नाव ऐकून होतो, सामाजिक ठिकाणी एक दोनदा भेट ही झाली होती , अनेकदा चर्चेत त्यांचे उदाहरण ही द्यायचो की कश्या त्या दोन उच्चशिक्षित बहिणी प्रेरणादायी कार्य करत आहेत पण जायचा योग काही लवकर येत नव्हता.काल तो आला
काही दिवसांपूर्वी यांच्या मुलासाठी चांगली पॉलिसी सुचवण्यासंदर्भात अपूर्वाताईंचा फोन आला त्याबद्दलची सर्व माहिती फोनवर देऊन पॉलिसी काढण्यासाठी त्यांच्या घरी गेलो आणि सगळं बघून थक्क झालो.
मुख्य पुण्यापासून 17 किमी अंतरावर सणसवाडी या गावात 2 एकर पडीक जमिनीवर अदिती आणि अपूर्वा संचेती या बहिणींनी 2008 पासून अतिशय कष्टाने नंदनवन फुलवले आहे. गांधीजी जे स्वावलंबी जगा आणि खेड्याकडे चला या गोष्टी त्या प्रत्यक्षात जगत आहेत.वडील CA, आजोबा डॉक्टर पण तरीही त्यांनी हा चौकटीबाहेरचा मार्ग स्वीकारला
त्यांच्या आई कल्पना संचेती(लोढा) या गांधी विनोबा चळवळीतल्या त्यांच्या प्रेरणेतून त्यांना हा अनोखा मार्ग निवडला असावा.
समाधान स्थली -
मध्यस्थ दर्शन यामध्ये समाधानाची परिभाषा दिली आहे. समाधान म्हणजे 'हर क्यो और कैसे का उत्तर'. त्यावरून ह्या जागेचे नाव समाधान स्थळी असं ठेवलं आहे.
दोघी उत्तम शिकलेल्या आहेत अपूर्वाने फर्ग्युसन कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानात पदवी घेतली तर अदितीने शाश्वत विकासाची संसाधने (सस्टेनेबल डेव्हलपमेंट) या विषयात MSC केले आहे. मनात आणलं असतं तर लौकिकदृष्ट्या यशस्वी करिअर सहज शक्य होतं पण ते सर्व टाळून त्यांनी हा मार्ग स्वीकारला.
त्यांच्या या जागेच नाव आहे 'समाधान स्थली'
जातानाचा रस्ता बराच अवघड होता , त्यांनी अनेक वर्षे हे सगळे उभारताना पुण्यातून updown कसे केले असेल काय माहीत?
काल अपूर्वा ताई पेक्षा जास्त गप्पा झाल्या त्या त्यांच्या आई कल्पनाताई संचेती यांच्याशी त्यांनी त्यांच्या एकंदरीत प्रवासाबद्दल सांगितलं.कल्पनाताई यांचे वडील डॉक्टर तर पती CA होते, त्यांनी स्वतः (LLB) वकिलीचे शिक्षण घेतले पण वकिली न करता अक्षरनंदन शाळेत शिक्षिका झाल्या.
दहावी झाल्यावर तिनं जाणीवपूर्वक ब्रेक घेतला आणि शिक्षण क्षेत्रात चाकोरीबाहेरचे प्रयोग करणा-या काही शैक्षणिक प्रकल्पांमध्ये ती राहिली. परत येतानाच तिनं निर्णय घेतला, की अदितीसोबत शेतावर राबायचं, आपलं अन्न आपणच पिकवायचं. अदितीनं तर एमएस्सी केल्यावर जो प्रवास केला, त्यातून आपल्याला जीवनशैलीत बदल करणं अनिवार्य आहे, याची खूणगाठ बांधूनच. त्यातूनच त्यांचं हे शेतावरचं घर आकाराला आलं.
‘आम्ही हे करू शकलो, कारण घरच्या मंडळींचा आणि मित्रमैत्रिणींचा पूर्ण पाठिंबा होता. सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती करायची, असे ठरल्यावर बाबांनी ही जमीन घेऊन दिली. त्यानंतर खरी परीक्षा सुरू झाली,’ असं अदिती म्हणाली. सुरुवातीला तर रेताड, खडकाळ असा परिसर होता.मातीसुद्धा धुपून किंवा खणून नेली होती. त्यामुळे खुरट्या गवताखेरीज या जमिनीत काहीच नव्हतं. ‘पण घेतलेल्या शिक्षणानं, मित्रमैत्रिणींच्या पाठिंब्यानं आणि आमच्या जिद्दीनं काम सुरू केलं. भल्या पहाटे शहरातल्या आमच्या घरातून निघायचो आणि दिवसभर जमिनीशी झटापट करून रात्री परतायचो. अशी दोन वर्षे गेली आणि मग आमच्या मेहनतीला जमीन जरा प्रतिसाद देऊ लागली. शिवाय दोन पावसाळेही गेले. या जमिनीत आधीपासूनच शेततळं होतं. त्यात जरा पाणी साठल्यावर आम्ही काही भाज्या लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, या जमिनीत कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत वा आधुनिक यंत्रे वापरायची नाहीत, हा निर्णय पक्का होता.’
या दोघींनी मग फक्त शेणखतावर काम सुरू केलं. चर खणले, दगडांचे ताल बांधले. त्यामुळे पावसाचं पाणी वाहून न जाता मुरायला लागलं आणि तळ्यातही साठलं. दोन एकर जमिनीवरच्या एका भागात छोटं मातीचं घर बांधायचा निर्णय घेतला. शेतावर काम करायचं तर शेतावरच राहायला पाहिजे, हेही त्यांना उमगलं होतं. ‘मग कामाला लागलो आणि कॉब पद्धतीनं (गाळा बनवून त्यावर मातीचे गोळे मारून भिंत तयार करणे) घराची उभारणी केली. कौलारू छप्पर केलं. तीन खोल्या तयार केल्या. पहिली चार वर्षं वीज नव्हती. तेव्हा सूर्यप्रकाशावर काम चालवलं.
अंधार पडला की, सगळे व्यवहार बंद. नंतर सौरदिवे वापरायचो. नुकतीच वीज आली आहे; पण घरात रात्री उजेडापुरतीच ती वापरतो. कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरत नाही.’
शेतातली सर्व कामं या दोघी स्वत:च करतात. अगदी घर बांधण्यापासून नांगरणी, खुरपणी, लावणी, पेरणी, कापणी, तोडणी सगळं. यंत्र न वापरता परंपरागत पद्धतीनं. ‘कधी कधी आमचे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणीही मदतीला येतात.
लग्नासाठी जोडीदार शोधतांना ही अडचण आली.जैन धर्मात जन्म झालेला असला आणि जैन धर्म अहिंसा, अपरिग्रह अश्या अनेक गोष्टी सांगत असला तरी प्रत्यक्ष जीवनात ते अवलंबणारे खूप कमी लोक. सध्या तर या समाजात ही कट्टरता खूप वाढत चालली आहे असे आई म्हणाल्या (आणि या जैन धर्माने जगाला अनेकांतवादाचा संदेश दिला असला तरी आता यातील अनेक जण आता एकांतवादी अंधभक्तीकडे वळाले आहेत विशेष म्हणजे अशी अंधभक्ती करणाऱ्यांना त्याची लाज वाटत नाही तर अभिमान वाटतो)
दोघींनी आंतरजातीय , आंतरधर्मीय समजून उमजून लग्न केली आहेत.
अपूर्वताईचा जोडीदार सौरभ राऊत, अकोला यांच्याशी ही भेट झाली ते स्वतः सॉफ्टवेअर इंजिनिअर पण ते सुद्धा हेच करतात.
या मुलींच्या वेगळ्या विचारांना घरच्या मंडळींनी मनापासून साथ दिली. आवश्यक तेव्हा मदतीचा हात पुढे केला, पण सारखा आधार देऊन सावरलं नाही. ‘आम्ही धडपडलो, ठेचा खाल्ल्या, चुकलो. पण शिकत गेलो आणि सावरलोही. आता पाच वर्षांच्या परिश्रमांना हिरवे अंकुर फुटलेत. आम्ही निवडलेली वाट योग्य आहे, याचं आश्वासन मिळतंय.’
काही गायी बैल मांजर कुत्रे आणि असे अनेक जण त्यांच्या कुटुंबात आहेत. मी जेव्हा तेथे गेलो तेव्हा अपूर्वाताई थालीपीठ शेकत होत्या तर त्यांच्या आई त्यांना पीठ मळून देत होत्या.हे करता-करता माझा गांधीविचारांकडचा जीवनप्रवास त्यांनी समजून घेतला आणि नंतर त्यांच्या वरील सगळ्या गोष्टींबद्दल सांगितले.
(मला यानिमित्ताने गांधीजींना भेटायला गेलेल्या पटेल, राजेंद्रप्रसाद, नेहरू, शास्त्री आणि विनोबा सारख्या काही लोकांची आठवण झाली. यातील अनेकांना वाटे कि गांधी स्वातंत्र्यलढ्याचे नेते म्हणजे सतत इंग्रजांशी भांडत असणार, मोठ-मोठी भाषण त्यांच्याविरुद्ध देत असणार पण प्रत्यक्षात गांधींना भेटल्यावर ते अवाक झाले की हा माणूस तर घरी भाजी चिरतोय, शौचालय साफ करतोय आणि बरेच काही करतोय. त्यातील एकाने एका ठिकाणी लिहलय की गांधीजी जर आम्हाला आयुष्यात भेटले नसते तर पटेल फक्त बॅरिस्टर पटेल, नेहरू फक्त बॅरिस्टर नेहरू विनोबा एखादे योगी असे फक्त आपापल्या क्षेत्रात मोठे झाले असते त्यात नाव ही झाले असते , चांगला पैसा ही त्यांनी कमावला असता पण गांधी भेटले आणि त्यांच्या आयुष्याचा कायापलट झाला ज्यामुळे पटेलांचे सरदार पटेल झाले, विनोबांचे आचार्य विनोबा भावे झाले, नेहरूंचे पंडित नेहरू आणि यादी न संपणारी आहे. पण आज त्यांनाच गांधींच्या विरुद्ध उभे करण्याचा घाट काही समाजकंटकांच्याकडून घातला जात आहे)
कल्पनाताई स्वतः विनोबांना ही भेटलेल्या आहेत आणि गांधीविचारांमुळे त्यांनी थोडासा वेगळा मार्ग निवडला. गांधीविचार हे त्यांच्या आयुष्यातील एक स्टेशन होते पण त्यापुढे जाऊन अपूर्वा ताईने दर्शन नावाचे एक शिबीर केले त्यातून पुढे त्यांना अशी एक वाट मिळाली असे त्या म्हणाल्या
त्यांनी काही मित्र मैत्रिणीच्या मदतीने बांधलेले घर त्यांनी दाखवले त्यानंतर आता लॉरी बेकर च्या शैली वर पुढचे घर बांधले जात आहे.
या लॉरी बेकरची पण कहाणी अनोखी आहे. .अनिल अवचट सरांनी त्याबद्दल लिहले आहे
हा 25 वर्षाचा सैनिक.स्वातंत्र्यपूर्व काळात लढाईवरून चीनहुन घरी इंग्लंडला परत चालला होता तेव्हा त्याची बोट काही दिवस मुंबई त थांबली, त्यानं पेपरमध्ये गांधींविषयी खूप वाचलं होतं. ‘हा कोण माणूस, बघूनतरी जाऊ या’ असं म्हणून गांधीजींना भेटायला गेला.गांधीजींनी त्याला विचारलं, ‘इंग्लंडला जाऊन काय करणार?’ ‘ मी आर्किर्टेक्ट आहे. तो व्यवसाय करीन. आलिशान घरे बांधेन’ गांधीजी म्हणाले, ‘मी खरा आर्किर्टेक्ट कोणाला म्हणतो, माहीत आहे? जो 25 मैलाच्या परिघातून बांधकाम साहित्य मिळवुन पर्यावरणपूरक अशी घरे बनवतो तो .’ लॉरी बेकर चक्रावलाच. तो इंग्लंडला गेला. प्रॉपर्टी विकून भारतात परतआला. केरळमध्ये स्थायिक झाला आणि गांधीजींच्या व्याख्येप्रमाणे त्याने हवेशीर, सुंदर घरं बांधली. त्याला ‘ब्रिक मॅन ऑफ इंडिया’ असं संबोधतात.आणि जगभरात या लॉरी बेकर शैलीतून घरे बांधली जातात.
असो तर आज स्वतःच्या गरजा कमी करून स्वावलंबीपणे जगणाऱ्या लोकांशी भेट झाली आणि समाधान काय आहे ते समजले . त्यांच्या चेहऱ्यावर मी जगापेक्षा वेगळे करतोय याबद्दल ना कुठला अभिमान होता ना जग सगळं पैश्यामागे, स्पर्धेत धावत असताना आम्ही हे वेगळं करतोय म्हणून कसला खेद होता
मागे समतादीदी मूळे माझ्या घरी गुजरात चे धीरेनभाई आणि स्मिता बेहन सोनी यांची मुले येऊन गेली ते पण असेच गांधीवादी.दोघांनी IIT मधून इंजिनेअरिंग केले नंतर मोठी नोकरी लागली असती ते सोडून A to Z वस्तू चे repairing शॉप सुरू केले नंतर ते सोडून त्यांनी गुजरात मध्ये जागा घेतली आणि तेथे शेती सुरू केली त्यांच्या शेतात जे पिकवतात तेच खातात बाहेरुन फक्त गूळ आणि मीठ या गोष्टी घेतात कपडे पण स्वतःचे स्वतः शिवतात (खादी).त्यांच्या स्वतःच्या मुलांना त्यांनी शाळेत कधी घातलेच नाही. त्याला इंजिनिअरिंग शिकायचे असेल तर प्रत्यक्ष बांधकाम करणाऱ्याकडे पाठवले, अजून काही शिकायचे असेल तर त्या त्या व्यक्तीकडे पाठवले आणि त्यांच्याकडून शिकून घेतले. कल्पनाताई संचेती यांना या 2 मुली तर आहेतच पण सोबत अजून 2 मुली आणि एक मुलगा त्यांनी दत्तक घेतला. त्यातील एका मुली सोबत भार्गव सोनी चे लग्न झाले.
...अपूर्वताईंचे वडील सी ए आणि अपूर्वताईंचा स्वतःच्या संपर्कातही अनेक आर्थिक सल्लागार होतेच..तरी त्यांनी मला फोन करून सेवा करण्याची आणि आर्थिक नियोजन करण्याबद्दल संधी देणे हे माझ्यासाठी मोठे भाग्य. ते पण अश्या वेळी ताईंनी बोलवले ज्यावेळी मी नुकतीच माझी 7 वर्षांपासून करत असलेली clinical research documentatiom क्षेत्रातील नोकरी सोडून दुसऱ्या क्षेत्रात प्रवेश केला तेव्हा...
आपण ही एकदा इथे अवश्य भेट द्या, यात काही भाग दिव्य मराठीमधील 7 वर्षे जुन्या लेखातील ही आहे
याबद्दल त्यांची मुलाखत ही youtube channel वर लवकरच टाकणार आहे (https://youtube.com/c/SanketMunotInspiring)
#yeswecan
#अवलीयव्यक्तिमत्वे
संकेत मुनोत
8668975178
खूप छान दादा. या ठिकाणी भेट द्यायला आवडेल
ReplyDeleteछान लिहिलंय संकेत, खूप छान आणि आशादायी माहिती होती, या ठिकाणी भेट द्यायला आवडेल, आणि त्या गुजरात मधील शाळेत न जाता आवडीचं शिक्षण घेणाऱ्या मुलांना व त्यांच्या पालकांनाही भेटायला आवडेल
ReplyDeleteभारी
ReplyDelete