त्यानिमित्ताने मांडलेले विचार
मला डॉ. नरेंद्र दाभोळकर थोडे उशीरा समजले अगदी त्यांच्या मृत्यूनंतर अधिक समजले असेही म्हणता येईल.
त्यापूर्वी मनात थोडे गैरसमज होते की #अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे धर्मविरोधी वगैरे पण प्रत्यक्ष काम बघितले तेव्हा समजले की हे तर धर्मसुधारणा करण्याचे काम आहे.
घरातुन कचरा काढला तर काय होईल ते घर स्वच्छ होईल आणि अस्वच्छतेमुळे होणारी रोगाराई दूर होईल त्याच प्रमाणे आपल्या धर्मातून अंधश्रद्धा दूर झाल्या तर काय होईल धर्म अजून चांगला होऊन मानवतेला फायदा होईल. नाहीतर चुकीच्या अंधश्रद्धांमुळे होणारे लोकांचे मोठे नुकसान आपण पाहतच आहोत. युरोप, अमेरिका सारखे देश सुधारले आणि पुढे गेले ते वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारल्यामुळेच. आपल्यातील अनेक लोकांची इच्छा असतें कि काही करून विकसित देशात शिफ्ट व्हावे किंवा त्यांच्यासारखी समृद्धी इथे यावी पण त्यासाठी त्यांच्यासारखा वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारण्याची आपली तयारी असतें का? तो स्वीकारला तर आपल्याकडे सुद्धा चांगला बदल घडेल.
डॉ दाभोळकर हे पार्श्वनाथ, महावीर, बुद्ध, तुकाराम, कबीर, विवेकानंद , फुले आणि गांधी आणि यांचे विचार पुढे घेऊन जात होते.
एक काळ असा होता की वैदिक ब्राम्हणांनी मोठ्या प्रमाणात शोषण सुरु केले होते. आम्ही ज्या कुळात जन्मलो तो श्रेष्ठ बाकी सगळे शूद्र. ज्ञान घेण्याचा आणि देण्याचा अधिकार फक्त आम्हाला. आम्ही सांगू तेच शास्त्र आणि देवाकडे जायचे असेल तरी आमच्या मध्यस्थीशिवाय जाता येणार नाही, आमच्याकडून मोठं-मोठे यज्ञ करावे लागतील, पशु बळी, नर बळी द्यावे लागतील मग तुम्ही ईश्वराला प्रसन्न करू शकाल, स्त्री केवळ उपभोग्य वस्तू. त्या काळात भले तो राजा असेल तरीही त्याला हे वैदिक नियम पाळावेच लागत. पण पार्श्वनाथ, महावीर आणि बुद्ध आले आणि त्यांनी ज्ञान सर्वांसाठी खुले केले, स्वतःच्या कर्माने कोणीही ईश्वर बनू शकते हे सांगितले सोबत पशुबळी, नरबळी बंद करून अहिंसा परमो धर्म सांगणारी, स्त्रीला केवळ उपभोग्य वस्तू न मानणारी नवी व्यवस्था निर्माण केली. संत कबीर यांनी हेच सांगितले पुढे जाऊन संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांनीही सामान्य माणसाला सहज समजेल असा ईश्वर आणि तो मिळवण्याचा मार्ग सांगत मध्यस्थ नाकारला. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सर्वसामान्यासाठी बंद असलेली शिक्षणाची दारे खुली केली. राजकारण, धर्मकारण, समाजकारण यांच्या मध्ये ठराविक उच्चभ्रू लोकांचेच वर्चस्व होते. स्वातंत्र्य मिळाले काय नाही मिळाले काय आमची परिस्थिती वाईटच राहणार असे सामान्य लोकांचे होते कारण ब्रिटिश जाऊन पेशवाई परत आली तर त्यांचे आयुष्य सुधारणार नव्हते तर अजून वाईट होणार होते, स्त्रीयांना तर चूल आणि मुल याबाहेर पडण्याचा अधिकार नव्हता, पडदा, घुंगट, बुरखा आणि अनेक प्रथा होत्या त्यामुळे हे कोणीही टिळकांच्या काळापर्यंत स्वातंत्र्यलढ्यात नव्हते पण गांधीजींनी सामान्य माणूस आणि स्त्रियांना स्वातंत्र्यलढ्यात आणून या गोष्टींवर मात केली. आपल्या पूर्वी शेकडो वर्ष आधी स्वातंत्र्य मिळुनही अनेक विकसित देशात महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता त्यासाठी अनेक दशके महिलांनी रस्त्यावर उतरून संघर्ष केला आणि तो आज मिळाला पण आपल्याला स्वातंत्र्यासोबतच तो मिळाला कारण गांधीजींनी स्वातंत्र्यलढ्यात स्त्रियांना सहभागी करून घेऊन लोकांची मानसिक तयारी केली होती.
पार्श्वनाथ, महावीर, बुद्ध हे आहे ती विषमतावादी व्यवस्था स्वीकारून राजा बनून सहज पुढे जाऊ शकत होते. स्वामी विवेकानंद, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा आजच्या ढोंगी बाबांच्या सारखे लोकांची दिशाभूल करून स्वतःचा दिव्य दरबार भरवून चमत्काराचे सोंग करत ऐशोआरामात जीवन जगू शकले असते. महात्मा फुले यांचा उद्योग आणि संपत्ती त्याकाळी टाटांच्या पेक्षाही मोठी होती तेही इथल्या काही नवाब आणि पेशव्यासारखे विलासी आयुष्य जगू शकत होते. महात्मा गांधीही मोठे बॅरिस्टर होते आणि त्यांचे आफ्रिकेतील उत्पन्न मोठे होते, पण हे सर्व सोडून या लोकांनी वेगळ्या ध्येयावर कार्य केले ज्याचा फायदा आज आपल्या सर्वांना मिळतोय.
त्याच प्रमाणे डॉ. नरेंद्र दाभोळकर हे MBBS झालेले मोठे डॉक्टर होते, हॉस्पिटलही चांगले चालत होते आणि त्यात ते राष्ट्रीय, आंतर राष्ट्रीय स्तरावरचे कबड्डी प्लेयर पण होते. मस्त आपले हॉस्पिटल चालवत परदेशीं कंपन्यांच्या ट्रिप करत अतिविलासी आयुष्य जगू शकत होते पण त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचा मार्ग निवडला आणि लाखो लोकांना फायदा झाला. अनेक नरबळी थांबले, अनेक बुवा बाबांकडून महिलांवर होणारे अत्याचार, नग्न धिंडी, वाळीत टाकणे, अनेक मंदिरातील पशुबळी थांबले आणि अजून असंख्य बदल झाले.
मोबाईल, टीव्ही, गाडी ही विज्ञानाची सृष्टी आपण घेतली पण दृष्टी नाही घेतली ती घेतली तर आपण, आपला समाज, देश आणि हे जग अधिक पुढे जाऊ शकेल, अजून समृद्ध होऊ शकेल.
ती दृष्टी घेऊया सोबत या लोकांनी जश्या आपल्या आयुष्यात निर्भयपणे ठाम भूमिका घेतल्या तश्या छोट्याश्या का होईना भूमिका घेऊया..
खूप सारे प्रेम... ❤️❤️
विवेकाचा आवाज बुलंद करूया...
आपलाच
संकेत मुनोत
8668975178
No comments:
Post a Comment