AddThis code

Tuesday, November 29, 2022

वेगवेगळ्या धर्मगुरूंशी संवाद साधून धर्म समजून घेत महात्मा गांधींबद्दल मते जाणून घेताना आलेले काही अनुभव

आम्ही महिन्यात किमान २ दिवस काढून वेगवेगळ्या धर्मगुरूना भेटतो. त्यात सुरवातीला श्रध्देने त्यांच्याकडून त्यांचे धार्मिक विचार समजून घेतो. त्यानंतर महात्मा गांधी यांचा विषय काढून "त्याबद्दल आपल्याला काय वाटते?" हे विचारतो. त्यात ते जेव्हा व्यक्त होतात त्यात त्यांच्या पर्यंत कुठले विचार पोहोचले हे लक्षात येते. यातील बहुतेक ठिकाणी आम्हाला त्यांच्याबद्दलच्या अफवा पोहोचल्याचे लक्षात आले आणि जेव्हा आम्ही त्यांच्याशी याबाबत संवाद साधून सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यातील काहीनी आमचे ऐकून घेत पुढे संवादही साधला. यात आम्हाला असेही काही साधू साध्वी भेटले जे स्वतः गांधीवादी होते आणि ठामपणे भूमिका घेत होते. जे समाजात विष पसरवतात त्यांना ते विरोध करत होते पण आपल्या कुठल्या चळवळीशी कुठेच जुळले नव्हते. ते म्हणाले की आमच्याकडे स्वतः ला गांधीवादी म्हणवणारे राजकीय पक्षाचे लोकही येतात पण ते त्यांच्या निवडणुकीच्या वेळेस आमच्या जाहीर सभेत मत मागायला किंवा आमच्या एखाद्या कार्यक्रमात त्यांच्या एखाद्या नेत्याला घेऊन दर्शनाला येतात आणि जातात. पण अशी चर्चा करायला असा संवाद साधायला त्यांच्यातील कोणी कधी येत नाही. तेच संघातील लोक नियमितपणें येतात. सगळ्यात सुरवातीला महात्मा गांधी बद्दल द्वेष पेरतात नंतर हळू हळू नेहरू बद्दल मग मुस्लिम ,ख्रिस्चन आणि इतर धर्मियांच्या बद्दल द्वेष पेरणे सारख्या गोष्टी केल्या जातात. या सततच्या मार्यामुळे आमच्यातील बरेचसे साधू त्यांच्या प्रवचनात तश्या गोष्टी मांडतात. पण तुम्ही करताय तसे घडले तर काही प्रमाणात का होईना इकडचे लोकही संवादातून बदलू शकतील. आणि समजा त्यातील अनेक लोक बदलले नाही तरी त्यांना एवढे जरी माहित पडले की असे कोणीतरी आहे तर ते पुढच्या वेळी महात्मा गांधींच्या विरुद्ध प्रक्षोभक वक्तव्ये करताना थोडी काळजी घेतील. म्हणजे आम्हाला काही ठिकाणीं असे साधू-साध्वी पण भेटले जे एकदम याच्या विरूद्ध होते . एक जैन साध्वी तर डायरेक्ट बोलल्या की त्या गोडसेला मानतात त्याने गांधीहत्या करून चांगले काम केले. या साध्वीना हे तुम्हाला कुठे समजले असे विचारले तर त्यांनी पुष्पेद्र कुलश्रेष्ठ, विवेक बिंद्रा आणि अश्याच काही महाभागांचे व्हिडिओज पाहिल्याचे सांगितले . म्हणजे विशेष कार्यक्रमही त्यासाठी आयोजित जर्ण्यात येतात ज्यात असे व्हिडिओस दाखवण्यात येतात .मी त्यांना चर्चेसाठी वेळ मागितला पण त्यांनी नकार दिला पण ही चर्चा सुरू असताना तिथे एक कपड्याचे व्यापारी त्यांचे दर्शन करायला आले होते. त्यांनी आमची चर्चा ऐकून माझ्याशी नंतर बसून संवाद केला. महात्मा गांधी बद्दल सुरवातीला प्रश्न विचारले. त्यानंतर मुस्लिम लोकसंख्या आणि इतर अनेक प्रश्न विचारले त्याची उत्तरे त्यांना पटली.आता ते समूहात आहेत आणि ठामपणे भूमिका घेतात इकडचे मेसेज त्यांच्या समूहात पाठवतात. यामुळे त्यांना Troll ही केले जाते, काही समूहातून काढलेही गेले पण ते तरी ठामपणे भूमिका घेतात. गांधी समजल्याचा हा परिणाम म्हणता येईल. एका साध्वीजींनी आम्हाला महात्मा गांधींच्या गोष्टींची हिंदीत पाठवायला सांगितल्या, या गोष्टी ते त्या प्रवचनात मांडतील असे त्यांनी सांगितले. त्या जर असे मांडू लागल्या तर खूपच चांगले होईल त्यांचे हजारो लाखो भक्त ते ऐकतील. म्हणजे ही प्रोसेस तशी खूप स्लो आहे आणि अपयशच बहुतेक ठिकाणी मिळते पण हे निरंतर करत राहिले पाहिजे असे माझे मत आहे. चळवळीतील काही मित्रांना सुरवातीला सोबत घेऊन गेलो तर त्यांना तिथे वाट बघणे आणि इतर धार्मिक गोष्टी पटल्या नाहीत ज्यामुळे ते नंतर आले नाहीत. प्रत्येक धर्मात अनेक चांगल्या गोष्टी आहेत त्यांच्या आधारे लोकांना जोडून घेत संवाद साधत राहिले तर प्रबोधन करणे अधिक सोपे जाते. महात्मा गांधी होते तेव्हा ही बहुतेक धार्मिक माणसे त्यांच्या मागे होती आज त्यातले बरेच कट्टरतेकडे गेले यात त्यांना समजत नाही म्हणून ते तिकडे गेले असे म्हणत त्यांना मूर्ख ठरवण्याऐवजी आपण त्यांच्याशी संवाद करण्यात कुठे कमी पडलो ते शोधून त्यावर काम करायला हवे असे वाटते.
महात्मा गांधींचे हे वैशिष्ट्य होते कि प्रत्येक धर्मातील चांगले शुद्ध चरित्राचे धर्मगुरू त्यांच्याशी जुळलेले होते . ते आचार्य विनोबा भावे , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , परमपूज्य साध्वीजी उज्वलकुंवरजी महाराज , राष्ट्रसंत गाडगे बाबा , मौलाना आणि असे अनेक साधू साध्वी आणि संत . संकेत मुनोत #Randomthoughts

1 comment:

  1. खूप मोलाचा विचार आणि कार्य. हे करायला हवंय. प्रत्येक भारतीयापर्यंत महात्मा गांधींचे विचार पोहोचले तर हा भारत कधीच फॅसिझमच्या आहारी जाणार नाही

    ReplyDelete