AddThis code

Saturday, June 1, 2019

Pralhad Mistri सर एक निस्वार्थपणे कार्य करणारे प्रचंड अभ्यासू , समर्पित असे प्रेरणादायी व्यक्तिमत्व

आपल्या जवळपास निस्वार्थपणे कार्य करणारी बरीच प्रेरणादायी व्यक्तिमत्व असतात पण आपल्याला माहीतच नसतात त्यातीलच एक प्रल्हाद मिस्त्री सर

सहा वर्षांपूर्वी फेसबुकवर ओळख झाली पण आता ते एक जवळचे मित्र आणि मार्गदर्शक आहेत.काहींना वाटत मी नोकरी आणि घर सांभाळून सामजिक कार्य कसा करू शकतो त्या उर्जेमागचे प्रेरणास्रोत आमचे मिस्त्री सर आणि त्यांच्यासारखी व्यक्तिमत्वे, जी मागे राहून बऱ्याच जबाबदाऱ्या पार पाडतात..

प्रल्हाद मिस्त्री सर सध्या नाशिकला राहतात.  त्यांचं मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात आहे. सरांनी १९८१ ला पुणे येथील COEP मधून B.E. (Civil) केले. जानेवारी १९८२ ते ऑक्टोबर १९८६ पर्यंत ते अहमदनगर येथे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता पदावर सेवारत राहिले. दरम्यान त्यांचे लग्न होऊन वर्षभरातच त्यांच्या पत्नीचे अपघाताने निधन झाले. त्यातूनच बालपणापासून ज्या देवाला भेटावे असे त्यांना वाटत होते, त्या जगन्नियंत्याचे नि जीवनाचे गूढ उकलण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु झाला.

नोव्हेंबर १९८६ पासून नाशिकला महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (Maharashtra Engineering Research Institute, MERI, मेरी), येथे त्यांची झाली बदली. इथपर्यंत आईवडिलांच्या ‘कोणाच्या अध्यात नको मध्यात नको, आपण भले आपले काम भले’ या शिकवणीनुसार त्यांची मार्गक्रमणा चालू होती. पुढे ते नाशिकला हिंदूहितासाठी, हिंदूसंस्कृती आणि परंपरांसाठी राबणाऱ्या रा. स्व. संघाच्या संपर्कात आले. संघात आल्यावर त्यांना ‘दिसले’ की, या समाजात ढवळाढवळ करणाऱ्या अश्या बऱ्याच शक्ती कार्यरत आहेत. इथेच आपणही समाजासाठी काही करायचे असते याची त्यांना पहिल्यांदाच जाणीव झाली. तोपर्यंत त्यांना शिक्षणात आलेल्या अडचणीतून एवढेच वाटायचे की, 'आपण जीवनात, एखाद्या तरी गरीब विद्यार्थ्याला उच्च शिक्षण द्यायचे.'

मिस्त्री सरांचं व्यक्तिमत्त्व त्यांच्या मूळ पिंडानुसार वारकरी संप्रदायाशी जवळीक सांगणारं आहे. त्यावेळीही श्रीमद्भगवद्गीता-उपनिषदांचे अद्वैत तत्त्वज्ञान, विपश्यना इत्यादींचा त्यांचा अभ्यास चालू होता. परंतु तेवढ्यावर समाधानी राहतील ते सर कुठले. मग ते बरेच आश्रम फिरले, त्यांनी बरेच गुरु केले आणि टाकले सुद्धा. तशातच ऑफिसमध्ये कुरबुरी सुरू झाल्या. त्यातून मग काहींचे सरांना त्रास देणे सुरु झाले, त्यांचा पगार काही महिने बंद करण्यात आला. मग सरांनी वैतागानेच आणि इतके दिवस त्यांना जे नेहमी वाटत असायचे की, एखादे वर्ष तरी एकांतात जावे त्यासाठी हीच वेळ त्यांना योग्य वाटली आणि कोणासही कोणतीही सूचना न देता मिस्त्रीसर सरळ जंगलात निघून गेले (ऑगस्ट १९९४). सुरवातीला ते एका मित्राकडे शेतावर राहत होते, कोणाशी संपर्क नाही. लोकांच्या संशयी नजरा. मग एक दिवस मुंडण केले, भगवे वस्त्र नेसले; बऱ्याच नजरांचा संशय मिटला. वर्षानंतर मित्रानेच त्रास द्यायला सुरुवात केली. मग एका गावाच्या मंदिरात वर्षभर राहिले. त्यांचा अभ्यास सुरु होता. काही सामाजिक वाचन देखील याच काळात झाले.

आतापर्यंत अद्वैत तत्त्वज्ञान हेच अंतिम सत्य वाटत होते, आता मात्र बुद्धाचे तत्त्वज्ञान आणि अद्वैत तत्त्वज्ञान एकच असल्याचे समजले. खरंतर एखाद्या वर्षानंतर नोकरीत परतावे अशा इराद्यानेच ते बाहेर पडले होते, पण आता त्यांना वाटू लागले की हेच कार्य शेवटापर्यंत न्यावे. त्यानंतर ते इगतपुरी तालुक्यातील एका डोंगरावर एक वर्षभर राहिले. त्यानंतर लोणावळ्याला ‘कैवल्यधाम’ या योगावर संशोधन करणऱ्या संस्थेत एक वर्षभर होते. १९९९ ला त्या संस्थेच्या हीरक महोत्सवानिमित्त एक अंतरराष्ट्रीय चर्चासत्र होते त्यात त्यांनी सुद्धा एक निबंध वाचला. त्यानंतर ते पुन्हा दुसऱ्या जागी जायला निघाले. लोणावळ्यात आले होते तेव्हा त्यांना मर्यादित कालावधीसाठीच परवानगी देणाऱ्या या संस्थेने म्हटले की, ‘आपण Research Scholar म्हणून इथेच राहू शकता, आम्ही मानधन देखील देऊ’. परंतु 'पैशासाठी मग मला नोकरीच बरी होती ना' असं म्हणत सर तिथून निघाले नि वडगाव मावळ तालुक्यातील आंध्रा धरणाजवळ एका डोंगरावरील जंगलात झोपडी बांधून राहिले. तिथे असे समजले की, एका गावातील लोक त्यांना मदत करत आहेत. त्याचे कारण असे की, त्यांच्या गावातील एका मंदिराचे संस्थानातील संस्थानिक गुरूची रिकामी जागा मिस्त्री सरांनी घ्यावी, अशी त्यांची इच्छा होती. तेथील अडचणी आणि लोकांचा उपद्रव टाळण्यासाठी सरांना एखाद्या खाजगी संरक्षित जागेत निवास असावे असे वाटत होते. तसे त्यांनी आवल्या एका कार्यकारी अभियंता मित्राला सांगितले, तेव्हा त्याने माझ्यासाठी काही जमीन घेण्याची तयारी दर्शवली. पण ही जमीन पैसा रिचवण्यासाठी सरांच्या नावावर घ्यायची अशी या मित्राची कल्पना होती. या गोष्टीला सर वैतागले. त्यांना जीवनात त्यांच्या नावावर काही जमीन जुमला मालमत्ता नको होती. परंतु व्यवहार सुटत नाही, तो सोडण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या कशात तरी गुंतू हे संकट पाहून पुन्हा त्यांनी नोकरीत शिरण्याचा प्रयत्न केला. मे २००३ मध्ये ते पुन्हा नोकरीत आले. त्यांची अनुपस्थिती सेवकाल धरून त्यांना शिक्षा म्हणून नव्यानेच समजून नियुक्ती देण्यात आली. २००५ मध्ये सरांचे मित्र श्री. विजय पांढरे हे मेरीला 'अधीक्षक अभियंता' या पदावर आले होते. नोव्हेंबर २०१३ मध्ये ते सेवानिवृत्त होईपर्यंत सर त्यांचे मित्र आणि कार्यालयीन स्वीय सहायक या दोन्ही नात्याने त्यांच्याबरोबरच होते. ते नाशिकला एकटेच राहत होते. त्यांनी सिंचन घोटाळा उघडकीस आणल्यानंतर त्यांच्या सेवेची शेवटची दोन वर्षे २४ तास मिस्त्री सर त्यांच्याबरोबर होते.  मे २०१५ मध्ये मिस्त्री सर ज्या पदावर शासकीय सेवेत पुनःच्च रुजू झाले होते त्याच पदावरून आपला कार्यकाळ पूर्ण करून निवृत्त झाले.
मिस्त्री सर म्हणतात,
"अध्यात्मिक अनुभव असा की देवाच्या शोधार्थ निघालेला मी आज नास्तिक आहे. नोकरी मध्येच सोडतांना अंधारात उडी घेणारा मी, कोठेही पोहोचलो नसलो तरी करीत असलेल्या वाटचालीत आत्मविश्वास आहे. माझ्यासारखे देवाच्या शोधार्थ भटकलेले अनेक तरुण भेटले, गृहस्थी भेटले. काहींना माझे विचार पटले. काहींनी तक्रार केली, ‘तुम्ही आम्हाला श्रद्धाहीन करून टाकले’. जीवनात कोठेतरी, कुणावर तरी श्रद्धा असावीच याची गरजच काय? जर गरजच असेल तर ती श्रद्धा स्वतःवरच असावी."

धर्म, अध्यात्म, परमार्थाच्या या जंगलात अनेक भटकले आहेत.  एका IAS झालेल्या तरुणाचे त्यांनी आत्मचरित्र वाचले. अध्यात्माच्या नावावर तो चालत असलेला रस्ता चुकीचा, अंधश्रद्धेचा आहे असे सूचित करणारे एक दीर्घ पत्र सरांनी त्याला लिहिले. काहीच प्रतिसाद नाही. तसेच स्वतःच्या अनुभवांचा विज्ञानाधारित चुकीचा, बादरायण अर्थ लावणारे पुस्तक एका तरुणाने लिहिले होते. सरांनी 'आपले हे पुस्तक तरुणांना भरकटून टाकेल', असे त्याला लिहिले. त्याने आपल्या चुका मान्य केल्या. परंतु त्याचा प्रकाशक मात्र पुस्तक खपते आहे म्हणून आवृत्त्या काढतोच आहे आणि हा लेखक त्यास प्रतिबंध करीत नाही.

आज अध्यात्मिक क्षेत्रात योग्य मार्गदर्शन करणारे लोक दिसत नाहीत, ही सरांची खंत सर नेहमीच बोलून दाखवत असतात. ते म्हणतात "योग्य अध्यात्मिक मार्गदर्शन ही जगाची गरज आहे. ज्यांच्या अंतरात गोंधळ आहे, संघर्ष आहे, असेच लोक बाहेरील जगात गोंधळ, संघर्ष निर्माण करतात. बुद्धाने आत्मा नाकारला, परमात्मा नाकारला असे तुम्ही कितीही ओरडून सांगितले तरी माणसाची आपल्या अस्तित्वाची जिज्ञासा, कुतूहल मिटत नाही."

सर नाशिक शहराच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीत एक पदाधिकारी म्हणूनही काम करत आहेत. त्यांच्या घराशेजारी काही बांधकामे चालू आहेत. एक दिवस त्यांच्या लक्षात आले, तिथल्या मजुरांची मुले अभ्यासात कच्ची आहेत. काही महिन्यांपासून सर त्यांना शिकवत आहे. याबद्दल सरांशी एकदा बोललो असताना सर अत्यंत साधेपणानी जे म्हणाले ते शब्द नी शब्द आजही मला जसेच्या तसे आठवतात. तेंव्हा सर म्हणाले होते की, "मी फार काही मोठे कार्य करतोय असे अजिबात नाही. उलटपक्षी जीवनात काहीही न केलेल्या वा न करू शकलेल्या अनेक माणसांपैकीच मी ही एक आहे.  फक्त तुझ्यासारख्या (संकेत मुनोत) सामाजिक म्हणा, किंवा कोणत्याही क्षेत्रात धडपडणाऱ्या तरुणांना दोन चार शब्दांनी केवळ प्रोत्साहन देत असतो. कारण माझ्याकडून प्रेरणा घेण्यासारखे काही नाही. तू मला या समूहात प्रवेशाची शिफारस केली. येथील सभासदांचे अनुभव आणि त्यांच्या चर्चा माझ्या अनेक क्षेत्रातील ज्ञानात भर घालतात. परंतु इथे काही शेअर व्हावे असे माझ्याकडे काही नाही याची खंत वाटते. बऱ्याच सभासदांची नावे वर्तमानपत्रात वाचतो. कधी भेटू. सर्व सभासदांचा मी आभारी आहेत."

माझी सरांची ओळख
  मी सामजिक चळवळीत जे थोडे फार योगदान देण्याचा प्रयत्न करतो त्याला सरांची साथ असते म्हणून ते शक्य होते.
मला वेळोवेळी प्रोत्साहन देणारे, चुकलो तर सांगणारे असे प्रल्हाद सर, आमची ओळख तशी फेसबुक वरच झाली. मी एका गांधींविचारा संदर्भातील लेखाला comment दिली होती कि हे खोटे आहे असं असं सत्य आहे. तर तिथे पोस्टकर्त्याच्या मित्र मंडळींनी मला ट्रोल करणे सुरु केले मी दुर्लक्ष केले. पण तिथे प्रल्हाद सरांची अभ्यासपूर्ण अशी  5-6 वर्षापूर्वी माझ्या कॉमेंट ला प्रतिक्रिया आली, मग थोडे मेसेजेस झाले मी ही त्यांना तुम्ही छान लिहिले वगैरे म्हणालो मला काय माहित कोण आहेत ते? पण नंतर फोन नंबर वगैरे शेयर केल्यावर या गोष्टी समजल्या. सुरवातीला फोनवर गप्पा होत. मग पूणे विद्यापीठ मध्ये ते पाली शिकायला खास नाशिक हुन काही दिवस येत तेव्हा भेट झाली, त्यांनी गांधीविचारांची बरीच पुस्तके मला दिली, मला आत्ता जो नवरत्न पुरस्कार मिळाला त्याचा नॉमिनेशन फॉर्म भरणे ही माझ्याकडून शक्य झाले नाही. तेव्हा सरांना फोन करून सांगितले कि सर असा असा फॉर्म आहे तारीख संपत आली आहे पहा भरता आला तर आणि सरांनी तो माझ्या वतीने भरला, सरांचे बाकी ठिकाणी ही योगदान खुप मोठे आहे, knowing Gandhism , चांगले विचार यांच्या तिन्ही स्नेहसंमेलनामधील बरीचशी धडपड सरांनी केली.
सरांचे कार्य असेच वाढत राहो आणि आम्हाला प्रेरणा मिळत राहो
सरांचे वाढदिवसा निमित्त हार्दिक अभिष्टचिंतन!

No comments:

Post a Comment