AddThis code

Wednesday, July 10, 2024

महत्वाची गोष्ट

पुण्यात औंध मध्ये मी राहतो त्या परिसरात बहुतांश रिटायर्ड लोक राहतात. यातली जवळजवळ सगळी लोक आपल्या उमेदीच्या काळात फार यशस्वी होती. आज त्यांचे वय ६०-७०-८० च्या घरात आहे. औंध मधल्या चांगल्या लोकेशनला त्यांचा मोठा फ्लॅट आहे. बहुतांश लोकांची मुलं परदेशात स्थिर झाली आहेत. जसजसे शरीर थकत जाते तसतसे परावलंबित्व वाढत जाते. आज बहुतांश लोक नोकरांवर किंवा नर्सेस वर अवलंबून आहेत. ज्यांना नोकर चाकर परवडत नाही, ते जमेल तसे स्वतःची कामे स्वतः करतात. या पिढीला ऑनलाइन ऑर्डर करणे, रिचार्ज करणे, UPI वापरून दुकानात पेमेंट करणे इत्यादी गोष्टी जमत नाहीत. त्यामुळे बऱ्याच वेळा ते पैसे काढण्यासाठी बँकेत रांगेत उभे राहतात, खूप जड किराणा सामान, भाजीपाला कसेबसे खांद्यावर उचलून घरी नेताना दिसतात. मोबाईल रिचार्ज, लाईट बिल भरणे इत्यादी गोष्टींसाठी सुद्धा ते प्रत्यक्ष जातात. 
आज भर पावसात एक आजी छत्री आणि सामानाची पिशवी सांभाळत रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत कशाबशा चालत होत्या. या सगळ्या कसरतीत जर त्या चुकूनही पडल्या तर दुखापत होऊ शकते, त्यांना वेळेवर दवाखान्यात न्यायला सुद्धा कोणीच नाही. 
मागे एकदा सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना, एका सोसायटीच्या एका फ्लॅटमध्ये बाहेरच्या गॅलरीत शिडी टाकून अग्निशमन दलाचे जवान त्या फ्लॅटमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. उत्सुकतेपोटी मी थांबलो काय चालू आहे ते बघण्यासाठी, तर कळले की त्या फ्लॅटमध्ये एक वयस्कर आजोबा एकटेच राहायचे. काही दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा, वास यायला लागला म्हणून सोसायटीतल्या इतर लोकांनी तक्रार केली तर कळाले की आजोबांचा आत मृत्यू झालाय. त्यांची मुलं नातवंड प्रदेशात स्थिर झाली आहेत. 
या वृद्धांपैकी बऱ्याच जणांनी आपल्या तरुणपणी आपलं करिअर गाजवलेले आहे. चांगला धनसंचय केला आहे. मुलांना चांगल्या क्वालिटीचे शिक्षण देऊन परदेशात किंवा इतर ठिकाणी सेटल करवले आहे. ते राहतात त्या फ्लॅटचे मूल्यांकन सुद्धा करोडोंच्या घरात गेले आहे. पण आज आयुष्याच्या संध्याकाळी ते एकटे पडलेत.
एक आजी एकट्याच फिरत असतात, कोविड मध्ये त्यांच्या पतीचा आणि मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर सुनेने नातवंडांसह घर सोडून दिले. सत्तरीच्या घरातल्या आजी इतक्या मोठ्या फ्लॅटमध्ये एकट्या पडल्या. गोकुळासारखे भरलेले घर अचानक ओसाड झाले.

ज्यांचे सोशल लाईफ चांगले असते त्यांना बऱ्याच वयापर्यंत चांगले मित्र मैत्रिणी असतात. त्यांच्याबरोबर एकत्र येणे, मॉर्निंग वॉक करणे वगैरे गोष्टी घडतात. तरीही कालांतराने त्या ग्रुप मधला एक एक मेंबर गळत जातो. काही सुज्ञ लोक लवकर आपले घर सोडून चांगल्या दर्जाच्या ओल्ड एज होम मध्ये शिफ्ट होतात. पैसे देऊ शकणाऱ्या लोकांसाठी चांगल्या फॅसिलिटी असलेले ओल्ड एज होम पुण्यात आहेत. पण आपले घर सोडून तिकडे जाणे हा बऱ्याच जणांसाठी भावनिक दृष्ट्या अवघड पर्याय असतो.
या पिढीच्या काळात दोन ते तीन मुले होणे नॉर्मल होते. माझ्या पिढीत तीच मुलांची संख्या एक किंवा शून्य वर आली आहे. दोन-तीन मुले असूनही इतक्या उच्चभ्रू समाजातील वृद्धांवर ही वेळ येत असेल तर माझ्या पिढीपर्यंत ही समस्या नक्कीच खूप गंभीर पातळीवर गेलेली असेल.
आता सरासरी वयोमान म्हातारे होत गेलेल्या देशांमध्ये अतिशय गंभीर प्रश्न तयार झाले आहेत. उदाहरणार्थ चीन, जपान. वृद्ध लोकांना दूरच्या शहरांमध्ये नेऊन सोडणे, चुकवणे, घराबाहेर काढणे इत्यादी समस्या चीन जपान बरोबर भारतातही सुरू झाल्या आहेत.
आर्थिक नियोजनाविषयी बोलताना जेव्हा माझ्या पिढीतले लोक रिटायरमेंट प्लॅनिंग विषयी म्हणतात की माझे मुलं हेच माझे रिटायरमेंट प्लॅनिंग आहे तेव्हा मला हसू येते.
एका विशिष्ट वयापर्यंत आपल्या करिअर प्लॅनिंग मध्ये रिटायरमेंट प्लॅनिंग हे व्हायला हवे. यात फक्त आर्थिक नियोजनच नाही तर आपल्या आरोग्य विषयी, सोशल लाईफ विषयी, वेळ पडल्यावर पैसे देऊन नर्सेस ची सर्विस घेण्याविषयी, वाईटात वाईट चांगल्या क्वालिटीच्या वृद्धाश्रमामध्ये शिफ्ट होण्याचे प्लॅनिंग आणि त्याची आर्थिक तरतूद करून ठेवायला काय हरकत आहे?
इन्फ्लेशन मुळे आपली लाईफ स्टाईल मेंटेन करण्यासाठी आजच्या पेक्षा अजून तीस वर्षांनी नक्कीच सहा सातपट खर्च वाढणार आहे. हे सगळे विचारात घेऊन रिटायरमेंट प्लॅनिंग करता येईल का?
शेवटी भविष्य आपल्या हातात नाही पण आज आपण किती तयारी करू शकतो ती करायला हवी. भविष्यात अनेक सरप्राईजेस येणार आहेतच. शक्य तितके आर्थिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या तयारी ठेवायला काय हरकत आहे?
लेख - Amol sale 

आजच आपले आर्थिक नियोजन करा 
संकेत मुनोत 
आर्थिक तज्ञ आणि विमा सल्लागार 8668975178


No comments:

Post a Comment