AddThis code

Saturday, June 15, 2019

आई

मी आज जे काही आहे त्यात या माऊलीचे मोलाचे योगदान मोठे आहे.
मला आठवतय मी 3-4 वर्षाचा असतांना आमच्या घरी काहीच नव्हते , आई शेजारून पोळपाट आणून पोळ्या लाटत असे एक- एक भांडे हळू-हळू घरी येत गेले, मी 10 वीत असतांना पप्पांची नोकरी गेली होती, नवीन नोकरी लागण्यास अवकाश होता तेव्हा एवढया दिवस गृहिणी असणाऱ्या आईने स्वतः नोकरी जॉईन केली, सकाळी घरातील सगळे कार्य करून ती नोकरीला जात असे.पुन्हा काही महिन्यानंतर वडील एका ठिकाणी नोकरी लागल्यावर आईने नोकरी सोडली पण घरातील सगळे कार्य सांभाळून सोबत फॉल पिको आणि अनेक गोष्टी ती करते, फॉल घरी बसवत असली तरी पिको करण्यासाठी फक्त 50 पैश्यासाठी लांब लांब चालत जात असे.मला वाचनाची गोडी आईमुळेच लागली.

एक सर्वात मोठी गोष्ट आईकडून शिकायला मिळाली ती म्हणजे कोणी आपल्याशी कसेही वागले तर आपण त्यांच्याशी चांगलेच वागायचे(याउलट इतर लोक म्हणत कि जशास तसे वागावे), म्हणजे अनेकदा असे होई कि समजा कधी कुणाशी भांडण झाले आणि मी घरी तक्रार घेऊन आलो कि आई त्याने मला मारलं किंवा हे चुकीचं केलं मी आता त्याच्याशी बोलणार नाही मी पण अस अस करेन, मारेन..etc म्हणत असे तर ती मलाच ओरडत आणि ठणकावून सांगत कि तू चांगलंच वगायच, मला तेव्हा आईचा प्रचंड राग यायचा पण आज सामजिक चळवळीत पडल्यावर किंवा गांधींविचारांचा अभ्यास करू लागल्यावर तेच नव्याने शिकायला मिळतंय.
नातेववाईकांमध्ये सुद्धा प्रत्येकाशी आई प्रेमाने वागते म्हणजे कधी कधी असे होते कि वादातून काही जण एकमेकांशी बोलतच नाहीत ना एकमेकांच्या घरी जातात पण आईशी हे सर्वच चांगलं बोलतात, काही प्रसंग असेही पाहिले कि जिथे चुकी आईची नसते पण समोरचा गैरसमज करून घेऊन रागात खूप काही बोलून जातो पण आई अश्यांना ही समजावून सांगते शिवाय अनेकदा स्वतःची चुकी नसतांना स्वतः झुकुन क्षमा मागते, कोणाशीही नाते न तोडायची सगळ्यांशी विनम्रतेने वागायची तिची ही सवय नकळत मला थोडी का होईना लागली, टीव्ही चर्चा किंवा लेखांमध्ये सत्यासाठी भांडत असलो किंवा ठाम भूमिका घेत असलो तरी वैयक्तिक जीवनात मी भांडण टाळतो आणि जर झालेच तर चुका स्वतःवर घेऊन नाते अधीक बळकट करू शकतो ते त्यामुळेच, पाहुणचार बद्दल बोलायचे तर आमचं घर पुण्यात मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे बहुतेक सासर व माहेर ची मंडळी आमच्या घरी च येतात तर आई कधीच कुणालाच उपाशी पोटी जाऊ देत नाही (पुणेकर झालेली असूनही😉).आणि विशेष म्हणजे सर्वांना समान वागणूक म्हणजे हा नातेवाईक श्रीमंत आहे किंवा याच्याकडे हे काम आहे म्हणून याला वेगळा पाहुणचार आणि गरीब आहे किंवा याच्याकडे आपले काही काम नाही म्हणून याला वेगळा पाहुणचार अश्या गोष्टी नाहीत सगळ्यांशी समान वागते.

पण मला तिचे दैवतीकरण ही करायचे नाही, जश्या उणीवा माझ्यात व आपणा सर्वात आहेत तश्या काही तिच्यात ही आहेत व त्या मी तिला वेळोवेळी सांगतो ही (जस कि टीव्ही वर त्या बोरिंग कौटुंबिक मालिका पाहून भावनिक होणे), शिवाय प्रत्येक गोष्ट आई म्हणेल तसेच करणे तिच्या शब्दाबाहेर न जाणे मला पटत नाही, होय मोठया वृक्षाची सावली आवश्यकच आहे पण जर स्वतःला घडवायचे असेल तर थोड बाहेर पडायलाच हव आणि स्वतः ऊन-पाऊस-सावली- वादळ यांच्याशी सामना करायला हवा.
कधी कधी कोणी खूप वाईट वागले, कमी लेखले तर आई तेव्हा म्हणते संकेत तुला सांगितलं ना चांगले पैसे कमव कार बंगला घे मग बघ कस वागतात ते,  तर तुला एवढंच सांगतो आई कि मी नोकरी व्यवसाय आपल्या सर्वांची स्वप्न पूर्ण करू शकेल व जबाबदाऱ्या व्यवस्थित हाताळू शकेल यासाठीच करत आहे. माझ्यामुळे तुम्हाला किंवा कुठल्याही कुटुंब सदस्याला अन्न-वस्त्र-निवारा-आरोग्य-शिक्षण व इतर गोष्टीत कुठलीही कमी पडू देणार नाही एवढ अर्थार्जन मी नक्कीच करेन आणि कुठलीही जबाबदारी झटकणार नाही पण यासोबतच माझी काही सामजिक बांधिलकी ही आहे तीही जपेन , तुला आठवतय ना मी आयोजित केलेल्या एका सामजिक कार्यक्रमात शारदा बापट तुला म्हणाल्या होत्या ना कि तुम्ही मुलाला छान संस्कार दिलेत तेव्हा तुझ्या डोळ्यात आलेलं पाणी अजूनही आठवतय मला आणि असे बरेच प्रसंग आहेत ना आई.शेवटी एवढंच म्हणेन कि कधीही कुणाला आईवरुन शिवी देणार नाही प्रत्येक महिलेचा तुझ्याप्रमाणेच आदर करेन आणि कधीही तुझी मान खाली जाईल असे अप्रामाणिक चुकीचे काम करणार नाही
संकेत मुनोत

Please do Comment, Share ,Follow and Subscribe

No comments:

Post a Comment