प्रेम आणि हिंसा याबद्दल सुंदर उपक्रम महाअनिस ने आयोजित केला होता
ऍड. रमा सरोदे, डॉ अनिल डोंगरे, आरती नाईक, लेशपाल जवळगे, माधव बावगे, संजय बनसोडे, सुनील रेडेकर यांनी यात अभ्यासपूर्ण आणि सुंदर मांडणी केली.
यात उपस्थित युवांना ही बोलण्यास सांगितले तेव्हा मी खालील मुद्दे मांडले
आपल्या समाजात तीव्र प्रतिक्रिया देण्याची प्रथा आहे. दर्शना पवार चा खून झाल्यानंतर त्या खुन्याला "जाळून टाका, तुकडे करा, चौकात फाशी द्या" वगैरे प्रतिक्रिया काही लोक देत होते. आता खून करताना स्वतः ला शिक्षा होणार हे त्या युवकाला माहित नसेल का? माहीतच होते पण मनात होता तो राग आणि रागातून झालेली जीव घेण्याची किंवा देण्याची तीव्र हिंसक इच्छा. त्याला त्याबद्दल कडक शिक्षा व्हावीच त्याबद्दल दुमत नाही. पण फक्त कडक शिक्षेने हे प्रकार थांबणार नाहीत. मूळ कारणांवर काम करायला हवे. ते मुळ कारण म्हणजे तीव्र राग आणि त्यातून हिंसा...
राग कसा व्यक्त करायचा? हे शिकायला हवे. टोकाचा राग आल्यावर तो व्यक्त करताना अनेक जण हिंसेवर उतरतात त्यात एकतर समोरच्याचा जीव घेतात किंवा स्वतः चा जीव देतात.
पण त्या रागावर तात्पुरता ताबा कसा मिळवता येईल, दुसरीकडे कसे लक्ष केंद्रित करता येईल? याकडे लक्ष द्यायला हवे. शाळा ,कॉलेज आणि इतर ठिकाणी बालपणापासून याबद्दल प्रशिक्षण द्यायला हवे.
गांधींना आफ्रिकेत स्वतः जवळ first-class चे तिकीट असताना आणि ते एवढे मोठे बॅरिस्टर असताना ट्रेन मधून बाहेर फेकले गेले तेवढ्यावरच न थांबता ते आपल्या कामाच्या ठिकाणी जात असताना त्यांना टांगे वाल्याने शिव्या देत चाबकाने खूप मारले, एकदा तर गोऱ्या लोकांनी एवढे मारले की ते मृत्यूच्या दारात जाऊन ते परत आले. असे अनेक जीवघेणे हल्ले गांधीजींवर तेथे वर्णभेदातून झाले. अश्या वेळी ते तडकाफडकी तेथील लोकांना एकत्र करून ते जाळपोळ करू शकले असते, ज्यांनी त्यांच्या सोबत हे केले त्या व्यक्तींचा खून करू शकले असते किंवा अपमान झाला म्हणून एखादी मोठी चिठ्ठी लिहून स्वतः आत्महत्या करू शकले असते पण असली कुठलीही हिंसक कृती न करता त्यांनी स्वतः च्या रागावर ताबा मिळवून मुळ कारणांचा शोध घेतला आणि अहिंसक लोकचळवळ उभारून वर्णभेदावर मात केली. ज्यातून नंतरही मंडेला, मार्टिन ल्युथर किंग आणि वेगवेगळ्या लोकांनी प्रेरणा घेऊन मोठे काम केले आणि आजही अनेक जण करत आहेत.
तर अहिंसक , विवेकशील समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहूया. आपापसात प्रेम आणि संवाद वाढवूया 



संकेत मुनोत

Comment, Share ,Follow and Subscribe.
No comments:
Post a Comment