AddThis code

Monday, June 17, 2019

विवाह नाते निवडतांना आणि फुलवंतांना

सध्या नातेसंबंधातील गोडवा वाढण्यासाठी आणि दुरावा कमी होण्यासाठी 'नाते टिकवूया' पेज आणि सामजिक चळवळ चालवत आहे त्यातून वेगवेगळ्या दाम्पत्यांच्या आलेल्या अनुभवातून काही विचार मांडत आहे.
जोडीदार निवडीचा कार्यक्रम, जोडीदाराची निवड व त्याचे निकष, विवाह पद्धति, नात्यातील दुराव्याचे वाढते प्रमाण कसे कमी करावे आणि नात्यातील गोडवा कसा वाढवावा या संदर्भातील काही विचार मांडत आहे पहा पटतात का?
जोडीदार निवडीचा कार्यक्रम साधा करण्याची गरज-
आपल्या इथे साधारणतः मुलीच्या घरचे किंवा मुलाच्या घरचे पाहण्यास येणार म्हटले कि खूप सारा थाट माट केला जातो, सुका मेवा, फळे, जेवण, मिठाई, नमकीन, कोल्ड्रिंक पासून प्रत्येक गोष्ट यात ठेवावी लागते.मग जोडीदार निवडीपेक्षा घरच्यांची त्याबद्दल च धावपळ जास्त उडते.त्यापेक्षा आपण ज्या मराठा समाजासोबत राहतोय त्यांचे पोहे ,चहा एवढं ठेवून ही जोडीदार निवडीचा कार्यक्रम करता येतो.शिवाय मुला मुलींना एकमेकांना जाणून घ्यायला जास्त वेळ द्यायला हवा.
लग्न कुठल्या प्रकारचे-
लग्न हा क्षण एका नवीन आयुष्याची सुरवात असल्याने तो आंनद आपल्या आप्तजणांना आणि मित्रांना बोलवून द्विगुणित करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते त्यामुळे रजिस्टर लग्न बहुतेक जण करत नाहीत, पण जे आप्तजनांना बोलावून करायचे लग्न आहे तेही अगदी सध्या पद्धतीने करता येणे शक्य आहे आणि तेही हजारो लोकांना बोलवून जेवण इ देऊन ही कमी खर्चात होऊ शकते शिवाय त्यातून एक सामजिक संदेश ही जातो.माझ्या अनेक मित्रांनी याप्रकारचे लग्न केले आहे. गांधीविवाह किंवा सत्यशोधक लग्न ही त्या प्रकारची आदर्श लग्न आहेत.हाच खर्च पालकांनी आपल्या पाल्यांना चांगले संस्कार, शिक्षण देण्यास त्यांना त्यांच्या पायावर उभे करून देण्यास खर्च करायला हवा.शिवाय अश्या साध्या लग्नात नातेवाईकांचा मानपान , रुसवे फुगवे या गोष्टीही टाळल्या जातात ज्यामुळे लग्नाच्या वेळी याला हे केले, त्याला हे केले नाही यामुळे होणारे रुसवे फुगवे व त्यातून होणारा मानसिक त्रास ही टाळला जातो जो 70% लग्नात असतोच असतो.माझा मित्र सचिन आशा सुभाष याने जवळपास हजार लोकांना बोलवून सत्यशोधक पद्धतीचे लग्न केले ज्यात या सर्वांचे जेवण,मंडप, व इतर सर्व मिळून खर्च जवळपास लाख रु. च्या आत आला शिवाय लग्नात भेटवस्तू ऐवजी त्याने पुस्तके स्वीकारली ज्यातून त्या दोघांच्या ही गावात त्यांनी एक चांगले वाचनालय सुरु केले, अशी अनेक उदाहरणे आहेत.
लग्नाबद्दल मानसिक तयारी-
फक्त वय झालय म्हणून टाकूया उरकुन अस म्हणण्यापेक्षा खरच आपला मुलगा वा मुलगी ती जबाबदारी पेलू शकतील अशी त्यांची क्षमता झाली आहे का? ते पहावे.
कुठलेही लग्न म्हटले कि तडजोड ही करावीच लागते पण 'मी कसलीही तडजोड करणार नाही आहे तसाच किंवा तशीच राहणार' म्हटले तर लग्न झाल्यानंतर सर्व गोष्टी अवघड होऊन बसतात.कारण दोन भिन्न वातावरणात वाढलेल्या व्यक्ती म्हटल्या कि त्यांचे स्वतंत्र अस्तित्व असणारच अश्या वेळी दोघांना ही एकमेकंसाठी काही सकारात्मक तडजोडी कराव्या लागतील त्याची तयारी असायला हवी.हुंड्याला स्पष्ट नकार द्यायला हवा.शिवाय नाते टिकवायचे म्हटले तर अहंकार कमी करायला हवा, मी आहे तसाच किंवा तशीच राहणार कधीच झुकणार नाही असे चालत नाही
नाते सांभाळायचे म्हटले तर ते टिकवण्यासाठी त्यात थोडी झुकण्याची सोबतच त्याग, समर्पण, प्रेम या गोष्टींचीही गरज असते.
जोडीदार निवडतांना-
आपल्या इथे पत्रिका जुळवण्याकडे अधिक लक्ष दिले जाते त्याऐवजी विचार कुंडली जुळते का त्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे.
बाह्य सौंदर्य जसे कि रंग , उंची, बांधा यापेक्षा आंतरिक गुण जसे कि स्वभाव, वैचारिक बैठक यांच्याकडे अधिक लक्ष द्यावे.
एकमेकांचे छंद,आवडी-निवडी, सवयी जाणून घ्यायला हव्यात.आणि समोरच्या च्या या गोष्टींचा आपल्याला त्रास तर होणार नाही ना हे पाहायला हवे.
अवास्तव अपेक्षा टाळायला हव्यात.
स्वप्ने, भविष्याबद्दलचे विचार यात ही थोडे साम्य असायला हवे.
त्यामुळे ओळख झाल्यापासून ते लग्न यामध्ये किमान 2 महिने ते वर्ष एवढे अंतर तरी असावे जो वेळ एकमेकांना समजून घेण्यासाठी देता येईल शिवाय जर नाहीच जुळले विचार तर तेव्हा तेथेच थांबताही येते, घटस्फोटापेक्षा ते कधीही चांगले.
100% सगळ्या दृष्टीने परिपूर्ण असे कोणीच नसते त्यामुळे अपूर्णतेत ही आपल्याला आवश्यक असलेले गुण आहेत का ते पाहता यायला हवे.
आर्थिक जबाबदारी इ गोष्टी जोडीदार पाहताना स्पष्ट पाहायला हव्यात उगाच वय होत चाललंय म्हणून इच्छा नसतांना एखाद्या आपल्या अपेक्षेपेक्षा कमी आर्थिक परिस्थिती असलेल्या व्यक्तीशी लग्न करणे आणि लग्नानंतर अधिक आर्थिक क्षमतेच कुणी दिसलं कि आहे त्या नात्याला तोडणे असे प्रकार ही घडतात तेच सौंदर्य, शिक्षण इ. गोष्टी पूर्वीच पाहायला हव्यात उगाच सुरवातीला नाते जोडायचे आणि नाही पटले किंवा दुसरे कुणी अजून चांगले दिसले कि आहे ते तोडणे चुकीचे आहे.
व्यसन - आपल्या समाजात ही व्यसनांचे प्रमाण हळूहळू वाढत चालले आहे त्यामुळे त्याबद्दल चौकशी करायला हवी आणि व्यसनी जोडीदाराला स्पष्ट नकार देता यायला हवा.
वैचारिक पातळी आणि सामजिक भान- आपला जोडीदार सामजिक , कला, राजकीय किंवा साहित्यिक क्षेत्रात असेल तर त्याच्या गोष्टींचा आपल्याला त्रास तर होत नाही ना, आपण त्या गोष्टीत साथ नाही देऊ शकलो तर किमान प्रोत्साहन तर देऊ शकू ना हे पहायला हवे
शिवाय त्याच्या किंवा तिच्या लेखनाचे, साहित्याचे, कलेचे अर्थ किंवा उद्देश आपल्याला समजत आहेत ना? जर ते समजत नसतील तर त्या गोष्टीतून वेगळे काही अर्थ निघून गैरसमज होण्याची शक्यता असते
उदा माझी एक मैत्रीण पुरोगामी, वैज्ञानिक आणि आधुनिक विचारांची तर तिच्या नवर्याचे आई-वडील प्रचंड धार्मिक, ज्योतिषशास्त्र वगैरे मानणारे त्यामुळे ही जे काही लेख त्या अंधश्रद्धावर किंवा कशावर ही लिहित तर ते आमच्यवरच आहेत असे त्यांना वाटे आणि त्यातून गैरसमज वाढत जात खरतर ती बऱ्याच वर्षापासून लिहित होती हे त्यांना समजायला हवे होते पण वैचारिक आणि बौद्धिक अंतर असल्यावर अर्थाचा अनर्थ होतो तो असा.
जोडीदाराची संगत -
कुठल्याही व्यक्तीची ओळख त्याच्या संगतीवरून होते.त्याच्यासोबत असणारा मित्र परिवार कुठल्या दर्जाचा आहे त्यावरून ही त्याचा किंवा तिचा स्वभाव लक्षात येतो.कारण जश्या व्यक्ती असतात तसे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात.
लग्न झाल्यावर-
एकमेकांशी खुला संवाद- मेसेज किंवा फोनवरून बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष फेस टू फेस बोलणे कधीही चांगले, कारण प्रत्यक्ष बोलण्यात आवाजाला चढ उतार असतो चेहऱ्यावर हावभाव असतात ज्या गोष्टी मेसेज किंवा फोन वर शक्य होत नाहीत आणि गैरसमज वाढण्याची शक्यता असते
एकमेकांची छेड काढणे- लग्नानंतरचे नाते healthy ठेवायचे असेल तर थोडी विनोदबुद्धी असायला हवी आणि एकमेकांची छेड काढणे , चिडवणे यातून प्रेम वाढते.
मतभेद झाल्यास दोघांत सोडवणे- दोन भिन्न व्यक्ती म्हटल्यावर मतभेद हे होणारच पण ते झाले तरी मनभेद होता कामा नये ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी , झालेले भांडण तिसऱ्या कुणाला सांगितले जाते तेव्हा दुरावा वाढण्यात च अधिक मदत होते
  सामान्यतः मनुष्य एखाद्याशी झालेल्या वादाबद्दल सांगतांना स्वतःच्या चुका नकळतपणे लपवत असतो किंवा कमी करून सांगत असतो यामुळे ज्याच्यासोबत आपण ही गोष्ट शेयर करतोय ती व्यक्ती तेवढेच ऐकून त्या-त्या दृष्टीने आपले मत बनवते आणि समजा ती गोष्ट त्या व्यक्तीने अजून काहींना सांगितली तर ५ जणांचे ५ सल्ले यातून वाद विकोपाला जातो.
समजूतदार पणा- ही सर्वात महत्वाची बाब आहे , छोट्या-छोट्या गोष्टी पकडून न ठेवता एकमेकांना समजून घेऊन पुढे जायला हवे.समोरचा व्यक्ती माणूस आहे आणि तो चुकू शकतो आणि आपणही चुकू शकतो ही गोष्ट मान्य करायला हवी.
कौतुक आणि टीका-
कौतुक चार चौघात करायला हवे तर चुका या एकट्यात त्याही थोड्या वेगळ्या शब्दात सांगायला हव्यात पण बऱ्याच ठिकाणी नेमके याच्या उलटे घडते.
पालकांचा संसारात अति हस्तक्षेप-
आपला मुलगा वा मुलगी किती वाजता उठतो, काय खातो, कुणाला किती पैसे देतो त्यापासून ते रुम मधल्या गोष्टीपर्यँत काही ठिकाणी पालकांचे लक्ष असते. आणि अशी प्रत्येक गोष्ट पाल्याकडून फक्त जाणून च घेतली जात नाही तर त्याच्यावर नाहक सल्ले ही दिले जातात कि हे असे असे असायला हवे शिवाय त्या सगळ्याच बाबतीत संसारात लुडबुड ही केली जाते.फोनवरून पालकांना सर्व रिपोर्टींग करणे हे याचे मोठे कारण आहे.
नाते टिकवूया चळवळीत आत्ताच जॉईन झालेल्या व कौटुंबिक समुपदेशक आणि सल्लागार म्हणून दीर्घ अनुभव असलेल्या छाया सावरकर यांनी सांगितले कि त्यांनी जेवढ्या केसेस हाताळल्या त्यात घटस्फोटासाठी सार्वधिक आढळलेले कारण हे मुलीच्या आईचा तिच्या संसारात अतिहस्तक्षेप हे आहे.आपल्या मुलीला जर मारहाण होत असेल, हुंड्याची मागणी होत असेल, तिच्या जीवाला धोका असेल अश्या वेळी हस्तक्षेप करून जाब विचारायला च हवा पण इतर प्रत्येक गोष्टीत  माहेरहुन लक्ष घालणे चुकीचे आहे.
शिवाय मुलाच्या पालकांनी ही सुनेकडून अवास्तव अपेक्षा, तिच्याकडून माहेरहुन काही आणण्याची मागणी, मारहाण इ. गोष्टी टाळायला हव्यात.
Mould for each other-
जगात made for each other अस कोणीच नसत पण तुम्हाला थोडं mould for each other व्हावेच लागेल
सकारात्मक बदल करण्याची  तयारी- मी बिलकुल बदलणार नाही जे बदलायचं ते समोरच्यानेच हा दृष्टिकोन ही घातकच
.तुलना- सतत दुसर्याशी  तुलना करु नये
काही मुली आपले भाऊ, मामा, काका इ. कडे बघून आपल्या नवर्याची त्यांच्याशी तुलना करतात तर काही मुले आपली बहीण, आई, आत्या इ बघून बायकोशी तुलना करतात व जोडीदाराने असे त्यांच्यासारखे व्हायला हवे अशी अपेक्षा ठेवतात ज्या चुकीच्या आहेत.
स्वतःचे मत बनवण्याची क्षमता- मुलगा असो वा मुलगी जर तो किंवा ती प्रत्येक गोष्ट दुसऱ्याच्या मतावरून ठरवत असेल तर वैचारीक परिपक्वतेअभावी गैरसमज च होण्याची अधिक शक्यता असते.
14.काही गोष्टी सिक्रेट्स ठेवण्याची गरज - नवरा बायकोतील काही गोष्टी या सीक्रेटस म्हणजे गुप्तच असायला हव्यात पण जर एखादा जोडीदार दुसऱ्या कुणाला या गुप्त गोष्टी सांगत असतील तर ज्या व्यक्तीला ते सांगितले जाते त्यातून वाद वाढण्याची किंवा उलटा अर्थ निघण्याची अधिक शक्यता असते.
15.धरसोड प्रवृत्ती नको-
धरसोड व्यक्तींना थोड्या दिवस एखादी व्यक्ती आवडते पण बाहेरहून कुणी फूस दिली कि अरे किंवा अग तुला यापेक्षा जास्त चांगला जोडीदार भेटला असता असे म्हटले आणि पालकांचा ही जर याला दुजोरा मिळाला तर अश्या व्यक्ती असणाऱ्या जोडीदारात सतत चुका शोधू लागतात, तू मला बोलायला पॉईंट देतोस/देतेस असे म्हणून समोरच्यात चुका शोधल्या जातात किंवा नसणाऱ्या चुका भासवल्या जातात ज्यामुळे दुसरा जोडीदार त्रस्त होतो, मग एक जण जोडायचा प्रयत्न करतो तर दुसरा तोडण्याचा प्रयत्न करतो , एक जण खोटे नाटे आरोप करत राहतो व दुसरा प्रत्येक गोष्ट सिद्ध करून दाखवू लागतो.
जोडणाऱ्याला जोडायचे असल्यामुळे तो किंवा ती कसेही करून नाते कसे चांगले होईल यासाठी प्रयत्न करतात समोरच्याच्या चुका दाखवण्याऐवजी स्वतःत सकारात्मक बदल करायची , सुधारण्याची ते तयारी दाखवतात आणि हवालदिल होतात तर तोडणाऱ्याला याची काही फिकीरच नसते त्यामुळे ते मिळेल तिथे खरे-खोटे आरोप करत आणि बदनामी करत जोडणाऱ्याचे मानसिक खच्चीकरण करत राहतात, तिसऱ्या व्यक्तींला सर्व बाजू माहित नसतात त्यामुळे तोडणाऱ्याच्या आरोपांकडे च अधिक लक्ष जाते पण यात जोडण्याचा प्रयत्न करणारा माणूस खचून जातो त्यामुळे धरसोड प्रवृत्ती टाळायला हवी.
16.एकमेकांना स्पेस देणे-
दोघांच्याही काही आवडी-निवडी असतीलच व त्या गोष्टी करण्यास एकमेकांना थोडी स्पेसही द्यायला हवी, उदा एखादी मुलगी चांगली चित्रकार आहे पण लग्न झाले कि तिला त्याबद्दल काहीच करू न देणे हे तिच्या कलागुणांना थांबवण्यासारखे आहे, तिच्या कलागुणांना वाव दिला तर ती आनंदी राहीलच शिवाय त्याचा फायदा ही होईल.शिवाय अश्या स्पेस चा गैरफायदा ही घेता कामा नये म्हणजे आपली पहिली प्राथमिकता कुटूंब ही असायला हवी.
एकमेकांशी विचारांचे टोकाचे मतभेद असतांना ही  ते कायम ठेवून नात्यात मनभेद न ठेवता एकदम सुखी संसार केल्याची अनेक उदाहरणे मला माहित आहेत, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ नरेंद्र दाभोळकर स्वतः अंधश्रद्धा मानत नसले तरी पत्नीच्या इच्छे खातर नऊ वर्ष रोज पत्नीच्या श्रद्धास्थळ असलेल्या मंदिरात ते त्यांना सोडत.महात्मा गांधीनी आश्रमात चहा कॉफी वर्ज्य ठेवली होती ते स्वतः चहा कॉफी घेत नसत त्याला दारू सारखे पेय मानत पण जेव्हा एकदा कस्तुरबांना कॉफी पिण्याची खूप इच्छा झाली तर गांधीजींनी स्वतः त्यांना ती आणून दिली आणि अग्रहाने प्यायला ही लावली.
काही दिवसांपूर्वी अभिनेते श्रीराम लागू यांची मनमोकळ्या गप्पा मारण्याचा योग आला, ते पूर्णतः नास्तिक आणि बुद्धिवादी चळवळीला समर्पित आहेत, मागे 'देवाला रिटायर करा' या त्यांच्या वक्तव्यावर बरीच टीका झाली.त्यांच्याशी गप्पा झाल्यावर त्यांच्या पत्नी दिपाताई यांच्याशी बोललो कि तुम्ही पण याच विचारांच्या का वगैरे त्या हो म्हटल्या पण माझी थोडी श्रद्धा आहे मी गणपती बसवते तेव्हा तो त्याला विरोध करत नाही 'मला फक्त प्रसाद देत जा' अस श्रीराम जी म्हणत असल्याचे त्यांनी सांगितले.
आपली प्रेयसी हितार्थी पारख(गुजरात,) हिला कँसर असल्याचे कळूनही प्रवीण पाटील(सांगली) याने तिच्याशी लग्न केले आणि 5 वर्ष तिच्यासोबत पहाडासारखा उभा राहून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, अशीच कहाणी प्रथमेश आणि सोनालीची, दोघे चांगले मित्र होते सोनालीच्या शिक्षणासाठी प्रथमेश ने आपल्या आईचे दागिने विकले होते पण दरम्यान काही वर्षांत प्रथमेशला कॅन्सर झाल्याचं तिला कळलं. त्याची अवस्था अतिशय बिकट झाली होती. अवघ्या 20 व्या वर्षी कॅन्सर. प्रथमेश पूर्णपणे खचून गेला होता.  तणावाखाली असलेल्या मित्राला प्रेमाची सावली द्यावी, या भावनेतून सोनालीने प्रथमेशशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.  सोनाली म्हणते, “ 25 जून 2018 रोजी आम्ही विवाहबद्ध झालो. या दिवसापासून प्रथमेशला या सगळ्या अडचणीतून बाहेर काढण्याचा मी दृढ निश्चय केला होता. माझ्या आईवडिलांनी नेहमी मला दुसऱ्यांना मदत करण्याचे संस्कार दिल्याने मी हा निर्णय घेऊ शकले."
आजही, प्रथमेशवर उपचार सुरू असून एका कार्यालयात तो अकाऊंट विभागात नोकरी करतो आहे. तर, सोनाली नगरपरिषदेत आरोग्यसेविका म्हणून काम करत आहे आणि त्याची तब्येत पहिल्यापेक्षा खूप सुधारल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
एकीकडे स्वार्थापायी काही नाती तुटताना ही उदाहरणे नाती कशी टिकवावी आणि फुलवावी याबद्दल प्रेरणादायी आहेत तर चला नाती अधिक सुंदर बनवूया
त्यावरूनच अश्या काही केसेस हाताळताना सहज सुचलेली कविता
मानलं तर लग्न  आहे खूप सुंदर #बात
जीवन जगायला मिळतो एक हक्काचा #हात
ज्यांच्यासोबत शेयर करू शकू प्रत्येक #बात
सुख दुःखात मिळते एकमेकांची #साथ
समजून घेऊ एकमेकांना #थोडे
एकत्र मिळवून सोडू आयुष्याचे प्रत्येक #कोडे
करावे एकमेकांवर भरपूर #प्रेम
तिसऱ्या कुणाला मध्ये लावू देऊ नये #नेम 
येतात यात समस्या #कश्यामुळे
तिसर्या कुणाच्या अति #हस्तक्षेपामुळे
जेव्हा दुसऱ्या कुणाला कळते घरातील प्रत्येक #बात
तेव्हा सुरु होतो त्या घराचा #घात
अर्धवट ऐकून मग दिले जातात अनेक #सल्ले
गैरसमजाचे गाठले जातात लांब-लांब #पल्ले
एका शब्दाचे लावून अनेक #अर्थ
केले जाते दाम्पत्य जीवन #व्यर्थ
मान्य नसते कुणी made for each other
पण व्हा कि थोडे Mould for each other
बघ मग कसा संसार होईल #छान
एक बनेल जानू तर दुसरा बनेल #जान
वेगवेगळ्या ठिकाणी वाढल्यावर भिन्न स्वभाव #असणारच
वेगवेगळ्या प्रकृती सारखे कुणी #नसणारच
वेगळेपणातील अनुभवून #सुख 
चल करूया हास्यमय #मुख..  
संकेत मुनोत
नाते टिकवूया चळवळ
8087446346

17 comments:

  1. खूप सुंदर किती बारकाईने विचार करून अभ्यासपूर्ण लिखाण केलंय मस्त मस्त

    ReplyDelete
  2. प्रिय संकेतजी,
    स.न.
    आपण उपकृत केलेला *विवाह नाते निवडताना आणि फुलवताना* हा लेख नुकताच वाचला. लेखातून अलीकडच्या स्पर्धेच्या, गुंतागुंतीच्या संस्करण आणि संकरण काळात आपण खूप मोलाचे विचार मांडत आहात. फेसबुकच्या माध्यमातूनही नाते टिकवण्याचा प्रयत्न करीत आहात याचे मनोमन कौतुक नक्कीच वाटते. सभोवताली नक्कीच सकारात्मक बदल घडून येईल असे नक्कीच वाटते. खरं तर नात्यांमध्ये दगा फटका तुलनेने फारच कमी आणि अज्ञान आणि गैरसमजानेच जास्त जागा व्यापली आहे. वेगवेगळी उदाहरणे देऊन आपण ती दरी कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहात. नात्यातील पीडितांना मानसिक दृष्ट्या सशक्त करण्यासाठी नाते कसे पोक्त आणि संपन्न होईल या दृष्टीने लेखात जोडीदाराच्या निवडी पासून अपेक्षा, सांगत, आवडी- निवडी, मतभेद, इतरांशी तुलना, स्पेस, पालकांचा नको तेवढा हस्तक्षेप इत्यादी महत्वाच्या विषयांची सविस्तर मांडणी केली आहे, शास्त्रीय दृष्ट्या त्यावर आपली मते मांडणे हे वाखाणन्या जोगे आहे.

    आपल्या या उपक्रमातून विस्कटलेले एखादं जरी नाते परत एकत्र पाहायला मिळालं तरी तो किती आनंदाचा क्षण असेल हे वर्णिता येत नाही!

    मी पाप पुण्य मानीत नाही तरीही आपल्या हातून हे खऱ्या अर्थाने पुण्याचं काम होत आहे याचा मला खूप आनंद होतोय. पुढील वाटचालीस माझ्या शक्य तेवढ्या सहकार्यासह हार्दिक शुभेच्छा!

    अरुण यावलीकर, पुणे

    ReplyDelete
  3. प्रिय संकेत,

    लेख छान जमलाय. अगदी प्रौढ अनुभवी माणसाने लिहिला आहे असे चांगले विचार आहेत. तरुणांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल.

    अभिनंदन.💐

    ReplyDelete
  4. Very good written. समजूतदारपण, वयापेक्षा मानसिक तयारी, थट्टा मस्करी हे एकदम पटले👍🏻 महात्मा गांधी चे चांगले विचार लोकांपर्यंत पोहचवणे, व्याख्याने देणे हे तर रक्तातच पण आता नाते संबंध आणि अजून काही गोष्टींवर लिहितोय. संकेत भाई असाच विस्तृत हो. तुझी fan following अशीच वाढत जाईल. अजूनही काही लेखांची, पोस्ट्स ची वाट पाहतोय

    ReplyDelete
  5. Simple formula, negetive point कडे दुर्लक्ष, व positive point ला appreciation असे केले तरी relation टिकतील.

    ReplyDelete
  6. अप्रतिम .... दादा .... तुम्ही करत असलेलं हे समाज प्रबोधन कार्य ...मनाला खुप भावलं ...आणि वाटलं ... या अस्थिर जगात ... काही चांगले माणसं ही आहेत ... जी समाजासाठी निस्वार्थ पणे आपलं आयुष्य झोकुण देतात ...आणि मला आनंद आहे ...की एवढ्या उंचीच्या माणसानं मला मित्र मानलं .... दादा तुज्या या कार्यासाठी माझ्या मनस्वी खुप साऱ्या शुभेच्छा ...💐💐🙏

    ReplyDelete
  7. एकदम सुंदर विश्लेषण

    ReplyDelete
  8. Sanjay D. Somvanshi PatilJuly 24, 2023 at 10:46 PM

    अगदीच छान लिहीलंय..

    ReplyDelete
  9. अप्रतिम लेख संकेत

    ReplyDelete
  10. सहज संवाद साधल्यासारखा वाटतोय लेख,छान आहे.

    ReplyDelete
  11. Saleem Bashir ManiyarJuly 24, 2023 at 10:51 PM

    अगदी बरोबर विश्लेषण सर

    ReplyDelete
  12. गैरसमजातून होणारे वाद...या वैचारिक लेखनीतुन नक्किचं कमी होतीलं याची खात्री वाटते.👌👌👍👍

    ReplyDelete
  13. खूपच छान ... नातं टिकवण्यासाठी नक्कीच उपयुक्त होतील यातील टिप्स.

    ReplyDelete
  14. तुझे लेखन, विचार आणि व्यक्तिमत्व मला नेहमी साने गुरुजी यांची आठवण करून देते. हा लेख देखील अतिशय तळमळीने लिहिलेला सुंदर लेख आहे. मित्र, नातेवाईक यांना नात्यात आलेल्या समस्यांवर विचार करून तू अतिशय विचारपूर्वक मांडणी केली आहेस. तुझ्या पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा! 🌹👏

    ReplyDelete
  15. खुप छान सर

    ReplyDelete
  16. Chetan Panse, NagpurJuly 27, 2023 at 4:51 AM

    संकेत..तुझे लेख म्हणजे खरोखर वैचारिक प्रगल्भतेचा ठेवाच.. ईश्वराचे खुप खुप आभार.. तुझ्यासारखा मित्र आम्हाला मिळाला..🙏😊

    ReplyDelete