AddThis code

Friday, June 14, 2019

डॉक्टरांना #देव वा #दानव न करता माणूस म्हणून पहायला हवे

मी डॉक्टर नाही पण अनेक कारणांनी वेगवेगळ्या डॉक्टरांशी संपर्क आलेला आहे, तसा आपला डॉक्टरांशी संपर्क लहानपणापासूनच येतो, जन्म होताना, लसीकरण करतांना, आजारी पडल्यावर आणि  बऱ्याचदा, आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य बळकट करून आपले जीवन आनंदी करण्यासाठी ते कार्य करतअसतात.

काही दिवसांपासून पाहतोय कि रुग्णाच्या नातेवाईकांकडून किंवा रुग्णांच्या मित्रांकडून डॉक्टरांवर हल्ले वाढत आहेत आणि डॉक्टरांकडे बघायचा दृष्टिकोन बदलत आहे.

हल्ले करून वैयक्तिक आणि सामाजिक समस्या सोडवता येतात ही धारणाच मुळात धोकादायक आहे. डॉक्टर जबाबदारीनं वागतात का हे बघण्यासाठी काही एक यंत्रणा आहेच त्यांच्याबद्दल फारशी माहिती लोकांना नसावी. आपल्याला झालेल्या दुःखासाठी दुसरं कोणीतरी कारणीभूत आहे हे आपण लहानपणापासूनच मुलांच्या मनावर बिंबवत असतो उदाहरणार्थ एखादा मुलगा ठेच लागून पडला तर "हात रे" असं म्हणून त्या जागेवर आपण रागाने मारतो,  याचेच रूपांतर पुढे अश्या गोष्टीत होते आणि आपला राग डॉक्टरांवर किंवा कुणावर हल्ला करून काढला जातो.

फॅमिली डॉक्टर ही संकल्पना लोप पावत चालली असून कॉर्पोरेट हॉस्पिटल्सची संख्या वाढत आहे.
कॉर्पोरेट हॉस्पिटल्स मध्ये डॉक्टरांवर टार्गेटचा ताण दिला जातो.
तेच स्वतःचे हॉस्पिटल टाकायचे तर किती तरी परवाने, मशिनरी आणि बरेच काही लागते शिवाय जागा, स्टाफ आणि इतर जबाबदाऱ्या वेगळ्या.त्यामुळे स्वतःचे हॉस्पिटल टाकणे आज अवघड झाले आहे.

कुठलाही डॉक्टर आपल्याकडे आलेल्या रुग्णाला बरे करण्याचे अतोनात प्रयत्न करत असतो पण सगळ्या गोष्टी काही त्यांच्या हातात नसतात काही गोष्टी नियतीच्या हातात ही असतात त्यामुळे त्याचा दोष लगेच डॉक्टरवर टाकून त्यांना मारहाण करणे चुकीचे आहे.

डॉक्टर प्रोफेशन सोपे नाही , आयुष्यातील अनेक वर्षे हे शिक्षण शिकण्यासाठी खर्च करावे लागतात, मेहनत करावी लागते.

सगळेच रुग्ण काही एक प्रकारचे नसतात , नाना तर्हा असतात पण प्रत्येकाला व्यवस्थित सांभाळून घेणे, समजावून सांगणे आणि बरेच काही त्यांना करावे लागते.

आरोग्य सेवेच्या खर्चाबाबत अनेक जण तक्रार करत असतात आणि त्यात तथ्य असले तरी ते भांडवलदारांनी सुरु केलेल्या दवाखाण्याबाबत आहे जिथे खर्च जास्त येतो पण तोच खर्च एखाद्या साध्या किंवा सरकारी रुग्णालयात कमी येऊ शकतो.

मी काही काळ Medical Representative (MR) म्हणून काम करत होतो, तेव्हा रोज किमान 8 ते 12 डॉक्टरांना भेटावे लागे तेव्हाही अनेक चांगले अनुभव आले.डॉक्टरांना जेव्हा product ची माहिती देत तेव्हा काही डॉक्टर सोडले तर बहुतेक जण लक्ष देऊन ऐकत आणि समजून घेत.

डॉक्टर जेव्हा काही तपासण्या करायला सांगतात तेव्हा आपल्याला अनेकदा शंका येते कि खरच या तपासण्यांंची गरज आहे का? पण त्या केल्याशिवाय पुढे काय करायचे ते ठरवता येत नाही आणि समजा तपासण्या न करता आपण पुढे गेलो तर पुढे जर दुसरे काही complication झाले तर पुन्हा आपण डॉक्टरांनाच जबाबदार ठरवत असतो.
तो डॉक्टर असला म्हणजे त्याला/तिला घरातील जबाबदाऱ्या नसतात का? ते आजारी पडत नाहींत का? त्यांना मानसिक ताण येत नाही का? हे सर्व आपल्यासारखेच त्यांना ही लागू होते.

आरोग्य सेवेसाठी वेळोवेळी तत्पर राहावे लागते,मध्यरात्री ही फोन येतात.

गुगलवाले रुग्ण - काही रुग्ण गुगल वर एखाद्या आजाराबद्दल वाचून येतात आणि त्यावरून डॉक्टरलाच सांगत बसतात, गुगल वरील सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात हे लक्षात घ्यायला हवे.

कधी कधी शस्त्रक्रियेची गरज नसतांना शस्त्रक्रिया किंवा इतर गोष्टी सांगितल्या जातात असे अनेकांकडून ऐकण्यात आले पण अश्या वेळी आपल्याकडे सेकण्ड ओपिनियन म्हणजे दुसऱ्या अजून एक दोन डॉक्टरांचा सल्ला हा ही पर्याय असतोच कि ते करून पहावे मग निर्णय घ्यावा.उदा- माझा मित्र शशांक याचा अपघात झाला खांद्याच्या हाडाला इजा झाली त्यावेळी त्याला जवळच्या एका हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो तर तज्ञ डॉक्टरांनी त्याला रॉड बसवावा लागेल असे सांगितले पण आम्ही second opinion म्हणजे दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे ठरवले तर त्याला भारती हॉस्पिटल येथे घेऊन गेल्यावर तेथील डॉक्टरांनी  येथे त्याचे dislocation काढून त्याला बरे केले ज्यामुळे रॉड टाकायची वगैरे गरज पडली नाही.

रूम चार्जेस बद्दल सांगायचे तर तुम्ही बाहेर कुठे हॉटेल वा इतर ठिकाणी रहायला गेले तर तेथेही रुम जशी घेऊ(AC/Non AC) तसा खर्च बदलतोच ना?मग हॉस्पिटल च्या रुमबद्दलच तक्रार का करतो आपण?

आपल्या देशात एकूण जीडीपीच्या केवळ 1.5 टक्केच्या आसपास च खर्च हा आरोग्यावर खर्च केला जातो तेच बाकीच्या विकसीत देशांमध्ये याचं प्रमाण 4 टक्के आहे याबाबत ही सर्व नागरिकांनी मिळून सरकार कडे मागणी करायला हवी.

होते काय कि आजार किंवा अपघात सांगून होत नाही आणि तो झाला कि मग दवाखान्यातील खर्चासाठी प्रचंड धावपळ उडते, जेव्हा असे काही होते तेव्हा त्या व्यक्तीला आपल्या सोबतीची अधिक गरज असते पण आर्थिक अडचणींमुळे किंवा इतर काही कारणामुळे आपण त्यावेळी तिथे वेळ देऊ शकत नाही आणि आपला तो वेळ आपली सेविंग मोडण्यात किंवा ती नसेल तर कर्ज घेणे वेगवेगळ्या मित्रांना फोन करणे इ. बाबीत जाते तोच आरोग्य विमा असला तर आपला हा ताण वाचतो, काही हजार वर्षाला भरून आपण लाखो रुपये वाचवू शकतो(तो निवडताना कोणती काळजी घ्यावी या संदर्भासाठी माझा जुना लेख आपण वाचू शकता) त्यामुळे प्रत्येकाने आरोग्य विमा काढवाच असे माझे मत आहे.शिवाय या आर्थिक ताणाचा राग ही डॉक्टरांवर काढला जातो आणि हल्ले होतात तेही थांबायला हवे.

होय अवैध गर्भलिंग तपासणी करून गर्भपात करणारे, पैसे घेऊन खोटी prescription बनवणारे, किडनी/अवयव काढणारे आणि त्यातून व्यवसाय करणारे, स्वतः त्या विषयातील तज्ञ नसतांना त्याबद्दल काही बाही मत मांडून रुग्णाला चुकीचा सल्ला देणारे, पैसे घेऊन एखाद्याला आजार नसतांना आजार आहे असे सांगणारे ही काही जण असल्याचे अनेक जणांकडून ऐकले आहे.पण  जसे सगळ्या क्षेत्रात काही वाईट व्यक्ती असतात तश्या त्या या क्षेत्रात ही थोड्या फार असणारच
पण त्यामुळे सगळ्याच डॉक्टरांवर तो शिक्का मारणे चुकीचे आहे.शिवाय तुम्हाला खात्रीच असेल कि समोरचा मनुष्य चुकीचा वागतोय तर कायदेशीर मार्ग आहेतच ना दाद मागण्याचे त्याचा अवलंब करा पण हल्ले करू नका.

सरकारी दवाखान्यात जास्त कधी गेलो नाही पण तेथील एक अनुभव आठवतोय तो असा, काही दिवसांपूर्वी मध्यरात्री 4 वाजता आम्हाला गोधडी वाटप करतांना 3 अंध युवा मित्र अडचणीत सापडलेले दिसले होते आम्ही त्यांना जवळच असलेल्या ससून हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो तर तेथील डॉक्टरांनी तातडीने त्याचा पायाचे हाडाचे डिसलोकेशन काढले ज्यामुळे त्याचा पाय fracture  किंवा कुठली मोठी इजा होण्यापासून वाचला.

असे हिंसक हल्ले होत राहिले तर पुढे वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्राकडे येणारा विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण होऊन करिअर म्हणून हे निवडण्याचा कल कमी होईल आणि आरोग्य सेवेत अजून मोठी दरी निर्माण होईल.

जागतिक आरोग्य संघटनेच्या(WHO) च्या  अहवालानुसार, प्रत्येक 1000 रुग्णांमागे 1 डॉक्टर असला पाहिजे.पण, भारतात प्रत्येक 1700 रुग्णांमागे 1, तर सरकारी रुग्णालयात 11,000 रुग्णांमागे 1 असं डॉक्टरांचं समिकरण आहे आणि असे हल्ले झाले तर डॉक्टरांचे प्रमाण अजून कमी होऊन आपल्याच आरोग्याचे हाल होतील.

म्हणजे मी फक्त हीच बाजू सांगत नाहीये 2 वर्षापूर्वी 'आरोग्य क्षेत्रातील गैरव्यवहार आणि रुग्णांचे हक्क' म्हणून काही डॉक्टरांचे आम्ही व्याख्यान आयोजित केले होते ज्यात या क्षेत्रातील काळी बाजू ही मांडली होती पण त्याला जबाबदार डॉक्टरांपेक्षा अधिक ते भांडवलदार आहेत जे प्रत्येक गोष्ट एक व्यवसाय म्हणून पाहतात.
पण यांच्यापेक्षा रुग्णाची मनोभावे सेवा करणाऱ्या डॉक्टरांची संख्या कितीतरी पटीने जास्त आहे.
तर शेवटी एवढेच म्हणेन कि डॉक्टरांचा देव वा दानव न करता एक माणूस म्हणून त्यांच्याशी संवाद साधूया आणि वैद्य -रुग्ण हे नाते अधिक दृढ करूया
मी स्वतः डॉक्टर नसलो तरी त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्याने मन दुखावले गेले आणि त्यामुळे थोडेसे लिहावे वाटले.

सोबतचे चित्र प्रतिकात्मक आहे.
लिहतांना काही चुकले असल्यास क्षमस्व
आपलाच
संकेत मुनोत

समाजप्रबोधना साठी आपण हा लेख शेयर करू शकता




Please do Comment, Share ,Follow and Subscribe

2 comments:

  1. संकेत ,हा खूप महत्त्वाचा विषय आहे ,आणि याला अनेक dimensions आहेत .ग्रामीण भागात चांगली आरोग्यकेंद्र नसणे , सरकारी हॉस्पिटल्समधे गरीब रुग्णांबद्दल बेपर्वाई असणे ,सरकारी डॉक्टरांनीच खाजगी रुग्णालयात जायला सुचवणे,कट प्रॅक्टिस ,खूप मोठं डोनेशन देऊन डॉक्टर होणं आणि establishment साठी प्रचंड पैसा खर्च केल्यावर तो पैसा पेशंटकडून वसूल करण्याची प्रवृत्ती ,कॉर्पोरेट हॉस्पिटल्समुळे डॉक्टरांबद्दलची विश्वासार्हता कमी झाली आहे .याला अपवादही आहेत .
    हिंसा ही केव्हाही निषेधार्हच आहे .
    यावर उपाय म्हणजे डॉक्टरांनी पेशंटला पुरेसा वेळ देऊन त्याला आणि त्याच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन ट्रिटमेंट ,औषधं, त्याचे परिणाम हे सगळं समजाऊन सांगणे.
    हिंसा ही केव्हाही निषेधार्हच आहे .

    ReplyDelete