व्यक्ती म्हणजे आजही जगात कुठेही जा गांधी माहित नाही असा माणूस दिसणार नाही.. त्याला का बर अश्या गोष्टींची गरज पडली नाही शिवाय त्यांच्यामुळे लाखोंनी अशी व्यसने सोडली म्हणजे सरदार पटेल गांधींना भेटण्यापूर्वी ब्रीज खेळायचे , सिगरेट प्यायचे ते सगळे त्यांनी गांधी भेटल्यावर सोडले....पण याच कारणामुळे सामाजिक चळवळीतील काही मित्र गांधींना मागासही म्हणताना दिसले आणि नेहरू आणि काही महापुरुष  सिगरेट पित होते म्हणून त्यांना आधुनिक म्हणत होते पण मला वाटत त्यांनी नेहरूही व्यवस्थित वाचलेले नसतात. नेहरूंनी स्वतः कधीही या गोष्टींचे समर्थन केले नाही ना कधी कुणाला तुम्ही असे व्यसन करा असे म्हटले..ती त्यांची मर्यादा होती..प्रत्येक व्यक्तीच्या काही मर्यादा असतात आपल्याही आहेत .. त्यांनी ज्या प्रमाणे आधुनिक भारताची निर्मिती केली जो त्याग आणि बलिदान दिले ते सोडून सिगरेटचा फोटो च फिरवणे हे चुकीचे आहे..
आता कुंभमेळ्यातील हजरो साधू सिगरेट, चिलीम आणि इतर तत्सम पदार्थ ओढतात आणि त्यांचे फोटो आदर्श म्हणून दाखवले जातात.. पण मला तर हे साधू वाटत नाहीत..संत तुकाराम, राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अश्या व्यसनी लोकांचा पुरेपूर समाचार घेतला आहे..
असो जे मित्र सिगरेट पितात ते काही माझी शत्रू नाहीत. यातील अनेक मित्र मनाने बुद्धिमान आणि समाजासाठी चांगले काम करणारे आहेत आणि ते सिगरेट किंवा अन्य काही पितात म्हणून आमच्या मैत्रीत कधीही अडचण आली नाही 
पण मनापासून वाटते कि सिगरेट सोडण्यासाठी मनापासून प्रयत्न व्हायला हवेत. Smoking  तुम्हाला आणि तुमच्या जवळ राहणाऱ्या लोकांना सर्वानाच घातक आहे...
वरती माझे अनुभव सांगण्याचा हेतू हाच होता कि माझ्यासारखा अगदी सामान्य मनुष्य जर हे टाळू शकतो तर आपल्यापैकी कोणीही ते टाळू शकतो ..त्यापेक्षा करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत नाही का ?

चूकभूल क्षमस्व
संकेत मुनोत 
8668975178
changalevichar1@gmail.com
#randomthoughts
Comment, Share ,Follow and Subscribe.

No comments:

Post a Comment