दरवर्षी प्रमाणे या वर्षीही एक दिवस तरी वारी अनुभवावी यात सहभागी झालो. हा एक सुंदर अनुभव होता. कुठलेही शस्त्र हातात नसलेली विठ्ठल रखुमाई ची मूर्ती ही अहिंसा आणि प्रेमाचे प्रतीक आहेत तर सगळे वारकरी हे त्या अहिंसेचे पुजारी.
मला वारीत सगळ्यात जास्त गोष्ट कुठली आवडते ती म्हणजे समता. कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही. आम्ही ह. भ. प. श्यामसुंदर सोन्नार महाराजांच्या पाया पडलो तर तेही माऊली म्हणत आमच्या पायी पडले.
सध्या देशात ठिकठिकाणी जाती धर्मात द्वेष वाढवून दंगली घडवल्या जात आहेत. रोजगार, शिक्षण, आरोग्य, अर्थव्यवस्था हे मूळ प्रश्न बाजूला ठेवून नेत्यांच्या अंधभक्तित गुंग करून ठेवले जात आहे त्यावेळी वारी ही प्रेम आणि संवाद वाढवणारी वाटते.
पूर्वीच्या काळी वैदिक ब्राम्हण च सगळ्या गोष्टी सांगत आणि आपल्याला ते असत्य पण सत्य मानावे लागे आणि ते म्हणावे ते कर्मकांड करावे लागे. संतांनी हा मध्यस्थ नाकारत तुम्ही कुठल्याही जाती धर्मात जन्माला आलेले असाल तरी ईश्वराच्या नामस्मरणाने पुण्यप्राप्ती करू शकता अशी मांडणी केली. पण आज अश्या ठिकाणी पण हे चुकीचे लोक घुसत आहेत त्यांच्या पासून सावध राहायला हवे.
पंढरपूरला निघालेल्या आषाढी वारीमध्ये 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' या उपक्रमातंर्गत प्रागतिक विचारकार्य करणाऱ्या संस्था संघटनांचे कार्यकर्ते वारकरी रविवारी सहभागी झाले होते. जवळपास पावणे दोनशे वारकरी कार्यकर्ते यात आले होते. गवळ्याची उंडवडी ते बऱ्हाणपूर या मार्गावर 10 किलोमीटर असे आम्ही चाललो. पुणे, मुंबई, सातारा, लातूर, नाशिक, ठाणे, रायगड आदी ठिकाणावरून या वारीत अधिक कार्यकर्ते वारकरी सहभागी होते.
सकाळी 6 वाजता पुण्यातून गवळ्याची उंडवडीला जाण्यासाठी पुण्यातून निघालो. 4 बसची व्यवस्था होती. रस्त्यात थांबून नास्ता, चहा घेतला. उंडवडीला नऊ वाजता पोचलो आणि चालायला सुरुवात केली.
बऱ्हाणपूर येथे मस्त बेसन, भाकरी, चटणी, बुंदी, भाताचे जेवण केले. त्यानंतर गाणी झाली. विशेष सत्कार झाले. पुस्तक प्रकाशन झाले. प्रमुखांची भाषणे झाली. आणि साडेचार वाजता पुण्याला जायला निघालो. साडेसात वाजता पुण्यात पोचलो.
No comments:
Post a Comment