AddThis code

Monday, July 1, 2024

टर्म इन्शुरन्स प्लॅन मिळण्यापूर्वी होणारे क्लिष्ट चेक अप आणि कागदपत्र पडताळणी ( Documentation )

अनेक Advisors किंवा एजन्ट टर्म इन्शुरन्स सुचवत नाहीत त्याऐवजी साधे सेविंग प्लॅनस सुचवतात. त्याला एक महत्वाचे कारण म्हणजे टर्म इन्शुरन्स पॉलिसी सुरु होण्यापूर्वी होणारे strict check up आणि कागदपत्र पडताळणी आणि त्याबद्दलची प्रोसेस.या पडताळणी प्रोसेसमध्ये मध्येच काही जण माघार घेतात. कारण त्यांना वाटते इतर policy मिळतात तशी ही पण पटकन मिळावी, एवढी प्रोसेस कशाला करावी. मग एवढी मेहनत घ्या आणि त्यातही मध्ये काही झाले तर client पुढे जाणार नाही मग आपली मेहनत वाया जाणार, म्हणून अनेक जण टर्म इन्शुरन्सच सुचवत नाहीत.
यातही कंपनी जेवढी चांगली तेवढी त्याची किंमत जास्त असते आणि प्रक्रिया पण मोठी असते पण त्या कंपन्याची क्लेम सेटलमेंट प्रक्रिया पण चांगली असते आणि rejection चे प्रमाण कमी असते. तेच नवख्या आणि जास्त प्रोसेस न करणाऱ्या कंपन्यातून क्लेम रिजेक्ट होण्याची शक्यता जास्त असते. ऑनलाईन मध्ये तर याच्या 80% पेक्षा जास्त fraud केसेस समोर आल्या आहेत.

आपण जे काही करतो ते कुटुंबासाठी करतो मग त्यांच्यासाठी आपला टर्म इन्शुरन्स काढणे  अन्न, वस्त्र, निवारा एवढेच आत्यावश्यक आहे हे आपण समजून घ्यायला हवे. अनेक विकसित देशांमध्ये Health Insurance आणि इतर अनेक प्रकारचे इन्शुरन्स compulsary आहेत. आपल्या इथे याबद्दल फारसे प्रबोधन नाही.
असो Term Insurance आणि Health Insurance हे 2  आर्थिक नियोजनाचे  मुख्य खांब आहेत. हे जर नसतील तर तुम्ही कितीही FD , SIP, saving, सोने किंवा इतर काहीही घ्या त्या सर्वांची इमारत एका दिवसात कोसळून तुम्ही उध्वस्त होऊ शकता.  त्यामुळे सर्वात आधी ते करा.
त्यासाठी जो वेळ लागेल प्रक्रिया लागेल ती होऊ द्या कारण ते तुम्हाला 50 लाख ते कोट्यावधी रुपये तुमच्या छोट्याश्या premium च्या बदल्यात देणार आहेत तर तेवढी पडताळणी ते करणारच. तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला 2 लाख जरी दिले तरी तो  त्या बदल्यात तुमच्या कुटुंबाला  50 लाख किंवा 1-2 कोटी देणार आहे का? नाही ना? त्यामुळे ही प्रक्रिया होते पण ती आवश्यक असते. 
कुठलाही प्रामाणिक आर्थिक सल्लागार तुम्हाला सर्वात आधी Term Insurance आणि Health Insurance सुचवेल मग इतर गोष्टी सुचवेल. जर ते सुचवत नसेल तर एकतर तो अप्रामाणिक आहे किंवा त्याला आर्थिक नियोजना बद्दल फारसे माहिती नाही. 
काही लोकांचे म्हणणे असतें कि आज 1 कोटीची किंमत आहे पण अजून 20 वर्षांनी 1 कोटीची किंमत तेवढी राहणार नाही तर आज असेही प्लॅन्स आहेत ज्यांचे कव्हर काळानुरूप वाढत जाते आज कव्हर 1 कोटी असेल तर 20 वर्षानी कव्हर 20-30 कोटी असेल. फक्त यात निवड करताना काळजीपूर्वक करायला हवी. नाहीतर तुम्ही घेऊन किंमत देऊन त्याचा क्लेम तुम्हाला नाही मिळाला तर त्याचा काय फायदा? इथे खूप गोड-गोड बोलून नंतर गळा कापणारेही लोक आहेत, जे नंतर तुमचा फोनही उचलणार नाहीत. त्यामुळे जो स्वतःचे शब्द जपून वापरतो, प्रामाणिकपणे काम करतो, स्वतःच्या फायद्यापेक्षा तुमचा जास्त विचार करतो अश्या तज्ञ व्यक्तीकडुन हे घेणे म्हणजे निर्धास्त होणे आहे. 

आपल्यापैकी अनेकांना अमेरिकेचे, विकसित देशांचे, त्यातील लोकांचे आकर्षण असते पण आपल्या लोकांना हे माहित आहे का कि तेथील लोक टर्म, हेल्थ आणि इतर इन्शुरन्स सर्वात आधी काढतात कारण ते आपल्या जबाबदारांच्या प्रति प्रॅक्टिकल असतात भावनिक नसतात. त्यामुळे तेथे लोकसंख्या कमी असुनही हजारो लाईफ इन्शुरन्स कंपन्या आहेत तर आपली लोकसंख्या जगात 1 नंबर असूनही फक्त 21 लाईफ इन्शुरन्स कंपन्या आहेत.
असो अधिक माहिती प्रत्यक्ष ऑनलाईन किंवा ऑफलाईन भेटून बोलू 

आपलाच 
संकेत मुनोत 
आर्थिक तज्ञ आणि विमा सल्लागार 
प्रामाणिक सल्ला उत्तम सेवा 
8668975178

Sunday, June 23, 2024

तिचा टर्म इन्शुरन्स काढला का? होय तिचाच?

तिचा टर्म इन्शुरन्स 
आश्चर्य वाटते ना? अनेक घरात आजही त्याचा म्हणजे घरातील पुरुषाचा टर्म इन्शुरन्स काढला जातो पण स्त्रीचा नाही. अर्थात त्याचा काढणारेही खूप कमी असतात कारण आपल्या देशात आजही टर्म इन्शुरन्स चे महत्वच समजत नाही. 
होय, हे खरे आहे कि टर्म इन्शुरन्स कमवत्या व्यक्तीचाच निघतो आणि अजूनही अनेक घरी पुरुषांवरच सगळा आर्थिक भार असल्याने त्यांचा टर्म इन्शुरन्स असलाच पाहिजे कारण तो नसला तर पुढे आपल्यानंतर कुटुंबाचे हाल होतात. म्हणजे ज्याचे कुणाचे आपल्या कुटुंबावर प्रेम आहे त्याने हे केलेच पाहिजे. एकवेळ फिरण्यासाठी नाही गेला, एखादी गाडी, नवीन वस्तू नाही घेतली तरी चालेल पण हे सर्वात आधी केले पाहिजे. यात फक्त मृत्युंनंतरच भेटते असे नाही तर जिवंत असतानाही अपंगत्व आले तरी मोठी रक्कम मिळते.
म्हणजे माझे एक परिचित ते काही वर्षांपूर्वी ट्रेनने घरी चालले होते तेव्हा त्यांना कोणी धक्का दिला कि चक्कर येऊन पडले माहित नाही पण पायावरून ट्रेन गेली आणि बेशुद्ध झाले. नंतर दोन्ही पाय  कापावे लागले. पत्नी चांगली मिळाल्याने ती आज अनेक जबाबदाऱ्या घेते . अपंगत्व आल्याने एक गोष्ट ही झाली कि ते आता कुठले काम करू शकत नाहीत आणि घराचे उत्पन्न पूर्ण बंद झाले. यात चांगली गोष्ट ही कि त्यांनी एक पॉलिसी काढली होती त्यातून त्यांना जवळपास 30 लाख रुपये मिळाले आणि पुढे maturity लाही मोठी रक्कम मिळणार आहे. राहिलेले सगळे हप्ते त्यांना अपंगत्व आल्याने ती कंपनी भरणार आहे. बँक, mutual फंडस्, सोने, रियल इस्टेट किंवा इतर कोणी एवढे पैसे दिले असते किंवा पुढची जबाबदारी घेतली असती ? अर्थात त्याही गोष्टी कराव्यातच हळूहळु पण आधी पाया पक्का केल्यावर. पाया पक्का नसेल तर या सगळ्या गोष्टी विकाव्या लागतात आणि कर्ज घेऊन स्वतःची स्वप्ने तोडावी लागतात.
असो आपण तिच्या टर्म इन्शुरन्स बद्दल बोलत होतो तर आता स्त्रियाही कमवत्या झाल्या आहेत आणि गृहिणीलाही कमी जबाबदाऱ्या नसतात. एखाद्या घरी जेव्हा स्त्रीचा मृत्यू होतो किंवा तिला अपंगत्व येते तर पतीचे आणि मुलांचे म्हणजे कुटुंबाचे हालच होतात, कारण त्या सगळ्या जबाबदाऱ्या एका व्यक्तीवर येऊन पडतात. त्यामुळे टर्म इन्शुरन्स घरातील स्त्रियांचाही काढायलाच हवा.
यात अनेक जण एक कारण देऊन काढत नाहीत कि "मी गेल्यावरच मिळणार जिवंत असताना काही नाही मग काय फायदा? " तर "भरला तेवढा प्रीमियम रिटर्न मिळतो" अश्या पॉलिसी ही आहेत किंवा ते "भरलेले पैसे इन्व्हेस्ट होऊन नंतर महागाई नुसार मोठी रक्कम मिळते" असेही अनेक पर्याय यात आहेत जे लोकांना माहीतच नाहीत. 
तर नवरा बायको दोघांनीही टर्म इन्शुरन्स काढाच शिवाय आपल्या मुलांनाही ते जसे वय वर्षे 18 च्या वर जातील तसे त्यांचाही लगेच काढा. कारण वय जेवढे कमी तेवढा प्रीमियम खूप कमी लागतो. 

फक्त हे काढतांना निवड काळजीपूर्वक करा. ऑनलाईन जाहिरातीना बळी पडून असाच काहीतरी काढू नका.प्रामाणिक आणि तज्ञ व्यक्तीशी बोलून, व्यवस्थित चर्चा करून काढा कारण मिळणारी रक्कम कोटी मध्ये असते. 100-200 रु वाचवण्यासाठी  ऑनलाईन काढला आणि क्लेम मिळाला नाही तर तुमच्या घरचे तिकडे चकरा मारत बसणार नाहीत ते म्हणतील माणूसच गेला तर आता आम्ही काय चकरा मारू इकडे. कारण नवीन कंपन्यामध्ये Rejection चे म्हणजे क्लेम न देण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 50% पेक्षा जास्त आहे.
अधिक माहिती साठी प्रत्यक्ष ऑनलाईन किंवा ऑफलाईन भेटून बोलूया 

आपलाच 
संकेत मुनोत 
आर्थिक नियोजन तज्ञ आणि विमा सल्लागार 
8668975178

Saturday, April 20, 2024

महावीरांकडून सत्य आणि प्रेमासाठी भूमिका घेणे शिकायला हवे- दैनिक प्रजापत्र, संकेत मुनोत

सध्या देशात आणि जगात धर्म , जात  वर्ग यातील  द्वेष वाढत असताना समाजात प्रेम आणि बंधू भाव वाढवण्यासाठी महावीरांचे विचार अभ्यासणे आणि त्यावर चालण्याची आज  तीव्र गरज आहे. 
जैन धर्म हा अतिशय प्राचीन धर्म असून  तो वैदिक , हिंदू , बौद्ध किंवा कुठल्याही धर्माची शाखा नाही. भ. महावीर हे जैन धर्माचे संस्थापक नसून ते त्यातील चोविसावे तीर्थंकर आहेत. दुसऱ्याला जिंकणे सोप्पे असते पण स्वतःला जिंकणे अवघड.ही स्वतः वर विजय मिळवण्याची शिकवण जैन धर्म देतो. 
'भ. महावीर' या विषयावर  काही जैन युवक युवतींशी  गप्पा मारत होतो . त्यांच्याकडून याबद्दल जाणून घेताना  कुणी म्हणे "ते विषारी सर्प (चंडकौशिक) चावल्यावर विचलित झाले नाही उलट पायातुन दूध आले"  तर कोणी म्हणे "त्यांच्या कानात खिळे ठोकले तरी ते शांत राहिले", "राजमहाल सोडला त्यांनी, त्रिशला मातांना त्यांच्या जन्माच्या वेळी 14 स्वप्ने पडली" आणि असेच प्रसांग सांगू लागले पण महावीरांचा मूळ संदेश काय? , त्यांच्या विचारांचा आज  जगाला आणि आपल्या स्वतःला नेमकी उपयोग  काय?  यावर कोणीच बोलेना? अनेकांतवाद, सर्वोदय हे शब्दच बहुतेकांना नीट माहितही नव्हते.
महावीरांना फक्त अश्या  कथापुरते मर्यादित ठेवून आपण महावीरांचे विचार फक्त एका  धर्मा पुरते किंवा धार्मिक स्थळा पुरते संकुचित करून ठेवतोय का? एक तत्वज्ञ म्हणून महावीरांचे विचार आपण अधिक पुढे आणायला हवे आणि व्यापक करायला हवेत.
महावीरांचे तत्वज्ञान किं हे काही फक्त जैन धर्मीयांसाठी नव्हते तर ते अखिल प्राणीमात्रासाठी होते.
महावीर कुठल्याही देवी-देवतेचा अवतार नव्हते,  ना त्यांनी स्वतःला तसे कधी घोषित केले किंवा चमत्कार , श्राप , वरदान इ. गोष्टी पण महावीरांनी कधी केल्या नाहीत. वर्धमान म्हणून जन्म झाला पण स्व कर्तृत्वाने आणि कर्माने ते महावीर बनले . आपण त्यांचे विचार फक्त डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा ते डोक्यात घेऊन त्यावर आचरण करणे जास्त आवश्यक आहे. महावीर किंवा कुठल्याही जैन तीर्थकरांच्या हातात कुठले शस्त्र नाही, कुठली मौल्यवान आभूषणे नाहीत त्यांच्याजवळ गेल्यावर शांततेचा व प्रसन्नतेचा अनुभव येतो.

सत्यासाठी भुमीका घेणे -
महावीरांचा जन्म झाला तेव्हा काळ असा होता की सगळीकडे कर्मकांडाचे स्तोम माजले होते, मुक्या जीवांना यज्ञात बळी चढवले जात होते, स्त्री फक्त भोगवस्तू होती, पददलित आणि दुर्बलांना छळले जात होते. निवडक लोक ( वैदिक ब्राम्हण )  विद्वत्तेची मक्तेदारी सांगत सामान्य जनांचे शोषण करत होते.सामान्य जणांना ज्ञान घेण्याचा वा देण्याचा अधिकार नव्हता. महावीरांनी अशा काळात त्या सर्व पीडितांना, दुर्बलांना बळ दिले शिवाय शोषण करणार्यांचा अहंगंड दूर केला.
भूमिका घेणे हा जैन धर्माचा प्रमुख गुण आज कुठे तरी हरवल्यासारखा वाटतो. महावीर त्याच व्यवस्थेचे राजा होऊन या सगळीकडे दुर्लक्षित करत मजेत आयुष्य जगू शकले असते पण महावीरांनी सत्य, प्रेम आणि संत यासाठी भूमिका घेतली. 
जर तुम्ही सत्यासाठी अशी भूमिका घेत असाल तर तुम्ही जैन धर्माचे खरे अनुकरण करता आणि त्यासाठी तुमची जैन धर्मातच जन्म घेण्याची गरज नाही. 
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजनांना शिक्षणाची दारे खुली करून या विचारांचे खरे अनुकरण केले . त्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला , प्रस्थापितांशी लढावे लागले पण हार मानली नाही.  महात्मा गांधीं हे जरी जैन धर्मात जन्माला आलेले नसले तरी त्यांनी राजकारण, समाजकारण , धर्मकारण यातील एका ठराविक समाजाचे वर्चस्व संपवून त्यात सामान्य माणसाला नेतृत्व देऊन तेथे समता आणून या विचारांचे अनुकरण केले. गांधीजींच्या या समतेच्या भूमिके मुळे विषमता मानणाऱ्या गोडसेने  गांधींचा खून केला.नंदुरबारच्या इवल्याश्या  शिरीषकुमार मेहता (जैन) याने  'महात्मा गांधी कि जय' म्हणत ब्रिटिशांच्या गोळ्या खाल्ल्या पण भूमिका घेणे सोडले नाही . 
पण आज  ठाम भूमिका घेण्याऐवजी आज अनेकांचा नेत्यांची अंधभक्ती करण्याकडे कल वाढला आहे. जैन धर्म म्हणजे फक्त आहारापुरती अहिंसेची भूमिका घेणे नव्हे तर आचरणात ही अहिंसा आणि सत्याची भूमिका आली पाहिजे. 
कुठलाही धर्म म्हटले चिकित्सा करायची नाही किंवा प्रश्न विचारायचे नाही , जो कोणी प्रश्न विचारेल तो धर्मद्रोही असा आघात असतो, आज तर काही हुकूमशाही देशात सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांनाही देशद्रोही ठरवले जाते.पण भ. महावीर मात्र याउलट सांगतात.ते ईश्वरवादी किंवा वेदप्रामाण्यवादी सिद्धांत मांडण्याऐवजी बुद्धीप्रामाण्यवादी सिद्धांत मांडतात.
'पण्णा समीख्खए धम्मं' अर्थात धर्माची प्रज्ञेने समीक्षा करा असे भ. महावीर म्हणतात.त्यांनी माणसा-माणसातील वर्णावरून, लिंगावरून होणारी विषमता नाकारली. त्यांच्या सोबत श्रमण-श्रमणी आणि श्रावक श्रविकांमध्ये राजापासून रंकापर्यत, म्हाताऱ्यापासून लहानापर्यत, पुरुष- स्त्रिया हे सर्व एकत्र होते त्यांच्यात कुठलाही भेदभाव केला जात नव्हता.

मैत्रिभाव- 
मित्ती मे सव्व-भूएसु, वेरं मज्झ न केणइ

म्हणजेच सर्व प्राण्यांशी मम मैत्री , राहो न वैर कोणाशी।।
म्हणजे तो फक्त प्राणीच नव्हे तर मनुष्यही तो कोणीही असो कोणत्याही जातीचा, वा कोणत्याही धर्माचा, वयाचा, लिंगाचा , वर्गाचा असो त्याच्याप्रति मैत्रिभाव ठेवायची आज गरज आहे.वेगवेगळ्या जाती व धर्मावरुन आपल्या देशात तेढ निर्माण होत असतांना या विचारांचे अनुकरण करणे महत्वाचे आहे. एखाद्या धर्माच्या विरुद्ध खोटे साहित्य फॉरवर्ड करून आणि द्वेष करून आपण कसे बर महावीरांचे अनुयायी  होऊ शकतो ?

हिंसेने आणि द्वेषाने प्रश्न सुटत नसतात तर वाढत असतात हे आज जगानेही मान्य केले आहे कल्पना करा कि समजा काही देशांनी युद्ध करायचे ठरवले तर एकमेकांवर बॉम्ब टाकता टाकता जग काही मिनिटांत संपू शकते  त्यामुळे जगापुढे आज अहिंसा हाच एकमेव पर्याय आहे.
भ.महावीर आणि बुद्ध गेल्यावर हजारो वर्षांनी जेव्हा या अहिंसेची खिल्ली उडवली जाऊ लागली तेव्हा महात्मा गांधीनी अहिंसक चळवळीच्या माध्यमातून जगभर राज्य गाजवणाऱ्या ब्रिटिशांविरुद्ध पूर्ण देश एकत्र करून स्वातंत्र्य मिळवून दाखवले.नेल्सन मंडेला, मलाला, मार्टिन ल्युथर किंग यांच्यासारख्या जगभरातील अनेक लोकांनी तो मार्ग स्वीकारुन जगात बदल करून दाखवला त्यामुळेच तर जगतिक कीर्तीचा वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाइन ही म्हणाला कि महात्मा गांधींचे अहिंसक विचार च या जगाला उध्वस्त होण्यापासून वाचवू शकतील.

जगात अनेक धर्म ,पंथ स्थापन झाले काही टिकले काही लयाला गेले.बहुतांशी धर्माच्या संस्थापकांनी आम्ही देव आहोत किंवा प्रेषित आहोत म्हणून सांगितलं. त्यांची वचन, धर्मग्रंथ प्रमाण मानले गेले.
मात्र महावीर आणि  गौतम बुद्ध यांनी  ना स्वतःला देव घोषित केले ना प्रेषित म्हणवून घेतले.
समोर आलेली गोष्ट तर्काच्या, विवेकाच्या,बुद्धीच्या कसोटीवर घासून घ्या, मी सांगतो म्हणून नव्हे तर तुम्हाला समजली आणि पटली तरच स्विकारा अस म्हणणारे बुद्ध आणि महावीर म्हणूनच आपले वाटतात
माणसांना झापडबंद न होता प्रश्न विचारायला प्रवृत्त करणारे आपले वाटतात ते ह्यासाठी प्रश्न विचारणारी माणस विचार करतात, अशी विचार करणारी माणस जोवर जगात आहेत तोवर महावीर आणि बुद्ध आहेत. 

सध्या देशात काही लोक वेगवेगळ्या राष्ट्रांच्या घोषणा देत आहेत कोणी भारताला हिंदुराष्ट्र बनवू पाहतंय तर कोणी इतर कुठल्या धर्माचे राष्ट्र. सरदार पटेल , नेताजी सुभाषचंद्र बोस , भगतसिंग , डॉ राजेंद्रप्रसाद सारख्या अनेक महान नेत्यांनी हिंदुराष्ट्र वगैरे कल्पनेला मूर्खपणा, वेडेपणा म्हटले होते . आज ते हयात नाहीत  पण आपण अश्या धार्मिक राष्ट्राच्या गोष्टींना ठामपणे विरोध करत भारत या धर्मनिरपेक्ष राष्ट्रावर एकमेकांसोबत प्रेमाने रहायला हवे. आज कुणी मुस्लिम संपवण्याची भाषा करत असेल तर उद्या ते संपल्यावर ख्रिश्चन मग बौद्ध मग जैन आणि नंतर सामान्य हिंदू ही त्यात असेल हे विसरायला नको. कारण द्वेष करणाऱ्यांना फक्त एक गट हवा असतो ज्याचा द्वेष करत ते स्वतःचे वर्चस्व जपत असतात. इतिहासात याची उदाहरणे आहेत इथे जेव्हा मुस्लिम नव्हते तेव्हा लाखो श्रमनांच्या हत्या झाल्या होत्या त्यामुळे कुठल्याही द्वेष पसरवणाऱ्या मोहिमेला बळी न पडता एकमेकांसोबत राहूया प्रेम पसरवूया

तर चला अहिंसा, प्रेम आणि नम्रतेने जग जिंकूया, आपले नाते संबंध, समाज , देश , जग या अनुषंगाने अधिक बळकट करूया
संकेत मुनोत
8668975178
Changalevichar1@gmail.com

Share